Jun 15, 2011

विहीर

परसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या मागच्या अंगणाला लागूनच विहीर होती. आजही आहे. माझ्या बालपणी पंप, नळ वगैरे आधुनिक सेवांचा आम्हाला गंधही नव्हता. रोज विहिरीवरून पाणी भरायला लागायचं. अंगणातल्या माडांना आणि फुलझाडांना विहिरीचंच पाणी काढून घालावं लागायचं. आजोबा या कामात एकदम पुढे असायचे. आम्हाला कळायला आणि झेपायला लागल्यापासून आम्हीही मग त्यांना मदत करायचो.
मला आठवतंय, तेव्हापासून विहिरीचं पाणी काढायला दोन रहाट होते. त्याआधी त्यांच्या मध्ये एक तिसरा रहाटही होता, अशी आख्यायिका ऐकायला मिळायची. सध्या जिवंत असलेल्या दोन रहाटांपैकी उजवीकडचा जरा डेंजर होता. लोखंडीच असावा, पण जरा पातळसर आणि हलका होता. त्यावर पाणी भरायला जास्त सोपं जातं, असं आजोबा म्हणायचे. आम्हाला मात्र लहानपणी त्याची भीती वाटायची. तो जास्तच हलका होता, त्यामुळे कळशी बांधून खाली सोडताना एकदम गपकन पाण्यात पडायची. रहाट आणि विहिरीचा कठडा यांच्यातील अंतरही थोडं जास्त होतं. त्यामुळे सवय नसेल, तर कळशी खेचून वर काठावर घेणं आणि पुन्हा खाली सोडणं अवघड जायचं.
त्या मानानं दुसरा रहाट अगदीच मध्यमवर्गीय होता. सोपा, साधा आणि सरळ. जरासा जाडसर आणि गुळगुळीत होता. आम्हा मुलांना तो बरा वाटायचा. रहाटाचं टोक डोळ्याला लागण्याचा धोकाही तिथे नव्हता. आम्ही बरेचदा तोच वापरायचो.
आजोबा प्रत्येक माडाला चार, अशा साधारणपणे पंचवीस ते तीस कळशा आणि घागरी दिवसातून दोनदा उपसायचे. आम्ही मदतीला असलो, की त्यांचं काम हलकं व्हायचं. पण त्यांनी स्वतःहून आम्हाला कधी मदतीला बोलावलं नाही. आम्ही नसलो किंवा खेळात दंग असलो तर तरी त्यांचा पाणी घालण्याचा शिरस्ता काही मोडायचा नाही. पुढच्या अंगणासमोर नंतर आमच्या आवाराच्या मालकांनी कपडे धुवायला पाथरी घालून दिल्या. तिथेही आजोबा त्यांचे कपडे, चादरी, अंथरुणं धुण्याचा आनंद घ्यायचे. त्यासाठीचे पाणीसुद्धा ते विहिरीवरूनच आणायचे.
आमच्या संपूर्ण आवारात ही विहीर सामायिक होती. आवाराचे मालक वेगळे असले, तरी आमचं घर तेवढं स्वतःच्या मालकीचं होतं. पण आम्हाला ही विहीर वापरण्याची मुभा होती, आहे. तेव्हा नगरपालिकेचे नळ फोफावले नव्हते. आसपासच्या घरांतली, अगदी लांबलांबची माणसं या विहिरीवर पाणी भरायला यायची. बायका आमच्या घरासमोरच्या पाथरीवर कपडे धुवायच्या. सकाळच्या वेळेतली ही लगबग बघताना वेळ छान जायचा. आवारातल्या एका घरातले वयस्कर भाऊ, धुणी भांडी करणा-या कमल-शेवंती आणि इतर काही लोक यांचा विहिरीवर दिवसभर राबता असायचा. कुणा एकाची दोरी रहाटाला लावलेली असायची. दिवसभर सगळ्यांच्या ती उपयोगाला यायची. एखादी प्लॅस्टिकची कळशीदेखील असायची. ती सोयीची असेल, तर लोक तिचाच वापर करायचे. नाहीतर स्वतःची कळशी लावली जायची.
पाणी काढण्याची प्रत्येकाची निरनिराळी त-हा होती. काही जण कळशी सोडताना ती रहाटाला लावून मग गडगड करून एकदम विहिरीत सोडायचे. भाऊ त्यात अगदी पटाईत. पन्नाशीच्या घरातले असले, तरी त्यांचा पाणी काढण्याचा उत्साह आणि क्षमता दाडगी होती. ते रहाट एवढ्या वेगाने सोडायचे, की तो डोळ्याला लागेल की काय, अशी भीती वाटायची. काढतानाही अगदी ढंगात ती कळशी वर घ्यायचे.
मलाही पाणी काढायला खूप आवडायचं. पण पाणी काढताना त्यात खेळच जास्त व्हायचा. कळशी बुडवताना होणारा आवाज ऐकून मजा यायची. ती पूर्ण भरली, की विहिरीच्या अगदी तळापर्यंत किंवा दोरी संपेपर्यंत सोडायची. मग पाण्याच्या आत असेपर्यंत ती हलकी वाटायची. पाण्याच्या वर आल्यावर मात्र जड व्हायची. मोठ्या रहाटावर पाणी काढायला मला लहानपणी कठीण जायचं. आमचा मुक्काम कायम दुस-या रहाटावर.
कधीकधी पाणी काढताना कळशीचा फास सुटून ती विहिरीच्या तळाशी जायची. मग तळाशी सूर मारून काढणारे एक-दोघे जण होते. आमची विहीर जेमतेम सात-आठ पुरुष खोल. त्यामुळे वरून विहिरीचा तळ सहज दिसायचा. कळशी कुठे पडलेय, ते दिसू शकायचं. आम्ही अगदी लहान असतानाच पाण्यात सूर मारून कळशी काढणारे होते. कधीकधी घळ सोडून कळशी वर काढली जायची. घळ म्हणजे लोखंडी आकडे असायचे. त्याला दोर लावून खाली सोडले जायचे. एखादा आकडा कळशीच्या काठात अडकायचा आणि कळशी वर निघायची.
आवारात राहणारे एक कुटुंब त्यांचा गणपतीही विहिरीत सोडायचे. पण नंतर ही पद्धत बंद झाली. आमच्या विहिरीत पोहण्याचे किंवा विहिरीच्या काठाला लागूनच कपडे धुण्याचे प्रकार नव्हते.
विहिरीत पाण्याचे दोन-तीन मोठे झरे होते. एक तर पाण्याच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळच होता. आमचे आवार म्हणजे पूर्वीचे शेतच असल्याने विहिरीला पाणी भरपूर. पावसाळ्यात तर हाताने पाणी काढता यायचं. विहीर कोरडी झालेली मी एखाद वेळीच बघितली असेल. एकदा गाळ साफ करण्यासाठी पाणी उपसलं होतं, तेव्हाच.
हळूहळू काळ बदलला आणि घरोघरी मुन्सिपाल्टीचे नळ आले. विहिरीच्या पाण्याची गरज कमी होऊ लागली. आम्हीसुद्धा पंप घेतला. दारात नळाचं पाणी येऊ लागल्यावर विहिरीवरची वर्दळ कमी झाली. आता तर विहिरीवर जाळी घातलेय आणि एखादंच कुणीतरी कधीतरी पाणी उपसतं. पाण्यावर हिरवळीचे थरही बघायला मिळतात. आता विहीर बरीचशी एकाकीच असते...बालपणीच्या अनेक आठवणींसारखी...