Dec 12, 2007

मी एक अशिष्टाचारी !

आज मी तुम्हाला माझीच (राम)कहाणी सांगणार आहे. तुम्हाला कदाचित बोअर होईल, कदाचित अगदीच रुटीन वाटेल. पण माझ्या आयुष्यातली ही एक गंभीर समस्या झाली आहे, एवढं मात्र नक्की.

मी आजच्या काळात जगायला अगदी नालायक आहे. हो..."नालायक'च ! "अकार्यक्षम', "अयोग्य', "अपात्र' वगैरे नाही. नालायक म्हणजे नालायक ! ज्याची लायकी नाही, तो. आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आणि जीवनाचं मूल्यच बनलेला, "शिष्टाचार' कशाशी खातात, हे मला माहित नाही. तसं मासे, मटण, खेकडे, चिकन, शेपू-कार्ल्याची भाजी, पिझ्झा, बर्गर, पास्ता, पैसे, आदी अनेक गोष्टी कशाशी खातात, हे मला माहित नाही. (या यादीत सिगारेट आणि दारूही येते. पण बरेच जण "सिगारेट'ला "पिणे' म्हणतात आणि आमच्या गावाकडे तर "काय दारू खाऊन आलायंस काय,' असं विचारलं जातं. त्यामुळं उगाच शाब्दिक, भाषिक, ज्ञानिक अवमान नको, म्हणून या दोन "पदार्थां'ना या यादीतून वगळलंय. चूकभूल देणे घेणे. म्हणजे खरं तर, घेणेच.)आजच्या काळातलं चलनी नाणं असलेल्या शिष्टाचाराला आमच्या जीवनात (आणि जेवणातही) कधीच स्थान न मिळाल्यानं आम्ही जगायला अगदी नालायक झालो आहोत. (आम्ही म्हणजे मीच बरं का! पण काहितरी तात्त्विक उपदेश करायचा असेल, किंवा खूप वरच्या लेव्हलवर बोलतोय असं दाखवायचं असेल, तर हा शब्द वापरायचा, एवढा शिष्टाचार शिकलोय मी !..सॉरी, आम्ही ! हल्ली तर ललित किंवा "इनोदी' काहितरी लिहायचं असेल, तरी "आम्ही' असा शब्द वापरायचा प्रघात आहे म्हणे !)

शिष्टाचार न शिकविण्याच्या या अशिष्टाचाराचं सगळं (अप)श्रेय आमच्या परमपूज्य मात्यापित्यांनाच द्यायला हवं. आमचा बाप (डोक्‍याला ताप!) हा रात्रीबरोबरच दिवसाही "पिता'च असल्यानं, त्याला त्याच नावानं हाक मारत आलोय आम्ही. त्यामुळं त्याच्याकडून शिकण्यासारखं काहीच नव्हतं. आईला घरकामातून आणि बाहेरच्या मोलमजुरीतून कधी वेळच नव्हता आमच्याकडे बघायला. पोरं किती आणि किती वर्षांची असं विचारल्यावरही तिला उत्तर द्यायला अर्धा तास लागायचा. तर पोरांना शिष्टाचार शिकवण्याची काय कथा?त्यामुळं, जगाच्या बाजारात आम्ही धाप्पकन पडलो, तेव्हा अशा संपन्न कौटुंबिक पार्श्‍वभूमीमुळं आमची वैयक्तिक "पार्श्‍वभूमी' शिष्टाचारप्रेमी सुसंस्कृत, सुविद्य नागरिकांकडून वारंवार शेकून निघाली. थोडक्‍यात ुुवर लाथा बसल्या ! मग आम्ही शिष्टाचार शिष्टाचार म्हणतात तो कशाशी खातात, हे शिकून घ्यायचा थोडाफार प्रयत्न केला. तर अनेक चित्तचक्षुचमत्कारिक गोष्टी समजत गेल्या.शिष्टाचार म्हणजे भलतंच प्रकरण आहे आणि ते आपल्या बापजन्मात कधी जमणार नाही, असं तेव्हा वाटून गेलं.

