Jul 3, 2008

कशी शांतता शून्य शब्दांत येते....

तो किंवा ती आपल्याला मनापासून आवडते. आपल्या काळजातच घुसते. कुठल्याही अपेक्षेनं नव्हे, पण निव्वळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आपण प्रेमात पडतो. त्यानं/तिनं आपल्याशी मैत्री करावी, असं वाटतं. पण ती एका मर्यादेपलीकडं आपल्याला फार भीक घालत नाही. आपण अनेक प्रयत्न करतो...त्यासाठी प्रसंगी, वेगळ्या वाटेनं जातो. पण व्यर्थ!
ती (व्यक्ती) कुठलीही असू शकते. कुठल्याही पार्श्‍वभूमीची, कुठल्याही प्रवृत्तीची. आपल्याला आवडते, ती तिची प्रवृत्ती. जगण्याची कला. धडाडी, कर्तबगारी, शैली, बोलण्या-वागण्याची पद्धत, एखाद्या विषयातला अभ्यास, विचार, मतं मांडण्याची पद्धत, यांपैकी काहीही. आपल्याकडे तो गुण नसतो कदाचित, म्हणून आपण तिचा आदर करायला लागतो. तिच्याकडून आणखी काही शिकता यावं, असं वाटतं. त्यासाठी तिच्याशी मैत्री करायला हवी असते. तिनं आपल्यासाठी खास काही करावं, काही द्यावं, अशी अपेक्षा नसते. पण थोडा वेळ तिच्या सहवासात राहता यावं, असं वाटत असतं. तिच्या सोबत राहून जेवढं टिपता येईल, तेवढं आपल्याला टिपायचं असतं. तिच्या खासगी गोष्टी तिनं सांगाव्यात, अशी अपेक्षा नसते, पण आपल्या खासगी गोष्टींत तिचा सल्ला मिळेल, निदान तिच्या सहवासाचा काही प्रभाव पडेल, असं वाटत असतं.
ती कुणी "ग्रेट' असतेच, असं नाही. पण सर्वसामान्यांपेक्षा कुठल्या तरी बाबतीत वेगळी असते. काही एक वेगळा गुण असतो, ज्याचं आपल्याला आकर्षण वाटत असतं आणि आपल्यात तो नसल्याबद्दल रुखरुखही. पण तिला आपल्याबद्दल फारसं वाटत नसतं. औपचारिक ओळख ठेवण्यापलीकडे मैत्री सरकत नाही. मैत्रीच्या तारा काही छेडल्या जात नाहीत. आपण प्रामाणिक प्रयत्न करतो, पण तिला त्याची फारशी कदर नसते. निदान आपल्या मैत्रीच्या प्रयत्नांचा आदर राखण्याएवढंही सौजन्यही कधी कधी वाट्याला येत नाही. हा तिचा दोष असतो, की आपल्याच अवाजवी अपेक्षांमधला फोलपणा?
तुम्हाला हा अनुभव आलाय कधी? मला हज्जारदा आलाय! अनेकदा तोंडघशी पडलोय, अनेकदा त्रास करून घेतलाय. अगदी मनापासूनचा म्हणवणारा मित्र काही कारण नसताना दुरावल्याचा. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडल्याची साक्ष देणाऱ्याकडून नंतर काहीच संपर्क न साधला गेल्याचा. कॉलेज संपल्यावर नातंही संपल्याचा. आणि आपण कितीही ओढीनं आपली सुख-दुःखं सांगितल्यानंतरही, त्यांची परतफेड न झाल्याचा. आपण अतिशय प्रामाणिक राहिल्यानंतरही, त्याच्या आयुष्यातला अगदी महत्त्वाचा टप्पाही दुसऱ्याच्या तोंडून कळण्याचा.
आपल्या चांगल्या/वेगळ्या कामगिरीकडे, कलेकडे नियमितपणे लक्ष ठेवून त्यात सूचना करणारा, कान धरणारा, सल्ले देणारा कुणीच मित्र असत नाही? गरज असल्याशिवाय, आपल्या आयुष्यात काय चाललंय, याची चौकशी करावीशीही त्याला वाटत नाही?
खरंच खरी मैत्री एवढी दुरापास्त आहे? व्यावहारिकतेच्या, धावपळीच्या आयुष्याच्या, अर्थाजनाच्या बंधनांनी तिला जखडून, संपवून टाकलंय? कधीतरी हॉटेलात जाणं, फोनवर बोलणं, एसएमएस करणं, यापलीकडे मैत्री जाऊ शकत नाही? नोकरी, जबाबदाऱ्या यांची बंधनं मैत्रीच्या नात्यापेक्षाही तीव्र असतात?
चांगल्या मैत्रीची गरज काय फक्त एकटेपणीच असते? अगदी जगण्याचं रहाटगाडगं व्यवस्थित चालू असतानाही मित्रांशी उत्तम नातं नाही राखता येत?
-------------

Jun 30, 2008

श्‍वानशक्तीचा विजय असो!

