Jul 18, 2008

"उघड्यावरची' कारवाई

थेट मंत्रालयातून आलेलं फर्मान बघून वरिष्ठ आरोग्य अधिकारी मानकामे हडबडलेच. एकतर नुकतीच दुपारच्या भरपेट जेवणानंतर त्यांना डुलकी लागत होती. चहा प्यायला कॅंटीनमध्ये जायला अजून वेळ होता. टेबलावरचा फायलींचा ढिगारा थोडासा बाजूला सारून त्यांनी मस्त निद्रादेवीची आराधना सुरू केली होती. बाकी, सरस्वतीशी लहानपणापासून कधीच जमलं नसलं, तरी सरकारी कार्यालयात चिकटल्यापासून निद्रादेवीशी मानकाम्यांनी चांगलंच जुळवून घेतलं होतं. मागल्या दारानं चोरपावलांनी लक्ष्मीही अधूनमधून पाणी भरत होती. जनू जमदाडे शिपायानं आणलेल्या अर्जंट टपालामुळे मानकामे जाम वैतागले.
""काय आहे? आत्ताच कशाला आलास, तडमडायला?''
""साहेब, अर्जंट आहे. मंत्रालयातून आलंय डायरेक्‍ट! नाही तर मलाही दुपारची तंबाखू सोडून इथे तुमचं तोंड बघायची कुठं हौस होती?'' जनूनं हात वर केले.
""जन्या, फार बोलतोस हां हल्ली!'' मानकामे डाफरले. जनूच्या हातून रजिस्टर ओढून घेऊन त्याच्यावर सही खरडली. जनू छद्‌मी हसत आल्या वाटेनं परत गेला. जाताना साहेबाच्या केबिनमध्ये बसलेल्या स्लिव्हलेस घातलेल्या बाईकडे अधाशासारखं बघायचा मोह काही त्याला आवरला नाही.
जड अंतःकरणानं आणि तेवढ्याच जड हातांनी मानकाम्यांनी टपाल फोडलं. कुठल्यातरी स्वच्छता मोहिमेचं, नाहीतर सरकारच्या नव्या योजनेच्या बैठकीचं चऱ्हाट असेल, असंच वाटलं त्यांना; पण एकेक वाक्‍य वाचायला घेतलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. चेहऱ्यावर घाम जमा झाला. हातापायाला हलका कंप सुटल्यासारखं झालं. तोंडातली पानाची पिंक थुंकण्याऐवजी आवंढ्याबरोबर आतच गिळली गेली.
""अहो, दांडगे, हे बघा काय आलंय!'' मानकामे जवळपास किंचाळलेच.
एरव्ही फारशा हालचालीची सवय नसलेल्या त्या कार्यालयाच्या भिंतींवरचे धुळीचे काही थर त्या दणक्‍यानं खाली कोसळले. कॅलेंडरची पानं फडफडून चुकून याच महिन्यातल्या एका तारखेचंही दर्शन झालं.
एवढं काय अघटित घडलं, म्हणून दांडगेंनीही मानकाम्यांकडे धाव घेतली. मानकाम्यांनी आपल्या हातातलं पत्र दांडगेंच्या तोंडासमोर फडकावलं.
""अयेच्चा! उघया विक्रेत्यांवर कायवाई कयण्याएवढं झायंय तयी काय?''
""दांगडे, आधी पिचकारी मारा!'' मानकामे वैतागले.
दांडगेंनी लगेच तोंडाचा चंबू करून त्यावर बोटांची "व्ही' आकाराची खूण केली.
""अहो, अहो, काय करताय दांडगे?''
तेवढ्यात दांडगे फिरले आणि तिथूनच चार-पाच फुटांवर असलेल्या खिडकीच्या बाहेर त्यांनी नेम धरला. मधल्या काही फायलींनाही रक्तसड्याची अंघोळ घडली. मुखरस ओघळून कॉलरवर आला, तरी दांडगेंनी काहीच न घडल्याच्या थाटात मानकाम्यांकडे पाहून दात विचकटले.
""साहेब, मला म्हणायचंय, की उघड्या विक्रेत्यांवर कारवाई कशाला? आणि करणार कशी?''
