Dec 31, 2008

`संकल्प'यात्रा!

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांची आसनेही हलली। हल्ली असं काही झालं, की मीडियावाले लगेच चांव चांव करायला लागतात आणि दिवस साजरा करण्यासाठी तेवढ्यापुरता कुणाचा तरी बळीचा बकरा करून टाकतात। पोलिसांपासून अतिरेक्यांच्या कपड्यांपर्यंत सगळ्याचं तपशीलवार "लाइव्ह कव्हरेज' देणाऱ्या मीडियाने एका गंभीर प्रसंगात शिवराज पाटलांना लक्ष्य केलं. त्यांनी दिवसभरात तीनदा कपडे बदलल्याचीच "ब्रेकिंग न्यूज' केली. त्यामुळं तो अनुभव लक्षात घेता, मुंबई हल्ल्याच्या वेळी शिवराज पाटलांनी तीन दिवस कपडेच बदलले नाहीत. स्वयंस्फूर्तपणे निदर्शने करणाऱ्या महिलांच्या पावडर आणि लिपस्टिकवर मुख्तार अब्बास नक्वी घसरले, तेव्हा कॉस्मेटिक बनविणाऱ्या कंपन्यांच्या सीईओंनी नक्वींविरोधात मोर्चा काढला. मंदीच्या काळात नक्वींसारख्या बेजबाबदार नेत्यांच्या वक्तव्यांमुळे व्यवसाय आणखी गाळात जात असल्याचा त्यांचा आरोप होता.

हल्ल्याचे हादरे बराच काळ बसत राहिले। शिवराज पाटलांबरोबर आर। आर। पाटील यांचंही पद केलं, तेव्हा कुणालाचा धक्का बसला नव्हता. दिल्लीकरांचा वरदहस्त लाभलेल्या विलासरावांच्या खुर्चीवरही गदा आली, तेव्हा मात्र सगळे हादरले. पाठोपाठ नारायण राणेंनीही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. या सर्वच नेत्यांवरील कारवाईचं कारण एकच होतं. या काळातली त्यांची वक्तव्यं आणि कृत्यं. (अपवाद शिवराज पाटील यांचा. त्यांनी काहीच न केल्याबद्दल त्यांना शिक्षा झाली होती. ) काही काळ विजनवासात घालविल्यानंतर आर. आर. पाटलांचं पुनर्वसन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी झालं. विलासराव आणि राणेंनीही पुढच्या वाटचालीसाठी कंबर कसली. विशेषतः "मीडिया'समोर जाण्यात आणि प्रसिद्धीतंत्र हाताळण्यात चुका झाल्यानं या नेत्यांच्या वाट्याला हे भोग आले होते. त्यामुळं नव्या वर्षात या चुका टाळायच्याच, असा निश्चय त्यांनी आणि त्यांच्यापासून धडा घेतलेल्या काही नेत्यांनी करून टाकला. आपापल्या पी. ए. च्या साथीनं त्यांनी करून ठेवलेली त्याची यादी आमच्याकडे पोचली...

विलासराव देशमुख ः-
रामगोपाल वर्माचा कुठलाही चित्रपट यापुढे पाहायचा नाही, त्याच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती लावायची नाही। रितेशलाही त्याच्या चित्रपटात काम करू द्यायचं नाही।
- मीडियाच्या कॅमेऱ्यात पकडले जाऊ, अशा कुठल्याही हॉटेलात यापुढे जेवायलाही जायचं नाही।
- पत्रकारांसमोर हसायचं नाही। पुन्हा मुख्यमंत्रिपद किंवा त्याहून मोठं पद पक्षानं दिलं, तरी कायम "अलोकनाथ'छाप चेहऱ्यानं वावरायचं.

आर। आर. पाटील ः
- हिंदीचा क्लास लावायचा। त्यासाठी वेळ पडल्यास नारायण राणे किंवा मायावतींचं मार्गदर्शन घ्यायचं. पक्षीय बंधनांमुळे ते उपलब्ध झाले नाहीत, तर मुकेश पटेलांना गळ घालायचीच!
- "छुटपुट'सारखे गोंधळात टाकणारे शब्द अभ्यासक्रमांतून, बोलीभाषेतून, व्याकरणातून नाहीसे होतील, यासाठी प्रयत्न करायचे। प्रसंगी विधानसभेत तसं विधेयक मांडायचं.
शिवराज पाटील ः
- अडचणीत आल्यानं राजीनामा द्यावा लागलेल्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांची यादी करायची। राजीनाम्याची पार्श्वभूमी, तात्कालिक कारणे, त्यांची कारकीर्द आणि मीडियामधील प्रतिमा, यांचा अभ्यास करायचा.
- नवीन वर्षात एकही नवा कपडा शिवायचा नाही।
- पक्षनिष्ठा पुन्हा सिद्ध होईपर्यंत आणि पक्षश्रेष्ठींच्या परवानगीशिवाय मीडियाला मुलाखती द्यायच्या नाहीत।
नारायण राणे ः
- "कॉंग्रेसची संस्कृती' या विषयात व्यासंग मिळवायचा। जमल्यास, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या चरित्रांची पारायणं करायची.
- काकासाहेब गाडगीळ, बॅ। विठ्ठलराव गाडगीळ, प्रणव मुखर्जी, अर्जुनसिंग आदींच्या पत्रकार परिषदांच्या सीडी जमवून त्यांच्या वक्तव्याचा अभ्यास करायचा.
- आर। आर. पाटील यांच्यामागे वशिला लावून आपल्यालाही हिंदीच्या क्लासला प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करायचा.
उद्धव ठाकरे ः
- "राज्यकर्त्यांना उसाच्या फोकानं बडवून काढा' या वाक्प्रचाराएवढेच प्रभावी, पण त्याला पर्यायी वाक्प्रचार शोधायचे।
- शिवसेनेची सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या विविध भावमुद्रांचं प्रदर्शन आयोजित करायचं। त्यासाठीच्या फोटोंची जमवाजमव करायची.
राज ठाकरे ः
- "बडव्यांच्या कचाट्यातून विठ्ठलाची सुटका' ही सत्यघटनेवर आधारित कादंबरी लिहून काढायची। बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरेंच्या उपस्थितीत त्याचं प्रकाशन करायचं.
- इंग्रजी भाषाशिक्षणही मराठीतून दिलं जावं, यासाठी आग्रह धरायचा।
- "बिग बी' आणि "ब्लॉग' या शब्दांना मराठीतील पर्यायी प्रतिशब्द अमिताभनं वापरावेत, यासाठी आंदोलन उभारायचं।
---
(खुलासा ः नेत्यांच्या नववर्षसंकल्पाची ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, आपण असे संकल्प केलेच नसल्याचा खुलासा या सर्व नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत केला. सुधारित यादी लवकरच पाठवून देणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. )

भीमाशंकरचा द्राविडी प्राणायाम!



रोज किंवा दर दोन दिवसांनी ब्लॉग लिहायचं ठरवलं, तरी ते साध्य होत नाही। एकतर आपण काही अमिताभ बच्चन नाही, ज्याला शिंक आली, तरी लोकांना कुतुहल वाटेल. त्यातून त्याला रोज घरची भांडी घासणं, कचरा काढणं, ढेकूण झाले तर पेस्ट कंट्रोलवाला शोधून काढून त्याला फोन करणं, मुलीची शी-शू काढणं, असली कामं करावी लागत नाहीत. (स्वतःची शी-शू काढायला सुद्धा माणसं ठेवली असतील त्यानं! असो.) तर नमनाला एवढं घंगाळभर तेल ओतल्यानंतर आता सांगण्याचा उद्देश हा, की या वेळी भीमाशंकरच्या सहलीबद्दल लिहायचा विचार आहे. फार ग्रेट बिट नव्हती सहल, पण जरा दोन दिवस बदल झाला, एवढंच!
रविवारला जोडून सोमवारी सुटी घेतली होती। मनस्वीच्या शाळेला आठ दिवस नाताळची सुटी होती. तिलाही बदल म्हणून हर्षदानं सुटी काढली आणि पाठोपाठ मी. मग कुठेतरी जायचा बेत आखायला घेतला. महाबळेश्‍वर, माथेरान, प्रतापगड, इकडे जाण्यात काही अर्थ नव्हता. रायगड, दापोली वगैरे लांब पडलं असतं. म्हणून भीमाशंकरची निवड केली. "ब्लू मॉर्मोन' या हॉटेलविषयी आधी ऐकलं होतं आणि तिथेही जायची बरेच दिवस इच्छा होती. सगळा योग जुळून आला आणि भीमाशंकरचं हॉटेल आणि बसचं बुकिंगही मिळालं.
रविवारी, 28 तारखेला भल्या पहाटे साडेसहाची गाडी पकडली। भीमाशंकरला पोचेपर्यंत बरीच दमछाक झाली. रस्ता खराब आणि घाट असल्यामुळे लाल डब्यात त्रासही झाला. "प्रवासाचा त्रास होणाऱ्यांचं कठीण असतं...स्वतः खाल्लं तरी त्यांच्या पोटात दुखतं आणि दुसऱ्यांनी खाल्लं, तरी!' या ग्राफिटीची आठवण झाली. अशाच एका वाईट प्रवासात ती सुचली होती. असो. साडेदहाच्या सुमारास भीमाशंकरला पोचलो. पण कालच्यापेक्षा वातावरण जरा बदललं होतं. काल रात्रीपासून मनस्वीला अचानक कोरडा खोकला सुरू झाला होता. रात्री एक वाजेपर्यंत जागी होती. त्यातून सकाळी लवकर उठल्यानं तिचं सगळं तंत्र बिघडलं होतं. आम्ही तिथे औषधांची चौकशी केली, पण काहीच उपलब्ध नव्हती. आम्हीही चुकून काहीच नेली नव्हती. ती तर खोकून खोकून हैराण झाली होती. खरं तर गुप्त भीमाशंकर वगैरेला जाऊन आणि दिवसभर फिरून संध्याकाळी हॉटेलवर जायचा बेत होता, पण तो बदलावा लागला.देऊळ पाहूनच आम्ही माघारी हॉटेलकडे जायला निघालो. सात किलोमीटरवरच्या पालखेवाडी फाट्याला उतरायचं होतं. तिथून दोन किलोमीटर आत हॉटेल आहे. आम्हाला न्यायला त्यांची गाडी येणार होती. आम्ही बाराला निघालो आणि मोबाईलला रेंज नसल्यानं, तिथून कॉइन बॉक्‍सवरून हॉटेलवर गाडी पाठवायला कळवून ठेवलं. गाडीत बसेपर्यंत सगळं ठरल्याप्रमाणे होत होतं. नंतर अचानक सगळंच चक्र फिरलं.
मनस्वीचा खोकला फारच वाढल्यासारखा वाटला आणि औषधंही नसल्यावर दिवस कसा काढायचा, असा विचार केला। मग आम्ही एकदा पुढच्या तळेघर गावात थांबून, औषधं घेऊन पुन्हा हॉटेलवर मागे जाण्याचा विचार केला. पण तिथे डॉक्‍टर मिळाला नाही तर काय, असं वाटलं. मग थेट पुण्यालाच जायचं ठरवलं. तसं तिकीटही काढलं. पालखेवाडीला थांबून जीपवाल्याला निरोप तरी देऊ, असा विचार केला, पण कंडक्‍टरने स्टॉप सांगितलाच नाही. मग झाली पंचाईत! मग पुढे आल्यावर पुन्हा विचार बदलला. सुटी घेतलीच आहे, तर फुकट कशाला घालवायची? एकतर ठरलेला कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीत बदलायला मला आवडत नाही. मनस्वीलाही नंतर थोडासा आराम पडला. मग पुण्याचं तिकीट फुकट घालवून, घोडेगावलाच उतरलो. तिथे औषधं घेऊन पुन्हा परतीची गाडी पकडून भीमाशंकरच्या दिशेनं आलो. पालखेवाडीला उतरून, गाडीने हॉटेलवर पोचलो. दोन तास थांबायला लावलं, म्हणून हॉटेलवाला वैतागला होता.
ब्लू मॉर्मोन' हे जंगलात, माळरानावर बांधलेलं एक छोटेखानी हॉटेल निवांत राहायला चांगलं आहे. पण अपेक्षा होती, तशी तिथे फार गर्द झाडी वगैरे नव्हती. आमची एका बंगलीत सोय केली होती. व्यवस्था चांगली होती. फ्रेश वगैरे झाल्यावर जेवण केलं. मग संध्याकाळी शेजारचं एक देऊळ, तळं, हेलिपॅड आणि सनसेट पॉइंटला फेरफटका मारला. संध्याकाळी लवकर परतलो. खूप दमलो होतो. खोलीवरच जेवण मागवलं. रात्री कॅंटीनपर्यंत जायचं म्हणजे सुद्धा भीती वाटत होती, एवढ्या लांब होती आमची ती बंगली. एवढ्या निवांतपणासाठी दिवसाला बाराशे रुपये मोजावे लागले, ही गोष्ट वेगळी!फार उत्तम नाही, पण बऱ्यापैकी व्यवस्था झाली राहण्याची. दुसऱ्या दिवशी पुन्ही भीमाशंकरला जाण्याची माझी इच्छा होती. कारण तिथलं प्रसिद्ध "शेकरू' (मोठी खार) आम्हाला दिसलंच नव्हतं. पण या दोघींच्या विरोधापुढे माझी इच्छा तोकडी पडली. साडेदहाला हॉटेलवाल्यांनी आम्हाला एकेक करून बाईकवरून फाट्यापर्यंत सोडलं. तिथं सव्वा तास बसची प्रतीक्षा करावी लागली. संध्याकाळी चारला घरी आलो.
भीमाशंकरला पूर्वीही एकदा गेलो होतो. तेव्हा गुप्त भीमाशंकरलाही जाऊन आलो होतो. प्रसिद्ध "शेकरू' तर देवळाजवळच दिसलं होतं! या वेळी योग नव्हता, एवढं मात्र खरं! पुढच्या वेळी जाऊ, तेव्हा स्वतःची गाडी घेऊनच, असा निश्‍चयही करून टाकला!

Dec 25, 2008

सादरीकरण वजनी; हिंसेच्या "भजनी'!

