
सुटीसाठी कुठे जायचं हे ठरवताना सर्वांत आधी माझ्या आवडत्या हिमालयाचाच विचार केला होता. पण नंतर तिकडे जाण्यासाठी जास्त वेळ लागेल, असं वाटलं. म्हणून दक्षिणेतच कुठेतरी जायचं ठरवलं. तसा केरळचा दौरा दीड वर्षांपूर्वीच झाला होता. उटी-कोडाईकॅनॉलला जायचं बरेच दिवस मनात होतं. म्हणून तेच ठिकाण नक्की करून टाकलं.
एप्रिलमध्ये रेल्वेचं बुकिंग केलं, तेव्हाही रिझर्व्हेशन मिळण्याबाबत थोडी धाकधूक होती. मात्र, येताना-जातानाच्या कन्फर्म सीट्स मिळाल्या. त्यामुळं मन निःशंक झालं. पण कसं जायचं, कुठे कधी जायचं, ते ठरत नव्हतं. एकतर अपुरी माहिती मिळत होती. त्यातून स्वतःच सहलीचा कार्यक्रम आखण्याची आमची हौस दांडगी. अखेर बेत पक्का झाला. आधी कोडाईकॅनॉल, मग उटी आणि नंतर मुदुमलाई जंगल, असा कार्यक्रम ठरवला.
चांगली तेवीस दिवसांची रजा टाकली होती. आधी रत्नागिरीला जायचं होतं. आंबे आणि फणस झोडायला. तिथून सहा तारखेला कोकण रेल्वेने एर्नाक्युलमला गेलो. जायच्या दिवशीच ट्रेन तीन तास उशिरा होती. तिथेच पहिली माशी शिंकली. म्हटलं, आता ट्रिपचा बट्ट्याबोळ होणार, बहुतेक! पण तसं काही झालं नाही. एर्नाक्युलमला दुसऱ्या दिवशी सकाळी दहाऐवजी एकला पोचलो. तिथे आमची विश्रांती होती, म्हणून नशीब!दुपारी आयडीबीआयच्या एटीएमचा शोध घेण्यासाठी तिथला महात्मा गांधी रस्ता जवळपास अर्ध्याहून अधिक पालथा घातला. नंतर तिथल्या प्रसिद्ध सुभाष चिल्ड्रन पार्कमध्ये गेलो. निघताना कळलं, आम्ही ज्या बागेत गेलो, तिच्या शेजारी ते चिल्ड्रन्स पार्क होतं. आम्ही फुकटच दुसऱ्या बागेत अर्धा-पाऊण तास टाइमपास केला होता.दुसऱ्या दिवशी सकाळची कोईमतूरची ट्रेन होती. वेळेत निघाली, दुपारी दोनला पोचली. तिथे सर्वाधिक वाईट अनुभव आला. आम्हाला थेट कोडाईकॅनॉलला जायचं होतं. एकतर रेल्वे स्टेशनवरून चुकीच्या दिशेनं बाहेर पडलो. रिक्षावाल्यानं 60 रुपये घेऊन कुठल्यातरी गांधीपुरम स्थानकावर आम्हाला सोडलं. तिथे बऱ्याच जणांशी मोडक्या तोडक्या हिंदीत, इंग्रजीत संवाद साधल्यावर कळलं, इथून बस नाहीच्चे. मग समोरच्या थिरुवल्लुवर बसस्थानकावर जायचा सल्ला कुणीतरी उपटसुंभानं दिला. आमची वरात तिकडे निघाली. रस्ता, पादचारी पूल बिल ओलांडून मणामणाची ओझी सांभाळत तिथे पोचलो. तिथेही बस नव्हतीच. मग तिथून रिक्षानं उक्कणम स्थानकावर पोचलो. तिथूनही फक्त पळणी येथे जाण्याची बस मिळाली. तिथे गेल्यावर कोडाईची बस मिळेल, असं कळलं. जाईपर्यंत साडेसहा वाजले. सहानंतर कोडाईला बस नाही, असं कळलं. मग नाइलाजानं टॅक्सीचा भुर्दंड सोसावा लागला. त्यात 1100 रुपये गेले. पण टॅक्सीतून प्रवास सुखकर झाला. घाटाघाटातून जायला मजा आली. साडेनऊला हॉटेलवर पोचलो. टॅक्सीवाल्यानं जणूकाही आमच्यावर उपकारच केल्याच्या थाटात, वर जेवणाला 50 रुपये मागून घेतले.