""ते मला काही विचारू नका. फर्मान आलंय ना, मग लागा कामाला!''
मानकाम्यांनी आदेश सोडला आणि तिथून तरातरा निघून गेले.
दुसऱ्या दिवशीपासूनच मोहीम सुरू करायची होती. सकाळी नऊलाच मानकामे कार्यालयात हजर झाले. सगळा फौजफाटाही जमला होता. दांडगेही कसंबसं पहाटे उठून, लवकर आवरून आले होते. त्या गडबडीत शर्टाची बटणं वर-खाली झाली होती, पॅंटची चेन लावायची राहिली होती आणि केसही विस्कटलेलेच होते.
""दांडगे, अंघोळ केल्यावर नीट आवरताही येत नाही का तुम्हाला?'' मानकामे डाफरले.
""हो साहेब; पण अंघोळ केली तर ना!'' दांडगेंनी डोळे मिचकावले.
मानकाम्यांनी कपाळावर हात मारून घेतला.
सगळ्या फौजफाट्याला त्यांनी सूचना वगैरे केल्या आणि निघताना त्यांची नजर कार्यालयाच्याच आवारातल्या शंकर कॅंटीनवाल्यावर पडली. तो बिचारा नुकताच उठून आवराआवरी करत होता.
मानकाम्यांनी "छू' म्हटल्यानंतर सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या साहित्यावर धाड घातली. त्याच्या कढया, भांडी, गॅस शेगडी, सगळं जप्त करण्यात आलं. शंकर बिचारा बावरून गेला.
""पर माझा काय गुन्हा झाला साहेब?'' तसाच एका हातानं काखेखाली खाजवत त्यानं विचारलं.
""उलटं आम्हालाच विचारतोस? उघड्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा आदेश आहे वरून. सकाळी सकाळी उघडा बसला होतास ना, मग भर आता दंड!''
""पर साहेब, मी जरा येळानं कपडे घालणार होतो, साहेब!'' शंकरनं खुलासा केला; पण ते ऐकण्याच्या मनःस्थितीत मानकामे नव्हते.
""भांडी कधी घासतोस की नाही?'' शंकरच्या एका कढईला हात लावल्यानंतर मानकामेंचा पूर्ण हात काळवंडला होता.
""हो साहेब, घासतो की! आता, गेल्या दिवाळीलाच तर घासली होती!'' शंकर नम्रपणे म्हणाला.
मानकामे त्याच्यावर वैतागून हात झटकत पुढे चालायला लागले. शंकर एका हातानं काखेखाली आणि दुसऱ्या हातानं डोकं खाजवत त्यांच्याकडे बघत राहिला.
मानकाम्यांनी नंतर रस्त्यावर मोहिमेचा धडाकाच लावला. एकतर सकाळी लवकर त्यांनी कारवाई सुरू केली होती. कुणी विक्रेते झोपले होते, कुणी नुकतेच उठून तोंड विसळत होते, कुणी प्रातर्विधीच्या तयारीत होते. निम्मी बटणं उघडी असलेल्यांनाही त्यांनी सोडलं नाही. चहाच्या टपऱ्या आणि नाश्‍त्याचे स्टॉल सकाळी लवकर उठून लावणाऱ्यांकडे मात्र त्यांनी कौतुकभरल्या नजरेनं पाहिलं. आपण काहीच विशेष "सेवा' केली नसताना कारवाईच्या कचाट्यातून आपण कसे वाचलो, हे त्यांनाही बिचाऱ्यांना कळेना. मध्येच एका ठिकाणी थांबून मानकाम्यांनी वडापावाचा आस्वादही घेतला.
एरव्ही ऑफिसात ढिम्म बसून असलेल्या दांडगेंना मात्र यात काहीतरी घोळ वाटायला लागला होता. त्यांनी मंत्रालयाकडून आलेल्या पत्रातला मजकूर पुन्हा पुन्हा आठवायचा प्रयत्न केला.
"उघड्या विक्रेत्यांवर कारवाई' करताना काहीतरी गल्लत होतेय, हे त्यांनाही कळत होतं; पण नेमकी काय, ते लक्षात येत नव्हतं.
