Jul 30, 2010

`काका' मला वाचवा!

"सार्वजनिक काका' अशा नावाचा एक पुरस्कार पुण्यात दिला जातो. सार्वजनिक कार्यात अग्रेसर असलेल्या लोकांसाठी हा पुरस्कार असावा. आमच्याशी संबंधित दोन काकांनी मात्र त्यांच्या "सार्वजनिक' वागण्याने अलीकडच्या काळात उच्छाद मांडला.

गेल्या वर्षीपर्यंत मला वेळ असल्यानं मनस्वीला सकाळी शाळेत आणि दुपारी बाल भवनला सोडण्याची जबाबदारी मीच खांद्यावर (आणि कडेवर) घेतली होती. या वर्षी मात्र निमिषचं आमच्या घरात आगमन झाल्यापासून आणि मनुच्या शाळेची वेळ बदलल्यापासून तिच्या शाळेच्या वेळांच्या बंधनात अडकायला नको वाटू लागलं. मनुची शाळा यंदा सकाळी 7.20 ची झाली. त्यामुळं सहाला उठणं, तिला आवरून वेळेत तयार करणं आणि काकांच्या व्हॅनसाठी सातच्या आधी सोडणं, असा दिनक्रम झाला. महिनाभरच झाला शाळा सुरू होऊन आणि सगळं व्यवस्थित सुरू होतं. एके दिवशी मात्र मनस्वी दुपारी घरी आली, ती हिरमुसल्या चेहऱ्यानं. तिला शाळेत उशीर झाल्यामुळं शिक्षा झाली होती. मैदानात उभं राहायला आणि उठाबशा काढायला लावलं होतं.

सकाळी ती वेळेत खाली उतरली, पण काका आले, तेव्हा त्यांच्या गाडीचं चाक पंक्‍चर होतं. त्यांनी तशाच अवस्थेत मुलांना गोळा करून वाटेत दुसऱ्या गाडीत मुलं सोडली आणि त्यांच्या मार्फत ती शाळेत पोचली, तेव्हा थोडासा उशीर झाला होता. अशा कारणासाठी पाच-दहा मिनिटं उशीर झाल्यानंतरही मुलांना शिक्षा झाल्याचं कळल्यावर माझं डोकंच फिरलं.

दुसऱ्याच दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांना तीव्र नाराजी व्यक्त करणारं पत्र दिलं. त्यांनी त्याची दखल घेतली, पण फारसा फरक पडला नव्हता त्यांना. वर उठाबशा म्हणजे मुलांसाठी व्यायामच असतो, असंही ऐकावं लागलं.

या काकांनी दुसऱ्या काकांकडे मुलं सोपविताना शाळेपर्यंत व्यवस्थित निरोप पोचविण्याची व्यवस्था तातडीने करायला हवी होती. ती त्यांनी न केल्यामुळे या मुलांना नाहक शिक्षा झाली.

दुसऱ्या काकांची वेगळीच तऱ्हा.
मनस्वी बाल भवनला अधून मधून दांड्या मारतेच. कधी पाऊस, कधी कुठलं काम, कधी कार्यक्रम यामुळे ती जाऊ शकत नाही. दर वेळी ती एक-दोन दिवस गेली नाही, की तिसऱ्या दिवशी तिच्या काकांना फोन करून ती येणार असल्याचं कळवायला लागायचं. त्यातून हल्ली साडेचारच्या बाल भवनसाठी तिची रिक्षा खूप लवकर, म्हणजे पावणेचारलाच येते, म्हणून आम्ही जाताना तिला स्वतःच सोडायचं ठरवलं होतं. तरीही काकांना पैसे दोन वेळचेच देत होतो.

मध्यंतरी एक-दोनदा काकांना फोनवरून न कळवल्यामुळं ते मनस्वीला घेऊनच आले नाहीत. मग उगाच धावतपळत तिला आणायला पुन्हा जावं लागलं. दरवेळी त्यांचं कारण ठरलेलं असायचं - ती कुठेतरी खेळत होती, बाईंनी मला सांगितलंच नाही, काका काही बोललेच नाहीत..वगैरे वगैरे.
आज पुन्हा ते तिला तिथेच ठेवून निघून गेले, तेव्हा या संतापानं टोकच गाठलं. मनस्वी ताईंबरोबर घरी आली. मी फोनवरून त्यांना झापलं. पण तरीही ते ढिम्म होते. आजही त्यांची कारणं तयार होती. मी रिक्षा बंद करून टाकली, तरी त्यांना फारसा काही फरक पडलेला नव्हता.

आता मनस्वीला दुसरी व्हॅन शोधायचेच. पण स्वतः करीत असलेल्या कामावर विश्‍वास असलेले काका कुठे मिळतील?
 

Jul 29, 2010

व्यसनेशु सख्यम!

आज दुपारी ऑफिसातील काम उरकल्यानंतर थोडासा वेळ हाताशी होता म्हणून बऱ्याच दिवसांनी सीडी खरेदी आणि विंडो शॉपिंगसाठी लक्ष्मी रस्त्यावरच्या माझ्या आवडत्या दुकानात गेलो होतो. इथूनच मी पहिल्यांदा सीडी प्लेअर घेतला, तेव्हापासून तिथल्या सीडी, कॅसेट कलेक्‍शनच्या प्रेमात पडलो होतो. तिथली शिस्त आणि सगळं साहित्य व्यवस्थित मांडण्याची पद्धत फार आकर्षक आहे. आपल्याला हवी ती सीडी विकत घ्यायला फार सोयीचं जातं. असो.

