Feb 16, 2011

दे दान, लागे गिरान!


दान देताना हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची मला प्रचंड खोड आहे. आतापर्यंत अनेकदा त्याबाबत तोंडघशी पडूनही ही खोड काही जाणार नाही. "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेत एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे,' असं विंदा म्हणतात, तसं एखाद दिवशी कुणी माझे हातच घेऊन जाईल की काय, अशी रास्त शंका वाटते.
प्रस्तावनेवरून मी दानशूर कर्णाचा अवतार असल्याचा अनेकांना संशय येऊ शकेल. पण मी तसा अजिबात नाही. सुरुवात जरा आकर्षक करावी म्हणून थोडी अतिशयोक्ती झाली आहे, एवढंच. सांगायचा मुद्दा काय, की दान करण्याबाबतचा अनुभव फारसा उत्साहवर्धक, आनंददायी नाही. मग ते दान पैशांचं असो वा अन्य कुठलं.
लिहिण्यासाठी निमित्त मिळालं ते परवाच आमच्या कॅंटीनच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या कपड्यांचं. बोहारणीला कपडे देऊन तिच्याकडून भांडी, ताटल्या, डबे वगैरे घेण्याची आम्हाला पूर्वीपासूनची सवय. पण इथे मोठ्या शहरातल्या सोसायटीत कुठली बोहारीण वगैरे घरी यायला! त्यामुळे कपडे मी कुठल्या कुठल्या संस्थांनाच देत असतो. या वेळी कॅंटीनमध्ये काम करणाऱ्या मुलांना द्यायचे ठरवलं होतं. नको असलेले कपडे बाजूला काढून ठेवण्यात आणि नंतर ते गोळा करून ऑफिसमध्ये आठवणीनं घेऊन जाण्यातच खूप काळ गेला. दोन दिवसांपूर्वी शेवटी ते नेऊन दोन मुलांच्या ताब्यात दिले. मापाचे नसतील ते परत देण्यासही सांगितलं. मला वाटलं संध्याकाळपर्यंत ते निदान कपडे बसताहेत किंवा बसत नाहीत हे तरी सांगतील. पण कुणीच तसं काही सांगितलं नाही. न बसणारे कपडे परत देण्याचा तर प्रश्‍नच नव्हता. त्यांना त्या कपड्यांचा उपयोग होणार आहे की नाही, हेही कळायला मार्ग नव्हता आणि नाही. मीच पुन्हा त्यांना जाऊन विचारणं म्हणजे त्यांना अवमान वाटायचा. असो.
भाऊ महाराज बोळात राहत होतो, तेव्हाची गोष्ट आठवली. कॉट बेसिसवर होतो आणि रूमवर स्वयंपाक-पाण्याची सोय नव्हती. अध्येमध्ये बाहेरून ब्रेड वगैरे आणून खायचो. असाच एके दिवशी मोठा ब्रेड आणला आणि तो अर्धा शिल्लक राहिला. वाया जाऊ नये म्हणून शनिपाराजवळ बसणाऱ्या भिकाऱ्यांपैकी एका भिकारणीला दिला. मी वळून परत जाईपर्यंत तिने तो कागद उचकटून त्यात काय आहे, ते पाहिलं होतं. ब्रेड फेकून देताना तिला पाहिलं, तेव्हा माझं टाळकं सटकलं. मग तसाच वळून तिच्याशी भांडायला गेलो. तर ती मलाच शिव्या द्यायला लागली. तिथल्या रिक्षावाल्यांनी मग तिचं डोकं फिरल्याचं सांगून मला घरी धाडून दिलं.
पैशांच्या बाबतीत तर माझ्यासारखा दानशूर मीच! अर्थात, मी ते पैसे देताना उधारीच्या बोलीवर देत असेन, तरी घेणारा मात्र ते दान समजूनच घेत असावा. परत न मागण्याच्या अपेक्षेने! कधी कुणी आजारी आहे, कुणी हॉस्पिटलमध्ये आहे, शाळेची फी भरायची आहे, असली कारणं सांगून माझ्याकडून पैसे मागायला आले, की की मी पाघळायचो. ऑफिसातल्याच एकाने असेच तीन हजार रुपये घेऊन ते दिले नाहीत, तेव्हापासून कानाला खडा लावला. आता मी सफाईदारपणे नकार देऊ शकतो. पैसे घेताना हे लोक दीनवाणे, अगतिक वगैरे असतात. द्यायची वेळ आली की मात्र शंभर कारणं तयार! निदान "मी नंतर देईन, थोडं थांब' एवढं म्हणायचं सौजन्यही त्यांना बाळगता येत नाही.
"दान दिल्याने दान वाढते' म्हणतात ते खरं असेल. पण माझ्या बाबतीत दान दिल्याने दान मागणारेच वाढले आहेत! दान प्रत्येकानं केलंच पाहिजे आणि त्याबद्दल फुशारकीही मारता कामा नये. पण दान घेणाऱ्यानं निदान त्याची जाणीव ठेवावी, एवढीच माझी माफक अपेक्षा असते. ती काही चुकीची नाही ना?
आमच्या घरात निमिषला सांभाळायला असलेल्या बाईंसाठीही मी चहा, नाश्‍ता स्वतः करून द्यायचो. त्यांना कदाचित रोज घ्यायला मिळत नसेल, म्हणून. त्यांनी आमच्या घरातला दागिनाच चोरण्याचा प्रयत्न केला. उपकारांची परतफेड म्हणतात, ती ही!