Feb 11, 2010

आओ म्हारो जैसलमेर

झी टीव्हीच्या एका सीरियलच्या शूटिंगसाठी जैसलमेरला घेऊन जाण्याचं निमंत्रण आलं होतं. माझी या दौऱ्यासाठी निवड झाल्यानं एक नवं ठिकाण पाहायला मिळण्याचं समाधान मिळालं. राजस्थानात भरतपूर अभयारण्यात मी सात-आठ वर्षांपूर्वी गेलो होतो. तेव्हा जयपूरही फिरून आलो होतो. पण जोधपूर-जैसलमेरची वारी पहिल्यांदाच घडणार असल्यानं जरा अधिक उत्साहित होतो.
प्रवास जरा आडनिडा होता. तीन फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता मुंबईहून विमानाने जोधपूरला जायचं होतं. त्यापूर्वी सकाळी मला पुण्याहून मुंबईला पोचणं आवश्‍यक होतं. कूल कॅबची चौकशी करून सकाळी लवकर निघायचं ठरवलं. साडेपाचची कूल कॅब फोन करकरून शेवटी सहा वाजता अवतीर्ण झाली. घरापासूनच टॅक्‍सी मिळाल्यानं फारसा त्रास झाला नाही. रात्री झोप झाली नव्हती. पहाटे गाडीतच थोडी झोप काढली. साडेनऊलाच आम्ही सांताक्रूझ विमानतळावर पोचलो. झी टीव्हीच्या सुशांतची तिथे भेट झाली. चॅनेल आणि प्रेसची अन्य काही मंडळी तिथे जमली होती. सगळ्यांशी ओळखी झाल्या. अकरा वाजता आमचं विमान उडणार होतं, पण ते दीड तास उशिरा असल्याचं समजलं. तिथेच टमरेलभर कॉफी पिऊन नाश्‍त्याची सोय भागवावी लागली. ब्रेड, केक प्रकारावर माझा बहिष्कार असल्यानं दुसरं काही पोटात ढकलण्यासारखं नव्हतं.
अकराचं फ्लाइट साडेबाराला अखेर निघालं. एअर इंडियाचं विमान असल्यानं आतील सेवा यथातथाच होती. एक जुनाट, रद्दड सॅंडविच माथी मारण्यात आलं. पोटात काहीच ढकललं नसल्यानं नाइलाजानं ते खावं लागलं. मध्ये उदयपूरलाही अर्ध्या तासाची विश्रांती होती. अखेर अडीच वाजता आम्ही जोधपूरच्या छोट्याशा विमानतळावर उतरलो. वाटेत सीटच्या मागच्या स्क्रीनवर "आ देखें जरा' पाहण्याचा आनंद मात्र घेता आला. विमानात बसल्या जागी पाहण्याइतपतच बरा होता.
जोधपूरला गेल्यावर तिथे अन्य कोणी मंडळी येणार असल्याचं कळलं. लखनौ, दिल्ली, इंदूर, अहमदाबाद या ठिकाणांहूनही लोक आले होते. सगळे जमल्यावर आम्ही तिथून जेवायला रवाना झालो. प्रत्येकाला कडकडून भूक लागली होती. सर्वांच्या ऑर्डर घेताना तो हॉटेलमालक मेटाकुटीला आला. चार वाजता सगळे जण जेवणावर तुटून पडले. "घट्टे की सब्जी' नावाचा एक प्रकार खाल्ला. बरा होता.
आमच्या कार्यक्रमात जोधपूर-जैसलमेर प्रवास तीन तासांचा असल्याचं लिहिलं होतं. प्रत्यक्षात तो 280 किलोमीटरचा, म्हणजे किमान पाच तासांचा होता. आम्हाला पोचायला रात्रीचे साडेनऊ वाजले. जाताना वाटेत पोखरण इथे थांबून चहा प्यायला. भारताने दोन अणुस्फोट घडविले, त्या गावात चहा पिण्याचा अनुभव वेगळाच होता.
