Oct 20, 2009

निकालाआधीची दिवाळी!

सामान्यांची, सर्वसामान्यांची, अतिसामान्यांची आणि असामान्यांची दिवाळी असते, तशीच राजकीय नेत्यांनाही दिवाळी असतेच की! त्यांच्या घरीही गोडधोड पदार्थ होतात, वेगवेगळे फराळाचे प्रकार केले जातात, आप्तेष्ट-नातेवाइकांना निमंत्रणं धाडली जातात, अगदी आनंदाचा महोत्सव असतो म्हणा ना! हां. इतरांपेक्षा राजकारण्यांची दिवाळी वेगळी म्हणायची ती या अर्थानं, की दिवाळीच्या आगचे-मागचे वातावरण कसे आहे, यावर बरंच काही अवलंबून असतं. सध्याचे त्यांचे ग्रहमान, पक्षश्रेष्ठींची मर्जी, सध्या असलेली जबाबदारी, येऊ घातलेली संकटं, विरोधकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, या सगळ्यावर त्यांच्या दिवाळीचा "मूड' ठरत असतो. अशा या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळीत त्यांचे फटाकेही एकदम जगावेगळे असणारच की नाही? पाहूया, त्यांची एक झलक..

1) आपटीबार ः हा फटाका दलित चळवळीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांच्यासाठी. रिपब्लिकन ऐक्‍याची त्यांनी दिलेली ही एकशेत्रेसष्टावी हाळी. या वेळी ऐक्‍य होणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघच मानली जात होती; पण ज्या खडूनं ही रेख मारायला आठवले निघाले होते, त्या खडूच्या निर्मितीतच काहीतरी भ्रष्टाचार झाला असावा. कारण ही रेघच मुळात पुसट आखली गेली. त्यामुळं ती पुसण्यासाठी इतरांना फारसे कष्ट करावे लागले नाहीत. शिवाय, तो काळा दगडदेखील आठवले ज्यांना सध्या जाहीर विरोध करताहेत, त्यांनीच पुरवलेला होता, अशीही कुजबुज ऐकू येऊ लागली.
असो. तर या फटाक्‍याचं वैशिष्ट्य असं, की बाहेरून वाटतो हा मोठा शक्तिशाली फटाका. पाहताक्षणी कुणाच्या डोळ्यात भरावा आणि कुणालाही आकर्षण वाटावं असा. अनेक वाती आणि अनेक प्रकारचे दारूगोळे एकत्र येऊन बनलेला; पण तो पेटवायच्या आधीच एकेक वाती निखळत जातात. काही आधीच फुसक्‍या होत्या, हे नंतर लक्षात येतं. ठासून भरलेल्या दारूगोळ्यातही फारसा दम नाही, हे फटाका पेटवल्यानंतरच लक्षात येतं. मोठ्या आवाजाचं चित्र फटाक्‍याच्या अंगावर असलं, तरी प्रत्यक्षात फुसका आवाज करून हा फटाका विझून जातो.

2) ट्रेन ः "ट्रेन' किंवा दोरीवरून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सुर्रर्रर्रऽऽऽऽ करत जाणारा हा फटाका खास बंडखोर आणि अपक्षांसाठी. तो सुरू कुठे होणार, हे आपल्याला माहीत असतं, पण संपणार कुठे, हे कुणीच आधी सांगू शकत नाही. एका टोकावरून जो वात पेटवून देईल, त्याच्याच बाजूला तो फटाका परत येईल, याची अजिबात खात्री नसते. कदाचित तो दुसऱ्या टोकाला जाऊन पुन्हा पहिल्या टोकाला येऊ शकतो, किंवा आल्याची हूल देऊन तिकडेच थांबूही शकतो. कधीकधी तर वात शिल्लक असताना आणि आत दारूही भरपूर असताना तो दोरीच्या मध्यभागीच एकाएकी विझूनही जाऊ शकतो. तर एखाद प्रसंगी वात पेटवणाऱ्याच्याच अंगावर उडी मारून त्याला भाजण्याची गंभीर धोकाही असतो!

