Mar 7, 2011

शर्यत रे जिंकली!







"कासव' हा काही उत्साहानं पाहायला जाण्याजोगा प्राणी नाही. मुलांनाही ससा आणि हत्ती-वाघाची जेवढी क्रेझ वाटते, तेवढी कासवाबद्दल वाटण्याची काहीच गरज नाही. एवीतेवी पडला हळू चालणारा, सगळ्यांच्या मागे असलेला आणि कुणाच्या अध्यात-मध्यात न येणारा प्राणी. पण वेळासच्या महोत्सवानं कासव ही सुद्धा पाहण्याची गोष्ट असते, हे सिद्ध केलं. आम्ही वेळासला गेलो, तर किनाऱ्यावर नुसती कासवाची पिल्लं पाहायला दीड-दोनशे पर्यटक मुंबई-पुणे, अन्य कुठल्या कुठल्या शहरांतून आले होते!
एका सहकाऱ्यानं ही टूम काढली होती. मलाही बऱ्याच दिवसांत कुठेतरी उलथायचं होतंच. त्यामुळं सहकुटुंब जायचं ठरवलं. मंडणगडला आधी कधी गेलो नव्हतो. दापोली पाहून झाली, पण मंडणगड तसं अनभिज्ञ होतं. ताम्हिणीमार्गे जायचं तर पाच तासांपासून आठ तास, असा कितीपण रस्ता कुणीही सांगत होतं. वेळास महोत्सवाच्या वेबसाईटवरून थोडीशी माहिती मिळाली होती, पण रस्ता शोधण्याला, चुकण्याला आणि डोकेफोड करण्याला काही पर्याय नव्हता.
तुलनेनं सकाळी पावणेआठला निघाल्यापासून रस्त्याबाबत तरी फारशी काही अडचण आली नाही. एकूण दोनशे किलोमीटरचा प्रवास होता. ताम्हिणीमार्गे माणगावात गेल्यानंतर तिथून वाट शोधत शोधत मंडणगडला पोचलो. तिथूनही वेळास 40 किलोमीटर होतं. दुपारी एकच्या सुमारास आम्ही वेळासमध्ये पोहोचलो. समुद्राच्या काठानं जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यानं वेळासमध्ये आम्ही पोहोचलो. जेमतेम दोन-अडीचशे उंबऱ्याचं गाव. छान नारळीपोफळीच्या बागांमधून जाणारा रस्ता. प्रकाश जोशी यांच्या घरी आम्ही आमच्या राहण्याची व्यवस्था सांगून ठेवली होती. वेळास हे छोटं गाव असल्यानं इथे राहण्याची सोय घरगुतीच आहे. जोशींचं घर अगदी जवळच होतं. तिथे पोहोचलो आणि अगदी कोकणी मातीचा आणि घराचा सुगंध आला. पुढे अंगण, मागे परसदार, पोफळीची बाग...असा मस्त कोकणी थाट होता. जोशींची आणि आमची साता जन्मांची ओळख असावी, अशा थाटात मुलं आणि त्यांच्या मागून आम्हीही त्यांच्या सगळ्या घरात बागडू लागलो. बाहेरचे पाहुणे म्हणून स्वतंत्र खोली वगैरे प्रकार नव्हता. माजघरात एकत्रित जेवण, कुठेही बसून गप्पा, असा सगळा घरगुती मामला होता.
