Oct 2, 2007

शुद्ध काही जीवघेणे...

"शुद्ध' काही जीवघेणे...

---------
व्याकरण, भाषा, यांचा आग्रह अस्मादिकांना पूर्वीपासूनचा.
मी काही तर्कतीर्थ नाही, की भाषासुधारक वि. दा. सावरकर.
पण माणसानं निदान शुद्ध, व्यवस्थित, दुसऱ्याला समजेल, अशा सोप्या पण स्वच्छ भाषेत बोलावं, एवढा बरीक आग्रह.
किंबहुना, हट्टच.
(त्यामुळं गृहस्वामिनीशीबरोबरही अनेकदा समरप्रसंग ओढवतात. असो.)

पुण्याची भाषा अधिक शुद्ध, व्याकरणाग्रही, आदीम आहे, असा आमचा आपला पूर्वीपासूनचा ग्रह. पण पुण्यात दहा वर्षांच्या मुक्कामातला अनुभव जवळपास नैराश्‍यजनकच. आता, काही तज्ज्ञ मंडळी म्हणतील, बाहेरून आलेल्या (आमच्यासारख्या) लोकांनीच पुण्याची भाषा बिघडवली. पण मी हे बोलतोय हे पुण्यात राहणाऱ्या, म्हणून पुणेकर असलेल्या बाहेरच्या बुणग्यांविषयी नाही; तर ज्याच्या पिढ्यान्‌ पिढ्या पुण्यातच जन्मल्या (आणि खपल्या) आहेत, अशा अस्सल पुणेकर म्हणवणाऱ्यांबद्दल.

"तुम्ही येणार आहे काय,' हे मराठी व्याकरण मला पुण्यात आल्यावरच लक्षात आलं.
"तू येणार आहेस काय,' "तो येणार आहे काय' आणि "तुम्ही येणार आहात काय,' ही वाक्‍यरचना योग्य, असं आमचं आपलं मराठीचं दुबळं ज्ञान आम्हाला सांगतं.
पण "तुम्ही येणार आहे काय' ही आमच्या ज्ञानात भरच.

"सिंह' ( lion ) हा शब्द लिहिताना "सिंह' लिहायचा आणि "सिंव्ह' असा उच्चारायचा, अशी आपली आम्हाला पुस्तकातून, अभ्यासातून, शाळेतून मिळालेली शिकवण. पण पुण्यालाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला ज्याचा अभिमान असला पाहिजे, अशा सिंहगडाचा उच्चार अस्सल पुणेकरही "सिंव्ह'गड' नव्हे, तर "सिंह'गड असाच करताना पाहून, तानाजी नावाच्या नरसिंहाचे बलिदान व्यर्थ जाते की काय, अशीच शंका आमच्या मनाला (सिंहासारखी) चाटून गेली.

पाण्याची "टाकी' असते. पाण्याचं "टाकं' हा शब्द मला पहिल्यांदाच कळला.
पुठ्ठ्याचा खोका असतो. "खोकं'ही नवीन होतं.
माळावर वारा सुटतो. "वारं' मला न झेपणारं होतं.

बाकी तो लसूण की ती लसूण,
ती लसणीची चटणी, की ते लसणीचे तिखट.,
तो ढेकर की ती ढेकर,

तो लाईट की ते लाईट,

हे वाद तर आदीम आहेत. आणि त्यांना अंतही नाही. त्यांत मला पडायचं नाही. पण वानगीदाखल (वांगीदाखल) काही उदाहरणं दिली.

फुटाणे म्हणजे, साखर-फुटाणे.
इथे चण्यालाच फुटाणे म्हणतात.

आता यापुढची काही उदाहरणं अस्सल पुणेकराची नसतील, पण एकूण अनुभवावरची आहेत.
त्याबद्दल मी अस्सल पुणेकराला दोष देणार नाही.

वात आणणारे काही शब्द ः
(माझ्या मते) योग्य शब्द सुरुवातीला आणि त्याचं अपरूप शेवटी.
पोळी - चपाती
(अनेकवचनी) केस - केसं
किल्ली - चावी.
पेन्सिली/पेन्सिल्स - पेन्सिल्या
गटारे - गटारी
(एकवचनी) कारंजे - कारंजा
आमटी - डाळ
भात - राईस

--------------

आता, डोक्‍याची मंडई करणाऱ्या (हाही वाक्‍प्रचार पुण्यातलाच!) काही प्रश्‍नांची जंत्री

ः1. स्थळ ः अमृततुल्य हॉटेल कम टपरी. (इथे फक्त चहा आणि चहाच मिळतो. अगदी डोक्‍यावरून पाणी म्हणजे साधं बिस्कीट आणि क्रीम रोल.)
तिथे आपण एकटेच चहा प्यायला गेल्यावर, कळकटातला कळकट वेटर खुणेनंच विचारतो ः"एक' का?(म्हणजे बोटानं फक्त "एक'ची खूण. संभाषण नाहीच.)

अरे बैला, मी काय तुझ्याकडे "सुपरपॉवर रिन' विकायला आलोय? एकटा चहा प्यायला आलेलो दिसतोय ना? मग (शक्‍य असेल, तर बोटं बुडवून) चहाचा कप बोडक्‍यावर आपट, नाहीतर तोंडानं विचार ना! खाणाखुणा कसल्या करतोयंस?
---
2. स्थळ ः अस्मादिकांच्या सोसायटीचे पार्किंग, किंवा घराचा दिवाणखाना, किंवा कोणतीही जागा.
वेळ ः दुपारी अकरा, बारा, दोन किंवा तीन, चारपर्यंत कोणतीही.
समोरून कुणातरी परिचिताचे आगमन, किंवा फोनवरून संभाषण.
अगदी निरागस, प्रामाणिक विचारणा ः आज "सुटी' का?