3) अग्निबाण (रॉकेट) ः हा फटाका खास राज ठाकरेंसाठी. या फटाक्‍याचं वैशिष्ट्यं असं, की त्याला जशी दिशा द्याल, त्या प्रमाणात तो विध्वंस घडवतो. कधी या गोटात खळबळ उडवेल, तर कधी त्या गोटात. काही सांगता येत नाही! बाटलीत जरी हा बाण लावला, तरी तो सरळ जाईलच, याचा नेम नसतो. सुईईईऽऽऽऽ असा त्याचा शिट्टीसारखा आवाज आणि जोरदार अग्निवर्षाव पाहून कुणालाही त्याविषयी आकर्षण वाटतंच. तो फार मोठा स्फोट वगैरे घडवत नाही. तरीही, प्रतिस्पर्ध्याच्या गोटात अस्वस्थता आणि चिंता निर्माण करण्याएवढा परिणाम नक्कीच साधतो. बाटली वाकडी करून लावली, तर तो कुणाच्याही खिडकीतून एखाद्याच्या घरात अग्निकांड घडवू शकतो, तर कधी कुणाला बेसावध गाठून त्याला नामोहरम करू शकतो. लावणाऱ्याला मात्र या अग्निबाणाचा काही अपाय झाल्याचा अनुभव आत्तापर्यंत तरी नाही!

4) लवंगी ः अतिशय आकर्षक वेष्टनात आणि दणदणीत आवाजाच्या स्टीकरसह बनवलेली ही लवंगी फटाक्‍यांची माळ आपले सर्वांचे लाडके नेते कोकणसम्राट नारायण राणेंसाठी! ही माळ अतिशय बेरकी, हुशार. आपली नक्की ताकद किती आहे, याचा अंदाज कुणाला येऊ द्यायची नाही. त्यामुळे सुरवातीला तिच्यावरचे स्टीकर पाहून आणि तिच्या वेष्टनाचा आकार पाहूनच भलेभले दचकतात; पण प्रत्यक्षात तसं घाबरण्याचं कारण नाही बरं! कारण आधी दणदणीत आवाज केला, तरी नंतर ही माळ फुसकी निघू शकते. कधी कधी तर वेष्टन बदलून अगदी सस्त्यातही खपवलेली गेलेली पाहिलेय म्हणे अनेकांनी तिला!

5) फुलबाजे ः मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेले समस्त नेते उदा. पतंगराव कदम, रोहिदास पाटील, अजित पवार, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदींसाठीचं हे विशेष उत्पादन. फारसं धोकादायक नाही, तरीही छान तडतडणारं आणि भरपूर प्रकाश व आनंद देणारं. फटाके उडविल्याचंही समाधान आणि कुणाला नुकसान न केल्याचंही. यानं दुसऱ्या कुणाला त्रास होण्याची शक्‍यताच नाही. उलट, कधीकधी याच फुलबाज्यानं दुसऱ्या मोठ्या फटाक्‍यांची वात लावून देऊन त्यांना उडण्यासाठी आणि भरपूर आवाज करण्यासाठी देखील मदत करता येते. अशी मदत झाली तरी ठीक, नाही झाली, तरी उत्तम! फुलबाजे उडविण्यातली गंमत काही कमी होत नाही. आहे की नाही खरी गमतीदार वस्तू?

यंदाच्या दिवाळीत या फटाक्‍यांच्या खरेदीला भरपूर गर्दी झाल्याची चर्चा आहे; पण ग्यानबाची मेख खरी पुढेच आहे बरं का! हे फटाके यंदा ज्या रंगाचे, ज्या रूपाचे आणि गुणधर्माचे आहेत, तसेच पुढील वर्षी राहतील, अशी खात्री नाही बरं का! तेव्हा यंदा असे दिसताहेत म्हणून खरेदी करून पुढल्या वर्षासाठी राखून ठेवाल, तर नक्की पस्तावाल, एवढं लक्षात ठेवा!!