Oct 18, 2008

हुर्रे!

सचिन तेंडुलकरनं बारा हजारांचा टप्पा गाठला आणि मी दहा हजारांचा! खरं तर दहा हजारांचा टप्पा कधी गाठला जातोय, याचीच वाट पाहत होतो. गेले काही दिवस तुम्हाला एक बातमी सांगायची होती, पण त्याआधी हा टप्पा पार पडावा, असं वाटत होतं. शिवाय, ती बातमी कन्फर्म पण होत नव्हती.
गेल्या शनिवारी एका उत्साही सहकाऱ्याचा फोन आला. मी खरेदीला बाहेर पडलो होतो.
""पेंढारकर साहेब, अभिनंदन!''
मी म्हटलं, कसलं?
""बस काय राव?'' पुढचा अपेक्षित प्रश्‍न.
""अरे बाबा, खरंच माहीत नाही मला!''
""अरे लेका, तुला "टार माझा'च्या स्पर्धेत बक्षीस मिळालंय! उत्तेजनार्थ. पार्टी पाहिजे, पार्टी!''
मी "बरं' म्हणून फोन ठेवला. खरं तर विश्‍वास बसत नव्हता...
अर्थात, "ब्यूटी क्वीन' स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळवणाऱ्या सुंदरींना एकदम आश्‍चर्याचा धक्का बसतो की नाही? त्या तोंडावर हात बित घेतात नाही का? आणि तोंडाचा भला मोठा चंबू करतात ना, तसं! आता, उरलेल्या तीन जणींपैकी कुणीतरी एक होणारच, हे तर नक्की असतं ना? मग प्रत्येक वर्षीच्या स्पर्धेत, प्रत्येक सुंदरीचा दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतलेला, तोंडाचा भलामोठा चंबू केलेला फोटो कसा काय छापून येतो, कुणास ठाऊक?
..असो. तर माझी तशी काही प्रतिक्रिया झाली नव्हती. तरीही, एखाद्या प्रसिद्ध मराठी टीव्ही चॅनेलच्या स्पर्धेत, तरुणाईच्या जत्रेत माझा उत्तेजनार्थ का होईना, नंबर लागणं, ही नाही म्हटलं तरी मोठीच कामगिरी होती.
शनिवारी, 11 तारखेला ही बातमी कळली, पण एका मित्राकडून. त्यानं "स्टार माझा'वर हा निकाल बघितला होता. पण चॅनेलकडून काही अधिकृत माहिती मिळत नव्हती. कुणी चॅनेलवरच्या पट्टीत माझं नाव दाखवल्याचंही सांगत होतं, पण स्वतः पाहिल्याशिवाय खात्री कशी करायची? तसा, हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासूनच माझा ब्लॉग त्यांनी अनेकदा दाखवला होता, तोही मी कधी पाहिला नव्हता...
अखेर गेल्या बुधवारी "स्टार माझा'कडून अधिकृत मेल आलं. 22 तारखेला मुंबईत शूटिंगला बोलावल्याचंही समजलं. प्रसन्न जोशीला फोन करून, माहितीही घेतली. अच्युत गोडबोले यांनीच या स्पर्धेचं परीक्षण केल्याचंही त्यानं सांगितलं. म्हणजे कुणाच्या वशिल्याबिशिल्यानं माझा ब्लॉग बक्षीसपात्र क्रमांकांत आला नव्हता. तर स्वतःच्या लायकीच्या आधारावरच आला होता.
आमचा मित्र आणि "सकाळ' परिवाराचाच आशिष चांदोरकरच्या ब्लॉगलाही उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. ते कळल्यावरही बरं वाटलं.
आता येत्या बुधवारी, 22 ला मुंबईत जायचंय. शूटिंगला. ब्लॉगविषयी आमची मुलाखत असावी, बहुधा. टीव्हीवर झळकण्याचा माझा पहिलाच अनुभव असेल. पण शूटिंगचा नाही. आधी "ग्राफिटी'च्या पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी एकदा मुलाखत दिली होती. अश्‍विनी भावेच्या "कदाचित'मधल्या पत्रकार परिषदेच्या दृश्‍यातही शूटिंगमध्ये सहभागी होतो. आता माझी स्वतंत्र मुलाखत असेल, बहुधा. मेकअप बिकप पण करणारेत. बघू!
ब्लॉग सुरू करण्यामागे अनेकांची प्रेरणा आहे. मुळात, या ब्लॉगविश्‍वाची ओळख करून दिली आमचे हरहुन्नरी दोस्त आणि माजी "सकाळ'वासी देविदास देशपांडे यांनी! त्यांनीच ब्लॉग सुरू करायला, त्यावर मजकूर टाकायला शिकवलं. बाकी डिझाइनचंही मार्गदर्शन केलं. तसा ब्लॉगच्या लेआऊट किंवा अन्य तांत्रिक बाबींत मी अजून अडाणीच आहे, पण लिखाणासाठी विषयांना मात्र तोटा नाही! रोज म्हटलं तरी लिहिता येईल. सुचण्याच्या प्रश्‍न आपल्याला कधीच नाही. फक्त वेळ मिळत नाही, एवढंच!
असो. तर ब्लॉगच्या माध्यमातून लोकांना चिमटे काढण्याचा, शिव्या देण्याचा, उखाळ्यापाखाळ्या करण्याचा आणि कौतुकं पण करण्याचा आणखी काही वर्षांचा संकल्प आहे. तुमची साथ आहे ना?