""साहेब, उघड्या विक्रेत्यांवर कारवाई म्हणजे...'' दांडगेंनी मध्येच एकदा साहेबांना ढोसून काहीतरी सुचविण्याचा प्रयत्न केला; पण साहेब त्यांच्याच अंगावर धावून आले, तेव्हा त्यांनी नाद सोडला.
रस्त्यातून चालत असताना वाटेत एक सिनेमाचं भलंमोठं पोस्टर कुणा कर्मचाऱ्यानं पाहिलं. त्यावर सलमान खानचा उघड्या अंगाचा फोटो होता. शेजारी त्याच्यापेक्षा थोडे जास्त कपडे घातलेली कुणी नटी होती.
""साहेब, या उघड्या लोकांनाही चांगली शिक्षा केली पाहिजे,'' कुणीतरी कर्तव्यदक्ष कर्मचारी साहेबाची चमचेगिरी करण्याच्या उद्देशानं पचकला.
""हं...!!'' मानकाम्यांनी अभिमानानं हुंकार भरला.
दिवसभर कारवाईची मोहीम राबवून सरकारी भांडारात भलीमोठी कमाई नोंदवून मानकामे रात्री उशिरा घरी परतले. कधी नव्हे ते त्यांच्या चेहऱ्यावरून "जॉब सॅटिस्फॅक्‍शन'चं तेज ओसंडून वाहत होतं. आता वरचे साहेब खूष आणि आपलं प्रमोशन नक्की, अशी स्वप्नंही रंगवायला त्यांनी सुरवात केली. बघता बघता ते घोरू लागले.
सकाळी सकाळी फोनच्या कर्कश आवाजानंच त्यांना जाग आली. चरफडत त्यांनी फोन कानाला लावला.
""कोण आहे?'' मानकामे विचकले.
""मी, सार्वजनिक आरोग्यमंत्री कोरडे-पाटील. मानकामे, तुम्हाला काही अक्कलबिक्कल आहे का हो?''
साक्षात मंत्रीच फोनवर असल्याचं बघून मानकाम्यांची झोप पार उडाली. आपल्या कौतुकासाठीच त्यांनी फोन केला असणार, अशी खात्रीही त्यांना झाली.
""साहेब, आपल्या आदेशप्रमाणे सगळं काम झालंय!''
""अहो, कपाळ तुमचं! रस्ते आणि फुटपाथ अडवून असलेले स्टॉल न काढता तुम्ही झोपलेल्या लोकांना उठवून त्यांच्यावर कशाला कारवाई केलीत? कुणी शिकवली तुम्हाला ही अक्कल?''
""पण साहेब, तसेच तर आदेश होते. "उघड्या विक्रेत्यांवर' कारवाई करा म्हणून...!'' मानकाम्यांची तंतरली होती.
""मूर्ख आहात! अहो, उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करायला सांगितलं होतं, उघड्या बसलेल्या विक्रेत्यांवर नव्हे! इथे मानवी हक्क संघटनेच्या लोकांनी त्या सगळ्या विक्रेत्यांचा माझ्या घरावर मोर्चा आणलाय! त्यांना काय उत्तर देऊ?''
""प...पण साहेब...''
""आता माझं ऐका. ताबडतोब ऑफिसात या. सगळी कारवाई रद्द करा. त्या विक्रेत्यांचं सामान देऊन टाका. त्यांना केलेल्या दंडाचे पैसे परत करा. निघा!'' साहेबांनी फोन आपटला.
"मानकाम्यांच्या घशाला कोरड पडली, तरी दांडगे काहीतरी चुकल्याचं सुचवत होतेच. म्हणजे असा घोळ झाला होता तर! अरे देवा! प्रमोशन बोंबललंच, आता नोकरी तरी राहतेय की नाही, कुणास ठाऊक?' मानकामे मटकन खाली बसले; पण आता वेळ घालवून उपयोग नव्हता. ताबडतोब ऑफिसात जायला पाहिजे.
त्यांच्या लक्षात आलं, आपल्याही अंगात शर्ट नाही! त्यांनी झटपट शर्ट चढवला आणि अंघोळबिंघोळ न करताच ऑफिसच्या दिशेनं चालते झाले...