आमीर खानचा हेअरकट, डोक्‍यावरच्या आघाताचं गूढ आणि शीर्षकाचा अर्थ एवढी रहस्यं "गज़नी'ला आहेत। भरपूर मालमसाल्यात घोळवून ही रहस्यं प्रेक्षकांपर्यंत पोचवून दणदणीत मनोरंजन देण्यात "गज़नी' 200 टक्के यशस्वी झाला आहे. तरीही मूळ घटनेचं रहस्य सांगेपर्यंत ताणलेली आणि सांगितल्यानंतर सरळसोट धावणारी कथा आणि नायकाच्या अचाट ताकदीबाबत दाखविलेलं "(पुरुष)दाक्षिण्य' यामुळं हा चित्रपट झेपणं प्रत्येकाच्या पचनशक्तीवर अवलंबून आहे. मात्र अतिहिंसेच्या "भजनी' लागला नसता, तर चित्रपट आणखी "वजनी' झाला असता.
ही एक अगदी सर्वसाधारण सूडकथा आहे; पण वेगळ्या प्रकारे सादर केलेली। संजय सिंघानिया (आमीर खान) हा एका बड्या मोबाईल कंपनीचा मालक. त्याचं कल्पना (असीन) या नवोदित मॉडेलशी अपघातानं प्रेम जमतं. ते पुरेसं फुलण्याआधीच चित्रपटातला परमोच्च बिंदू असलेला "तो' आघात होतो. नंतर संजयचं आयुष्य बदलतं. त्याला पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काळ काही लक्षात राहत नाही, म्हणून तो अंगभर आणि घरभर प्रदर्शन सूचनांची रांगोळी घालून ठेवतो. त्याच्या सूडाचा हा प्रवास.
कथेचं सादरीकरण दाक्षिणात्य स्टाइलचं; तरीही भन्नाट! चित्रपटातल्या मूळ घटनेपर्यंतचा प्रवास वेगानं होतो। संजय-कल्पनाचं प्रेमप्रकरण हा चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भाग बॉलिवूडपटांपेक्षाही वरच्या पातळीचा. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीच्या (जिया खान) प्रयत्नांतून नायकाचं आयुष्य मध्यंतरापर्यंत अतिशय परिणामकारकपणे प्रेक्षकांसमोर उलगडत जातं. त्यानंतर मात्र तो आघात आत्ता घडेल, मग घडेल, अशा प्रतीक्षेत प्रेक्षकाला एक-दोन गाणीही घुसडून बरंच टांगलं जातं. प्रत्यक्ष आघाताचा प्रसंग अंगावर काटा आणणारा असला, तरी सहृदय लोकांना न पाहवणाराच!
त्या बहुप्रतीक्षित प्रसंगानंतरचा प्रवास मात्र अगदीच सरधोपट आहे। एकदा फक्त नायकाकडच्या सगळ्या नोंदी पुसून त्याची स्मृती घालविण्याचा प्रयत्न केला जातो, तेवढंच काय ते वेगळेपण! बाकी, दाक्षिणात्य चित्रपटाचा "रीमेक'च असल्यानं दिग्दर्शक ए. मुरुगदास यांनी तिकडचा आततायी हिंसाचार, ढणढणाटी संगीत, रक्ताचा सडाबिडा व्यवस्थित घातला आहे, फक्त थोडा सौम्य रूपात!
बडा उद्योगपती असलेल्या नायकाला चेहऱ्यानं (पोलिसांसकट!) कुणीच कसं ओळखत नाही, त्याची स्मरणशक्ती गेल्यानंतर कंपनीचे लोक त्याला एकटे कसे सोडतात, डझनभर लोकांना यमसदनाला धाडल्यानंतरही तो लगेच बाहेर कसा येतो, वगैरे चुका सोडून देण्याजोग्या।
दहा-बारा लोकांना एका वेळी लोळवू शकेल, एवढं पटवून देण्याजोगं विक्राळ रूप आमीरने धारण केलंय, हे मात्र खरं! एकाच वेळी सरळमार्गी माणूस आणि नंतर सूडानं पेटलेला रक्तपिपासू महामानव त्यानं परिणामकारक सादर केला आहे। (पण तो आलिशान ऑफिसातही शर्टाच्या अर्ध्या बाह्या वर करून चालतो. बहुधा चाहत्यांची गरज म्हणून!) नवोदित असीन अतिशय उत्स्फूर्त आणि प्रसन्न. प्रदीप रावतने क्रूरकर्मा खलनायक उत्तम साकारला आहे. चित्रपटाच्या इतर दर्जाच्या बाबतीत ए.आर. रेहमानचं संगीत अगदीच सुमार.
हिंसक दृश्‍यांबद्दल माफ केलं, तर आमीरच्या शिरपेचात "गज़नी'चा आणखी एक तुरा खोचायला हरकत नाही!

Dec 23, 2008

मौजेचा आठवडा!

मनस्वीची शाळा म्हणजे एक गंमतच आहे। खेळ, गाणी आणि दंगामस्ती! आजच शाळेतून सुटल्यावर सांगत होती, "आज आम्ही "कनिका'चं लग्न केलं आणि सानिकानं माझ्या हातावर खोटीखोटी मेंदी काढली.' आता या पोरी हे लग्न-लग्न कधी खेळतात आणि बाई तरी त्यांना परवानगी कशी देतात, कुणास ठाऊक!
असो। सांगायची गोष्ट ही, की गेल्या आठवड्यात नुसती धमाल होती. 14 तारखेला, रविवारी तिचा वाढदिवस होता. आम्ही खरं तर दरवर्षीसारखा साजरा करणार नव्हतो, तरी गेला बाजार तीसेक माणसं झालीच. यंदा पहिल्यांदाच ऑर्डर देऊन "मॉंजिनीज'चा (सुमारे 800 रुपयांचा) केक आणला होता. (माझ्या खाऊसाठी अख्ख्या आयुष्यात आई-वडिलांनी केलेल्या खर्चही याहून कमीच असेल!) मनस्वीच्या इच्छेप्रमाणे तो मिकी-माऊसचा होता. एक तर मॉंजिनीज-बिंजिनीज सारख्या ठिकाणी ऑर्डर देऊन केक वगैरे घेण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे केकचा फ्लेवर कोणता, सॉफ्ट की नॉर्मल वगैरे प्रश्‍नावली रताना माझी फें-फें उडाली होती. केक आणायला स्कूटी घेऊन गेलो, तेव्हा कळलं, त्यावर बसण्याएवढा तो लहान नाहीये. काय करायचं, असा प्रश्‍न होता. मग वाटेत एका सत्शील दिसणाऱ्या रिक्षावाल्याला पकडलं. मनस्वी आणि तो केक दोघांना सांभाळून घरी पोचविण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. तोही बिचारा कबूल झाला. तिथून त्याच्यासह मॉंजिनीज आणि मग त्याच्या मागेमागे किंवा बरोबरीने घरी, अशी आमची वरात निघाली. मनस्वी आधी एकटी रिक्षात बसायला तयार नव्हती, पण केकचीही जबाबदारी असल्याने कदाचित आपण मोठं झाल्यासारखं वाटत असावं.
संध्याकाळी वाढदिवस छान झाला। घरी फार सजावट केली नव्हती. केक, पावभाजी, गुलाबजाम, असा बेत होता. सोसायटीतली चिल्ली-पिल्ली आणि काही नातेवाईक, अशी मंडळी होती. रत्नागिरीहून अप्पा खास त्यासाठी आले होते. आजारपणानंतर विश्रांती म्हणूनही त्यांना आईने इकडे पिटाळलं होतं. (विश्रांतीच्या नावाखाली ते रोज नव्या ठिकाणी फिरण्याची टूम काढत होते, ही गोष्ट निराळी! ते आईला अजून सांगितलं नाहीये!)
वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी शाळेला सुटी होती। मंगळवारी, 16 तारखेला मनस्वीचं स्नेहसंमेलन होतं. अप्पांचा तोही योग चांगला होता. बाईंना नऊवारी साडी नेसवायची होती. ती अर्थातच कुणाकडून तरी उसनी, रेडिमेड आणली होती. पाच ते सहा अशा कार्यक्रमात मनस्वीचं नृत्य दहा मिनिटांचं होतं. त्यासाठी गेले महिनाभर तयारी सुरू होती. ती घरीदेखील त्याच वातावरणात होती. एक-दोनदा तर माझ्याकडून आणि हर्षदाकडूनही तिनं डान्सची प्रॅक्‍टिस करून घेतली होती! "उदे गं अंबे उदे' हा गोंधळ होता. नावाप्रमाणेच नृत्यातही गोंधळ झाला. मनस्वी नाचते चांगली, पण ती दुसऱ्या रांगेत होती. पुढच्या दोन मुली व्यवस्थित नाचणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे मनस्वीचा उत्साह काहीसा झाकोळला गेल्याचं जाणवलं. तुलनेने, शाळेतल्या तिच्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळी तिचं नृत्य उत्तम झालं होतं. त्यात मुली कमी होत्या आणि मनस्वीला नाचायलाही चांगला वाव होता.
कार्यक्रमांच्या वेळी पालक मधेमधे करतात, म्हणून कुणी पालकांनी फोटो किंवा व्हिडिओसाठी मध्ये येऊ नये, अशी सूचना शाळेनं आधीच केली होती। बसल्या जागेवरून फोटो काढणं शक्‍य नव्हतं. मी वशिल्यानं पहिल्या रांगेत जाऊन बसलो आणि तिथून व्हिडिओ घेतला. पण फारसा चांगला आला नाही. आता शाळेची डीव्हीडी भरमसाट किंमतीत विकत घ्यावी लागेल!
मधल्या सोमवारच्या दिवशी मी, अप्पा आणि मनस्वी थेऊरला जाऊन आलो। पण अगदी पोपटच झाला. एकतर आधी स्वारगेट, मग तिथून बऱ्याच प्रतीक्षेनंतर मिळालेल्या बसमधून थेऊर फाटा आणि नंतर तिथून तिसऱ्या बसने थेऊर, असा कंटाळवाणा प्रवास झाला. देऊळही मला अजिबात आवडलं नाही. मला एकतर निसर्गाच्या सान्निध्यातली, शांत ठिकाणची देवळं आवडतात. तर तेही असो.
स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मनस्वीच्या शाळेतला अल्पोपाहार रद्द झाला. त्याचे पैसे वाचवून मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना द्यायचे ठरलेय म्हणे! पोरांचा उगाच हिरमोड. पण मनस्वीला सुटी मिळाली. आता उद्या, बुधवारी फक्त दोन तास शाळा आहे. नंतर नाताळची आठ दिवस सुटी! कार्टी डोकं पिकवणार आहे आठवडाभर!!
http://picasaweb.google.com/abhi.pendharkar/ManasviSBirthday?feat=email#

Dec 17, 2008

ब्रेकिंग न्यूज!

आमची `स्वर्ग' सोसायटी तशी कुणाच्याच अध्यात ना मध्यात असलेली. (गावरान भाषेत याला `शेपूटघालू' प्रवृत्ती म्हणतात. असो) सोसायटीची इमारत बांधून झाली, तेव्हा कुणाच्याच `अध्यात-मध्यात' नव्हती. नंतर मात्र भोवताली मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आणि आमची सोसायटी बिचारी शक्ती कपूर किंवा रणजीतसमोर पूर्वी गावातल्या गरीब नायिकेची, सहनायिकेची किंवा ज्युनिअर आर्टिस्टची व्हायची, तशी अवस्था झाली. अंग चोरून, कशीबशी श्‍वास घेत आता ही सोसायटी उभी आहे. त्यामुळं तशी इतर लोकांच्या चर्चेत किंवा पाहण्यात आमची सोसायटी येण्याची काहीच शक्‍यता नव्हती. त्यातून, सोसायटीतले एकेक `नग' सदस्य आणि त्यांचा तिथ्यशील आणि सौजन्यपूर्ण' स्वभाव, यामुळं कुठलाही बिल्डर सोसायटीचं `कॉंप्लेक्‍स' करण्याची `कॉंप्लेक्‍स' आयडिया घेऊन आमच्याकडे येण्याची सुतराम शक्‍यता नव्हती। बरं, एवढ्या सगळ्या आलिशान, चकचकीत इमारतींच्या गर्दीत आपल्याच सोसायटीचं "कॉंप्लेक्‍स' का होत नाही, याचाही "कॉंप्लेक्‍स' सोसायटीच्या सदस्यांना येण्याचाही संबंध नव्हता...!

तर, अशी ही आमची सोसायटी एकाएकी नुसत्या शहराच्या नव्हे, राज्याच्या नव्हे, देशाच्या नकाशावर आली. (तशी ती आधी `गूगल अर्थ'च्या नकाशावर होती. या वेबसाइटवर आपल्या घराचा पत्ता आणि इमारतीचं नाव वगैरे देण्याची सुविधा उपलब्ध झाली, तेव्हा सोसायटीतल्या काही वांड कार्ट्यांनी या साइटवर सोसायटीच्या जागेच्या ठिकाणी `भूलोकीचा नरक' असं नाव देऊन ठेवलं होतं। पण ती बदनामी निराळी.)

सोसायटीचं नाव देशाच्या नकाशावर कसं आलं, त्याची मोठी रंजक कथा आहे।मी त्या दिवशी नेहमीप्रमाणेच (उशिरा) ऑफिसला गेलो होतो. मस्टरवर सही वगैरे करून झाल्यानंतर श्रमपरिहारासाठी खाली कॅंटीनमध्ये बसलो होतो. सध्या कामाचा लोड किती वाढलाय, त्यातून किती दमणूक होते, वगैरे नेहमीच्या आवडीच्या विषयांवर चर्चा सुरू होती. तेवढ्यात गणू शिपाई बोलवायला आला. ऑफिसात माझ्यासाठी फोन होता.

`हेड ऑफिसचा नाहीये ना? मग मरू दे!' मी वैतागलो.

``साहेब, हेड ऑफिसचा नाहीये, होम मिनिस्ट्रीकडून आहे। तुमच्या घरून फोन आहे.'' गणूनं खुलासा केला. सरकारी हापिसात कामाला असूनदेखील गणूनं ही विनोद करण्याची वृत्ती जपलेली पाहून मला भरून आलं. तरीही, त्याच्या निरोपामुळं थोडासा धक्का बसला. गौरीचा- माझ्या बायकोचा फोन? एवढ्या सकाळी? कशाला बुवा?कपातली साखर तशीच टाकून मी ऑफिसकडे निघालो.

"आज पुन्हा काहितरी निमित्त काढून बिल न देताच कटले जोशी!' असा शिंदे आणि टाकळीकरांनी मारलेला टोमणा ऐकला, पण त्याकडे दुर्लक्ष केलं.फोन घेतला. शेजारच्या खरे काकूंचा होता

``अहो बबनराव, ताबडतोब घरी या! इकडे भूकंप झालाय!!'' खरे काकू एवढ्या प्रेमळ आवाजात ओरडल्या, की ऑफिसातली जमीनही थरथरल्यासारखी वाटली.

"काय सांगताय? डोंबिवलीत भूकंप? मग इथे दादरला कसा नाही झाला? हल्ली पावसासारखा भूकंपदेखील दर पन्नास फुटांवर व्हायला लागलाय की काय?''

"फालतू विनोद कसले करताय? प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय?''

"सॉरी हं खरे काकू! पण भूकंप होऊनही तुमचा फोन चालू कसा? कॉर्डलेस घेतलात की काय तुम्ही?''

"बबनराव, आता ऐकून घेणार आहात का माझं? भूकंप म्हणजे तसला नाही. अहो, आपली सोसायटी गजबजलेय. आपली कामंधामं सोडून सगळे लोक इथे आलेत. सगळे चॅनेलवाले आणि त्यांच्या धोबी व्हॅन पण आल्यायंत।''

``धोबी व्हॅन' हा प्रकार काही मला कळला नाही. "ओबी व्हॅन' मला माहीत होत्या. बहुधा, चॅनेलवाले सगळ्या बातम्या आपटून धोपटून धुतात आणि पीळ पीळ पिळतात, म्हणून खरे काकूंनी त्यांच्या गाडीला `धोबी व्हॅन' असं नाव दिलं असावं, असा समज मी करून घेतला.

"पण कशासाठी एवढी गर्दी?''

"अहो कशासाठी म्हणजे काय? तुमच्या गौरीच्या मुलाखती नि शूटिंग घ्यायला.