Oct 17, 2008

जरा वजन ठेवा!

सदू आणि दादू जानी दोस्त. कळायला लागलं, तेव्हापासून एका ग्लासातले. गावातले लोक तर त्यांना ढवळ्या-पवळ्याच म्हणायचे. सदू सातवीपर्यंत शिकला होता, तर दादूनं पहिलीनंतर शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं, एवढाच काय तो दोघांमधला फरक. सदू ग्रामपंचायतीत चिकटला, तर दादू मोलमजुरी करून रात्रीच्या दारूची सोय बघू लागला. घरदार वगैरे काही प्रश्न नव्हता; कारण दारूवर पैसे उडवल्यानंतर हाताशी फार काही राहत नव्हतं. सदूची नोकरी बऱ्यापैकी चालली होती. तो आणि त्याच्या चार भिंती, एवढाच संसार. खरं तर चार भिंतीसुद्धा नाहीत. एक ढासळलीच होती. पुढच्या पावसाळ्यात राहील की नाही, याची खात्री नव्हती.
रोज संध्याकाळी कामं उरकली, की दोघांचं भेटण्याचं ठिकाण म्हणजे हणम्या पावलेचा गुत्ता. दोघांना रोज तिथे स्वर्गप्राप्ती व्हायची. रात्री गुत्ता बंद होईपर्यंत, किंबहुना हणम्यानं लाथा घालून हाकलून देईपर्यंत दोघांची तिथेच ब्रह्मानंदी टाळी लागलेली असायची. घरी विचारायलाही कुणी नव्हतं. तशी दादूची म्हातारी होती घरी; पण ती बिचारी स्वतःपुरती भाकरी करून जे काही असेल, त्याच्याबरोबर खाऊन झोपून जायची. तिला दिसायचंही नाही नीटसं. त्यामुळं दादू घरी कधी येतो, यावर कुणी लक्ष ठेवणार नव्हतं.
एकदा गावात पाइपलाइन योजनेचं मोठं काम निघालं होतं. स्वतः आमदारसाहेब छगनराव जमदाडेंनी त्यात लक्ष घातलं होतं. त्यामुळे गावात आनंदाचं भरतं आलं होतं. तुमच्या घरात, दारात नळ येणार, असं आश्वासन छगनरावांनी दिलं होतं. छगनराव दिल्या शब्दाला जागले. महिनाभरात घराघरांत नळ आले. या गोष्टीलाही आता वर्ष उलटलं होतं. पाण्याचा मात्र अजून पत्ता नव्हता!
दादूची परिस्थिती त्या वेळी वाईट होती. हातात काम नव्हतं. दिवसाची खायची आणि रात्री प्यायची पंचाईत झाली होती. कसेबसे दिवस ढकलत होता. पाइपलाइनच्या कामाचं त्याला कुणीतरी सांगितलं, तेव्हा त्याला हुरूप आला. तालुक्याला जाऊन आमदारसाहेबांना भेट, असं कुणीतरी सुचवलं. त्याला आपला जिगरी दोस्त सदूची आठवण झाली. सदूच्या ओळखीनं, मध्यस्थीनं दादू छगनरावांच्या दरबारात पोचला. तिथं त्यानं आपली कैफियत मांडली. छगनरावांनीही उदार मनानं त्याला काम देण्याचं आश्वासन दिलं. सदू-दादूची जोडी खूष झाली.
दोघं निघायला लागले, तेव्हा छगनरावांच्या दिमतीला असलेला जिल्हा परिषदेचा एक अधिकारी कदम यानं दोघांना अडवलं.
"काय राव, तसंच निघालात? "
"मग? तसंच म्हंजे? " सदूच्या चेहऱ्यावर प्रश्नांची जळमटं पसरली.
"अहो, तसंच जाऊन तुमचं काम होणारंय होय? "
"मग? आमदारसायेब सोता म्हणालेत! " दादूनं मध्ये तोंड घातलं.
"अहो, ते म्हणाले, तरी तसं काम होत नसतं! सदू, तू तर सरकारी हापिसात काम करतोस ना? तुला कळायला पायजे, " कदमनं खुलासा केला.
