Mar 30, 2010

लाभले दुर्भाग्य आम्हास...

""माझ्या आयुष्यातील 68 वर्षांपैकी 41 वर्षे मी महाराष्ट्रात घालविली आहेत. मी स्वतःला महाराष्ट्राचेच एक अंग मानतो आणि त्याबद्दल मला अभिमान आहे.''
...गेली चार दशके केवळ रुपेरी पडदाच नव्हे, तर तमाम भारतीयांचे हृदयही व्यापून उरणारा महानायक अमिताभ बच्चन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून हे गौरवाने सांगत होता....हिंदी भाषेतून!
वेळात वेळ काढून मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहून अमिताभ यांनी मनाचा मोठेपणा दाखविला; पण त्यांचा "महाराष्ट्राभिमान' फुलून आला, तो भाषणाच्या सुरवातीला मराठी उच्चारशैलीतील "नमस्कार', सुरेश भट आणि गडकरी (फक्त "गडकरी'च! "राम गणेश गडकरी' नव्हे!) यांच्या कवितांमधल्या "चारोळ्या' म्हणण्यापुरता.
संमेलनाचा मुख्य मंडप पहिले तीन दिवस फुलला होता, त्यापेक्षा दीडपट ते दुप्पट गर्दी समारोपाला होती; ती अर्थातच अमिताभच्या चाहत्यांची. अमिताभ मराठी कविता वाचणार, कदाचित मराठीतूनही बोलणार, या अपेक्षेने आणि त्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार, या उत्सुकतेने बरेच चित्रपटप्रेमीही सोहळ्याला आले होते. यात अर्थातच त्यांचा दोष नव्हता. "अमिताभी' आवाजातील कविता ऐकण्याचा प्रत्यक्ष योग दुर्मिळच होता. परंतु अमिताभने कविता वाचल्या त्या हरिवंशराय बच्चन यांच्या! मराठी साहित्य संमेलनात, मराठी वातावरणात, मराठी श्रोत्यांसमोर, हिंदी कविता! नाही म्हणायला त्याने सुरेश भट आणि गोविंदाग्रजांच्या कवितांमधील काही ओळींचा उल्लेख केला; पण त्यापेक्षा तो नसता केला तर बरे, असेच म्हणण्याची वेळ त्यांच्या वाचनाच्या शैलीवरून आली.
मुंबईत वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत लावलेल्या हजेरीवरून कॉंग्रेसमध्ये उठलेले वादळ, "मराठी'च्या मुद्द्यावरून "मनसे'ने उठविलेली टीकेची झोड, या सगळ्याचा संदर्भ अमिताभच्या भाषणाला होता. या वादांना आणि टीकेला त्याने "नजरबट्टू' (तीट) असे नाव देऊन सौम्य शब्दांत उत्तरही दिले; पण मुख्य मुद्दा होता मराठीबद्दलच्या अभिमानाचा. कौशल इनामदारच्या मराठी अभिमानगीताचा उल्लेखही अमिताभ यांनी भाषणात केला. मान-सन्मान, बायको, यश, सगळे काही महाराष्ट्रात मिळविल्याचेही सांगितले; पण हिंदीतून.
वास्तविक, महाराष्ट्राच्या ऋणातून उतराईच व्हायचे होते, तर अमिताभसाठी हीच सुवर्णसंधी होती. मराठी कवितांच्या मोडक्‍यातोडक्‍या उच्चारांना तिथे उपस्थित तमाम अमिताभप्रेमी आणि साहित्यप्रेमींनी जेवढा प्रतिसाद दिला, त्यापेक्षा कित्येक पट अधिक प्रतिसाद त्याच्या (मोडक्‍यातोडक्‍या का होईना) मराठीतील भाषणाला दिला असता. अमिताभच्या दर्शनाने मंडपातील रसिक जेवढे भारावले नसतील, त्याहून जास्त व्यासपीठावरील काही मान्यवर भारावले होते. त्यांच्या भाषणातूनही अमिताभप्रेमाचा जागोजागी प्रत्यय येत होता.
कोणत्याही समारंभात, कोणत्याही व्यासपीठावर अमिताभसारखा मध्यममार्गी माणूस शिष्टाचाराला धरून जे बोलेल, ते आणि तेवढेच अमिताभ मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलला. मनसेच्या बोचऱ्या टीकेला, कॉंग्रेसमधील बालिश वादाला टीकाकारांना उत्तरच द्यायचेच होते, तर मराठीतून भाषण करून नव्हे, गेला बाजार "होय, मी मराठी आहे,' असे ठणकावून सांगता आले असते. अमिताभची मराठी अस्मिता "महाराष्ट्राचे अंग' असल्याचे सांगण्यापुरतीच मर्यादित राहिली. संयोजकांनी नाही, पण निदान मराठी रसिकांनी त्याहून जास्तीची अपेक्षा ठेवायला हरकत नाही!