``गौरीच्या मुलाखती? माझ्या बायकोच्या? तशी आमची गौरी "सजावट स्पर्धे'त (म्हणजे आरशासमोर तासंतास बसून चेहऱ्यावर निरनिराळी रोगणं लावण्याच्या चढाओढीत) एक्‍स्पर्ट असल्याचं मला माहीत होतं. रोज नवनवे मुखवटे घालूनही ती माझ्यासमोर वावरत असते, याचीही कल्पना होती. पण ही सजावट आणि मुखवटे स्पर्धा गणपतीतल्या गौरीसाठी असते. आमच्या गौरीसाठी कशी काय, अशी शंका डोक्‍यात आली.कुठल्या बरं स्पर्धेत भाग घेतला असावा तिनं? माझ्या माहितीप्रमाणं इयत्ता तिसरीत असताना लिंबू-चमचा स्पर्धेत भाग घेतला, तीच तिच्या आयुष्यातील शेवटची स्पर्धा. त्यातही तिचा सतरावा नंबर आला होता. बाकी, लग्नानंतर आता संसाराच्या "रिऍलिटी शो'मध्ये भाग घेतला आहे, ती गोष्ट वेगळी।

मी निःशब्द झालेला पाहून खरे काकू पुन्हा खेकसल्या, "अहो, ऐकताय ना?'

"काकू, नक्की काय झालंय ते थोडक्‍यात सांगाल?''

"अरे परमेश्‍वरा! म्हणजे मी काय पाल्हाळ लावतेय का? बरं. आता नीट ऐका. तुमच्या गौरीच्या अंगात देवी आलेय. काय काय खायला अन्‌ प्यायला मागतेय. दूध प्यायल्यावर पेरू खातेय. ताकावर सरबत पितेय. भेळ, पाणीपुरी खाऊन वर जेवायला मागतेय. कलिंगडावर चिकू खातेय आणि कार्ली तर काकडीसारखी ओरपतेय!''

आता मीही जरा दचकलो. देवी अंगात येणं म्हणजे काय? आम्ही कॉलेजात होतो, तेव्हा आमच्याही अंगात देवी यायची. पण ती पडद्यावरची श्रीदेवी. तिचे सिनेमे आम्ही तासंतास बघायचो आणि घायाळ व्हायचो. पण गौरीची केस निराळी दिसत होती. तिनं खायलाप्यायला मागणं यात काही विशेष नव्हतं. तिच्या प्रकृतिमानाला साजेसंच होतं ते. आणि ती बिथरल्याचा अनुभव तर मी लग्न झाल्यापासूनच घेत होतो. त्यामुळं तिच्या विक्षिप्त वागण्यानंही मला धक्का बसला नव्हता. धक्कादायक हे होतं, की ती चक्क फळं आणि भाज्या खात होती. एरव्ही तिच्या खाण्याच्या सवयींवरून लहानपणी आईनं तिला वरणभाताच्या ऐवजी एसपीडीपी आणि कच्छी दाबेलीच भरवली होती की काय, असं मला वारंवार वाटायचं।

म्हणजे, आजचा प्रकार एकूण गंभीर होता तर!मला तडक घरी जाणं भागच होतं. अर्ध्या दिवसाची सुटी मांडण्याशिवाय पर्याय नव्हता. ट्रेन, बस, रिक्षा अशी मजल दरमजल करत घरी पोचलो, तेव्हा तिथे हीऽऽऽऽ गर्दी जमली होती. सोसायटीचं मुख्य गेट बंद होतं. पोलिसही पोचले होते. चॅनेलचा एक "दांडुकेवाला' सोसायटीच्या गेटवरच चढून बेंबीच्या देठापासून ओरडत होता. एका हातात ते माईकचं दांडकं आणि दुसऱ्या हातानं गेट धरलेलं, अशी त्याची कसरत चालली होती. मध्येच गेटचं ग्रिल लागून त्याची पॅंट नको तिथे फाटली अन्‌ त्याला तोंड लपवायला जागा राहिली नाही. बरं, `लाइव्ह' प्रक्षेपण असल्यानं कॅमेरामनला वाटलं, आपला बातमीदार काहीतरी भन्नाट न्यूज देतोय, त्यामुळं फाटलेली पॅंट लपवण्यासाठीची त्याची धडपड आणि फजिती कॅमेऱ्यानं इत्थंभूत चित्रित केली आणि सगळ्या जगानं ती `लाइव्ह' पाहिली।

सोसायटीच्या आतही कॅमेरेवाले, पत्रकार, पोलिस आणि बघ्यांची गर्दी होती. मी कशीबशी वाट काढत आत गेलो. बाहेरचं रामायण कमी होतं म्हणून की काय, आत वेगळंच महाभारत सुरू होतं. मध्यमवर्गीय घरातल्या एका सुशिक्षित, सुसंस्कारित, सुपरिचित, सुगृहिणीच्याही `अंगात' येऊ शकतं, याची सगळ्या चॅनेलवाल्यांनी `एक्‍सक्‍लुझिव्ह' आणि `ब्रेकिंग न्यूज' केली होती. सहज एका घरात डोकावलो, तर आमच्या गौरीचं दर्शन झालं. खरं तर टीव्हीच्या 29 इंची पडद्यावर ती मावत नव्हती. `लार्जर दॅन लाइफ' अशी तिची प्रतिमा जाणवत होती. मी `लार्जर दॅन वाइफ' होणं आयुष्यात शक्‍य नसल्यानं तिची प्रतिमा अबाधित राहणार, याचीही खात्री झाली।

गौरी घरातलं कायकाय खात होती, त्याची क्‍लिपिंग दाखवून काही काही चॅनेल कुठल्या कुठल्या भुताटकीच्या सिनेमांतली भयानक दृश्‍यं सोबत दाखवत होते. भुतांच्याही अंगात येतं, हे मला माहीत नव्हतं. हा संबंध त्यांनी कसा जोडला, हे कोडंच होतं.गर्दीतून वाट काढत मी घरात प्रवेश मिळवला. तिथलं दृश्‍य हृदय पिळवटून टाकणारं होतं. घरात सर्वत्र पसारा पडला होता. टीव्ही रिपोर्टर, कॅमेरामन, अन्य तंत्रज्ञांनी घरात अक्षरशः नंगानाच घातला होता. म्हणजे टीव्हीच्या पडद्यावर ती भुतं नंगानाच घालत होती, इथं आमच्या घरात ही भुतं! गौरीला सर्वांनी घेरलं होतं. तिच्यावर सर्वांच्या प्रश्‍नांच्या फैरी चालू होत्या. घरातल्या संडासापासून बेडरूमपर्यंत सगळीकडची क्‍लिपिंग चॅनेलवाले टिपत होते. गौरीला वेगवेगळ्या ऍक्‍शन करायला लावून तिचे बाइट्‌सही घेत होते. एकदा तर चुकून एका पत्रकारानं माईकचं दांडकं तिच्या तोंडाच्या एवढं जवळ नेलं, की रागावलेल्या गौरीनं माइकचाच `बाइट' घेतला, असं कुणीतरी सांगितलं.मी घरात आल्याचं कळल्यावर गौरीच्या जिवात जीव आला. प्रश्‍नांच्या सरबत्तीनं ती भंडावून गेली होती. मी जवळ गेल्यावर ती माझ्या गळ्यातच पडली. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर बायको स्वतःहून जवळ येण्याचा हा दुसराच प्रसंग! असो. खासगी तपशीलात जास्त शिरणं योग्य नाही.मलाही भरून आलं. तिची अवस्था पाहवेना. चेहराही सुकलेला वाटत होता. चॅनेलवाल्यांच्या आग्रहामुळं की काय कुणास ठाऊक, प्रमाणाबाहेर खाल्ल्यानं ती मूळच्या आकारमानापेक्षा दीडपट भासत होती. मी तिला आधार दिला।

तिच्याशी काही बोलणार, एवढ्यात गौरी अचानक खाली कोसळली.तिचे डोळे मिटलेले होते।

``काय झालं, काय झालं?" सगळे चॅनेलवाले सरसावले।"

नालायकांनो, तुमच्यामुळं झालंय हे सगळं!'' कधी नव्हे तो चढ्या आवाजात मी ओरडलो. तसे काही जण चपापले. काही जणांनी मागच्या मागे काढता पाय घेतला.

``कुणीतरी डॉक्‍टरांना बोलवा रे पटकन!'' मी शेजाऱ्यांना आर्त साद घातली.शेजारचा राजू पटकन धावत जाऊन सोसायटीच्याच आवारात असलेल्या डॉक्‍टरांना घेऊन आला. तोपर्यंत मी सगळ्या चॅनेलवाल्यांना हाकलून लावलं होतं. डॉक्‍टरांनी गौरीची तपासणी केली. मी गॅलरीत येरझाऱ्या घालत होतो.

डॉक्‍टर बाहेर येऊन म्हणाले, "जोशी साहेब, पेढे काढा पेढे!''या डॉक्‍टरांना कुठल्या वेळी काय बोलावं याचं कधी भान नसतं. चक्कर आल्यावर पेढे कसले? मला काही कळेना."

``अहो, डॉक्‍टर, प्रसंग काय, बोलताय काय?'' मी जरासा वैतागलो.

``बबनराव, प्रसंगच तसा आहे. आनंदाची बातमी आहे. तुम्ही बाप होणार आहात. गौरीताई गरोदर आहेत...!''

डॉक्‍टरांच्या या बोलण्यानं मला धक्काच बसला. म्हणजे, तसे आमचे प्रयत्न बरेच दिवस चालले होते, पण अशा प्रकारे अचानक फलप्राप्ती होईल, याचा अंदाज नव्हता.आनंदाच्या भरात काय बोलावं तेच मला कळेना.

`देऊया,' असं म्हणून मी डॉक्‍टरांची बोळवण केली.एवढ्या सगळ्या रामायणाची ही फलनिष्पत्ती झाली होती. दिवस गेल्याचं कळण्याआधीच गौरीला काहीबाही खाण्याचे डोहाळे लागले होते आणि गैरसमजातून चॅनेलवाल्यांनी त्याची `ब्रेकिंग न्यूज' केली होती.या प्रकरणातली खरीखुरी `ब्रेकिंग न्यूज' साजरी करायला मात्र एकही चॅनेलवाला तिथे हजर नव्हता...

Dec 16, 2008

`अण्णा'न्न दशा!

इतुकेच तूप घेताना वरणावर होते

'अन्ना'ने केली सुटका, 'अण्णा'ने छळले होते!

ती आमटी फुळूकपाणी बोलून बदलली नाही

मी डाळ शोधण्या कितीदा, तळ ढवळले होते


मेलेल्या आयुष्याचा त्रास गडे विसरूया

(पाऊल कधी वासाने 'मेशी'कडे वळले होते? )

मी वाहिली तेव्हाही अण्णाला शिव्यांची लाखोली

मी नाव त्याच्या बापाचे चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला हसणेही

मी रंग त्याच्या कन्येसह कितीक उधळले होते!

नुकतीच त्या स्मरणांची जखम भळभळा वाहिली

दिसभर मग त्या विचारांनी पोट ढवळले होते

घर माझे शोधाया 'ब्युरो'त वणवण केली

जे 'फोन' मिळाले ते केव्हाच केले

एकटाच त्या रात्री बकाबका जेवत होतोहोते

'मधू'सह आकाशात कितीक 'चंद्र' उजळले होते!!

Dec 8, 2008

पाळणा हलला!

`वर्षा' बंगल्यावर मोठी लगबग सुरू होती. सगळ्या बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली होती. उत्साह ओसंडून वाहत होता. घरात चार वर्षांनी पाळणा हलला होता. बारशाचा कार्यक्रम अगदी झोकात, थाटामाटात होणार होता. सगळे नातेवाईक, पाव्हणेरावळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले आप्तजन जमले होते. दिल्लीच्या विशेष पाहुण्यांना खास आमंत्रण होते. सगळे जण गटागटाने उभे होते. पहिला मान आपल्यालाच मिळावा, असा प्रत्येकाचा हट्ट होता.
बंगल्याचे सध्याचे मालक आले. आता ते घर सोडून जाणार होते. त्यामुळे पाळण्याला पहिला झोका देण्याचा मान त्यांचा होता. त्यांनी तो पार पाडला आणि ते बाजूला झाले. खरं तर ते आत निघून जातील, असं सगळ्यांना वाटत होतं, पण ते एका गटाच्या मागे जाऊन उभे राहिले. मग नाव ठेवण्यासाठी प्रत्येक गटाची कुरघोडी सुरू झाली.
दिल्लीहून आलेले दोघे विशेष पाहुणे प्रत्येक गटातल्या सदस्यांपाशी जाऊन काय नाव ठेवावं, याची चर्चा करत होते. कुणाकुणाला बाजूला घेऊन काही गुफ्तगूही चालू होतं. बंगल्याच्या कोपऱ्यात उभा असलेला एक सगळ्यात मोठा गट आणि दाराच्या उंबरठ्यावरच असलेला एक नेता अस्वस्थपणे येरझारा घालत होते. पुढे झालेल्या गर्दीमुळे त्यांना आत यायला मिळत नव्हतं. पाळण्यातल्या बाळाला नाव ठेवण्याची संधी आपल्यालाच मिळावी, यासाठी त्यांची धडपड दिसत होती. त्यांच्यातलेच काही जण बाहेर उभे असल्यानं बंगल्याबाहेरचा सगळा परिसर दुथडी भरून वाहत होता.
कुणी बाळाला सोन्याची अंगठी करून आणली होती, कुणी वाळा आणला होता, कुणी कानातलं, तर कुणी गळ्यातली चेन. आपलाच दागिना कसा भारी आहे, यावरून मग चर्चा आणि वादविवाद झडत होते. "पेट्या' आणि "खोके' भरभरून भेटवस्तूही काहींच्या हातात दिसत होत्या. दिल्लीतल्या पाहुण्यांना मोठा मान होता. त्यांनी सांगितल्याशिवाय बाळाचं नाव ठरणार नव्हतं. हे पाहुणेही असे बेरकी होते, की प्रत्येकाजवळ जाऊन सारख्याच आपुलकीनं आणि आस्थेनं चौकशी करत होते. दुसरा काय बोलला, याविषयी तिसऱ्याला ताकास तूर लागू देत नव्हते.
अखेर सगळ्यांशी चर्चा झाली. बाळाचं नाव ठरल्यात जमा होतं. कोणत्या गटाला हा मान मिळणार, हेही जाहीर होणार होतं. पण उंबरठ्यावर असलेल्या त्या सगळ्यात मोठ्या गटानं दिल्लीच्या पाहुण्यांना दम भरला. छोट्या गटाला नाव जाहीर करू देणार नाही, असा इशारा दिला. दिल्लीकर पाहुणेही जरासे चरकले. मग त्यांनी "मॅडम'शी संपर्क साधला. काय बोलणं झालं, कुणालाच कळलं नाही. पण दिल्लीकर अचानक तरातरा निघून गेले आणि बाळाचा नामकरण विधी त्या दिवसापुरता स्थगित झाला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा बंगला सजला. सगळे जण पहिल्यापेक्षा जास्त उत्साहानं त्या ठिकाणी जमले. सगळ्यांनी बाहेर फटाके, जल्लोषाची तयारी केली. पाहुण्यांनी दिल्लीतूनच नाव जाहीर केलं - अशोक! आनंदाला पारावार राहिला नाही. अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला, आलिंगनं, हस्तांदोलनांची आवर्तनं घडली. उंबरठ्यावर असलेल्या त्या एका गटाच्या प्रमुखानं तातडीनं सगळ्यांना जमा करून आपल्याला संधी न दिल्याबद्दल सगळ्यांचे वाभाडे काढले. आपल्याविरुद्ध कारस्थान रचल्याचा आरोपही केला. त्याच्याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नाही.
...बंगल्यात आनंदोत्सव सुरू असताना बाहेर कसला तरी प्रकाश चमकल्याचं कुणाला तरी जाणवलं. "फटाक्‍यांचा किंवा विद्युत रोषणाईचा असेल, त्याकडे विशेष लक्ष देऊ नका,' असं बंगल्यातल्या सगळ्या गटांच्या प्रमुखांनी सांगितलं. पण हा प्रकाश म्हणजे बंगल्याच्या शेजारीच जळत, धुमसत असलेल्या भल्यामोठ्या परिसरातल्या आगीचा आहे, हे एका उपस्थितानं आपल्या प्रमुखांच्या लक्षात आणून दिलं. काही विघातक प्रवृत्तीच्या लोकांनी तो परिसरच उद्‌ध्वस्त करून टाकला, त्याला आठ दिवसही झाले नव्हते. अजून त्याची धग जाणवत होती.
काही ज्येष्ठांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं. "ए, बाहेरचं लायटिंग बंद करून टाका रे!' त्यांनी आदेश दिला. स्वयंसेवकांनी तातडीनं त्याची अंमलबजावणी केली. आणि मग पुन्हा अभिनंदनाचे वर्षाव, हास्यांचे फवारे आणि आलिंगनांचा उत्सव सुरू झाला...!