तेव्हा कुठे सदूच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्याला अशा कामांची कल्पना असली, तरी या कामात सुद्धा ते द्यायला लागेल, याची कल्पना नव्हती. शेवटी हो-नाही करता करता हजार रुपयांवर सौदा ठरला. दोन महिन्यांच्या कामाचे दादूला सहा-सात हजार रुपये मिळणार होते. त्यातले हजार तर इथेच गेले म्हणून त्यानं जरा तोंड वेंगाडलं; पण पर्याय नव्हता. हे हजार रुपये आमदारांच्या नव्हे, तर कदमच्याच खिशात गेल्याचं त्यांना नंतर कळलं. त्या वेळी कुण्या आमदारांच्या कुण्या विरोधकानं या प्रकाराचा बभ्रा केला आणि आमदारांवर आरोप झाले. मग दादूलाच लाचखोरीची तक्रार द्यायला लावून कदमला कामावरून कमी करण्यात आलं.
पेपरमधली एक बातमी वाचून सदूला अचानक या प्रकरणाची आठवण झाली. सरकारी कामात घेण्यात आलेली लाच त्या त्या माणसांना परत मिळणार होती. महिनाभरात ही कारवाई करण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता.
सदूनं उत्साहानं दादूला ही बातमी सांगितली. या लाच प्रकरणापासून दादूचा सरकारी यंत्रणेवर विश्वासच राहिला नव्हता, तरीही सदूनं त्याला पटवलं. आपण सरकारी नोकरीत असल्याचा त्याला विलक्षण अभिमान होता. आपण ही रक्कम परत मिळवून देऊच, अशी खात्री त्यानं दादूला दिली. दादूही त्याच्या आग्रहाला बळी पडला.
सदूला ग्रामपंचायतीचं काही काम होतं. त्यामुळं लाचेचे पैसे परत मिळवण्यासाठी दादूलाच तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागत होत्या. दोन-चार चकरा झाल्यावर तो वैतागून गेला. त्याची गावातली मजुरीही बुडत होती आणि हेलपाट्यांतून हाती काही लागत नव्हतं. शेवटी दादूनं सदूच्याच गळ्यात हे काम घातलं. पुढच्या आठवड्यात सदू तालुक्याला जाऊन आला, तो येताना पैसे घेऊनच.
रात्री ठरलेल्या ठिकाणी- अर्थात गुत्त्यावर भेटल्यानंतर दादूला अगदी भरून आलं होतं. लाच हजार रुपयांची दिली, पण सातशेच रुपये परत मिळाले होते, तरी पैसे मिळाले यावरच तो खूष होता. आपल्याला जे काम अनेक खेपांत जमलं नाही, ते सदूनं एकाच दमात कसं काय केलं, याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. त्यानं सदूला खोदून खोदून विचारायचा प्रयत्न केला; पण सदू फार काही बोलत नव्हता. आपण काम गळ्यात घातल्यामुळे सदू रागावला की काय, असं दादूला वाटलं; पण तसं काही नव्हतं.
"अरे गड्या, झालंय तरी काय तुला? हे अवघड काम एका दमात केलंस तरी कसं ते सांग! " दादूनं शेवटी न राहवून विचारलं.
"अरे काय सांगायचं? सरकारी नोकरीवर जो इस्वास होता, तोच उडालाय लेका! "
"का? काय झालं? "
"अरे काय होनारंय? तुला तीनशे रुपये कमी का मिळाले समजलं नाही का गड्या? "
"नाही...! " दादूच्या डोक्यात काही शिरत नव्हतं.
"लाच म्हणून दिलेले हजार रुपये परत देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच घेतली हरामखोरांनी! " सदू वैतागल्या स्वरात म्हणाला.
दादूनं कपाळावर हात मारून घेतला....

Oct 16, 2008

येस `बॉस'!

