Aug 24, 2011

दर्शनमात्रे मनःकामना (अर्ध) पुरती!

(FILM REVIEW - MORAYAA)
 
"मोरया' हा गणेशोत्सवातल्या अपप्रवृत्तींवरचा नव्हे, तर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या दोन शेजारच्या चाळींमधल्या तरुणांच्या दोन गटांतली खुन्नस आणि त्याला लागणारं वाईट वळण दाखवणारा चित्रपट आहे. सध्याच्या गणेशोत्सवाचं बरं-वाईट रूप व्यापक स्वरूपात बघायला मिळेल, अशी अपेक्षा ठेवली नाही, तर हा चित्रपट बऱ्यापैकी रंजक झाला आहे.
मुंबईतील दोन चाळींमधील गणेशोत्सव मंडळांचे प्रमुख असलेले समीर (चिन्मय मांडलेकर) आणि मनोज (संतोष जुवेकर) एकमेकांचे कट्टर वैरी. आपापल्या चाळीचा गणेशोत्सव जास्त दिमाखात व्हावा, यासाठी ते काहीही करण्यास तयार होता. दोन राजकीय नेते आणि एका मुस्लिम संघटनेचा नेता या दोघांचा आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेतात. त्यातून दंगली पेटतात आणि परिस्थिती विकोपाला जाते. शेवटी या दोघांनाही आपला कोणी, कसा गैरवापर केला, हे लक्षात येऊन एकत्र येण्याची उपरती होते.
लेखक सचिन दरेकर यांनी पहिल्यापासून प्रेक्षक या कथेत आणि संघर्षात गुंतेल, याची उत्तम काळजी घेतली आहे. पटकथेपेक्षाही दमदार संवादांमुळे चित्रपट जबरदस्त पकड घेतो. मात्र, कथा केवळ दोन गटांमधील वैरापुरतीच मर्यादित राहते. त्यांच्या कुरघोड्या आणि खुन्नस याच्या पलीकडे जाण्याचा चित्रपट प्रयत्न करत नाही. खानावळ चालविणाऱ्या काकांच्या (दिलीप प्रभावळकर) माध्यमातून गणेशोत्सवाला आलेल्या वाईट स्वरूपाबद्दल काही टिप्पणी आहे, पण ती तेवढ्यापुरतीच.
दहीहंडीच्या दृश्‍यापासूनच कॅमेऱ्याची चित्रपटावरील जबरदस्त पकड जाणवते. संवाद आणि छायांकन या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत, त्याचबरोबर चिन्मय आणि संतोष जुवेकर यांच्यासह त्यांच्या सर्वच "पंटर्स'चा उत्तम अभिनय. दोघांची खुन्नस छान चित्रित झालेय. खासगी दूरचित्रवाणीचे पत्रकार दोन छोट्या मंडळांच्या प्रमुखांच्या दावणीला बांधल्यासारखे त्यांच्यासोबत वाहवत कसे जातात, देव जाणे! कुठल्या चाळीतल्या दहीहंडीत तरुण-तरुणी एकमेकांच्या कंबरेत हात घालून नाचतात, याचाही शोध घ्यायला हवा.
गणेश यादव, दिलीप प्रभावळकर, जनार्दन परब, यांच्या भूमिका लक्षात राहण्याजोग्या. लबाड आणि तेवढाच "पोचलेला' पोलिस अधिकारी गणेश यादवच करू जाणे. अशी उत्तम व्यक्तिरेखा लिहिल्याबद्दलही दरेकर यांना शंभर टक्के गुण! परी तेलंग आणि स्पृहा जोशी ठीकठाक.
अवधूत गुप्तेंनी दणकेबाज गाणी केली आहेत. दहीहंडीच्या गाण्याचे चित्रीकरणही झकास. ऊर्मिला कानेटकर-क्रांती रेडकरच्या आयटम लावणीची कल्पना त्यांच्यातल्या संगीतकाराला सुचली, निर्मात्याला, की दिग्दर्शकाला, हे कळायला मार्ग नाही. "घालीन लोटांगण' मध्ये "प्रेमे आलिंगन' मात्र खटकतं. एवढी ढोबळ चूक टाळायला हवी होती.
सर्वांनी घेतलेल्या मेहनतीसाठी मात्र "मोरया'चं एकदा दर्शन घ्यायला हवं.