Dec 5, 2008

"ग्राफिटी' जरा कमीच रंगली...!

"नॅशनल बुक ट्रस्ट'च्या प्रदर्शनात बुधवारी आमचा "ग्राफिटी'चा कार्यक्रम नेहमीप्रमाणे ठीकठाक झाला. पण छान रंगला नाही. त्याबद्दल थोडा नाराजच होतो.
एकतर पावणेसहाचा कार्यक्रम सहा वाजून वीस मिनिटांनी सुरू झाला. अडचणी अनेक होत्या. प्रदर्शन अगदीच घाईघाईत रचलेले होते. पुस्तके चांगली असली, तरी व्यवस्था चांगली नव्हती. नदीपात्रच असल्याने पायाखाली दगड-माती, खिळे, कधीही काही येऊ शकेल, अशी परिस्थिती. त्यातून रविवारी तुफान पाऊस झाल्याने सगळीकडे चिखल झाला होता. त्यामुळे प्रतिसादाबाबत आनंदच होता.
पाऊस आणि चिखलामुळे गवतात नवेनवे पाहुणे भेटीला आले होते. आमच्यानंतर साडेसहाला आमच्याच दोन पत्रकार मित्रांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन तिथेच होणार होते. आमचा कार्यक्रम जवळपास त्यांच्याच वेळेवर सुरू झाल्याने लवकर संपविण्याचे थोडे टेन्शन होते.
सुरुवातीला गर्दी नव्हती, पण कार्यक्रम सुरू झाल्यावर वाढली. काही विनोद बिनोद पेरल्यानंतर लोकांमध्ये खसखसही पिकली. पण प्रतिसाद नेहमीसारखा उत्साही नव्हता. काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं. आम्ही आमच्या परीनं चांगला प्रयत्न केला, किस्से खुलवून सांगितले. पण जरा पुढच्या वेळी अधिक प्रयत्न करावे लागतील.
अर्ध्या तासात कार्यक्रम उरकला. सहा वाजून पन्नास मिनिटं झाली होती. एवढा वेळ पुरेसा होता. मुख्य म्हणजे आम्हाला जे सांगायचं होतं, ते सांगून झालं होतं.
आता दहा तारखेला, बुधवारी एस. पी. कॉलेजात विद्यार्थ्यांच्या एका गटासमोर कार्यक्रम सादर करायचा आहे. तिथे काही वेगळे प्रयोग करण्याचा विचार आहे. बघूया, तिथे कसा प्रतिसाद मिळतोय!
---------

Nov 30, 2008

`ग्राफिटी' किस्से आणि गप्पा


मित्रहो,
`ग्राफिटी' किस्से आणि गप्पा कार्यक्रम आहे मंगळवारी, दोन तारखेला. नदीपात्रात, भिडे पुलाजवळ. नॅशनल बूक फेअर प्रदर्शनात. नकी या आणि प्रतिक्रिया कळवा.
वेळ : संध्याकाळी ६ वा.

Nov 25, 2008

व्यायाम 'हराम' आहे

सर्दी-पडसं किंवा मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं तत्सम पातळीच्या गंभीर आजारावरच्या औषधासाठी एका डॉक्‍टर मित्राकडे गेलो होतो. मित्र या माणसाला काही पाचपोच नसावी, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यानं ते वचन सार्थ केलं. सर्दी-पडशावरचं औषध राहू द्या, त्यानं माझ्या आकारमानालाच हात घातला.
"लेका, केवढा केंडासारखा वाढला आहेस?''
मित्रानं बॉंब टाकला. तोही साक्षात सहधर्मचारिणी सोबत असताना!
"बघा, मी तुम्हाला सांगत नव्हते? खाण्यावर काही कंट्रोल नाही. व्यायाम करायचा नाही. वजन वाढेल नाहीतर काय?" बायकोनं अगदी 'असामी'तल्या 'मी' अर्थात धोंडोपंत जोशींच्या बायकोची गादी चालवली.
माझ्या प्रकृतीला नावं ठेवणार्‍या या मित्रानं फार काही मोठा तीर मारला नव्हता.
`लेका, आठवीत असताना तू शर्टाच्या बाहीला शेंबूड पुसायचास आणि गोष्ट सांगायला उभा राहिलास, की दर मिनिटात तीनदा चड्डी सावरायचास,' असं मी त्याला त्याच्या तरुण सेक्रेटरिणीसमोर सांगितलं असतं तर त्याची तिच्यासमोरच चड्डी नसती सुटली? पण सभ्यता सोडून बोलण्याचा अधिकार डॉक्‍टर किंवा वकिलालाच असतो. त्यामुळं मी काही पातळी सोडली नाही.

"हो...थोडं वजन वाढलंय खरं!" मी प्रामाणिकपणानं मान हलवली.
"थोडं? अरे सुजलाहेस सगळीकडून!"अभय एवढ्या जोरात उसळला की मला माझी पोटाची, छातीची, दंडांची, मांड्यांची, पोटर्‍यांची चरबी लोंबते आहे असा भास होऊन त्या 'सुमो' पैलवानाच्या जागी स्वतःचाच चेहरा दिसायला लागला.
"जिने चढताना सुद्धा धाप लागत असेल लेका!"
त्याचा हा हल्ला मात्र मी परतवण्याचा निर्धार केला."अभ्या, डॉक्‍टर झालाहेस म्हणून काही पण बोलशील? काही पण धाप बिप लागत नाही मला! मी ट्रेकिंगला सुद्धा जातो. अगदी साल्हेर, कळसूबाईच्या! तुला वाटतंय तशी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये.""तर तर! गेले ते दिवस! आता वर्षातून एकदा त्या 'ड्यूक्‍स नोज'ला जाता आणि मग अंग धरलंय म्हणून चार दिवस रजा टाकता. मला माहितेय तुमचं 'रेग्युलर ट्रेकिंग'!" बायको नावाची बाई ही नवर्‍याची अब्रू चारचौघांत काढण्यासाठीच असते, या तत्त्वावर हिनं शिक्कामोर्तब केलं.
"तेच म्हणायचंय मला! ये, काट्यावर ये बघू!" अभयनं वजनकाटा पुढे केला. माझ्या अंगावर काटा आला.
"८४ किलो! अरे, काय वजन की काय? आता माझं ऐकायचं. चाळिशी तरी गाठायची आहे ना तुला?" अभयनं निर्वाणीचा इशारा दिला.
पूर्वीच्या बायका नवर्‍याविषयी असा अपशकुनी उल्लेख ऐकला, की कसनुशा होत असत. नवर्‍यानं आपल्या मरणाविषयी उल्लेख केला, तर हातानं त्याचं तोंड बंद करीत. वर आपलं आयुष्य त्याला लाभो, अशी इच्छा व्यक्त करत, असं आमचं मराठी 'सौभाग्य वस्तू भांडार'छाप चित्रपटविषयक ज्ञान आम्हाला सांगतं.आमच्या बायकोनं मात्र, "बघा! हेच सांगत होते ना तुम्हाला?" असं म्हणून मित्रालाच आणखी फूस दिली.
"मी डाएटचा कोर्स देतो तुला. उद्यापासून व्यायाम सुरू कर. किमान दहा किलो वजन कमी केलं पाहिजे तुला." अभयनं फर्मान सोडलं.
कागदावर फराफरा काहीतरी खरडलं. सेक्रेटरीला बोलावून कुठल्या तरी डाएट आणि खादाडी, आरोग्यावरच्या दोन-तीन लेखांच्या प्रिंट आऊट दिल्या. एवढं करून त्याचं समाधान झालं नसावं. मला आणखी काही तोंडी सल्ले दिले. वर, त्याची फीदेखील घेतली. सर्दी-पडशावरचं औषध घ्यायला गेलेला मी मित्राच्या या अमूल्य आणि अनपेक्षित सल्लादानाच्या ओझ्यानं पार वाकून गेलो.
घरी गेल्यापासून बायकोची भुणभुण सुरू झाली... "उद्यापासून व्यायाम सुरू करा. सोनारानंच कान टोचलेत ना आता?""सोनार नाही, डॉक्‍टर होता त." असा माफक विनोद मी करून पाहिला, पण तो तिच्या कानावरून गेला. मलाही एक नवी ऊर्मी आली. पहाटे उठून चालायला जायचं आणि महिनाभरात वजन कमी करून त्या डॉक्‍टरड्याच्या तोंडावर कमी झालेल्या वजनाचं तिकीट फेकायचं, अशी भीष्मप्रतिज्ञा करून टाकली.
दुसर्‍या दिवशी पहाटे पाचचा गजर लावला. झोपेतच तो बंद करून पुन्हा झोपलो. साडेपाचला पुन्हा गजर वाजला. बंद झालेला गजर पुन्हा कसा झाला, असा प्रश्‍न पडेपर्यंत लक्षात आलं, की बायकोनं खबरदारी म्हणून दुसर्‍या मोबाईलवर गजर लावून ठेवला होता. तोही बंद करून पुन्हा मुरगुशी मारली. पाच वाजून पन्नास मिनिटांनी पुन्हा गजरचा ठणाणा झाला. आता मात्र पुरता वैतागलो. घरात तिसरा मोबाईल कुठून आला, असा शोध घेऊ लागल्यावर समजलं, की हा पहिल्याच मोबाईलवरचा "रिपीट अलार्म' होता. आता उठणं भागच होतं. शिवाय काल रात्री केलेला दृढसंकल्पही डोळ्यापुढे काजव्यासारखा चमकला. बर्‍याच महिन्यांपूर्वी अशाच एका व्यायामाच्या संकल्पाच्या बेसावध क्षणी घेतलेली ट्रॅक पॅंट धुंडाळून काढली. खसाखसा दात घासून, चहाबिहा न पिताच फिरायला बाहेर पडलो. माझ्या कानाशी तीनदा गजर करणारी बायको स्वतः मात्र कुंभकर्णाच्या अवस्थेत होती.
बाहेर पडल्यावर कुठं जायचं ते कळेना। थंडीतलीच धुक्‍याची ती पहाट बघण्याची माझी ही ३४ वर्षांच्या आयुष्यातली दुसरी की तिसरी वेळ होती. पाच वर्षांचा असताना आजोळच्या जत्रेला जाण्यासाठी आईनं पहाटे उठवलं होतं. त्यानंतर स्वतःच्या लग्नाच्या दिवशी मुहूर्तच आठचा असल्यानं आणि लग्नाला मी उपस्थित राहणं अनिवार्य असल्यामुळं पहाटे उठलो होतो. त्यानंतर थेट आजच! बाकी दिवाळीचा ब्राह्ममुहूर्तही मी कधी पाहिला नव्हता. साक्षात बायकोच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळी सिझेरियन सकाळी सात वाजता करण्याचा डॉक्‍टरांचा अट्टाहासही मी मोडून काढला होता. सकाळी सातच्या ऐवजी त्यांनी थेट संध्याकाळी सातची वेळ तेव्हा केली होती...सांगायचा उद्देश हा, की सकाळी बाहेर पडलो, तेव्हा एवढी थंडी आणि धुकं असेल, याची कल्पना नव्हती. उठलोच आहोत तर पर्वतीला जावं, असा निश्‍चय केला. लहानपणी गावी राहायचो, तेव्हा पहाटे बायका उठून घराभोवती आणि वाटेवर सडा-रांगोळी करायच्या. त्यावरून चालताना मंद सुगंधाचा आनंद घेता यायचा. पर्वतीच्या वाटेवरही ही परंपरा पाळली जात होती, पण वेगळ्या अर्थानं. तिथे झोपड्यांतल्या पोरासोरांच्या मलमूत्राचा सडा घातलेला होता आणि त्याच्या उग्र दर्पाने नाकातले केसही करपत होते.कसाबसा जीव आणि नाक मुठीत धरून पर्वती पायथ्यापाशी पोचलो. मोठ्या उत्साहानं चढायला सुरुवात केली. पाचवी-सहावीतल्या विज्ञानातल्या उदाहरणांप्रमाणे, सुरुवातीला जास्त उत्साह, नंतर कमी, नंतर आणखी कमी आणि मग शेवटी गलितगात्र अवस्था, या क्रमानं त्या पायर्‍यांवर चढताना अनुभव आला. पहिल्या पंधरा-वीस पायर्‍यांतच आपल्या बापाला हे झेपायचं नाही, हे लक्षात आलं. तरीही निर्धारानं अर्धी पर्वती चढलोच. तिथे बराच वेळ मुक्काम ठोकून, नव्या उमेदीनं उरलेला टप्पा गाठायचा निश्‍चय वारंवार केला, पण मनानं उभारी घेतली, तरी शरीरानं हाय खाल्ली. थोरल्या माधवरावांना तिथूनच दंडवत घालून परतीच्या वाटेला लागलो.