मोकळ्या पटांगणाऐवजी एका बंद घरातल्या शाळेत त्या मुलांचा खेळ रंगला होता. खेळाचं नाव होतं - "महाराज म्हणतात... ' खेळाचं स्वरूप साधारणपणे असं असतं ः एकानं राज्य घ्यायचं. तो होणार महाराज. मग त्यानं एकेकाला ऑर्डर सोडायच्या - महाराज म्हणतात, पाणी प्या. महाराज म्हणतात, खाली बसा. महाराज म्हणतात अमकं करा अन् तमकं करा...! सगळ्यांनी त्या पाळायच्या जो पाळणार नाही, त्यानं बाहेर जायचं. इथे "महाराज'च्या ऐवजी त्याला "बॉस' म्हणत होते, एवढाच फरक...
ही मुलं जरा मोठी होती. कुठल्या कुठल्या भागातून आलेली. काही वांड होती, काही आगाऊ, काही अतिउत्साही, काही खोडकर (नॉटी. ). या शाळेत एक आधुनिक बाईसुद्धा होत्या. त्या पण लंडन-बिंडन कुठल्या कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या. मुलं आणि हे "बॉस', यांच्यात समन्वयाचं काम त्या करत होत्या.
या मुलांचं काम काय, तर एकतर त्या महाराजांनी दिलेल्या ऑर्डर पाळायच्या आणि उरलेला वेळ चकाट्या पिटत, एकमेकांची उणीदुणी काढत बसायचं. काही मुलं पार बिघडलेली होती. कुणी विड्या फुंकायचं, कुणी मन मानेल ते करायचं, कुणी शिवराळ भाषा वापरायचं, कुणी अंगावर धावून जायचं...
या सगळ्या गोतावळ्यात एका प्रसिद्ध दिवंगत राजकीय नेत्याचा मुलगाही होता. घरात, परिसरात, कॉलनीत, गल्लीत उच्छाद मांडणाऱ्या आणि नकोशा झालेल्या मुलांना शिक्षा म्हणून होस्टेलला पाठवतात ना, तसंच त्यालाही "तीन महिने कटकट नको' म्हणून या शाळेत पाठवलं होतं. पण झालं भलतंच. त्याच्या खोड्या कमी व्हायच्या ऐवजी इथे येऊन आणखी वाढल्या होत्या. आपल्याबरोबर त्यानं बाकीच्या मुला-मुलींनाही बिघडवायला सुरवात केली होती... त्यांचा हा खेळ बघणारे लोकही त्याच्या या थेरांमुळे हवालदिल झाले होते.
या अनोख्या शाळेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होतं, की तिथे "बॉस'च्या, अर्थात "महाराजां'च्या ऑर्डर पाळण्याशिवाय दुसरी कोणतीही शिस्त नव्हती. त्यामुळं कुणीही कुणाच्याही बाथरूममध्ये घुसणं, एखाद्याची टवाळी करणं, अंगचटीला जाणं, अंधारात कुणाचा गैरफायदा घेऊ पाहणं, याही कृत्यांना मोकळं रान होतं. किंबहुना, जास्तीत जास्त लोकांनी हा खेळ बघावा, म्हणून त्यासाठी प्रोत्साहनच होतं...
तो खोडकर मुलगा या सगळ्यात आघाडीवर होता. शाळेच्या सगळ्या मोकळ्या वातावरणाचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला होता. रक्तरंजित पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेली मुलगी असो, वा चित्रपटांत बरीवाईट कामं करणारी मुलगी, त्याच्यासाठी दोघीही सारख्याच होत्या. शाळेनंही त्याला प्रोत्साहन दिलं होतं... त्याच्या या खोड्या, कुरापतीच खेळाचं आकर्षण ठरल्या होत्या.
अचानक काय झालं माहित नाही, पण मुलांच्या खोड्या कमी झाल्या. मुलं थोडी सुधारल्यासारखी वाटू लागली. तो खोडकर मुलगा तर जरा अधिकच. शोध घेतल्यावर कळलं, की कुणीतरी वरून दट्ट्या आणला होता. हा खेळ आयोजित करणाऱ्यांनाच झापलं होतं. त्यांच्यावर कारवाईची ताकीद दिली होती. त्यामुळं मुलंही सुतासारखी सरळ आली...

Oct 13, 2008

कुणाची गं तू?

अंगावर फाटक्‍या तुटक्‍या कपड्यांनिशी मुंबई स्वर्गाच्या दारात उभी होती। एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, वसंत बापट प्रभृतींची भेट तिला घ्यायची होती. चित्रगुप्तानं बऱ्याच रखडंपट्टीनंतर मुंबईला आत प्रवेश दिला. एसेम, अत्रे, बापटांसह संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांसमोर मुंबई जाऊन उभी ठाकली. सगळ्या नेत्यांना थोडंसं आश्‍चर्य वाटलं, पण त्यांना हे फार अनपेक्षित नव्हतं. कधी ना कधी मुंबई आपल्याकडेच गाऱ्हाणं घेऊन येणार, याची त्यांना खात्री होती.