शिष्टाचाराचा हा प्रवास अगदी झोपेतून उठण्यापासून जो सुरू होतो, तो पुन्हा रात्री झोपेपर्यंत!घराबाहेर पडल्यावर, समाजात वावरताना, सरकारी कचेऱ्यांत, कोर्टात किंवा ऑफिसांतच हा शिष्टाचार पाळायचा असतो, अशी आमची आपली भाबडी, खेडवळ समजूत. पण तिला सुरुंग लागला, आम्ही "थाड थाड शिष्टाचारा'चे क्‍लास जॉइन केले तेव्हा ! शिष्टाचाराची सुरुवात घरापासून होते, असा आम्हाला अंतर्बाह्य हादरवून टाकणारा, आमच्या संवेदनाच गोठवून टाकणारा साक्षात्कार आम्हाला त्या प्रसंगी झाला. ही धरणीमाय दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं, असं वाटू लागलं. पण हाय रे कर्मा ! तीही शिष्टाचार पाळणारीच ठरली. यमराजाकडून लेखी ऑर्डर असल्याशिवाय दुभंगत नाही म्हणाली.सांगण्याचा मुद्दा काय, की शिष्टाचाराची सुरुवात सकाळी झोपेतून उठल्यापासून, म्हणजे अगदी घरापासून होते. आपण उठल्यावर आपल्या अंथरुणाची घडी करून ठेवणं, हा शिष्टाचार. आपला चहा वगैरे तयार असेल, घरातली स्वच्छतेची कामं उरकून निम्मा स्वयंपाकही तयार असेल, हा समज मनाचा हिय्या करून दूर सारून, बायको अंथरुणातून हललेलीच नाहिये, हे सत्य समोर आल्यानंतर तिला लाडक्‍या (अंथरुणातल्या) नावानं हाक मारणं, हा शिष्टाचार. तिच्या कंबरड्यात लाथ घालून, "म्हशी सूर्य डोक्‍यावर आलाय, इथे काय लोळत पडल्येस,' असं न विचारता, "बरं वाटत नाहीये का? डोक्‍याला बाम चोळून देऊ का?' काल घरी खूप काम होतं का,' असं विचारणं, हा शिष्टाचार. मग तिनं डोळेही न उघडल्याकडे दुर्लक्ष करून, स्वतःच चरफडत उठून, तोंड विसळणं आणि स्वतःच चहा करून घेऊन पिणं, वर तिच्यासाठीही चहा करून ठेवणं, हा शिष्टाचार. रात्री दातांत घाण साठते, तोंडाला वास मारतो. त्यामुळं सकाळी उठल्यावर राखुंडी, मिश्री, दातवण, किंवा नव्या काळात ब्रश-पेस्टनं दात स्वच्छ घासणं, हे आम्ही शिकलो होतो. पण सध्या उठल्या उठल्या अंथरुणातच फतकल मारून दुसऱ्यानं आणून दिलेला चहा पिणं, यालाही श्रीमंतांघरी शिष्टाचार म्हणतात, असंही अलीकडेच कळलं.