घरी आलो, तोवरही अर्धांगिनी अंथरुणातच निपचीत पडली होती. लाथ घालूनच उठवायची इच्छा होती, पण सभ्यतेच्या मर्यादा आड आल्या.हा प्रकार रोजच व्हायला लागल्यावर पर्वतीचा नाद सोडून द्यावा लागला. एकतर रोजची बारा-चौदा तास झोपायची सोय होत नव्हती. त्यातून पायातलं त्राणच निघून गेल्यासारखं वाटत होतं. पहिल्या दिवशी उत्साहानं अर्ध्या पायर्‍या चढून गेलो, पण दुसर्‍या दिवशी पाव, तिसर्‍या दिवशी आधपाव, चौथ्या दिवशी सात पायर्‍या, असं करत करत दोन ते तीन पायर्‍यांवरच मी गार व्हायची वेळ आली होती. मग पर्वती रद्द झाली. तरीही, व्यायामाची उमेद मी सोडली नव्हती. कुठं तरी जिम लावावी, असा विचार केला. जवळपास कुठेही सोयीची (अर्थात, कमी त्रासाची) जिम मिळेना. ज्ञानप्रबोधिनीत जायला लागलो. एका मित्रालाही वजन कमी करायची खुमखुमी आली होती.
तिथला इन्स्ट्रक्‍टर नेमका कुठल्या तरी जुन्या ओळखीचा भेटला. आम्ही आलोय म्हटल्यावर त्याच्या अंगात बारा हत्तींचं बळ आलं असावं बहुधा. एखादा खाटिक नवा बकरा मिळाल्यावर जेवढा खूश होईल, तेवढाच आनंद त्याला झाला. आम्हाला कसली कसली वजनं उचलायला लावून, कुठली कुठली चक्रं फिरवायला लावून, स्वतः जिमभर उंडारत फिरायचा. बरं, मुला-मुलींची जिमही वेगवेगळी होती. त्यामुळं निदान तो तरी विरंगुळा होईल, हा हेतूही फोल ठरला. सुजलेलं अंग कमी होण्याऐवजी कष्टानं अंगावरच सूज चढलेय, हे लक्षात आल्यावर जिमचा उत्साहदेखील आठ दिवसांत मावळला. तिथले पैसेही फुकट गेले.
"अहो, पोहायला तरी जा आता!'' बायकोनं शेवटचं अस्त्र सोडलं.मग मला तीन-चार वर्षांपूर्वी पंधरा-वीस दिवस कष्ट करून पोहायला शिकल्याची आठवण झाली. तसं, विहिरीत जीव वाचविण्याइतपतच पोहता येत होतं मला, पण एवढ्यात हार पत्करून चालणार नव्हतं. शहरातल्या तमाम स्विमिंग पूलवर जाऊन चौकशी केली. कुणाची वेळ जमणारी नव्हती, तर कुणाची फी अवाच्या सव्वा होती. कुणाचा टॅंकच खराब होता, तर कुणाकडे ऍडमिशन फुल होती. कुणाकडे सध्या जीवरक्षक नव्हते. उगाच टॅंकच्या व्यवस्थापकांचा जीव धोक्‍यात कशाला घाला, असा विचार केला.एस.पी.च्या टॅंकची वेळ जमून आली. तरीही, सकाळी सहाला उठण्याचं शिवधनुष्य पेलावं लागणार होतं. कारण त्यानंतरची कुठलीच वेळ माझ्या सोयीची नव्हती. ऍडमिशन घेऊन टाकली आणि दुसर्‍या दिवशी जामानिमा करून टॅंकवर धडकलो. सकाळी सहाची गार हवा, वारा आणि बर्फासारखं गार पाणी...आहाहा! काय आल्हाददायक अनुभव हो! अंगाचं नुसतं लाकूड झालं होतं. त्याशिवाय, स्विमिंग टॅंकशी चार वर्षांनी संबंध आलेला...त्यामुळं दर पाच फुटांवर होणारी दमछाक...! काठाकाठानंच पोहलो, तरी पुरेवाट झाली. घरी आल्यानंतर दोन दिवस उठता-बसता नाकी नऊ येत होते. एकदा झोपल्यावर या कुशीवरून त्या कुशीवर काही झालो नाही! कुणाकडे वळून बघायचं, तरी मानेला प्रचंड त्रास द्यावा लागत होता.
माझे व्यायामाचे असे अनेकविध चक्षुचमत्कारिक आणि अंगविक्षेपित प्रयोग फसले होते. त्यामुळं सगळे तूर्त थांबवले होते. एके दिवशी सहज टीव्ही बघत बसलो होतो. बाबा रामदेवांचं सप्रयोग व्याख्यान सुरू होतं. त्यांनी प्राणायामाचं महत्त्व सांगितलं. श्‍वास रोखून धरायचा आणि निःश्‍वास टाकण्याचं तंत्र त्यांनी सांगितलं. मला वाटलं, अरे, आपल्याला एवढे दिवस हे का नाही सुचलं?...हिंदी चित्रपटांतले घरच्यांसोबत न बघण्यासारखे अनेक प्रसंग आपण वर्षानुवर्षं श्‍वास रोखून बघत आलो आहोत (आणि नंतर काहीच हाती न पडल्यानं त्याबद्दल पस्तावलोही आहोत!) तसंच, सुटकेचा निःश्‍वास तर प्रत्येक संकटानंतर टाकला आहे! हे आपल्याला जमण्यात काहीच अडचण नाही!!मग त्या दिवसापासून मी बाबा रामदेवांचा परमभक्त झालो. वर्षानुवर्षांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आता श्‍वास रोखून ठेवणं आणि उच्छ्वास टाकणं मला सहजरीत्या जमू लागलं आहे...जय बाबा रामदेव की!

Nov 23, 2008

श्रद्धा आणि सबुरी

विधानसभा निवडणुकीचे नगारे जोरजोरात वाजू लागले होते. जागावाटप यशस्वीरीत्या पूर्ण झालं होतं. मतभेद मिटविण्यातही विलासरावांची कृष्णशिष्टाई यशस्वी ठरली होती. विलासरावांची तर या दिवसांत फारच धावपळ झाली होती. सकाळचा नाश्‍ता मुंबईत, दुपारचं जेवण दिल्लीत, संध्याकाळचा चहा मंत्रालयात, तर रात्रीचं जेवण कुणा समर्थकाच्या घरी, अशी गडबड सुरू होती. कॉंग्रेसची बहुतांश ठिकाणची प्रचाराची तयारी पूर्ण झाली होती. फक्त उमेदवार ठरायचे बाकी होते!
"कार्यावर आधारितच उमेदवारी' हा निकष असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, अगदी अर्धा तास बाकी असतानाही कॉंग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर झाली नव्हती। कोणाचं कार्य जास्त उजवं, यावर मुंबईत, दिल्लीत, खल सुरू होता। अखेर मुदत संपायला वीस मिनिटे बाकी असताना दिल्लीहून यादीचा फॅक्‍स विलासरावांच्या बंगल्यावर येऊन थडकला।विलासरावांनी उत्सुकतेनं यादीवर नजर फिरवली, पण त्यांनी "कार्यसम्राट' म्हणून ज्यांच्या नावांशी शिफारस केली होती, त्यांची नावं यादीत शोधूनही सापडेनात। अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी नावं मिळाली, तसे विलासराव अस्वस्थ झाले। त्यांनी अँटनींशी चर्चा करून यादीबद्दलची आपली स्पष्ट मतं नोंदवली. `बघतो,' असं आश्‍वासन देऊन अँटनींनी फोन ठेवला.
दिल्लीच्या फॅक्‍सचं दुसरं पान यायचं राहिलंय का, अशी चौकशी करण्यास विलासरावांनी पीएला सांगितलं। मग पीएची लगबग सुरू झाली। काही क्षण असेच अस्वस्थतेत गेले आणि अचानक, "साहेब, आणखी काहीतरी येतंय दिल्लीहून!' असं ओरडतच पीए आला. विलासरावांनी घड्याळात पाहिलं, "अवघी 17 मिनिटं!''कॉंग्रेसमध्ये गुणांची, कार्याची किती कदर केली जाते, अशा भावनेचं एक प्रसन्न, विजयी हास्य त्यांच्या चेहऱ्यावर झळकलं. दिल्लीचा फॅक्‍सटोन सुरू झाला. दुसऱ्या, सुधारित यादीची सर्वांनाच उत्सुकता होती. पण यादी येण्याऐवजी कुणाचं तरी चित्र फॅक्‍सवर उमटत असल्याचं पाहायला मिळालं. विलासरावांनी फॅक्‍स काढून हातात धरला, तर ते साईबाबांचं चित्र होतं. खाली मोठ्या अक्षरात अक्षरं होती -"श्रद्धा आणि सबुरी.'
...
कॉंग्रेसचा प्रचार अगदी धूमधडाक्‍यात झाला। पक्षांतर्गत विरोधकांचीही डाळ फारशी शिजली नाही। कॉंग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचं कार्य घरोघरी पोचविण्यासाठी जिवाचं रान केलं. कॉंग्रेस आघाडीनं दहा वर्षांत महाराष्ट्रात केल्या अफाट, देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर आघाडीला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाली.सत्ता पुन्हा मिळाली, तरी राज्याचं नेतृत्व कोण करणार, हा प्रश्‍न काही सुटला नव्हता. दिल्लीच्या वाऱ्या करूनही काही निर्णय जाहीर होत नव्हता. राज्यात जवळपास आठ वर्षं आपलं नेतृत्व असल्यामुळेच कॉंग्रेसला पुन्हा विजय मिळाल्याचं विलासरावांना मनातून वाटत होतं, पण पक्षानं त्यावर शिक्कामोर्तब करावं, अशी त्यांची इच्छा होती.एवढ्यात काही राणे-समर्थक कार्यकर्ते भेटायला आल्याची वर्दी पीएनं त्यांना दिली. मनातलं वादळ बाजूला सारून प्रसन्न चेहऱ्यानं विलासराव त्यांना भेटायला गेले. नमस्कार-चमत्कार झाले, क्षेमकुशल विचारून झाले. कार्यकर्त्यांनी विलासरावांच्या नेतृत्वाचं आणि कर्तृत्वाचं कौतुक केलं. राणेसाहेबांनी त्यांच्यासाठी पाठविलेली भेट विलासरावांकडे सुपूर्द केली. विलासरावांनी कौतुकानं उलगडून पाहिलं, तर साईबाबांचा भलामोठा फोटो होता. त्याखाली "श्रद्धा आणि सबुरी' असं भल्यामोठ्या अक्षरात लिहिलं होतं.
...
अचानक विलासरावांची तंद्री भंग पावली. समोरच सोफ्यावर पडलेल्या वर्तमानपत्रांमध्ये शिर्डीतल्या कॉंग्रेस प्रचाराच्या कार्यक्रमाचे फोटो आणि बातमीकडे त्यांचं लक्ष गेलं. "श्रद्धा आणि सबुरी' या साईबाबांच्या तत्त्वांवर आपला विश्‍वास असल्याने कोणतेही "प्रहार' झेलायला आपण तयार असल्याची त्यांची प्रतिक्रिया वर्तमानपत्रांनी जरा जास्तच ठळक छापली होती. विलासरावांनी पीएला हाक मारली. "हे वक्तव्य केवळ धार्मिक भावनेशी संबंधित होतं, त्याचा विपर्यास करून पत्रकारांनी राजकीय अर्थ काढला,' अशा स्वरूपाचा खुलासा सर्व प्रसारमाध्यमांना पाठवून देण्याचे आदेश त्यांनी पीएला दिले!
--------
संदर्भ :
शिर्डीची बातमी (२१।११।०८)
श्रद्धा आणि सबुरीपुढे "प्रहार' निष्प्रभमुख्यमंत्रिपदी चार वर्षे राहिल्याबद्दल सर्वच वक्‍त्यांनी विलासरावांचे अभिनंदन केले। त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी साईबाबांचा भक्त आहे। श्रद्धा आणि सबुरी ही त्यांची शिकवण मी अंगिकारली। नेतृत्वावर श्रद्धा ठेवणे आणि सबुरीने काम करणे, हेच माझ्या मुख्यमंत्रिपदी चार वर्षे राहण्याचे गमक आहे। नेतृत्वावर तुमची श्रद्धा असेल तर मग कितीही "प्रहार' होवोत ते निष्प्रभच ठरतात, असा शेरा त्यांनी आपल्या विरोधकांना पक्षांतर्गत हाणला.
----





Nov 20, 2008

एका `अभिनयसम्राटा'चा अंत

निषेध! त्रिवार निषेध!!

"देशद्रोही'वरील बंदीनं केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा नव्हे, तर एका उदयोन्मुख अभिनयसम्राटाचा, भावी सुपरस्टारचा आणि प्रतिभावंत कलावंताच्या उमेदीचा गळा घोटाला आहे। एका जातिवंत कलाकाराच्या अभिनयसामर्थ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे...

"इसके कहने पे मैं मुंबई छोड दूँ...उसके कहने पे मैं दिल्ली छोड दूँ...क्‍यूँ? ये देश मेरा है। क्‍या मुझे कहीं भी रहने का हक नहीं?'असा तेजतर्रार, बाणेदार, हृदयाचा ठाव घेणारा जळजळीत डायलॉग आतापर्यंत ऐकला होता कधी? "जब तक बैठने के लिए न कहा जाए, शराफत से खडे रहो...ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं' किंवा "ये ढाई किलो का हाथ किसीपे पडता है, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है,' म्हणणारे तुमचे अँग्री यंग किंवा ओल्ड मॅन पाचोळ्यासारखे उडून जातील या संवादफेकीपुढे

तरुणाईचा, राष्ट्रभक्तीचा, देशप्रेमाचा धगधगता अंगार आपल्या संवादांतून, देहबोलीतून ओकणाऱ्या या नव्या अभिनयसम्राटाचं नाव कमाल खान!हा कमाल खान कोण बुवा, असा कुत्सित, बाष्कळ प्रश्‍न तुम्ही विचारणार असाल, तर तुमच्या अकलेची, सारासार विवेकबुद्धीची आणि सामान्यज्ञानाची कीवच करायला हवी.

`देशद्रोही' नावाचा राष्ट्रभक्तीचा ज्वलंत हुंकार गेला महिनाभर विविध वाहिन्यांवरील जाहिरातींच्या माध्यमातून देश पेटवतो आहे. (ही जाहिरात पाहिल्यानंतर टीव्हीच पेटवावासा वाटतो, अशी काहींची प्रतिक्रिया आहे. यालाच म्हणतात प्रत्ययकारी अभिनय!)"देशद्रोही'चा नायक-निर्माता (आणि कदाचित कथा-पटकथा-संवादलेखक, दिग्दर्शकही!) कमाल खान याच्या तोंडून हा डायलॉग एखाद्या ज्वालामुखीसारखा बाहेर पडतो आणि तमाम प्रस्थापित अभिनयसम्राटांच्या छाताडावर थयथया नाचतो! बहुधा, या प्रस्थापित अभिनयसम्राटांना या नव्या उद्रेकाचे हादरे जाणवू लागले होते, म्हणून जुलमी, निष्ठुर व्यवस्थेशी संगनमत करून त्यांनी चित्रपटावर बंदी घातली. कमाल खान या उमलत्या कळीची (किंवा कळ्याची म्हणा हवं तर!) फुलण्याची स्वप्नंच खुडून टाकली.एक वास्तव पडद्यावर साकार होण्याआधीच पडद्याआड गेलं।

आता कायदेशीर लढाई लढली जाईल. तमाम अन्यायग्रस्तांचे वाली, दीनदुबळ्यांचे आशास्थान आणि सर्व न-अभिनेत्यांचे प्रेरणास्थान मा. महेश भट यांची साथ असल्यामुळे कुठल्या कुठल्या परिसंवादांतून, मुलाखतींतून या अन्यायाला तोंड फोडलं जाईल. न्याय मिळेल...न मिळेल।

कदाचित, कमाल खान वेगळ्या नावानं, पण हीच "श्‍टोरी' वापरून हाच चित्रपट पुन्हा काढेल. पण तरीही, "देशद्रोही'वरील बंदी उठली नाही, तर त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकेला, अभिनयाला प्रेक्षक नक्कीच मुकतील.

अवांतर : महेश भट यांच्या आगामी चित्रपटाचा विषय "देशद्रोही'वरील बंदीनाट्य हाच आहे म्हणे!

Nov 15, 2008

`जिगर'बाज!




