Sep 1, 2014

`येष्टी'चित!

रत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता एकटे नाही, दोन दोन सिरियलमधल्या डझनभर बायकांच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर आहे, ही काळजी होती. त्यातल्या कुणा बाईला मध्येच उचकी लागली तर काय घ्या, या विचारानं घालमेल होत होती. पण शेवटी जायचा निर्णय घेतलाच.

महिनाभर आधी येष्टीचं रिझर्व्हेशन सुरू झालं होतं, पण याच डायलेम्म्यामुळे नक्की दिवस ठरवायचं आणि त्यानुसार रिझर्वेशन करायचं टाळलं होतं. एकटंच कार ताबडत जावं माज करत, होऊ द्या खर्च, असाही विचार केला होता. फेसबुकावर तसं आवाहनही करून पाहिलं. पण वाह्यात कमेंट आणि ढीगभर लाइक्स पडण्यापलिकडे त्यातून काही साध्य झालं नाही. शेवटी `गड्या आपली येष्टी बरी,` असा विचार करून online रिझर्वेशन साइटवर फेरफटका मारायचं ठरवलं. येष्टीच्या सगळ्या गाड्या रिझर्वेशन सुरू झाल्याच्या पहिल्या काही तासांत जिथे फुल होतात, तिथे ऐन गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच्या एका शेमी लक्झरीचं रिझर्वेशन मिळून गेलं. जादा गाडी होती, पण वेळेत होती, सोयीची होती, त्यामुळे निश्चिंत झालो. आता फक्त रत्नागिरीहून परत येतानाचं रिझर्वेशन मिळण्याचं टेन्शन होतं. येष्टी त्या मागणीला काही दाद देत नव्हती. मग मित्राला सांगून एका खाजगी गाडीचंच रिझर्वेशन करून टाकलं. आता यायचा, जायचा दोन्ही प्रश्न मिटले होते. सिरियलमधल्या कुठल्या नायिकेला उचकी लागली नाही, तर आपला दौरा निर्विघ्न पार पडायला हरकत नाही, असंच वाटत होतं.

रात्री नऊला चिंचवडहून सुटणारी शेमी लक्झरी होती. गणपतीच्या आदल्या दिवशीची रस्त्यावरची खरेदीची झुंबड, ट्रॅफिक जाम वगैरे गृहीत धरून नऊलाच घरातून निघालो. कुठल्याही अडथळ्याविना सव्वानऊला स्वारगेट स्टॅंडला पोहोचलो. पंधरा वीस मिनिटं आधी पोहोचणार असलो, तरी स्टॅंडवर बसून पुस्तक वाचू, अगदीच कंटाळा आला तर गेम खेळू, असा विचार केला होता. पुस्तकही अगदी सहज सापडेल असं बाहेरच्याच कप्प्यात ठेवलं होतं. पण स्वारगेटला पोहोचलो आणि प्रथम ग्रासे मक्षिकापातः झाला. गर्दीची अपेक्षा होती, पण आजची गर्दी एवढी तुफान होती, की खुर्ची वगैरे रिकामी मिळणं शक्यच नव्हतं. मग मागेच उभा राहून वाट पाहणं सुरू झालं. त्यातून पावसानं कृपा केल्यामुळे सगळीकडे चिकचिकाट होता. बॅग जमिनीवर ठेवणं म्हणजे चिखलात ठेवण्यासारखंच होतं. पण पर्याय नव्हता.

गाडीची माहिती देणा-या आणि आल्या गेल्या सगळ्या गाड्यांची नोंद करणा-या कंट्रोलरच्या समोर ही.... गर्दी होती. काही विचारण्यासाठी त्याच्यापर्यंत पोचणं हे रेशनवर ठरलेल्या वेळी ठरलेल्या प्रमाणात धान्य मिळण्याएवढंच अवघड होतं. दहा वाजले तरी गाडी आली नाही, तेव्हा जरा काळजी वाटू लागली. विचारून काही फायदा नव्हताच, तरी कंट्रोलरपर्यंत जाण्याचा धीर केला. ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यानंतर आपण नाही का शेजारच्या गाडीवाल्याला `काय झालंय हो पुढे,` असं विचारतो, त्यालाही काही माहिती नाहीये, याची आपल्याला कल्पना असते, तरीही. थोड्या वेळात येईल, असं उत्तर देऊन तो गरीब बापुडा इतर प्रवाशांच्या समस्यांचं निरसन करण्यात बिझी झाला. मी पुन्हा जागेवर येऊन उभा राहिलो.