चला, गंगेत घोडं न्हालं म्हणायचं. माणूस नावाच्या "गाढवां'ना कुत्र्यांचा प्रामाणिकपणा तरी पटला. आजची "सकाळ'मधली बातमी वाचलीत? पुण्यात कुत्र्यांची मागणी दुपटीने वाढल्याची! आमच्या प्रामाणिकपणाला आत्ता कुठे भाव आलाय. बरं वाटलं.

बरेच दिवस याच विचारानं अस्वस्थ होतो. डायरी सुद्धा लिहावीशी वाटत नव्हती. आमच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेतला जात होता. "ही कुत्तरडी करायची काय?' असले भोचक आणि अवमानास्पद प्रश्‍न विचारले जात होते. कुणीकुणी उपटसुंभ तर जंगलातून वस्तीत येणाऱ्या बिबट्यांसाठी खाद्य म्हणून सगळी कुत्तरडी जंगलात फेका, अशी भाषा करत होते. मुन्सिपाल्टीच्या लोकांपुढे तर कित्येक भाईबंदांनी हौतात्म्य पत्करलं. पण आम्ही त्यांच्या बाजूनं ठाम उभे राहिलो. म्हटलं, होताहेत क्रांतिकारक तर होऊ द्यात! हे बलिदान व्यर्थ जाणार नाही! काहींना बंदिवासात टाकण्यात आलं. त्यांच्यासाठीही लढा दिला. निदर्शनं केली. तुरुंगांच्या दरवाजांवर, अधिकाऱ्यांच्या घरांच्या भिंतींवर, दंडेलशाही करणाऱ्यांच्या चकचकीत गाड्यांवर जाहीरपणे तंगडं वर केली. तरीही काही फायदा झाला नाही.

आमचा प्रामाणिकपणा, आमची उपयुक्तता पटायला चोरांनी घरं लुटायला हवी होती. मुडदे पडायला हवे होते. भरदिवसा अपहरणं व्हायला हवी होती....!

असो, उशीरा का होईना, माणसांना शहाणपण सुचलं, हे महत्त्वाचं. त्या "व्होडाफोन'वाल्यांच्या सात पिढ्यांवर तंगडं वर करावं, असं जाहिरात बघून वाटलं होतं. कारण त्यांनी आमच्या एका परदेशी भाईबंदाला जाहिरातीसाठी कुठल्यातरी गाडीच्या मागे तंगडतोड करत पळायला लावलं होतं. पण त्यांनीच आमची "इमेज' सुधारली. कुठल्याही मदतीला तयार, अशी आमची ओळख लोकांवर ठसवली. आता त्या जाहिरातीतल्या कुत्र्याच्या तोंडावरची माशीही हलत नाही, ही गोष्ट अलाहिदा. पण आपल्या एका भाईबंदाचं कौतुक होतंय आणि आपला मान वाढतोय, हा आनंद मोठा होता. बरं, त्याच्या जातीतल्या इतर पंटर्सचीही किंमत वाढली ना त्याच्यामुळं!

मलाही कुण्या केळकरानं विकत घेतलाय. माजी लष्करी अधिकारी आहे म्हणे. आता त्याच्या शिस्तीत राहावं लागणार. आयला, गोचीच आहे! पण आता संधी मिळालेय. आता जिवाचं रान करून मालकाचं घर राखायचं. फक्त एकच प्रॉब्लेम होईल. स्वीटीला सारखं सारखं भेटता येणार नाही. सध्या ती तरी कुणाच्या घरची शोभा झालेय, कुणास ठाऊक! बाकी, ती काही घराच्या रक्षणाबिक्षणाच्या कामाची नाही म्हणा! ती पडली पामेरिअन! आमच्यापेक्षा वरच्या जातीतली. ती कुणातरी धनिकाच्या घरातच पडली असणार. कुणीतरी फटाकडी नको तेव्हा घरी येणाऱ्या बॉयफ्रेंडपासून संरक्षणासाठीच तिचा उपयोग करत असणार.

असो. हेही नसे थोडके!