चला,
एकदाचा तो जिगर भेटला बुवा!
जीव काढला होता पोरीनं त्यासाठी!!
राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा सुरू व्हायच्या खूप आधीपासूनच मनस्वी त्या `जिगर'च्या प्रेमात पडली होती। सणस मैदानापाशी `राष्ट्रकुल'चं ऑफिस होतं। तिला `बाल भवन'ला घेऊन जायचो, तेव्हा रोज तो जिगर त्यावर चमकत असलेला दिसायचा। मनस्वीला त्याच्याविषयी माहित नव्हतं, तेव्हा `बाबा, हा पिक्चर कधी लागणारेय' असा प्रश्न तिनं निरागसपणे विचारला होता.
`जिगर'चे फोटो पेपरमध्ये यायला लागले आणि तिची त्याच्याशी गट्टी जमली। (खरं तर सकाळी उठायला, मग दात घासायला, मग दूध प्यायला, आंघोळीला आणि नंतर शाळेत जायला काहीतरी आमिष हवं, म्हणून मुद्दामच आम्ही ही गट्टी जमवली होती. पण ते असो.) मग रोज पेपरमधले फोटो कापून ठेवणं, ते कुठे कुठे चैकटवणं, त्याच्या निरनिराळ्या अदा पाहणं आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं, हे उद्योग सुरू झाले.बॅटन रिले मध्ये तुला `जिगर' दाखवायला तडफडत टिम.बर मर्केट ल गेलो होतो. तिथे आम्ही जिगरला शेक हॅंड पण केलं!`राष्ट्रकुल'ला मला काही जाता आलं नाही. पण हर्षदाला एके दिवशी पास मिळाले आणि ति सगळा माहेरचा कुटुंब कबिला घेऊन गेली. तिथेही दुर्दैवानं `जिगर'चा डान्स हुकला.
`जिगर'चा बाहुला बरेच दिवस मनस्वीला वाकुल्या दाखवत होता. अखेर काल तो तिच्यावर प्रसन्न झाला. हर्षदानंच तो कुठून तरी मिळवला आणि मुलीला प्रेझेंट दिला. (तेवढीच नवर्‍यावर कडी करण्यची संधी!)काल दिवसभर त्या जिगरचे हाल हाल झाले. कुशीत झोपण्यापासून ते कपडे घालण्यापर्यंत सगळे सोपस्कार झाले. हे आकर्षण दोन-चार दिवस टिकेल. मग पुन्या नव्या आमिषाच्या शोढासाठी आई-बापाल नवी `जिगर' दाखवावी लागेल!
इथे फोटो पाहा।

`जिगर'बाज!

Nov 10, 2008

मनात(च) पूजीन रायगडा!

भव्य हिमालय तुमचा अमुचा
केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचे,
मनात पूजीन रायगडा!
वसंत बापटांची ही कविता ऐकण्याच्या आधीच रायगडाच्या प्रेमात पडलो होतो। रायगडावर पहिल्यांदा कधी गेलो, ते आठवत नाही। (वय झालं आता!) पण शाळेच्या सहलीतून गेलो नव्हतो, हे नक्की. दोनदा गेलोय, एवढं आठवतं. त्यालाही आता आठ-नऊ वर्षं झाली. लग्नाआधी तिरसटल्यासारखा एकटाच फिरायचो, तेव्हाची ही गोष्ट। "सकाळ'मध्ये रुजू होण्याआधी 30 मे 1999 साली शिवरायांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो, ते मात्र स्पष्ट आठवतंय!
तर सांगण्याची गोष्ट ही, की रायगडावर जायचं बरेच वर्षं मनात होतं. सहधर्मचारिणीलाही भरीस घातलं आणि एसटीच्या "रायगड दर्शन' बसची दोन तिकिटं बुक केली. मग त्यांनाही स्फुरण चढलं. मला भरीस घालून त्यांनी त्यांच्या प.प्पू. माता-पित्यांचीही दोन तिकीटं काढायला मला भाग पाडलं. मग आणखी एक मेव्हणी वाढली. सगळी बस जोशी-पेंढारकर परिवारानंच भरते की काय, असं वाटायला लागलं. "प्रासंगिक करार' असं या बसला नाव द्यावं, असा एक क्षूद्र विनोदही करून पाहिला. बायकोनं नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केलं.नेहमीप्रमाणे ट्रेकला जाण्याआधीच्या सूचना मी करण्याचं या वेळी धाडस केलं नाही. कारण एकतर हा ट्रेक नव्हता. बसनं पायथ्यापर्यंत जाऊन रोप-वे नं वर जायचं होतं. गडावर चालण्याचेच काय ते कष्ट होते. त्यातून "मला अक्कल शिकवायची गरज नाहीये,' असे भाव चेहऱ्यावर पाहण्याची स्वतःहून इच्छा नव्हती. "काय घालायचा तो गोंधळ घाल,' असं म्हणून बायकोला कपड्यांपासून ते खाद्यपदार्थांच्या निवडीपर्यंतचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं.आम्ही खासगी केंद्रातून बुकिंग केलं होतं. त्याआधी दहा वेळा बसची सुटण्याची, पोचण्याची, परतण्याची वेळ विचारून घेतली होती. खाण्यापिण्याची सोय, रोप-वे चा खर्च, आदी चौकश्‍याही केल्या होत्या. याच बसनं रायगड दर्शन करून आलेल्या एका मित्राची जाहीर व प्रकट मुलाखतही घेतली होती. त्यामुळं चूक होण्याचा प्रश्‍नच नव्हता!एकुलत्या एक कन्येला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टीबिष्टी सांगून आणि रायगडाचं शक्‍य तेवढं भव्यदिव्य चित्र तिच्या मनात उभं करून सकाळी लवकर उठण्यासाठी तिला पटवलं होतं।
सगळं चंबूगबाळं सांभाळत धापा टाकत पावणेसातलाच स्वारगेटलो पोचलो. सकाळी सातची "रायगड दर्शन' बस अजून यायची होती. आमच्यासाठी बहुधा फुलांच्या माळा, लायटिंग वगैरे करून सजवत असतील, अशी समजूत करून घेतली. सात वाजायला आले तरी बस दिसेना, तशी कंट्रोलरकडे जाऊन चौकशी केली. त्यानं तोंडातला तोबरा थुंकायलाच दहा मिनिटं घेतली. रायगड बसची चौकशी केल्यावर जणू "पॅरिसच्या विमानाला पास चालतो काय,' असं विचारल्यासारखी तुच्छतेनं आमच्याकडे नजर फिरवली. मग हातानंच "नाही' अशी खूण केली. काय समजायचा तो अर्थ घ्या!
बऱ्याच संवादानंतर कळलं, की आमचं पाचच जणांचं बुकिंग झालं आहे. गाडीत ड्रायव्हर-कंडक्‍टरशिवाय दुसरं कुणीच नाही. त्यामुळं गाडी रद्द!बोंबला! मग आमची वरात त्याच्या मागून डेपो व्यवस्थापकांकडे. त्यांनी थेट तिकीट पैसे परताव्याचे अर्जच आमच्या हाती दिले. मग ते प्रामाणिकपणे भरून देऊन पैसे परत घेतले. नशीब, सगळेच्या सगळे पैसे मिळाले।
"तरी मी तुला म्हणत नव्हते, काल फोन करून एकदा विचारून घे म्हणून!'' बायकोनं चारचौघांत अब्रू काढलीच!
जिथे तिथे हाडामासाचा जिवंत असलेल्या कंट्रोलरला या बसची खबर नाही, तिथे काल रात्री ड्युटीवर असलेल्या माणसाला कशी असेल, असा फालतू प्रश्‍न विचारण्याचं धाडस मी केलं नाही. मग रायगडाच्या ऐवजी सिंहगडावर चर्चा सुरू झाली. मग अलिबाग, आळंदी, सज्जनगड, वगैरे ठिकाणं सुचवून झाली. कशावरच एकमत होईना। रायगडला गाडी बदलून जाण्याची माझी इच्छा आणि तयारी होती, पण एका दिवसात परत येणं शक्‍य नव्हतं. त्या रात्री मुक्काम करावा लागला असता. ते बाकीच्यांना शक्‍य नव्हतं।
मग मी गोंदवल्याचं नाव सुचवलं. एकतर मला नवीन ठिकाणं बघायला आवडतात आणि ते जवळही होतं. दुसऱ्या स्टॅंडवर गेलो, तर गोंदवल्याची गाडी आमची वाटच बघत उभी होती. मग तिच्यात घुसून गोंदवल्यात पोचलो. देवाधर्माशी माझं काही देणंघेणं नसलं, तरी देवळं पाहायला मला आवडतात. पण ती शांत, रम्य ठिकाणची. बजबजपुरी नसलेली. अष्टविनायकांपैकी काही आवडतात. कोकणातली शंकराची देवळं तर बेस्टच. तर ते असो।
गोंदवले मात्र भकास होतं. नुसतं एक मंदिर आणि आश्रम. शेजारी ना नदी, ना डोंगर, ना हिरवाई. माण-फलटण परिसरातलं ते एक वैराण गाव. अजिबात आवडलं नाही. पण दिवसभराची एक सहल झाली, एवढंच. दिवस अगदीच फुकट गेला नाही म्हणायचं।
वसंत बापटांनी जसं मनात रायगडाचं पूजन केलं, तसं आम्हालाही नाइलाजानं "मनातल्या मनात'च करावं लागलं! असो. आता पुन्हा रायगडावर मुक्कामाला जाण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत नेहमी चढूनच गेलोय. रोप-वे देखील पाहणं राहिलंय. बघू, कधी जमतंय ते!
----
(मित्रहो, माझा ब्लॉग तुम्ही वाचता, प्रतिक्रिया देता, याबद्दल तुमच्या सहनशक्तीचं कौतुक करावं, तेवढं थोडंच। पण मला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल, , तर त्यासाठी तुमचा ई-मेल ही सोबत लिहीत जा. ई-संपर्काबाबत थोडा अज्ञानी आहे; समजून घ्या! )

Nov 5, 2008

`स्टार' माझा, ब्लॉग माझा!

...अखेर तो बहुप्रतीक्षित, बहुचर्चित क्षण आला! दूरचित्रवाणीच्या पडद्यावर माझी छबी झळकण्याचा! आयुष्यात पहिल्यांदाच!
आतापर्यंत या "इडियट बॉक्‍स'नं मला अनेकदा हुलकावणी देऊन "इडियट' बनवलं. "साथ-साथ'साठी एक कार्यक्रम बसवत होतो, तेव्हा. "साम'साठी काम करण्याची इच्छा होती, तेव्हा. दरवेळी काही ना काही कारणांनी टीव्हीशी नातं जुळलं नव्हतं."स्टार माझा'च्या स्पर्धेत भाग घेतला आणि उत्तेजनार्थ बक्षीसही मिळालं. तसा माझा ब्लॉग या कार्यक्रमानं टीव्हीवर झळकावला होता, पण प्रत्यक्ष मी आलो नव्हतो. पहिला बक्षीस समारंभ "राज'राड्यामुळे रद्द झाला। तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली। म्हटलं, कार्यक्रम होणार, की नाही! पण झाला. गेल्या सोमवारी झाला. आणि आता शनिवारी, 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता "स्टार माझा'वरही दाखवणार आहेत. पाहायला विसरू नका!शूटिंग मात्र अपेक्षेप्रमाणेच कंटाळवाणं होतं.
साडेदहाला "स्टार माझा'च्या महालक्ष्मी येथील स्टुडिओत पोचलो. सगळे जमून मेक अप होईपर्यंत बारा वाजले. तोपर्यंत सगळ्यांनी अच्युत गोडबोलेंची जाहीर प्रकट मुलाखत घेतली. मला वाटतं, ते लहानपणी गोट्या खेळायचे की आट्यापाट्या, एवढाच प्रश्‍न विचारायचा राहिला असेल. असो.साडेबाराला आम्ही स्टुडिओतल्या मुख्य शूटिंग स्थळी पोचलो. एकेकाला माईक अडकवून प्रत्येकाचं वेगळं शूटिंग होतं. त्यात खूप वेळ गेला. प्रत्येकाला दोनच वाक्‍यं बोलायची होती. आमचा आशिष काही कारणांनी येऊ न शकल्यानं, त्याचंही बक्षीस मीच घेतलं आणि त्याच्या वतीनं बोललोही. मला या निमित्तानं दोनदा झळकायची संधी मिळाली.
पण शूटिंगचा एकूण अनुभव कंटाळवाणा होता. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमात आपलं काही जमायचं नाही, याची खात्री पटवून देणारा.

Oct 30, 2008

भडक लाल रंगाचे कपडे घालून एकता कपूर तिच्या गिरणीत नेहमीप्रमाणे कामात दंग होती। मधली एक गिरणी फारच अवाढव्य होती. एखाद्या ऑटोमोबाईल कारखान्यात शोभावी, अशी. या गिरणीवर एकता कपूर स्वतः काम करत होती. वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची वेगवेगळी पिंपं शेजारी मांडली होती. मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून धान्य काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून सकस, रसरशीत पीठ खालच्या पिंपांत पडत होतं.
या भल्यामोठ्या आवारात शेजारीच रांगेत, ठराविक अंतरावर पंधरा-वीस गिरण्या मांडल्या होत्या। त्यांच्यावरही एकतासारख्याच दिसणाऱ्या काही बाया कार्यरत होत्या। या एकताच्या "डमी'। त्यांच्या हाताखाली डझनभर लोकं काम करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले होते, कसल्यातरी ओझ्याखाली ते पार बुडून गेले होते. बहुधा, एकताच्या "कारखान्या'तले लेखक असावेत. तेही धान्य पुरवण्याच्या कामात मदत करत होते. कुठलं धान्य कुठल्या वेळी घालायचं, हे एकताच मुख्य गिरणीवरून ओरडून सांगत होती.
गिरणीच्या बाहेर गिऱ्हाइकांची भलीमोठी रांग लागली होती। प्रत्येकाने आपल्यासोबत ट्रकच आणले होते. तयार झालेलं पीठ लगेच नोकरांकरवी ट्रकमध्ये चढवलं जात होतं. ट्रक अगदी खच्चून भरले, की पुढच्या मार्गाला लागत होते. गिऱ्हाइकांनी मोठमोठ्या पिशव्या भरभरून नोटा आणल्या होत्या. बालाजीच्या भल्यामोठ्या फोटोसमोर ठेवलेल्या दानपेटीत ते या नोटा ओतत होते. दर अर्ध्या तासाने ही पेटी रिकामी करावी लागत होती.असं सगळं पवित्र वातावरण हा एकूणच भारावून टाकणारा अनुभव होता. अचानक काय झालं कुणास ठाऊक, एकताच्या गिरणीतून "खडाम खट्ट....खुर्र खुर्र...' असा विचित्र आवाज ऐकू यायला लागला. गिरणीतून पीठ पडताना अडकायला लागलं. एकताच्या आणि बाहेरच्या गिऱ्हाइकांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली...पण क्षणभरच. एकतां ताबडतोब आधीच्या धान्याचं पिंप हलवलं आणि त्या जागी नवीन मागवलं. हे धान्य जरा वेगळ्या रंगाचं होतं, पण लगेच गिरणी पूर्वीसारखी सुरू झाली.
गिऱ्हाइकांच्या रांगेतली चुळबूळही थांबली। पुन्हा दानपेटीत धान्याच्या राशी पडू लागल्या.थोडा वेळ गेला आणि एकताच्या मुख्य गिरणीच्या शेजारच्या गिरणीला "घर घर' लागली. बऱ्याच खटपटी करूनही ती सुरू होईना. नंतर लक्षात आलं, तिचा पट्टाच कुणीतरी तोडला होता. शेवटी सगळ्यांनी नाद सोडून दिला.मधली मुख्य गिरणी मात्र जोरात सुरू होती. खरंतर तिच्या क्षमतेचाच बाकीच्या गिरण्यांना आधार होता. सगळ्यात जास्त पीठ याच गिरणीतून पडत होतं. एकताचं काम वेगात सुरू असताना काहीतरी घडलं. जोराचा आवाज आला आणि एकाएकी गिरणी बंद पडली. पीठ पडायचं थांबलं. एकतानं आणखी धान्य ओतून पाहिलं, धान्य बदलून पाहिलं, पट्टा जोरजोरात फिरवून पाहिला, पण काही फरक पडेना. ती मागे वळली तेव्हा लक्षात आलं, की या गिरणीचा "मेन स्विच'च कुणीतरी काढून टाकला होता. तिनं वीज मंडळाला फोन लावला. पण त्यांचं हे काम नव्हतं. तिच्या विजेचं बिल भरणाऱ्या "स्टार' लोकांनी ही कारवाई केली होती.एकतानं आपले सगळे "सोर्सेस' वापरून बघितले.
मुदतीआधीच गिरणी बंद करायला लावणं म्हणजे कराराचा भंग होता. एकतानं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आलं, की "स्टार' लोकांना जास्त पीठ पाडणारी दुसरी गिरणी मिळालेय. तिच्यातून उत्पन्नही चांगलं मिळतंय. पिठानं माखलेला हात एकतानं कपाळावर मारून घेतला....काही क्षणांतच मग ती सावरली. बंद पडलेली गिरणी ताबडतोब तिथून हलवली आणि नव्या पद्धतीच्या, नव्या रूपातल्या गिरणीची ऑर्डर तिनं लगेच नोंदवून टाकली. आधीच्या धान्याला पॉलिशही करून आणायला सांगितलं आणि बाकीच्या गिरण्यांकडे वळली.