कोडाईकॅनॉलमध्ये दोन दिवस मजेत गेले. पहिल्या दिवशी बसमधून साईट सीइंग टूर केली. ती खूपच सोयीची आणि माफक दरात होती. तिसऱ्या दिवशी रात्री आम्हाला उटीला निघायचं होतं. दिवसाऐवजी रात्रीचा प्रवास करायचं ऐनवेळी ठरवलं होतं. त्या दिवशी कोडाईच्या लेकमध्ये बोटिंग वगैरे करून मनोरंजन केलं.पहाटे साडेपाचलाच उटीला पोचलो. एकतर बसच्या ड्रायव्हरनं "हॉटेल लेक व्ह्यू' कुठेतरी लांब असल्याचं सांगून आमच्या मनात दहशत भरवली होती. ते होतंही तसंच लांब. साडेपाचला उटीत शुकशुकाट होता. हॉटेल लांब असल्याचं सांगून, बसवाल्यानं तिथे सोडायला आमच्याकडून दोनशे रुपये घेतले. काय करणार, अडला हरी!
हॉटेलवर आमच्यासाठी वेगळंच संकट मांडून ठेवलं होतं. त्यांचं चेक-इन टायमिंग बाराचं होतं. कमीत कमी नऊपर्यंत खोली मिळणार नाही, हे निश्चित झालं. मग तिथे तीन तास काय करणार? परत रिक्षानं स्टॅंडवर आलो. पण तिथेही काकडायला झालं. एकतर मनस्वी खांद्यावर झोपली होती. चहा बिहा पिऊन किती वेळ घालवणार? मग परत हॉटेलवर गेलो आणि दीड तास तिथेच ताटकळलो. आमचं कॉटेज होतं, पण कोडाईकॅनॉलच्या हॉटेलच्या रूमपेक्षा वाईट. भाडंही जास्त होतं. एजंटाला धरून आपटायला हवा, असं वाटलं. त्या दिवशी मग उटीहून कुन्नूर या ठिकाणी टॉय ट्रेननं गेलो. बसनं परत आलो. एक तासाचा मजेदार प्रवास होता. संध्याकाळी आल्यावर मुदुमलाईच्या फॉरेस्ट रेस्ट हाऊसचं बुकिंग करून टाकलं. मिळालं, हे नशीब!
दुसऱ्या दिवशी उटीत बसनं साईट सीइंग केलं. मजा आली. बरीच ठिकाणं बघायला मिळाली. पण तिथलं सर्वांत उंचीचं ठिकाण- दोडापेट्टा पीक इथं धुकं होतं. दरी बिरी काही दिसलं नाही. तिसऱ्या दिवशी आम्ही हॉटेल बदलणार होतो. तिसऱ्या दिवशीही आणखी एका टूरबरोबर सिनेमाच्या शूटिंगची ठिकाणं बघितली. फोटोबिटो काढले.
----आणि अखेर मुदुमलाई!

मुदुमलाईला जंगलात फिरण्यासाठी हत्ती आणि बस असे दोन पर्याय आहेत. हत्तीचं बुकिंग मुदुमलाईत गेल्यावर मिळेल, अशी खात्रीनं चुकीची माहिती आधीच्याच बसवाल्यानं दिली. पण ते काही नव्हतं. आम्ही हळहळलो. मग दुपारी बसनंच फिरायचं ठरवलं. 35 रुपये तिकीट आणि पाऊण तासाची सफर असा कार्यक्रम होता. मजा आली. पहिल्या दिवशी हत्ती, हरणं, मोर बिर दिसले. पण आमच्या गाडीला काचांऐवजी गज होते. त्यामुळं फोटोंचं समाधान झालं नाही.थेप्पकडूमध्येच एलिफंट कॅंप आहे. तिथे पूर्वी हत्तींनी देवाची पूजा वगैरे करण्याचा एलिफंट शो व्हायचा, पण आता फक्त एलिफंड फीडिंग कार्यक्रम असतो. हत्तींना जेवायला घालायचा कार्यक्रम. साडेपाचला तिथे गेलो. पाऊण तास भरपूर मनोरंजन होतं. एकतर सुळेवाले हत्ती मी आणि मनस्वी पहिल्यांदाच बघत होतो. तेही एवढ्या जवळून. त्यांचे फोटो घेतले आणि शूटिंगही केलं.