नेहमीची पुणे-रत्नागिरी आणि चिंचवड-रत्नागिरी गाडीही आली नव्हती. एकूणच स्टॅंडवर अभूतपूर्व गोंधळ होता. जेवढ्या गाड्या फलाटावर उभ्या होत्या, त्याहून दुप्पट मागच्या बाजूला मधल्या रस्त्यावरच उभ्या राहून तिथूनच सुटत होत्या. आणि काही गाड्या तर वेगळ्याच फलाटांवर लावण्यात आल्या होत्या. एकूणच कुणाचा कुणाला काही मेळ नव्हता. थोड्यावेळानं असं लक्षात आलं, की गाडी आलेलीसुद्धा कुणाला कळत नाहीये. मग मी बॅग एका कोप-यात ठेवली आणि पाठीला लॅपटापची सॅक अडकवून माझ्या गाडीच्या शोधमोहिमेवर निघालो. कोलंबसाच्या पृथ्वीप्रदक्षिणेपेक्षाही ही मोहीम अवघड होती, हे माझ्या थोड्याच वेळात लक्षात आलं. स्टॅंडच्या एका कोप-यात ठेवलेल्या बॅगवर मी पाणीच सोडलं होतं. कुणी नेली तर नेऊ द्यात, पण मी तिचं ओझं वागवून फिरणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी स्वारगेटवर दीनवाणेपणाने इकडून तिकडे फिरत होतो. दर पंधरा मिनिटांनी स्टॅंडच्या शंकरशेट रस्त्यावरच्या गेटजवळ जायचं, आपली गाडी आली का याचा अंदाज घ्यायचा, परत बॅगेपाशी येऊन एकदा नजर टाकायची, मग पुन्हा आणखी कुणाकडे काही माहिती मिळते का बघायचं, असा द्राविडी प्राणायाम सुरू होता.

स्वारगेटच्या बाहेरच्या शंकरशेठ रस्त्यावर अभूतपूर्व ट्रॅफिक जाम झाला होता आणि गाड्या यायला खूप उशीर होत होता, हे अल्पावधीतच कळलं. पण आपल्या गाडीबद्दल कुणी सांगेल, याचा काही नेम नव्हता. समोर दिसणा-या गाड्यांची काय विल्हेवाट लावायची, हे जिथे येष्टीच्या तमाम अधिका-यांना सुधरत नव्हतं, तिथे ते चिंचवडहून येणा-या गाडीबद्दल काय सांगणार होते? रिझर्वेशनची सीट सोडून बस तशीच हाणायचा येष्टीचा लौकिक नाही, एवढ्या एकाच आशेवर आणि पूर्वानुभवावर मी तिथे ताटकळलो होतो. सव्वाअकराच्या सुमारास चिंचवडहून येणारी नेहमीची रत्नागिरी शेमी लक्झरी आली, तेव्हा मात्र धीर खचला. आपली जादा गाडी रद्द झाली, की काय झालं, याचा काहीच अंदाज येत नव्हता. अजून किती वेळ थांबायचं आणि तोपर्यंत अस्वस्थपणे येरझा-या घालण्यापलीकडे काय करायचं, याची चिंता डोकं पोखरत होती. शेवटी साडेअकराच्या सुमारास चिंचवडहूनच येणारी दापोली गाडी आली. आशेने तिच्याकडे धाव घेतली. चिंचवडहून नऊची जादा गाडी आपल्या गाडीबरोबरच सुटलेय, अशी मौलिक माहिती त्या कंडक्टरनं दिल्यानंतर जिवात जीव आला. तरीही माझी इच्छित गाडी स्वारगेटच्या स्टॅंडपर्यंत यायला पावणेबारा वाजले. तीही मागच्या नेहमीच्या गेटनं आत न येता पुढे जाऊ लागली, तेव्हा काळजात धस्स झालं. पुढच्या गेटनं ती आत आली, तेव्हा पटकन जाऊन जागा पकडली. सुमारे दोन तास उशिराने गाडी सुटण्याची माझ्या आयुष्यातली ही पहिली वेळ.

नंतरचा प्रवास मात्र सुखानं झाला. पहाटे पाचला रत्नागिरीत पोचणारी येष्टी सकाळी आठ वाजता पोचली. जाताना रिक्षावाल्यांच्या हातापाया पडायची वेळ आली नाही, हीच काय ती दुःखात सुखाची बाब. आता जाताना टगे-पाटील काय धुमाकूळ घालतात, ते बघायचं.