दिवाळी संपली, सुटी सुरू!

मस्तपैकी १० दिवस रजा टाकलेय. बरीच राहिलेली कामं पूर्ण कराय्चेत. शनिवार-रविवार फिरायला जाणार होतो, पण आता सोमवारी मुंबईत `स्टार माझा'च्य ब्लॉग स्पर्धेचं बक्षीस वितरण आहे. त्यामुळे तिकडे जावं लागणार. बघू....फिरायला पुढच्या आठवड्यात जाईन.
दिवाळी मजेत गेली. भरपूर कपडे घेतले सगळ्यांनी. सगळ्यात जास्त खरेदी मनुताईंची. तिनं यंदा २ आकाशकंदील घेतले. आणखीही घ्यायचे होते. पण दम दिल्यावर गप्प बसली. किल्ल केला. पाडव्याला सहकुटुंब `अभिरुची'त गेलो होतो. सकाळी १० ते २. मजा आली. जेवण पण तुडुंब झालं. माहेरच्या मंडळींना आमची पार्टी द्यायची राहिली होती. त्यातून उतराई झालो एकदाचे.
किल्ला पण रोज वेगळ्या अवस्थेत होता. एके दिवशी ऑफिसातून आलो, तर सगळे मावळे आडवे. आणि एकटे शिवाजी महाराज जागे. मला वाटलं औरंगजेबानं हल्ला केला की काय! पण तसं नव्हतं. सगळ्या मावळ्यांना झोप आला, म्हणून विश्रांती दिल्याचं मनुताईंकडून कळलं. बिच्चारे शिवाजी महाराज! ते साधरणपणे किल्ल्याच्या निम्म्या आकाराचे असल्यामुळे त्यांआ झोपवणं शक्य नव्हतं. म्हणून नाइलाजानं ते डोळे तारवटून पहारा देत बसले होते....मावळे झोपलेले, आणि राजे पहारा देताहेत, अशा अभूतपूर्व घटनेची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल.
असो.
दिवाळीत लेखन पर.म्परा पण जोरात होती. `साहित्य शिवार'च्या दिवाळी अंकात लेख लिहिला. `मनोगत'वर विनोदी कथा-कम-लेख लिहिला. `ईसकाळ'वर ग्राफिटीच्या कार्यक्रमाचं ऑडिओ सादरीकरण होतं. `जत्रा'मधली कथा आली नाहीये बहुतेक.
तर, पुन्हा सुटी. मजा आहे. बघुया, काय काय कामं पूर्ण होताहेत!

Oct 27, 2008

किल्ला, किल्ल्या आणि कल्ला

दोनच दिवसांपूर्वी किल्ल्यावरची पोस्ट टाकली ब्लॉगवर. त्यानंतर लगेच त्यासंबंधित विषयावर लिहायला लागेल, अशी कल्पना नव्हती. नियतीनंच हा खेळ मांडला असावा!
घाबरू नका. काही फार गंभीर, चित्तचक्षुचमत्कारिक, नेत्रविस्फारक वगैरे लिहिणार नाहीये. अनुभव अगदी साधासाच, पण धडा शिकविणारा आणि योगायोगाचं महत्त्व ठसविणारा.
परवा शनिवारी ऑफिसला आलो, तेव्हा अंमळ उशीरच झाला होता. ऑफिसला यायचं, म्हणजे सगळं शिस्तशीर असतं. म्हणजे, शर्टाच्या शिखात लायसन्स, डेबिट कार्ड (हो, डेबिटच! "क्रेडिट' नाही!!), पीयूसी. पॅंटच्या डाव्या खिशात घराची किल्ली, मोबाईल. उजव्या खिशात गाडीची (म्हणजे बाईकची. आम्ही "श्रीमंत' मध्यमवर्गीय बाईकलाच "गाडी' म्हणतो.) किल्ली आणि रुमाल. दर पाच मिनिटांनी खिसे रापून हा सर्व जामानिमा सुरक्षित आहे ना, हे बघण्याची सवय. बरं, आपली टाचणी हरवली, तरी अस्वस्थ होण्याची प्रथा. पेनबिन म्हणजे फारच त्रास! तर सांगण्याचा मुद्दा काय, की त्या दिवशीही सगळं असंच व्यवस्थित जागच्या जागी होतं.
जेवणाचा डबा सवयीप्रमाणे बाईकच्या डिकीत ठेवला होता. जेवणाच्या सुटीत खाली पार्किंगमध्ये गेलो. डब्यात पोळ्या नसल्यानं त्या हॉटेलातून घेऊन आलो. डिकी उघडायला गेलो अन्‌ काय? खिशात किल्लीच नाही! हादरलो. गाडीला आहे काय, ते पाहिलं. नव्हती. पार्किंगच्या जागेत बऱ्याच ठिकाणी शोधली. गाडी हलवून पाहिली. किल्ली कुठेच नव्हती.
तसाच वर टेबलपाशी आलो. मीटिंग रूम, आर्टिस्ट रूम, कॉन्फरन्स हॉल, साहेबांची केबिन, स्वच्छतागृह, जिथे जिथे म्हणून जाऊन आलो होतो, तिथे तिथे वेड्यासारखा फिरलो. औरंगजेबाच्या सैन्याला जसे संताजी-धनाजी पाण्यात दिसत, तसे मला सगळीकडे माझी किल्लीच पडलेली असल्याचा भास होऊ लागला होता. पण अर्थातच या शोधमोहिमेचा काही उपयोग झाला नाही. शेवटी ज्या हॉटेलातून पोळ्या आणल्या, तिथेच त्याच पोळ्या आणि वर भाजी बिजी घेऊन चार घास पोटात ढकलावे लागले. वसुबारसेच्या दिवशी ते भयाण अन्न अक्षरशः पोटाची गरज म्हणूनच खावं लागलं.
"गाडीची डुप्लिकेट किल्ली घेऊन ये,' अशी विनंती सहधर्मचारिणीला केली, पण तिने पुणेरी स्वाभिमानी बाणा दाखवत ती धुडकावून लावली. झक्‌ मारत ड्युटीनंतर एक तास थांबून एका मित्राच्या मागे बसून घरी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी डुप्लिकेट किल्ली घेऊन ऑफिसला हजर. तिथे आल्यावर सहज म्हणून वॉचमनकडे चौकशी केली, तर माझी किल्ली तिथे माझी वाट बघत होती. कॅंटीनमधल्या मुलाला सकाळी झाडताना पार्किंगमध्ये मिळाली होती. अशा रीतीने माझी कसोटी बघत बेटी छान सुरक्षित हाती विसावली होती!
....
किल्लीचाच प्रसंग दोन दिवसांत पुन्हा घडेल, असं अजिबात वाटलं नव्हतं.
या वेळी "बळी' होती, माझ्याबाबत बाणेदारपणा दाखविणारी आमची (म्हणजे माझीच हं!) सहधर्मचारिणीच!
संध्याकाळी दिवाळीच्या उत्साहाच्या आणि पोरीला खेळवण्याच्या नादात बाईसाहेबांनी लॅचचं दार बाहेरून लावून घेतलं. मग शेजारून मला फोन करून आपला पराक्रम कळविला. वर मलाच किल्ली घेऊन घरी येण्याचा विनंतीवजा आदेशही दिला. काय करणार बापडा? नवरा या प्राण्याला बाणेदारपणा नसल्यामुळे झक्‌ मारत जावं लागलं. एक फायदा मात्र झाला. अगदी जेवायच्या वेळीच घरी गेल्यामुळे कधी नव्हे ते गरमगरम गिळायला मिळालं. अर्थात, माझ्या उपकारांच्या ओझ्यामुळं दबून गेल्यामुळं बायकोनंही न कुरकुरता जेवायला घातलं, हे वेगळे सांगणे न लगे!
...
या निमित्तानं एक सुरस आणि चमत्कारिक कथा आठवली. शनिवार पेठेत भाड्याच्या (हा कोण "भाड्या?') खोलीत राहत होतो, तेव्हाचा प्रसंग. एकदा पहाटे पाचला रत्नागिरीहून आलो, तो खोलीची किल्ली रत्नागिरीत विसरूनच! मग पत्र्यावर चढून, तिथून गॅलरीत उतरून, खिडकीतून खोलीत शिरून दुसऱ्या किल्लीनं दार उघडण्याचं दिव्य पार पाडावं लागलं होतं. तेव्हा कुण्या शेजाऱ्यानं चोरटा समजून दगडबिगड मारले नाहीत, हे नशीबच!
...
असो. इजा-बिजा-तिजा कधी होतोय, पाहायचं!
------------

Oct 25, 2008

मनुताईंचा किल्ला!


मनस्वीच्या शाळेच्या शेवटच्या आठवड्यात किल्ले बनविण्याची स्पर्धा होती. मी फोटो काढून "सकाळ'मध्येही दिले. खरं तर किल्ले स्पर्धेचा उद्देश मुलांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी, हा असतो. मला मात्र किल्ला बनवण्याचीच प्रेरणा मिळाली. मनस्वीलाही आवडेल, अशी खात्री होती. मग किल्ला बनविण्याचं नक्की करून टाकलं.
हातातली थोडी कामं आटपली आणि थोडी बाजूला ठेवली. मग किल्ला बनवायला घेतला. सहकारी होते दोघंच - मी आणि मनस्वी. एकतर जवळपास वीसेक वर्षांनी किल्ला बनवण्याचा उपद्‌व्याप करत होतो. त्यातून रत्नागिरीत आम्ही किल्ला करायचो, तेव्हा दगड-मातीला तोटा नसायचा. इथे पुण्यातल्या सोसायटीत कुठली आलीये दगड नि माती? तरीही, खाली जाऊन मोकळ्या मैदानातून कायकाय भरून आणलं. काही लोकांच्या घराच्या कामातला राडारोडा पडलेला होता. मागे मैदानात माती होती. वाईट होती, पण तात्पुरती कामाला येणारी होती. म्हटलं, चला! आपली गरज तर भागेल!
दोन पोती एकट्यानंच वर घेऊन आलो. मनुताईंना मदतीची इच्छा खूप होती, पण शरीर साथ देत नव्हतं. तरीही, झेपेल तेवढं खालून वर घेऊन आल्या. मग आम्ही किल्ला करायला घेतला. दगड रचून, त्यावर गोणपाट टाकणं आवश्‍यक होतं. ते भिजवून, चिखलात लोळवून रचलं. पायऱ्यांसाठी आणि शिवाजी महाराजांच्या आसनासाठी दोन फळ्या टाकल्या आणि वर गोणपाट पसरलं. त्यावर माती लिपली आणि झाला तयार किल्ला! मनस्वीनं माती कालवण्याचा आणि चिखलात बरबटून घेण्याचा मनसोक्त आनंद घेतला. मी तिला ओरडत होतो, पण मलाही लहानपणी असंच चिखलात लोळायला आवडत होतं. पण आता बाप झाल्यामुळं वेगळा अभिनिवेश घेणं आवश्‍यक होतं. असो! असतात काही व्यावहारिक अडचणी!
दोन दिवस पुन्हा त्याकडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही. माती कमीच पडत होती. मग शनिवारी समोरच्या नर्सरीतून पोतंभर माती घेऊन आलो. ती किल्ल्यासमोर पसरली आणि मग किल्ल्याला परिपूर्णता आली. आमच्या आधुनिक किल्ल्याशेजारून एक ट्रेनही धावते. हातात शस्त्रं घेतलेले पोलिस शिपाईसुद्धा आहेत.
मनस्वीनं तर शिवाजी महाराजांचं आणखी एक लग्नसुद्धा लावून टाकलं. एका बाहुलीला त्यांच्या शेजारी उभं करून त्यांची "नवरी' करून टाकलं. त्यानंतर काल अचानक त्या बाहुलीनं भूमिका बदलून आता ती हनुमानाची "मैत्रीण' झालेय. दिवाळी संपेपर्यंत आणखी दोन-तीन परकायाप्रवेश करेल बहुधा ती!
रोज किल्ल्याची नवी रचना आणि बाहुल्यांची अदलाबदल करण्याचं व्रत तिनं घेतलंय. मूळचा किल्ला तरी दिवाळी संपेपर्यंत टिकेल, ही अपेक्षा!
------

Oct 21, 2008

नकटीच्या लग्नाला १७०० विघ्नं!


`स्टार'च्या मुलाखतीला आज मुंबईला जायचं होतं. आधी दहा वेळा फोन करून खात्री करून घेतली होती. सकाळी सकाळी धक्के खात जायला नको, म्हणून मित्राला सांगून ऑनलाइन आरक्षण करून थेवलं. काल काही लेखही पूर्ण करून टाकले. टीव्ही वर शोभेल, असा एक नवा शर्ट काल धावपळीत जाऊन आणला.
संध्याकाळी प्रसन्न जोशीशी बोलणं झालं, तोपर्यंत तरी कार्यक्रमात काही बदल नव्हता. अचानक ७ ला त्याचा फोन आला, आणि कार्यक्रम रद्द झाल्याचं कळलं. बर्‍याच जणांचे नातेवाईक या कार्यक्रमाला येणार असल्यामुळे `Sतार'ला धोका पत्करयचा नव्हता.
सगळी तयारी, धावपळ वाया गेली. अर्थात, कार्यक्रम पुढे होणारच आहे, तेव्हा ही तयारी उपयोगी पडेल. आणि कामंही वेळेआधी झाली, हेही उत्तमच.
पण तरी ठरलेल्या वेळी एखादी गोष्ट झाली नाही, तर विरस होतोच ना!

Oct 20, 2008

महापुरे काव्ये जाती...

