Jun 19, 2009

काही अनुभव..पावसाळलेले!


पावसाची बरेच दिवस वाट पाहिली, शेवटी कंटाळून सकाळी पावसाच्या अनुपस्थितीतच कांद्याची "खेकडा' भजी (खेकड्याच्या पायांसारखी दिसणारी. खेकड्याचे पाय घातलेली नव्हे!) करून खाल्ली. वर बायकोला एकही न ठेवल्यानं, संध्याकाळी तिच्या शिव्याही खाल्ल्या! दुपारी पावसाचा मस्त शिडकावा झाला आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. क्षणार्धात अनेक पावसाळलेल्या सहली डोळ्यांसमोरून तरळून गेल्या.

कॉलेजात होतो, तेव्हा आमचा "नेचर क्‍लब' नावाचा अभ्यासाच्या नावाखाली भटकंती करण्याचा (उनाडक्‍या म्हणा हवं तर!) क्‍लब होता. विशेषतः पावसाळ्यात या भटकंतीला बहर यायचा! एकदा पावसजवळ असंच "एक्‍सकर्शन'ला गेलो होतो. सकाळी कुठली तरी झाडं-पानं बघायची, त्यांचा अभ्यास वगैरे करायचा आणि दुपारी एकत्र जेवण, गाण्यांच्या भेंड्या, विविध गुणदर्शन वगैरे. संध्याकाळपर्यंत घरी परत, असा कार्यक्रम असायचा. दुपारची जेवणं वगैरे उरकली होती. नरडीही साफ करून घेतली होती. पावसच्या जवळच्या माळरानावर आम्ही होतो आणि तुफान पाऊस आला. कोकणातलाच पाऊस तो! त्यातून मोकळं माळरान आणि जुलैचा महिना! कुणाचीच त्याला अडवायची शामत नव्हती, आणि तोंड द्यायचीही! पावसाच्या तडाख्यात आम्ही मस्तपैकी सापडलो होतो. मोठ्या हरभऱ्याच्या आकाराचे ते टपोरे थेंब टणाटणा तोंडावर-अंगावर आपटत होते. छत्री-बित्रीनं तग धरण्याचा प्रश्‍नच नव्हता. वाराही सोसाट्याचा होता. कसेबसे त्या तडाख्यातून वाचून रस्त्यापर्यंत आलो. पाऊस थांबायची लक्षणं नव्हती. बऱ्याच वेळानं तो कमी झाला. एसटी गाड्या वेळेवर येण्याची चिन्हं नव्हतीच. आमची परतीची गाडी रत्नागिरीहून सुटलीच नसल्याचं समजलं. मग पर्यायी व्यवस्था बघणं आवश्‍यक होतं. शेवटी एक टेम्पो ठरवला. वाळूची वाहतूक करणारा टेम्पो होता तो. हौद्यातल्या काही फळ्या निसटल्या होत्या, काही मोडलेल्या होत्या. अख्खा माणूस मधून रस्त्यावर पडेल, अशी परिस्थिती होती. नशीब, वरती हूड (ताडपत्रीचं छप्पर) तरी होतं. सगळी मेंढरं टेम्पोत चढली. टेम्पोवालाही त्या घाटरस्त्यातून पावसाच्या तुफान माऱ्यातही "फॉर्म्युला वन'मध्ये भाग घेतल्यासारखाच टेम्पो चालवत होता. त्यामुळं आम्ही कधी उजव्या बाजूच्या, तर कधी डाव्या बाजूच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीला जात होतो. टेम्पोच्या हौद्याच्या कठड्यांना धरून जी मुलं उभ
ी होती, त्यांच्या हाताच्या आधारानं मध्यभागी मुलं-मुली उभ्या होत्या. हात जरा जरी सुटला, तरी रस्सीखेचीत दोरी सुटल्यावर जसे सगळे एकमेकांच्या अंगावर कोसळतात, तशी अवस्था होत होती. मध्येच कुणाचा पाय खाली जायचा, कुणी खांबावर आपटायचं! वर पावसाची मजा घ्यायला गाण्यांचा धिंगाणाही होताच.

आणखी एक पावसाळी अनुभव होता ढाक-भैरीचा. आमच्या क्‍लबबरोबर 31 डिसेंबरच्या रात्री आम्ही कामशेतजवळच्या ढाक-भैरीच्या ट्रेकला गेलो होतो. कामशेतवरून टेम्पोतून जायला आधीच धमाल आली होती. रात्री एका मित्राच्या टेंटमध्ये मस्त गाणी म्हणत बसलो होतो. बाकीचं पब्लिक देवळात जागा शोधून गुडूप झालं होतं. मी आणि आणखी दोन मित्रांची किशोरकुमारची गाणी रंगात आली होती. त्याच वेळी पाऊस आला. तिसरा जो होता, तो पावसासाठी आडोशाचं कारण दाखवून पळाला. मग आम्ही दोघंच राहिलो. बाहेर भरपूर पाऊस, तंबूतही खालून पाणी यायला लागलेलं, अशा स्थितीत आम्ही किशोरकुमारच्या दर्दभऱ्या गाण्यांच्या मैफलीत दंगून गेलो होतो. पहाटे तीन-चारला झोपलो असू. तेही देवळाच्या कातळामुळे थंडगार पडलेल्या गाभाऱ्यात, उंदरांच्या सहवासात!
पहिल्यांदा केलेला तोरणा ट्रेकही पावसाच्या उपस्थितीत असाच धम्माल झाला होता. जाताना धबधब्यात मनसोक्त भिजलो होतो आणि येताना एका बंधाऱ्याच्या अडवलेल्या पाण्यात! ड्यूक्‍स नोजच्या धबधब्याला तर पर्याय नाही!!
धबधब्याखाली मनसोक्त भिजायचं राहिलं तसं गेल्या वर्षी. ताम्हिणी घाटात एकदाही गेलो नाही. एकदा फक्त पौड रस्त्यालाच "लवासा सिटी'जवळ गेलो होतो. पण कारमधून गेलो होतो. त्यामुळं भिजलो नाही. शिवथरघळीलाही गेलो, तिथेही येताना भिजू म्हटलं आणि राहून गेलं. यंदा बरेच प्लॅन्स आहेत, पण अजून पावसाचा पत्ता नाहीये!
rain

No comments: