Dec 26, 2010

`कांदे'पालट!

कांद्यानं शंभरी गाठल्याचे संभाव्य परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर दिसून आलेच. पण इतर न दिसलेले आणि फारसे प्रकाशात न आलेले परिणामही देण्याचा हा प्रयत्न.
...
मुलगी "पाहण्याच्या' कार्यक्रमात शिष्टाचारसंमत आणि समाजमान्यताप्राप्त "कांदे-पोहे' जाऊन त्याजागी "बटाटा-पोहे' आले. त्यामुळे "अहो, शकूला कांदे-पोहे आणायला सांगा,' असं म्हणून "आमची शकू फर्मास कांदे-पोहे करते हो!' अशी भलामण करण्याची संधी वधुपित्यांच्या हातून निघून गेलेय. त्याऐवजी शकूला बटाटे-पोहे आणण्याची हाक दिली जातेय. "मुलगी नाकानं कांदे सोलणारी आहे हो!' असं म्हणण्याचीही वरमाईंची पंचाईत झालीय!
...
- परवाचीच गोष्ट. दिनकरकाका गोखले सदाशिव पेठेतून मंडईपर्यंत तंगडतोड करीत मंडईत कांद्याला चार रुपये कमी भाव असेल, या आशेने गेले. दोन-चार दुकानं फिरले, पण मनासारखा कांदा मिळेना. भावही कोणी ओरडून सांगत नव्हते. मंडईच्या कांदा बाजारात शुकशुकाट होता. एका ठिकाणी मनाचा हिय्या करून गोखलेकाकांनी भाव विचारला, तेव्हा सत्तर रुपये किलोचा भाव ऐकून तिथेच चक्कर येऊन पडले म्हणे. कांद्याच्या बाजारात असूनही त्यांना शुद्धीवर आणायला कुणी कांदाही फोडला नाही म्हणतात!
...
लपाछपी, डोंगर की पाणी, रंग रंग कोणता, विषामृत, असे खेळ सध्याच्या क्रिकेटच्या आक्रमणात भरडून गेलेच आहेत, पण अध्येमध्ये खेळला जाणारा "कांदेफोडी'चा खेळही मुलांच्या क्रीडाविषयक आयुष्यातून बाद झाला. परवा गल्लीत कुणी पोरं "कांदेफोड' खेळत होती, तर अण्णा दांडेकरांनी त्यांना बडवून काढलं. "ही कसली तुमची श्रीमंती थेरं' म्हणून ते त्यांच्या अंगावर खेकसले. पोरांना मार खाण्याचं कारणच न कळल्यामुळं ती नुसतीच धुमसत राहिली.
...
छापून तयार असलेल्या पुढच्या वर्षीच्या सर्व दिनदर्शिका "कालनिर्णय', "भाग्यलक्ष्मी'वाल्यांनी माघारी घेऊन त्यात महत्त्वाची दुरुस्ती केली म्हणे. कांद्याचे भाव उत्तरोत्तर वाढतच राहण्याची शक्‍यता असल्यानं "कांदेनवमी'च्या तिथीचा उल्लेख कॅलेंडरांतून काढून टाकण्यात आल्याची चर्चा आहे. जो सण साजराच होणार नाही, त्याचा उल्लेख तरी कशाला हवा कॅलेंडरात?
...
कांद्याची भजी, कांद्याचं थालीपीठ, कांदा-बटाटा रस्सा, कांदा-लिंबू "मारके' मिसळ, कांद्याची पीठ पेरून भाजी, कांदा उत्तप्पा, वगैरे पदार्थ अजिबात कांदा न वापरता कसे करता येतील, यावरच्या पुस्तकांना आणि "पॉकेट्‌स बुक'ना प्रचंड मागणी आल्याचं समजतं. काही पुस्तकांच्या तर तीस-चाळीस आवृत्त्या (प्रत्येक आवृत्ती पन्नास पुस्तकांची या हिशेबाने) निघाल्याचंही विश्‍वसनीय सूत्रांकडून कळलं आहे.
...
कांदा-लसूण खाणे वर्ज्य असलेल्या "चातुर्मासा'ची व्याप्ती वाढवून ती बारा महिन्यांपर्यंत करावी, या मागणीसाठीही मोठी आंदोलनं उभी राहत आहेत.
...
महाग झालेल्या कांद्याला पर्याय म्हणून अळवाचे कांदे, पालकाचे कांदे रोजच्या जेवणात वापरायला लोकांनी सुरवात केली आहे.
...
कांद्याचे भाव आणखी वाढू नयेत म्हणून चिडका कांदा, अकलेचा कांदा, असे शब्दप्रयोगही दैनंदिन व्यवहारातून काढून टाकण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे.
...
प्रत्यक्ष कांद्याऐवजी कांद्याचा इसेन्स बाजारात आलाय आणि तो प्रचंड खपतोय. हल्ली डाळीच्या पिठात हा इसेन्स घालून कांदा भजी केली जातात म्हणे! कांदा "एक्‍स्कूझिव्ह' झाल्यामुळं कांद्याच्या परफ्यूमला अचानक मागणी वाढलेय. "ऍक्‍स', "झटॅक'पेक्षा हा परफ्यूम जास्त "पॉवरफुल' असल्याची जाहिरात केली जातेय.
...
...आणि सरतेशेवटी...सर्वांत महत्त्वाचं.
"कांद्यानं केला वांदा' हे नाव चित्रपटाला मिळण्यासाठी पंचवीस जणांनी एकाच वेळी अर्ज केलाय आणि आपल्यालाच हे नाव पहिल्यांदा कसं सुचलं, असा दावा करण्यावरून मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांमध्ये भांडणं लागली आहेत!