साडेनऊला जैसलमेरच्या किल्ल्यासमोरच आमची गाडी थांबली. तिथल्याच एका इटालियन हॉटेलात जेवायचं होतं. साडेचारलाच पोट फुटेस्तोवर खाल्ल्यानं कुणाला फारशी भूक नव्हती. तिथे मांडी घालून एका टेबलासमोर बसायचं होतं. इटालियन काहीबाही पदार्थ मागविले, पण ते घशाखाली उतरले नाहीत. कुठलातरी पास्ता होता माझ्या ताटात, पण तो खपला नाही. सगळ्या पास्त्यांची चव सारखीच होती. रात्री तिथे आमच्यासोबत डिनरला त्या मालिकेतल्या दोन प्रमुख नायिकाही आल्या होत्या. तिथे त्यांच्याशी प्राथमिक ओळख आणि गप्पा झाल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून "दो सहेलियॉं'च्या सेटवर जायचा बेत होता. पण सगळ्यांनीच उठायला उशीर केला. प्रत्यक्षात आरामात नाश्‍ता करून आम्ही दुपारी साडेअकराला सेटवर पोचलो. सेट म्हणजे एका जुन्या पडीक देवळाचं ठिकाण होतं. तिथे काही कलाकार शूटिंग करत होते. प्रमुख नायिकांना भेटण्या-बोलण्यासाठी फारसा वेळच नव्हता. त्यांच्या शूटिंगच्या अध्ये-मध्ये आम्ही एक आड एक त्यांच्याशी गप्पा केल्या. इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या लोकांना काहितरी आकर्षक, वेगळे प्रसंग हवे होते. त्याची व्यवस्था रात्री करण्याचं तिथल्या कार्यकारी निर्मात्यानं कबूल केलं. मग आम्ही अडीच वाजता तिथून कटलो. या शूटिंगमध्ये आणि सेटवर बराच वेळ फुकट गेला. आमचा अर्धा दिवस तिथेच गेला.
दुपारी एका राजस्थानी हॉटेलात खास राजस्थानी ढंगाचं जेवण केलं. तिथे दाल-बाटी-चूरमा आणि घट्टे की सब्जी पुन्हा हाणली. चव उत्तम होती. दुपारनंतर आम्ही खरेदीला पुन्हा जैसलमेर गावात आलो. किल्लाही पाहिला. मनस्वीसाठी, बायकोसाठी काहीबाही घ्यायचं होतं. टप्प्याटप्प्यानं ही खरेदी केली.
संध्याकाळी इलेक्‍ट्रॉनिक मीडियाची मंडळी पुन्हा गाडीनं सेटवर रवाना झाली. आम्ही खरेदी आणि किल्ला पाहण्यासाठीच रेंगाळलो होतो. झी टीव्हीच्या अनुजसोबत मग आम्ही एका भांग विक्री दुकानात मैफल रंगवली. हो-नाही करत मीही थोडी सौम्य भांग चाखली. हॉट चॉकलेटमधून ती प्याल्याने फारसा फरक जाणवला नाही. डोकं काही काळ जड झालं होतं, तेवढंच. आधी जरासं टेन्शन आलं होतं. पण प्रत्यक्षात काहीच त्रास जाणवला नाही. सतत एकच कृती करणं वगैरे पण काही घडलं नाही.
तिसऱ्या दिवशी सकाळी साडेसहालाच आम्ही नाश्‍ता उरकला. दोन वाजता जोधपूरहून विमान होतं. सातला जैसलमेरहून निघालो. बारा वाजताच जोधपूरला पोचलो. गाडीत अंताक्षरी वगैरे खेळून दंगा केला. बऱ्याच दिवसांनी घसा साफ करण्याची संधी मिळाली. विमान वेळेत सुटलं. आमच्यासोबत "जेट एअरवेज'च्या विमानात हेमामालिनीही होती. या वेळचं विमान एअर इंडियापेक्षा वाईट होतं. आतली आसनव्यवस्था चांगली होती, पण सेवा काहीच खास नव्हती. खायला-प्यायलाही काही फुकटात मिळणार नव्हतं. शिवाय सीटच्या मागे स्क्रीनचीही सोय नव्हती. मुंबईत विमानतळावर गर्दी असल्यानं आम्हाला अर्धा तास आकाशातच घिरट्या घालाव्या लागल्या. त्यामुळे ढगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या मात्र कॅमेऱ्यात टिपता आल्या.
मुंबईत पोचल्यावर मला न्यायला टॅक्‍सी तयार होतीच. एकदम राजेशाही वागणूक मिळाल्याचीच भावना होती. टॅक्‍सीचा आरामदायी प्रवास करून रात्री साडेनऊला पुण्यात पोचलो.
तीन दिवस रोजच्या कटकटींपासून दूर, राजस्थानात मस्त सहल झाली. आता आईला आणि मनस्वीला विमानातून सफर घडवायचेय. बघू, कधी जमतंय ते!