Jun 7, 2015

फटा पोस्टर, निकला... हिरो, हिरोइन, व्हिलन, सेकंड हिरो, सेकंड हिरोइन, ईटीसी ईटीसी...!

 

 

`दिल धडकने दो'चं पोस्टर पाहिलं आणि मळमळायला झालं.

छ्या...!

ह्याला काय पोस्टर म्हणतात? पोस्टर म्हणजे कसं हवं? सिनेमातल्या जवळपास प्रत्येक प्रसंगाचा तो छोटेखानी प्रोमोच हवा. नव्वदच्या दशकात आम्ही स्वतंत्रपणे थेट्रात जाऊन पिक्चर पाहायला लागलो. काय पोस्टर्स असायची त्या काळात....अहाहा...!!

एका हातात पिस्तुल, दुस-या हातात rocket launcher घेतलेला मिथुन, धर्मेंद्र, गोविंदा, चंकी पांडे, सनी देओल किंवा कधी कधी तर दस्तुरखुद्द बच्चन साहेब. त्याच्या कपाळावर रक्ताचा मळवट भरलेला. हातावर एखादी पट्टी. अंगात रक्ताळलेली बनियन. चेह-यावर खाऊ का गिळू छाप बद्धकोष्ठित भाव. त्याच्या सोबत अर्धी झाकलेली हिरवीण. (अर्धी झाकलेली म्हणजे, भीतीनं त्याच्या मागे अर्धी दडलेली. `तशा` अर्थानं अर्धी झाकलेली नव्हे. ती पण असायची, पण दुस-या कोप-यात.) दुस-या कोप-यात हिरोपेक्षाही संहारक शस्त्रं हातात घेऊन उभा असलेला व्हिलन किंवा व्हिलनची फौज. मल्टिस्टारर सिनेमा असेल, तर मग सगळे हिरो लायनीत आपापल्या हिरविणीबरोबर रांगेत उभे. पोस्टरच्या डाव्या वरच्या कोप-यापासून ते उजव्या वरच्या कोप-यापर्यंत फोटो फ्रेमला फुलांची माळ घातल्यासारखी छोट्या छोट्या चौकौनांमध्ये सिनेमातल्या इतर असंख्य कलाकारांची वेगवेगळ्या भावमुद्रेतली छायाचित्रं. उजव्या कोप-यात सिनेमातल्या बलात्कारासारख्या अत्यंत महत्त्वाच्या दृश्याची झलक. डाव्या कोप-यात एखाद्या होळीच्या किंवा तत्सम गाण्याची झलक. मधोमध सिनेमाचं नाव आणि त्याभोवती दोन, तीन थरांचं वलय.

त्या काळात बी ग्रेड, सी ग्रेड अशी हीन, जातिवाचक, अपमानास्पद वर्गवारीच अस्तित्त्वात नव्हती. सगळे सिनेमे एकाच जातकुळीतले वाटायचे. जे वेगळ्या वाटेनं जायचे, ते कुठल्यातरी एकांड्या थेट्रात किंवा टीव्हीवरच बघायला मिळायचे.

`जंगल क्वीन' `डाकूरानी`छाप सिनेमांची पोस्टर्स तर विशेष आकर्षक असायची. किती दूरदर्शी विचार करणारे दिग्दर्शक आणि निर्माते होते, त्या काळात...! आपल्या सिनेमाचा प्रोमो प्रेक्षकांना कुठेही पाहता येणार नाहीये, त्यामुळे पोस्टरवरच तो स्थिरचित्र रूपाने का होईना, दिसला पाहिजे, अशी त्यांची प्रामाणिक भावना असायची. के. सी. बोकाडिया, कांती शाह, मेहुलकुमार, हे अशाच सामाजिक हेतूनं प्रेरित झालेले काही महापुरुष.

सिनेमाच्या मुख्य पोस्टरशिवाय अगदी खिडकीच्या एका झडपेच्या आकाराची छोटी पोस्टरही त्या काळात आकर्षक असायची. ती बाजारात, किंवा दुस-या थिएटरवर लावली जायची. ती बघून मोठं पोस्टर बघायची उत्सुकता चाळवायची.

याशिवाय जास्त उत्सुकता असायची ती सिनेमातल्या काही दृश्यांची झलक दाखवणारी साधारण छोट्या फ्रेमच्या आकाराची पोस्टर्स. प्रेक्षक म्हणून माझी कारकिर्द रत्नागिरीत घडली. त्यावेळी तिथे तीन थिएटर्स होती. राधाकृष्ण, श्रीराम आणि लता. `राधाकृष्ण`ला साधारण नवीन (एक महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेले) सिनेमे लागायचे. `श्रीराम`ला मराठी किंवा रिपीट रन मधले आणि `लता`ला तथाकथित बी किंवा सी ग्रेड. `राधाकृष्ण`मध्ये तिथल्या आणि `श्रीराम`मधल्या सिनेमांची ही छोटी फ्रेम साइज पोस्टर्स लागायची. प्रत्येक सिनेमाची साधारण दहा ते बारा. गुरुवारी तर मेजवानी असायची. सध्या सुरू असलेल्या आणि शुक्रवारपासून लागणा-या सिनेमाची, अशी दोन्ही पोस्टर्स बघायला मिळायची. मी तर चौथीपासूनच मधल्या सुटीत वेळात वेळ काढून, ही पोस्टर्स बघायला थेटरवर धावायचो.


या पोस्टरनी सिनेमांची चटक लावली आणि सिनेमानं जगण्याची!