आम्ही आपले सूर्यकांत-चंद्रकांतचे सिनेमे बघून मोठे झालेले. त्यांमध्ये "स्वारी', "धनी' वगैरे शब्दांनी पतीला हाक मारण्याची पद्धत. त्यातली नायिका पहाटे उठून, (आमच्या "हिची' पहाट नऊ वाजता होते) सडासंमार्जन करून (म्हणजे काय असतं ते?), सगळी कामं उरकून (विसरा !) धन्याच्या सेवेला सदा तत्पर असणारी. तो बाहेरून आल्यावर त्याचे कोट-टोपी सावरणारी, त्याला काय हवं-नको ते पाहणारी. एकदा सहज घरी हे उदाहरण देऊन पाहिलं, तर स्त्रीमुक्ती, विचार-आचारस्वातंत्र्य, यावर तासभर लेक्‍चर ऐकावं लागलं. सगळा शेजारपाजार गोळा झाला होता. शेवटी मीच नमतं घेतलं आणि "स्त्रीमुक्तीचा विजय असो!' अशा घोषणा (मनातल्या मनात) देऊन गप्प बसलो.बायकोच्या नादाला न लागता मग पाण्याचे चार-दोन शिंतोडे अंगावर उडवून झाले, (सभ्य भाषेत याला आंघोळ म्हणतात) की ऑफिसला जायची तयारी करायची. डबा तयार असेल, तर आपलं भाग्यच. नाहीतर तसंच सुटायचं, दुपारी कॅंटीनमध्ये मिळेल ते शिळंपाकं खाण्याच्या आशेवर.ऑफिसातल्या शिष्टाचारांची तर मोठीच जंत्री आहे. पार्किंगमध्ये जागा मिळाली, तर गाडी लावणं, दोन-चार गाड्या फराफर ओढून आपल्याला जागा करून दिल्याबद्दल वॉचमनलाही "थॅंक यू' म्हणणं, हा शिष्टाचार. या "थॅंक यू'ची मोठी गंमत आहे हं! हॉटेलात ज्या कामासाठी वेटर असतो ना, ते केल्याबद्दल म्हणजे पाणी-बिणी आणून दिल्याबद्दल सुद्धा त्याला "थॅंक यू' म्हणणं "मस्ट' आहे. आपल्या तोंडून एखादी चुकीची ऑर्डर गेली, तर "सॉरी' म्हणायचं. त्याला बोलवायचंही "एक्‍सक्‍यूज मी' असं म्हणून. आता, ऑर्डर देण्यासाठी आधी त्याची माफी का मागावी लागते, कुणास ठाऊक? इंग्रजांची परंपरा आहे म्हणून आपणही चालवायची.... एक्‍सक्‍यूज मी हं! ऑफिसी शिष्टाचारांबद्दल बोलताना जरा भरकटलोच. सॉरी....!

ऑफिसात शिरल्यावर प्रत्येकाला गुड मॉर्निंग म्हणायचं. अगदीच "घाटी' ऑफिस असेल, तर नमस्कार म्हणायचं. आणि त्याहूनही सामान्य संस्कारांचं असेल, तर मात्र शेजारचा माणूस येऊन बसला, तरी ढुंकून बघायचं नाही, हा शिष्टाचार. बरं, सकाळ असेल तर गुड मॉर्निंग, दुपारी गुड आफ्टरनून आणि संध्याकाळी गुड इव्हिनिंग बरं. पण रात्रपाळी असेल, तरी गुड "इव्हिनिंग'च. मी रात्रपाळीत सुरुवातीला "गुड नाइट' म्हणायचो. एवढ्या शिव्या खाल्ल्यायंत म्हणून सांगू! नंतर सरावानं मला असं कळलं, की निघताना सुद्धा काही "खास' सहकारिणींनाच "गुड नाइट' म्हणायचं असतं. तेही हलक्‍या आवाजात, किंवा जमलं तर फोनवरच. बाकीच्यांना, म्हणजे पुरुषांना फक्त "बाय' म्हणायचं. आता, पुरुषांना "बाय' कसं म्हणायचं, असला गावंढळ प्रश्‍न विचारू नका.साधी शिंक आली, तरी सॉरी म्हणायचं. ह्याची तर आपल्याला बापजन्मात कधी सवय नव्हती. शिंक म्हणजे अशी झडझडून पाहिजे, की समोरच्या दोघा-चौघांना आंघोळ होऊन, अख्खा परिसर हादरला पाहिजे. आमचे आजोबा शिंक द्यायचे, त्यानं छपराची कौलं हलायची. माळ्यावरून दोन-चार ढिगारे डोक्‍यावर कोसळायचे. पण या शिष्टाचाऱ्यांच्या राज्यात शिंक द्यायची ती नाका-तोंडावर रुमाल घेऊन. वर "सॉरी'ही म्हणायचं. हा म्हणजे तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार झाला ! बरं, बायकांनी तर शिंक अशी द्यायची, की कळलंही नाही पाहिजे. मला वाटतं, या शिंकांचे पण क्‍लास जॉइन केले असणार त्यांनी.