मुंबईच्या या अनपेक्षित आगमनानं सगळे नेते किंचित चिंतेत पडले। "गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाही, एवढी दुरवस्था मुंबईची झाली आहे. तिला नरकयातना भोगायला लावणाऱ्यांना संडास साफ करायला लावलं पाहिजे, नरकातही त्यांना जागा दिली जाऊ नये,' असं भाषणच त्यांनी संतप्त अवस्थेत ठोकलं. "जाहला न इतुका अवमान कधी, जाळली का यासाठीच आयुष्यें आम्ही' अशा स्वरूपाची कविता बापटांनी तत्काळ रचून गाऊन दाखवली. एसेम नेहमीप्रमाणे धीरगंभीर होते.परप्रांतीयांनी केलेलं आक्रमण, आपल्याच माणसांनी दलालांच्या हाती सोपवून शहराची केलेली माती, वाढतं प्रदूषण, गजबजाट, अस्वच्छता, गुन्हेगारी याबद्दलच मुंबईला गाऱ्हाणं मांडायचं असावं, अशी या सर्व नेत्यांना खात्री होती. "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,' ही घोषणा आपण का दिली आणि त्यातल्या "च'ला किती महत्त्व होतं, याची आठवण अत्र्यांनी पुन्हा एकदा करून दिली. हे करताना यशवंतराव चव्हाणांकडे जाणीवपूर्वक कटाक्ष टाकला. यशवंतराव आपल्या पेटीतून महाराष्ट्राचा मंगल कलश काढून त्याला पॉलिश करण्यात गुंगले होते. त्यांनी अत्र्यांकडे विशेष लक्ष दिलं नाही.

मुंबईचं खरं गाऱ्हाणं ऐकून घ्यायलाच कुणी तयार नव्हतं। खुद्द महाराष्ट्रात जी स्थिती भोगत आहोत, तीच संयुक्त महाराष्ट्राच्या अध्वर्यूंच्या दारी आल्यावरही अनुभवायला मिळावी, याचं तिला विलक्षण वैषम्य वाटलं. ती रडवेली झालेली पाहून सगळ्या नेत्यांना दया आली. आपण समजतो तसं नाही. मुंबईचं दुःख वेगळंच आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी आपापल्या भूमिका आणि मतभेद बाजूला ठेवून मुंबईला बोलण्याची संधी दिली.
"संयुक्त महाराष्ट्राच्या पदरात माझं कन्यादान करणाऱ्या माझ्या आदरणीय पित्यांनो, मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन. पण आता सध्याच्या राज्यकर्त्यांनी जो तमाशा मांडलाय, तो तुम्हाला कळला, तर तुमच्याच कामगिरीची तुम्हाला कीव येईल...'' मुंबई मुसमुसत म्हणाली
``काय झालं, काय झालं?'' सगळे चिंताक्रांत झाले
``खुद्द माझ्या पित्याच्या चारित्र्याविषयीच संशय घेतला जात आहे.''
``कोण आहे तो हरामखोर?'' अत्रे गरजले.
``सांगते, सांगते....आधी एका पोलिस अधिकाऱ्यानं माझ्या वडिलांविषयी संशय घेतला। मी कुणाच्याच `बापा'ची नाही, असे ते म्हणाले। आतापर्यंतचे राज्यकर्ते मला कायमच सावत्रपणाची वागणूक देत आले। त्यात या अधिकाऱ्यानं मी अनौरस असल्याचंच सांगून मला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही...'' मुंबई स्फुंदून स्फुंदून रडू लागली.
एसेमनाही गलबलून आलं.
``माझ्यावर कायमच प्रेम करणारे एक आजोबा मला धीर देतील, असं वाटलं होतं. पण त्यांच्याशी भांडण असलेल्या त्यांच्या पुतण्यानं मला आधार दिला. "रस्त्यावर उतरा, म्हणजे मुंबई कुणाच्या बापाची आहे हे कळेल,' असं त्या अधिकाऱ्याला सुनावलं. नंतर आमच्या या आजोबांचा दसरा मेळावा झाला. ते आता थकल्यामुळं त्यांच्या मुलानंच "मुंबई आमच्या "बापा'ची' असं जाहीर करून टाकलं.''
``हे बरं झालं। कुणीतरी न्याय दिला ना?'' बापटांनी सुस्कारा सोडला.''
``ते झालं हो, पण आता मलाच प्रश्‍न पडलाय ना, मी नक्की कुणाची ते!'' मुंबईच्या या प्रश्‍नावर सगळेच निरुत्तर झाले.
---------