अलिकडच्या काळात बरेच हिंदी, मराठी चित्रपट पाहायला वेळ झालेला नाही. अनेक सिनेमे घरी कॉंप्युटरच्या हार्डडिस्कवर असले, तरी ते बघणं झालेलं नाही. काही सिनेमे तर अर्धवट बघितले, पण इंटरव्हलनंतर बघायचे राहिले, ते राहिलेच. अनेक जुने, अर्धजुने सिनेमेही मी पाहिलेले नाहीत. पूर्वी घरून परवानगी नव्हती, कुठले सिनेमे बघायची त्याची अक्कल नव्हती, रत्नागिरीत फार काही बघण्याची संधी नव्हती...बरीच कारणं. बॅकलॉग बराच राहिलाय, एवढंच खरं.

हाच बॅकलॉग भरून काढण्याचे आता प्रयत्न चाललेत. त्यामुळे आज वेळ होता म्हणून थोड्या सीडी खरेदी कराव्यात, असा विचार करून दुकानात शिरलो होतो. दहा-पंधरा मिनिटांत खरेदी उरकून निघायचं होतं, पण सीडींचा खजिना पाहून रमायलाच झालं. मोझर बेअरच्या अलिकडे आलेल्या स्वस्तातल्या सीडी हे माझं पहिलं लक्ष्य होतं. पण डीव्हीडी पाहिल्या आणि त्यांच्या प्रेमात पडलो.

नव्या, जुन्या सिनेमांच्या अनेक डीव्हीडी खुणावत होत्या. माझे अलिकडच्या काळात चुकलेले अनेक सिनेमे एकत्रित उपलब्ध होते. त्यातही सर्वांत चांगल्या पॅकेजसाठी बरीच शोधाशोध केली. कमिने, वेन्सडे, देव डी, अशा एकूण सहा चित्रपटांची डीव्हीडी अवघ्या 55 रुपयांना पाहून मी थक्क झालो. अलिकडे पायरसी बोकाळल्यापासून 50 रुपयांत पाच, सहा चित्रपट की गोष्ट काही नवी नव्हती. पण ती बनावट सीडींच्या बाबतीत होती. अधिकृत, चांगल्या दर्जाच्या आणि कंपनीच्या सीडीसुद्धा एवढ्या स्वस्तात उपलब्ध असल्याची मला कल्पनाच नव्हती.
अवघ्य 55 रुपयांत सहा सिनेमे खरेदी करताना मला रत्नागिरीचे सिनेमा पाहण्यासाठीचे संघर्षाचे दिवस आठवले. तेव्हा थिएटरला तिकीट दहा रुपयांच्या आतच होते, पण तरीही घरून सिनेमा पाहायला जायला परवानगी मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागायचा. "टीव्हीवर येईल तेव्हा बघ सिनेमा!' हे उत्तर ठरलेलं असायचं. मग काहीतरी कारण सांगून, बाबापुता करून परवानगी मिळवायला लागायची. नववीत असताना आईनं "थरथराट' बघायला परवानगी दिली नाही, तेव्हा तेवढा "थयथयाट' केला होता मी! दहावीच्या अख्ख्या वर्षात मी एकच चित्रपट पाहिला होता. मोठं झाल्यावर मी यंव करीन नि त्यंव करीन अशी स्वप्नं पाहायचं वय होतं ते. मी त्यावेळी मोठं झाल्यावर आपण तिन्ही थिएटरला लागलेले सगळेच्या सगळे सिनेमे दर आठवड्याला पाहायचे, असली स्वप्नं रंगवायचो. आमच्या महत्त्वाकांक्षेची झेप तेवढीच!

अनेकदा उन्हाळ्यात सार्वजनिक पूजेच्या निमित्तानं मळ्यात, मैदानात सिनेमे प्रोजेक्‍टरवर दाखवले जायचे. शेजारपाजारचा कुणीतरी जोडीदार शोधून मी ते पाहायला जायचो. टिपिकल मिथून, अमिताभ, नाहीतर जीतेंद्रचे सिनेमे असायचे. पण तरीही कुठेतरी शेणार, चिखलात, काट्यात, गडग्यावर बसून डोळे तारवटून ते सिनेमे पाहायचो. रस्त्यात बसलेलो असताना बस आली म्हणून चंबूगबाळं आवरून मध्येच उठावं लागायचं. पडद्याच्या समोरच्या बाजूला जागा मिळाली नाही, तर मागच्या बाजूनं उजव्या हातानं फायटिंग करणारा अमिताभ पाहावा लागायचा. मध्येच कुठून तरी सापबिप निघाला, तर पळापळ व्हायची. धुरळा, मातीनं कपडे खराब व्हायचं. पण "की न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने' या निर्धारानं आम्ही टिकून राहायचो.
"राम तेरी गंगा मैली' पाहायला असाच कुठेतरी रस्ता तुडवत गेलो होतो. तिथे व्हिडिओवर सिनेमा होता आणि आम्ही सुमारे वीस-पंचवीस फुटांवर होतो. मंदाकिनीचं नखसुद्धा दिसणं शक्‍य नव्हतं! मग हिरमुसून परत फिरलो होतो.
मजा होती त्या दिवसांत!

आज 55 रुपयांत 6 सिनेमे, म्हणजे नऊ रुपयांना एक सिनेमा कायमस्वरूपी विकत घेताना हे सगळं आठवलं आणि फार वाईट वाटलं. आपण जिवापाड प्रेम केलेलं हे व्यसन एवढं स्वस्त आणि सहज होईल, अशी कधीच कल्पना केली नव्हती.
आपल्या आवडीच्या, अतीव प्रेमाच्या गोष्टीसाठी थोडेफार कष्ट करायला लागले पाहिजेत. सुखसोयी आयत्या मिळाल्या, तर त्यातली गंमत कमी होते, हेच खरं!