पण त्याची ही निरागसता तळपायाची आग मस्तकाला नेऊन भिडवणारी.
अरे अकलेच्या खंदका! नतद्रष्टा! मी पत्रकार आहे! सकाळी उठल्यावर चहा ढोसताना तुला ज्या ताज्या बातम्या चवीचवीनं वाचायला आवडतात (आणि चॅनेलवरची एखादी बातमी त्यात रंगवून सांगितलेली नसली, तर तू शिव्या घालतोस,) त्यासाठी जोडे, लेखणी आणि की बोर्डची बडवाबडवी मला आणि माझ्या जमातीतल्या समस्त पोटार्थ्यांना रोजच करावी लागते. तुझ्यासारखं दहा ते सहा ऑफिस, मग निवांत घरी चहा-पोहे, पर्वती, रात्री साडेआठला वरणभात नाहीतर गुरगुट्या भात आणि पावणेदहापर्यंत गुडूप, असं सरळ, साधं, सोपं आयुष्य नाही आमचं! तुमच्या गरजेपोटी आम्हाला रात्री एकपर्यंत लोकांच्या कुलंगड्यांच्या उठाठेवी करत, सोमालियापासून हिरडोशी बुद्रुकपर्यंतची उष्टी-खरकटी आवरत बसावं लागतं. रात्री अकरा-बारा-एक कितीही वाजेपर्यंत उपाशी पोटी भरल्या घरच्या धन्यांच्या भाषणांच्या बातम्या देत बसावं लागतं.संध्याकाळी आणि रात्री ऑफिसमध्ये म्हटल्यावर सकाळी (आणि सकाळीच) मी घरी असणं अपेक्षित आहे ना? मग कशाला तेच तेच प्रश्‍न विचारून डोकं पिकवतोस?
---

3. तुम्ही "एडिटिंग' म्हणजे नेमकं काय करता? अग्रलेख पण तुम्हीच लिहिता का?

या प्रश्‍नावर त्या माणसासमोर लोटांगण घालणं किंवा स्वतःच्या डोक्‍याचे केस उपटून घेणं, याखेरीज दुसरा काहीच पर्याय नसतो.
असे हे काही प्रश्‍न.
काही शुद्ध, पण जीवघेणे!

यांतून सुटका बहुधा अस्मादिकांचे अवतारकार्य संपुष्टात येईपर्यंत तरी नाही!
-------------

Sep 30, 2007

ग्राफिटी नगरच्या भेटीला...

मित्रहो,

"ग्राफिटी'निमित्त मुलाखतींचे कार्यक्रम सध्या करतोय.
म्हणजे, मुलाखती देत फिरतोय.
आपल्याला काहीही वर्ज्य नाही...यशवंतराव, साधना कला मंच, हाउसिंग सोसायट्या, हळदीकुंकू, मंगळागौर, केळवण, डोहाळजेवणं...!!!
शनिवारी नगरला कार्यक्रम झाला. आमचे तिथले सहकारी अभय जोशी यांनीच आयोजित केला होता. तिथल्या उदय बुक एजन्सी या पुस्तकांच्या दुकानानं आयोजित केला.आदल्या दिवशी जायचं, सकाळी लवकर जाऊन नगर फिरायचं वगैरे मनसुबे अपेक्षेप्रमाणंच उधळले गेले. अखेर सहाच्या कार्यक्रमासाठी संध्याकाळी पाच वाजताच आम्ही नगरमध्ये पोचलो. चहा-पान (म्हणजे फक्त चहाच!) झाल्यानंतर सहाला कार्यक्रमस्थळी गेलो. सुरुवातीला चार-दोन टाळकीच होती, पण कार्यक्रम सुरू होईपर्यंत सगळा हॉल भरून गेला. दाराच्या बाहेरही काही लोक उभे होते.

मी बॅटिंग व्यवस्थित केली, लोकांचे हशे आणि टाळ्याही मिळवल्या. नगरकरांची गंमत करण्याची आणि खवचट प्रश्‍न विचारणाऱ्यांना तोंडावर पाडण्याची संधी सोडली नाही.प्रभाकर भोसलेनं त्याच्या ब्रशचे फटकारे ड्रॉइंग शीटवर ओढले आणि त्याची कला दाखवली. हा अगदी वेगळा प्रयोग छान रंगला. मजा आली.

आमच्या सह्या घ्यायलाही झुंबड उडाली होती. चाहत्यांचा प्रतिसाद पुण्यापेक्षा उदंड होता. मी वाचलेल्या सगळ्या ग्राफिटी त्यांना तोंडपाठ होत्या. आम्ही खरंच भारावलो. श्रीफळ (नारळ नव्हे!), पुष्पगुच्छ आणि छानसं पाकीटही मिळालं.जेवण खास नव्हतं, पण सीताफळाचं आईस्क्रीम भारी होतं. उशीर झाल्यानं काही खरेदीही करता आली नाही. रात्री 11 च्या गाडीनं दोनपर्यंत पुण्यात परतलो.

पुण्याबाहेरचा हा पहिला कार्यक्रम झकास झाला. आता सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर वगैरे ठिकाणच्या निमंत्रणांची वाट पाहतोय!
-आपल्याही शुभेच्छा हव्या आहेत!