रात्री रेस्ट हाऊसवर जंगलातल्या त्या भयाण शांततेनं थरकाप उडविला. जेवणानंतर सहज काहीतरी निरोप सांगायला मी खोलीबाहेर पडलो, पण येताना अक्षरशः फाटली. बाहेर सगळा अंधार होता आणि नदीच्या पाण्याचा तो भीषण खळखळाट.
दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा जंगलात सफरीला गेलो. आमचा अंदाज खरा ठरला. पहाटे जास्त प्राणी बघायला मिळाले. सुरुवातीलाच हरणं दिसली आणि त्यानंतर चक्क एक गवा आमच्या बसच्या अगदी जवळ शिस्तीत चरत होता. आमच्याकडे वळून त्यानं फोटोलाही छान पोझ दिल्या. परतताना एक हत्तीण आणि तिचं पिल्लू दिसलं. मोर तर चिक्कार बघितले. त्या दिवशीही संध्याकाळी एलिफंट कॅंपला भेट दिली.पहिल्या दिवशी संध्याकाळी रूमवर परतलो, तेव्हा आमच्या शेजारच्या रेस्ट हाऊसच्या बाजूलाच हरणांचा कळप चरायला आला होता. जाण्याच्या दिवशी पहाटे जीपसाठी निघालो, तेव्हा तर ती हरणं रेस्ट हाऊसच्या अगदी जवळ बिनधास्त चरत होती. मागे दोन हरणं शिंगांनी टिपऱ्या खेळत होती. आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. जीपमधून मसिनागुडीपर्यंत पोचतानाही भरपूर मोर, डुक्कर, हत्ती बघितले.दुपारी कोईमतूरला पोचलो आणि रेल्वेनं दुसऱ्या दिवशी पुण्याला.
एकूण प्रवास आणि सहल झकास झाली. उटीतल्या हॉटेलचा वाईट अनुभव वगळता. प्रत्येक ठिकाणी पैसे काढण्याचं तंत्र मात्र प्रत्येकाला अवगत झाल्यासारखं वाटलं. बसच्या साईट सीईंग टूरमध्येही ते लोक पार्किंग, गाईड फी वगैरे सांगून वर वीस-पंचवीस रुपये घेत होते. हॉटेलात बॅगा उचलणाऱ्या नोकराला आणि खोली स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही "टिप'ची अपेक्षा होती. श्रीमंत लोकांची थेरं, दुसरं काय!
आम्ही अर्थातच सगळीकडे "इकॉनॉमिक' राहिलो. बऱ्यापैकी कमी खर्चात सगळं निभावलं. तरीही, आणखी दोनेक हजार रुपये वाचले असते. पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एक रुमाल, एक मोज्यांचा जोड, याशिवाय बाकी काहीही माझ्याकडून गहाळ झालं नाही. आणि विशेष म्हणजे "शाळा' कादंबरी अख्खी वाचून झाली. मागे एकदा पनवेल-पणजी प्रवासात एका दिवसात "सोनाली' वाचली होती. त्यानंतरचा हा दुसऱ्या क्रमांकाचा गतिमान वाचनाचा विक्रम!
बकाल आणि बेंगरूळ
उटी, कोडाईकॅनॉल एवढं प्रसिद्ध असूनही बकाल वाटलं. तमिळनाडूत तर बऱ्याच ठिकाणी भाषेची बोंबच होती. हिंदी, इंग्रजी दोन्ही बऱ्याच लोकांना कळायचं नाही. त्यामुळं थोडेसे हाल झाले. तमिळनाडूत स्वच्छ, व्यवस्थित, टापटीप राहणारे लोकही भेटले नाहीत. आकर्षक तरुण-तरुणी तर सोडूनच द्या. एकदर बरेचसे लोक "रंग गेला तर पैसे परत' या वर्णवारीतले. त्यातून बहुसंख्यांना विडी-सिगारेटचं व्यसन. थुंकणं तर सर्रासच. पुण्यापेक्षाही किंबहुना जास्तच. रिक्षांना मीटर बिटर पद्धत नाही. रिक्षावाल्याच्या तोंडाला येईल, तो दर. खासगी बसची सेवाही वाईट. कोईमतूरहून पाच तासांच्या अंतरावर असलेल्या कोडाईकॅनॉलला जायला तिथे थेट बस नाही, म्हणजे बघा!
कोडाईच्या लेकमध्येही चक्क सांडपाणी सोडलंय. ही या पर्यटनस्थळांची काळजी! असो. आम्हाला फार काही त्रास झाला नाही. आता दक्षिण बरीचशी पालथी घालून झाली. पुढच्या वेळी हिमालय नक्की!
--------------