कुणाच्या घरी जायचं असेल, तर भलतेच शिष्टाचार. आधी फोन करून तो/ती घरी आहे ना, हे विचारायचं. मग त्याची वेळ ठरवायची, आपण येतोय हे सांगायचं. एवढं करून महत्प्रयासानं त्यानं यायला होकार दिलाच, तर त्याच्या घरी जायचं. जाताना घरात केलेलं काही गोडधोड, एखादा पदार्थ वगैरे न नेता, काहितरी "रेडीमेड' गिफ्ट न्यायचं. एखाद्या प्रसिद्ध हलवायाची मिठाई, नाहीतर पॅक्‍ड फूड न्यायचं. त्याच्या घरात असलेल्या समस्त चिल्ल्यापिल्ल्यांची तोंड तासभर बंद राहतील, इतपत काहितरी खाऊ नेणं वेगळंच. त्यानं चहा दिलाच, तरी तो कपात थोडासा कंपल्सरी उरवायचा. तळाशी साखर असली, तर ती चाटूनबिटून अजिबात खायची नाही. कप साफसूफ करून धुण्यासाठी सोपा करून देणं, हे "बॅड मॅनर्स' मानले जातात या शिष्टाचारी जगात. तुमचा कितीही गाढ मित्र असेल आणि त्याच्या घरचं फर्निचर भंगारात विकण्याच्या लायकीचं वाटत असेल, तरी "अरे, नवीन केलं का हे?' असं विचारणं मस्ट. "रंग नवीन दिला का?' असंही विचारायचं. तो "नाही' म्हणाला, तर लगेच पुढचं वाक्‍य फेकायचं..."पण एकदम नवीन वाटतंय हं. छान मेन्टेन केलंय (घर) तुम्ही.' मग त्याच्या सहधर्मचारिणीकडून "बाया कुठे मिळतात हल्ली कामाला, सगळं स्वतःच करावं लागतं. मिळाल्या, तरी अगदी कामचुकार असतात. स्वतः राबल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,' वगैरे टिपिकल प्रवचन ऐकण्याची तयारीही ठेवायची.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, निघताना, "या हं एकदा घरी' असं म्हणायचं. हे वाक्‍य प्रत्येकाला म्हणायचं असतं. विशेषतः तुम्ही पुण्या-बिण्यासारख्या पुढारलेल्या, सुसंस्कृत शहरात राहत असलात, तर ते "मस्ट'च.

आणखी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. "येत्या रविवारी या', "अमूक तारखेला मला सुटी आहे तेव्हा या', असली मूर्खपणाची आणि स्वतःला गोत्यात आणणारी विधानं अजिबात करायची नाहीत. आपण कधीही घरी नसतो, दिवसभर काम असतं, वगैरे वाक्‍यं आधीच गप्पांच्या ओघात पेरून ठेवायची. म्हणजे आपल्याकडे येण्याचा विचारच समोरचा माणूस करत नाही. त्यातून "या हं एकदा घरी' असं म्हटलं, की तो समजून जातो. नव्या सोसायटीत राहायला गेल्यावर समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठी सुद्धा हे वाक्‍य फेकता येतं.शिष्टाचाराची ही कथा मग पार चप्पल-बुटांच्या प्रकारापासून स्वच्छतागृहापर्यंत जाऊन पोचते. प्रातर्विधी उरकण्यालाही हल्ली "बाथरूम'मध्ये जाणं म्हणतात. अर्थात, हल्ली संडास-बाथरूम खऱ्या अर्थानं "ऍटॅच्ड' म्हणजे एकत्रच असल्यानं, तेही प्रॅक्‍टिकली खरंय म्हणा!

बॉसच्या वाढदिवसाला ग्रीटिंग, गिफ्ट देणं, कुणाला मिळालेल्या फडतूस प्रमोशनबद्दलही त्याचं तोंड भरून अभिनंदन करणं, हेही शिष्टाचारात मोडतं. आमच्या बापजाद्यांच्या काळात बॉसचा काय, स्वतःचाही वाढदिवस सेलिब्रेट वगैरे करणयाची पद्धत नव्हती. साल माहित असलं, तरी मिळवली, अशी परिस्थिती होती. पण काळानुसार बदलायला हवं, हेही खरंच.मीही काळाबरोबर बदलायचं ठरवलंय. उगाच "धोंडोपंत जोशी' व्हायचं नाही आपल्याला. शिष्टाचार पाळणं एवढाच एक शिष्टाचार सध्या अंगी बाणवायचा प्रयत्न करतोय.

----