Feb 5, 2009

`तारे' जमीं पर नव्हे, जमीनदोस्त!

कित्ती हुशार आहे हो तुमची मुलगी! किती छान नाचते, हावभाव करते, समज तरी किती आहे तिला वयापेक्षा!!
या आणि असल्या प्रशंसेने आम्ही (आणखीनच) फुगलो होतो. त्यातून भर पडली, सारेगमप सुरू झाल्यानंतर तिच्या आणि मुग्धा वैशंपायनच्या तुलनेची. "सेम टू सेम मुग्धा हं!' अशा कॉंप्लिमेंट्‌स मनस्वीला घडोघडी, जागोजागी मिळू लागल्या. "अगं मुग्धा, मला ओळखलंस का?' असं थेट विचारणाऱ्या अनोळखी बायकाही ठिकठिकाणी भेटू लागल्या. जणू या बया गेल्या जन्मी मुग्धाच्या आयाच होत्या आणि आता नव्या जन्मात मुग्धानं मनस्वीचं रूप घेतल्यानंतर त्या तिला जुनी ओळख दाखवू पाहत होत्या!
मनस्वीच्या अंगातही मग "मुग्धा' संचारायला वेळ लागला नाही. आधी "एकापेक्षा एक' चालू असताना ती भार्गवी चिरमुले, अमृता खानविलकर होती. आता मुग्धा, आर्या, कार्तिकी झाली. मग शाळेतून घरी आल्यानंतर तोंडापुढे मुठीचा माईक धरून ती घराचा "सारेगमप'चा मंच करून टाकायची! मला आणि बायकोला आलटून पालटून अवधूतदादा आणि वैशालीताईच्या भूमिका बजावायला लागायच्या.
तर अशी ही "सर्वगुणसंपन्न, नृत्यनिपुण, अष्टकलापारंगत' मनस्वी शाळेच्या पहिल्या स्नेहसंमेलनात धिटाईनं स्टेजवर उभी राहिली आणि नाचली, तेव्हा आम्हाला कोण आनंद झाला होता! घरी करून दाखवत असलेल्या सगळ्या स्टेप्स तिनं तिथे स्टेजवर जशाच्या तशा साकारल्या, तेव्हा आम्हाला खुद्‌कन हसूही आलं होतं. एकमेकींना टाळी देतानाचा गोंधळ तर पाहण्याजोगा! या धिटुकलीची ही धिटाई बघायला अख्खा परिवार लोटला होता.
मग डिसेंबरात दुसरं स्नेहसंमेलन आलं. "शाळेत नुसते डान्स नि गॅदरिंगच घेतात की काय,' पासून सर्व प्रचलित वाक्‍यांची पुन्हा पारायणं झाली. प्रत्यक्षात स्नेहसंमेलनाच्या दिवशी आधीच्या एवढी मजा आली नाही. एकतर तिथे शूटिंग करायला, फोटो काढायला शाळेनं अचानकच बंदी केली. त्यामुळं आमचा पोपट झाला. त्यातून मनस्वी एवढी चांगली नाचणारी असूनही तिला दुसऱ्या रांगेत उभं केल्यानंही आम्ही धुसफुसत राहिलो. म्हटलं, जाऊ द्या! पुन्हा कधीतरी बघून घेऊ!
या भक्कम पायाभरणीच्या जोरावर आमचे स्वप्नांचे इमले म्हणजे अगदी गगनाला भिडले होते. त्यामुळं तिच्या "बाल भवन'चं गॅदरिंग जाहीर झालं, तेव्हा तर मनस्वी "बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे' ठरणार, हे आम्ही मनातल्या मनात पक्कं करून टाकलं होतं! खोकला का काही कारण झालं आणि स्नेहसंमेलनाच्या आदल्याच दिवशी म्हणजे, शेवटच्या प्रॅक्‍टिसला आम्ही तिला पाठवलं नाही. म्हटलं, करेल ती लक्षात ठेवून!
स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला. विशेष ड्रेसकोड नव्हता, त्यामुळं मुलीला नटवताना आईची "हा ड्रेस की तो,' अशी त्रेधातिरपीट उडाली. सगळं साग्रसंगीत आवरून तिला बाल भवनात नेली. तिसराच डान्स तिचा होता. "बरं का रे मोरा' या गाण्यावर. ते गाणं बाल भवनचंच असल्यामुळं आम्ही आधी ऐकलेलं नव्हतं. आधीची तिची गाणी "आज गोकुळात रंग' आणि "उदे गं अंबे उदे' होती. मनस्वीच्या डान्सची वेळ आली आणि पडदा उघडला. मनस्वीसह तिघी मुली नाचणार होत्या आणि मुलगे मोरासारखे उभे राहणार होते. सुरुवातीच्या वाक्‍यानंतर तिन्ही मुलींनी पुढे येऊन मुलग्यांभोवती नाचायचं, असलं काहीतरी ठरलं असावं. दोघी मुली पुढे आल्या आणि त्यांचा ठरलेला नाच करू लागल्या. मनस्वीसुद्धा पुढे आली आणि स्तब्ध उभी राहिली. समोर कोण बसलंय, लाईट कुठे लावलाय, भानुदासकाका कुठे दिसताहेत, गटातल्या मुली आहेत का, आई-बाबांचे चेहरे दिसताहेत की नाही, वगैरे वगैरे कुतूहल शमविण्याचा ती प्रयत्न करत होती. गाण्याकडे तिचं ढिम्म लक्ष नव्हतं. बरं तिच्यासोबतचा मुलगाही तिच्याहून वरचढ निघाला. त्या बाबानंही काही तिला हलवलं नाही, की बाईंनी स्टेजवर येऊन ढकललं नाही. अख्खं दोन-तीन मिनिटांचं गाणं तिनं एका जागी उभी राहून "एन्जॉय' केलं.
त्या दिवशी संध्याकाळी तिचा मूड जाऊ नये, म्हणून दुपारी व्यवस्थित दामटून झोपवलं होतं. खायला घालून तिथे नेलं होतं. त्यामुळं यापैकी कुठली कारणं तिच्या "नॉन-परफॉर्मन्स'च्या आड येणारी नव्हती. तिनंही न नाचण्याचं कारण गुलदस्तातच ठेवलं. अजूनही ते आमच्यासाठी एक गूढच आहे!
"तारे जमीं पर'मधले पालक मुलावर अपेक्षांचं ओझं लादतात. आम्ही तिच्याबद्दलच्या अपेक्षांचं ओझं स्वतःवरच लादून घेतलं होतं, बहुधा. बाल भवनात त्या अपेक्षांचा फुगा फुटला. कानात बसलेले दडे अजून मोकळे होताहेत...!

1 comment:

साधक said...

टायटल खूपच भारी आहे. मस्त वाटलं.
लेखही तितकाच छान. मजा आली वाचताना.