दुपारी जरा वेळ परसातच पडी टाकून आम्ही संध्याकाळी कासवं बघायला समुद्राकडे लोटलो. समुद्र तसा दीडेक किलोमीटरवर होता. मुख्य म्हणजे थेट किनाऱ्यापर्यंत गाड्या जाऊ नयेत, अशीच व्यवस्था कासव महोत्सव आयोजित करणाऱ्या सह्याद्री निसर्ग मंडळानं करून ठेवली होती. बाहेरच्या रस्त्यावर गाड्या लावायच्या आणि आत शेतातून जवळपास तीनेकशे फूट चालत जायचं. जाताना वाटेत दोन काठ्यांची बेडी. (कुंपणं.) जेणेकरून दारूड्यांना धडपणे समुद्रावर तमाशे करण्यासाठी पोहोचताच येऊ नये. आम्ही गेलो, तेव्हा कासवांना बाहेर काढण्याची तयारी सुरू व्हायची होती. ऑलिव्ह रिडले जातीची कासवं या किनाऱ्यावर येऊन डिसेंबरपासून अंडी घालायला सुरुवात करतात. पूर्वी ही अंडी बहुतेकदा स्थानिकांच्या पोटात जायची. सह्याद्री मंडळाचे भाऊ काटदरे यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करून या कासवांना वाचविण्याची मोहीम हाती घेतली. सन 2002 पासून अव्याहतपणे हा उपक्रम सुरू आहे. आता स्थानिक लोकच या कासवांना वाचविण्यात आघाडीवर आहेत. ओरिसानंतर सर्वाधिक प्रमाणात या वेळास किनाऱ्यावरच ही कासवं येतात. अंडी घालून गेली, की पुन्हा या आया मुलांकडे परतत नाहीत. वाळूखाली दीड फुटांवर ही अंडी घातलेली असतात. स्थानिक रक्षक ही अंडी एका सुरक्षित ठिकाणी हलवतात. पुन्हा तेवढाच खड्डा करून, तशाच प्रकारे अंड्यांची रचना करावी लागते...तीदेखील सहा तासांत! पहाटेपासून ही मोहीम सुरू होते. किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी अंडी ठेवल्यानंतर 55 दिवसांनी पिल्लं वाळूतून वर येतात. कावळे-कोल्हे-कुत्र्यांपासून त्यांना वाचविण्यासाठीही हे कुंपण उपयोगी ठरतं. प्रत्येक घरट्याच्या (अंडी ठेवलेली जागा) वर टोपल्या असतात. पिल्लं वाळूतून वर येऊन या टोपलीखाली येऊन बसतात. सकाळी सात आणि संध्याकाळी सहा वाजता समुद्रापर्यंत त्यांची पाठवणी करण्याचा कार्यक्रम होतो
.
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाला टोपल्या उघडण्यात आल्या. आठ-दहा घरट्यांपैकी एकाच घरट्यातून सात पिल्लं बाहेर आलेली होती. कधीकधी एका वेळी 50 ते 100 पिल्लंही मिळू शकतात. आमचं नशीब एवढं थोर नव्हतं. पण आम्ही गेलो त्या दिवशी सकाळी आणि आदल्या दिवशीही एकही पिल्लू मिळालं नव्हतं. त्या मानानं आम्ही नशीबवान होतो.
एकेक पिल्लू टोपलीत घेऊन समुद्रापासून ठराविक अंतरावर त्याला वाळूत उतरवण्यात आलं. पिल्लं लगेच धडपडत समुद्राकडे धावत सुटली! लोकांच्या पायाखाली ती येऊ नयेत म्हणून कुंपणही घालण्यात आलं होतं. पाचेक मिनिटांतच ती समुद्राच्या लाटांवर स्वार झाली....आपापल्या आयुष्याची वाट शोधत!
एवढा दहा मिनिटांचा खेळ पाहण्यासाठी आम्ही चारशे किलोमीटरचा प्रवास, दोन दिवसांची सुटी, दगदग सगळं सहन केलं होतं. पण कासवांबरोबरच कोकणी गावातल्या आदरातिथ्यानंही सगळे श्रम वसूल झाले.
वेळासहून हरिहरेश्‍वरही अगदी जवळ आहे. जेटीतून कारसह पलीकडे जावं लागलं फक्त. तिथून दहा किलोमीटरवर हरिहरेश्‍वर होतं. तिथेही भेट देऊन संध्याकाळपर्यंत परत आलो. दीड दिवसांच्या या प्रवासानंतर मला संध्याकाळी पुन्हा ड्युटीवर जायचं होतं. कासवांना त्यांची वाट शोधायला समुद्राचा अफाट परीघ होता. आम्हाला मात्र पोटापाण्यासाठी नोकरीशिवाय (तूर्त) पर्याय नव्हता!
...