आषाढाचा मास। दर्शनाची आस।।
होती तुझे भास। वरुणराजा।।

आठवावे नेत्री। भिजलेल्या गात्री
चिंब ओल्या रात्री।। रूप तुझे।।

भरल्या ताटावरी। उठोनि सत्वरी
खरकट्यावरी। जेवोनिया।।

मुठेच्या तीरी। होई तिरीमिरी।।
कधी येणार तू तरी। पाऊसराया।।

सप्तरंगांचा सोहळा। इंद्रधनुचा लळा।।
याचि देही याचि डोळा। का न अनुभवणे।।

कांदाभज्यांचा वास। वा मिसळ सुग्रास।।
संपणार कधी आस। तुझ्या शिंपण्याने।।

हळुवार पुळण। कधी रानाचे गान।।
कधी रूप भीषण। दाव तरी तुझे।।

चातकाची हार। पापाचा साक्षीदार।।
होऊ नको गुन्हेगार। समस्तांचा।।

काय तुला म्हणावं? देव की दानव।
घे भूवरी धाव। सर्व सोडुनी।।

श्रद्धेचा महापूर। प्रार्थनांचा कहर।।
भावनांचा बहर। त्याचसाठी।।

प्रयत्नांच्या अंती। ध्येयाची होईल पूर्ती।
कोसळेल अंती। बदाबदा तो।।

जाणा हेचि कर्म। पावसाचे मर्म।
गाळुनिया घर्म। झाडे लावा।।

अभिजित म्हणे ऐसे। निसर्गास जपावे।
चुलीत न घालावे। नियम सारे।।
-----------------------

Oct 18, 2008

हुर्रे!

सचिन तेंडुलकरनं बारा हजारांचा टप्पा गाठला आणि मी दहा हजारांचा! खरं तर दहा हजारांचा टप्पा कधी गाठला जातोय, याचीच वाट पाहत होतो. गेले काही दिवस तुम्हाला एक बातमी सांगायची होती, पण त्याआधी हा टप्पा पार पडावा, असं वाटत होतं. शिवाय, ती बातमी कन्फर्म पण होत नव्हती.
गेल्या शनिवारी एका उत्साही सहकाऱ्याचा फोन आला. मी खरेदीला बाहेर पडलो होतो.
""पेंढारकर साहेब, अभिनंदन!''
मी म्हटलं, कसलं?
""बस काय राव?'' पुढचा अपेक्षित प्रश्‍न.
""अरे बाबा, खरंच माहीत नाही मला!''
""अरे लेका, तुला "टार माझा'च्या स्पर्धेत बक्षीस मिळालंय! उत्तेजनार्थ. पार्टी पाहिजे, पार्टी!''
मी "बरं' म्हणून फोन ठेवला. खरं तर विश्‍वास बसत नव्हता...
अर्थात, "ब्यूटी क्वीन' स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळवणाऱ्या सुंदरींना एकदम आश्‍चर्याचा धक्का बसतो की नाही? त्या तोंडावर हात बित घेतात नाही का? आणि तोंडाचा भला मोठा चंबू करतात ना, तसं! आता, उरलेल्या तीन जणींपैकी कुणीतरी एक होणारच, हे तर नक्की असतं ना? मग प्रत्येक वर्षीच्या स्पर्धेत, प्रत्येक सुंदरीचा दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतलेला, तोंडाचा भलामोठा चंबू केलेला फोटो कसा काय छापून येतो, कुणास ठाऊक?
..असो. तर माझी तशी काही प्रतिक्रिया झाली नव्हती. तरीही, एखाद्या प्रसिद्ध मराठी टीव्ही चॅनेलच्या स्पर्धेत, तरुणाईच्या जत्रेत माझा उत्तेजनार्थ का होईना, नंबर लागणं, ही नाही म्हटलं तरी मोठीच कामगिरी होती.
शनिवारी, 11 तारखेला ही बातमी कळली, पण एका मित्राकडून. त्यानं "स्टार माझा'वर हा निकाल बघितला होता. पण चॅनेलकडून काही अधिकृत माहिती मिळत नव्हती. कुणी चॅनेलवरच्या पट्टीत माझं नाव दाखवल्याचंही सांगत होतं, पण स्वतः पाहिल्याशिवाय खात्री कशी करायची? तसा, हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासूनच माझा ब्लॉग त्यांनी अनेकदा दाखवला होता, तोही मी कधी पाहिला नव्हता...
अखेर गेल्या बुधवारी "स्टार माझा'कडून अधिकृत मेल आलं. 22 तारखेला मुंबईत शूटिंगला बोलावल्याचंही समजलं. प्रसन्न जोशीला फोन करून, माहितीही घेतली. अच्युत गोडबोले यांनीच या स्पर्धेचं परीक्षण केल्याचंही त्यानं सांगितलं. म्हणजे कुणाच्या वशिल्याबिशिल्यानं माझा ब्लॉग बक्षीसपात्र क्रमांकांत आला नव्हता. तर स्वतःच्या लायकीच्या आधारावरच आला होता.
आमचा मित्र आणि "सकाळ' परिवाराचाच आशिष चांदोरकरच्या ब्लॉगलाही उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. ते कळल्यावरही बरं वाटलं.
आता येत्या बुधवारी, 22 ला मुंबईत जायचंय. शूटिंगला. ब्लॉगविषयी आमची मुलाखत असावी, बहुधा. टीव्हीवर झळकण्याचा माझा पहिलाच अनुभव असेल. पण शूटिंगचा नाही. आधी "ग्राफिटी'च्या पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी एकदा मुलाखत दिली होती. अश्‍विनी भावेच्या "कदाचित'मधल्या पत्रकार परिषदेच्या दृश्‍यातही शूटिंगमध्ये सहभागी होतो. आता माझी स्वतंत्र मुलाखत असेल, बहुधा. मेकअप बिकप पण करणारेत. बघू!
ब्लॉग सुरू करण्यामागे अनेकांची प्रेरणा आहे. मुळात, या ब्लॉगविश्‍वाची ओळख करून दिली आमचे हरहुन्नरी दोस्त आणि माजी "सकाळ'वासी देविदास देशपांडे यांनी! त्यांनीच ब्लॉग सुरू करायला, त्यावर मजकूर टाकायला शिकवलं. बाकी डिझाइनचंही मार्गदर्शन केलं. तसा ब्लॉगच्या लेआऊट किंवा अन्य तांत्रिक बाबींत मी अजून अडाणीच आहे, पण लिखाणासाठी विषयांना मात्र तोटा नाही! रोज म्हटलं तरी लिहिता येईल. सुचण्याच्या प्रश्‍न आपल्याला कधीच नाही. फक्त वेळ मिळत नाही, एवढंच!
असो. तर ब्लॉगच्या माध्यमातून लोकांना चिमटे काढण्याचा, शिव्या देण्याचा, उखाळ्यापाखाळ्या करण्याचा आणि कौतुकं पण करण्याचा आणखी काही वर्षांचा संकल्प आहे. तुमची साथ आहे ना?

Oct 17, 2008

जरा वजन ठेवा!

सदू आणि दादू जानी दोस्त. कळायला लागलं, तेव्हापासून एका ग्लासातले. गावातले लोक तर त्यांना ढवळ्या-पवळ्याच म्हणायचे. सदू सातवीपर्यंत शिकला होता, तर दादूनं पहिलीनंतर शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं, एवढाच काय तो दोघांमधला फरक. सदू ग्रामपंचायतीत चिकटला, तर दादू मोलमजुरी करून रात्रीच्या दारूची सोय बघू लागला. घरदार वगैरे काही प्रश्न नव्हता; कारण दारूवर पैसे उडवल्यानंतर हाताशी फार काही राहत नव्हतं. सदूची नोकरी बऱ्यापैकी चालली होती. तो आणि त्याच्या चार भिंती, एवढाच संसार. खरं तर चार भिंतीसुद्धा नाहीत. एक ढासळलीच होती. पुढच्या पावसाळ्यात राहील की नाही, याची खात्री नव्हती.
रोज संध्याकाळी कामं उरकली, की दोघांचं भेटण्याचं ठिकाण म्हणजे हणम्या पावलेचा गुत्ता. दोघांना रोज तिथे स्वर्गप्राप्ती व्हायची. रात्री गुत्ता बंद होईपर्यंत, किंबहुना हणम्यानं लाथा घालून हाकलून देईपर्यंत दोघांची तिथेच ब्रह्मानंदी टाळी लागलेली असायची. घरी विचारायलाही कुणी नव्हतं. तशी दादूची म्हातारी होती घरी; पण ती बिचारी स्वतःपुरती भाकरी करून जे काही असेल, त्याच्याबरोबर खाऊन झोपून जायची. तिला दिसायचंही नाही नीटसं. त्यामुळं दादू घरी कधी येतो, यावर कुणी लक्ष ठेवणार नव्हतं.
एकदा गावात पाइपलाइन योजनेचं मोठं काम निघालं होतं. स्वतः आमदारसाहेब छगनराव जमदाडेंनी त्यात लक्ष घातलं होतं. त्यामुळे गावात आनंदाचं भरतं आलं होतं. तुमच्या घरात, दारात नळ येणार, असं आश्वासन छगनरावांनी दिलं होतं. छगनराव दिल्या शब्दाला जागले. महिनाभरात घराघरांत नळ आले. या गोष्टीलाही आता वर्ष उलटलं होतं. पाण्याचा मात्र अजून पत्ता नव्हता!
दादूची परिस्थिती त्या वेळी वाईट होती. हातात काम नव्हतं. दिवसाची खायची आणि रात्री प्यायची पंचाईत झाली होती. कसेबसे दिवस ढकलत होता. पाइपलाइनच्या कामाचं त्याला कुणीतरी सांगितलं, तेव्हा त्याला हुरूप आला. तालुक्याला जाऊन आमदारसाहेबांना भेट, असं कुणीतरी सुचवलं. त्याला आपला जिगरी दोस्त सदूची आठवण झाली. सदूच्या ओळखीनं, मध्यस्थीनं दादू छगनरावांच्या दरबारात पोचला. तिथं त्यानं आपली कैफियत मांडली. छगनरावांनीही उदार मनानं त्याला काम देण्याचं आश्वासन दिलं. सदू-दादूची जोडी खूष झाली.
दोघं निघायला लागले, तेव्हा छगनरावांच्या दिमतीला असलेला जिल्हा परिषदेचा एक अधिकारी कदम यानं दोघांना अडवलं.
"काय राव, तसंच निघालात? "
"मग? तसंच म्हंजे? " सदूच्या चेहऱ्यावर प्रश्नांची जळमटं पसरली.
"अहो, तसंच जाऊन तुमचं काम होणारंय होय? "
"मग? आमदारसायेब सोता म्हणालेत! " दादूनं मध्ये तोंड घातलं.
"अहो, ते म्हणाले, तरी तसं काम होत नसतं! सदू, तू तर सरकारी हापिसात काम करतोस ना? तुला कळायला पायजे, " कदमनं खुलासा केला.
तेव्हा कुठे सदूच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्याला अशा कामांची कल्पना असली, तरी या कामात सुद्धा ते द्यायला लागेल, याची कल्पना नव्हती. शेवटी हो-नाही करता करता हजार रुपयांवर सौदा ठरला. दोन महिन्यांच्या कामाचे दादूला सहा-सात हजार रुपये मिळणार होते. त्यातले हजार तर इथेच गेले म्हणून त्यानं जरा तोंड वेंगाडलं; पण पर्याय नव्हता. हे हजार रुपये आमदारांच्या नव्हे, तर कदमच्याच खिशात गेल्याचं त्यांना नंतर कळलं. त्या वेळी कुण्या आमदारांच्या कुण्या विरोधकानं या प्रकाराचा बभ्रा केला आणि आमदारांवर आरोप झाले. मग दादूलाच लाचखोरीची तक्रार द्यायला लावून कदमला कामावरून कमी करण्यात आलं.
पेपरमधली एक बातमी वाचून सदूला अचानक या प्रकरणाची आठवण झाली. सरकारी कामात घेण्यात आलेली लाच त्या त्या माणसांना परत मिळणार होती. महिनाभरात ही कारवाई करण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता.
सदूनं उत्साहानं दादूला ही बातमी सांगितली. या लाच प्रकरणापासून दादूचा सरकारी यंत्रणेवर विश्वासच राहिला नव्हता, तरीही सदूनं त्याला पटवलं. आपण सरकारी नोकरीत असल्याचा त्याला विलक्षण अभिमान होता. आपण ही रक्कम परत मिळवून देऊच, अशी खात्री त्यानं दादूला दिली. दादूही त्याच्या आग्रहाला बळी पडला.
सदूला ग्रामपंचायतीचं काही काम होतं. त्यामुळं लाचेचे पैसे परत मिळवण्यासाठी दादूलाच तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागत होत्या. दोन-चार चकरा झाल्यावर तो वैतागून गेला. त्याची गावातली मजुरीही बुडत होती आणि हेलपाट्यांतून हाती काही लागत नव्हतं. शेवटी दादूनं सदूच्याच गळ्यात हे काम घातलं. पुढच्या आठवड्यात सदू तालुक्याला जाऊन आला, तो येताना पैसे घेऊनच.
रात्री ठरलेल्या ठिकाणी- अर्थात गुत्त्यावर भेटल्यानंतर दादूला अगदी भरून आलं होतं. लाच हजार रुपयांची दिली, पण सातशेच रुपये परत मिळाले होते, तरी पैसे मिळाले यावरच तो खूष होता. आपल्याला जे काम अनेक खेपांत जमलं नाही, ते सदूनं एकाच दमात कसं काय केलं, याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. त्यानं सदूला खोदून खोदून विचारायचा प्रयत्न केला; पण सदू फार काही बोलत नव्हता. आपण काम गळ्यात घातल्यामुळे सदू रागावला की काय, असं दादूला वाटलं; पण तसं काही नव्हतं.
"अरे गड्या, झालंय तरी काय तुला? हे अवघड काम एका दमात केलंस तरी कसं ते सांग! " दादूनं शेवटी न राहवून विचारलं.
"अरे काय सांगायचं? सरकारी नोकरीवर जो इस्वास होता, तोच उडालाय लेका! "
"का? काय झालं? "
"अरे काय होनारंय? तुला तीनशे रुपये कमी का मिळाले समजलं नाही का गड्या? "
"नाही...! " दादूच्या डोक्यात काही शिरत नव्हतं.
"लाच म्हणून दिलेले हजार रुपये परत देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच घेतली हरामखोरांनी! " सदू वैतागल्या स्वरात म्हणाला.
दादूनं कपाळावर हात मारून घेतला....

Oct 16, 2008

येस `बॉस'!

मोकळ्या पटांगणाऐवजी एका बंद घरातल्या शाळेत त्या मुलांचा खेळ रंगला होता. खेळाचं नाव होतं - "महाराज म्हणतात... ' खेळाचं स्वरूप साधारणपणे असं असतं ः एकानं राज्य घ्यायचं. तो होणार महाराज. मग त्यानं एकेकाला ऑर्डर सोडायच्या - महाराज म्हणतात, पाणी प्या. महाराज म्हणतात, खाली बसा. महाराज म्हणतात अमकं करा अन् तमकं करा...! सगळ्यांनी त्या पाळायच्या जो पाळणार नाही, त्यानं बाहेर जायचं. इथे "महाराज'च्या ऐवजी त्याला "बॉस' म्हणत होते, एवढाच फरक...
ही मुलं जरा मोठी होती. कुठल्या कुठल्या भागातून आलेली. काही वांड होती, काही आगाऊ, काही अतिउत्साही, काही खोडकर (नॉटी. ). या शाळेत एक आधुनिक बाईसुद्धा होत्या. त्या पण लंडन-बिंडन कुठल्या कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या. मुलं आणि हे "बॉस', यांच्यात समन्वयाचं काम त्या करत होत्या.
या मुलांचं काम काय, तर एकतर त्या महाराजांनी दिलेल्या ऑर्डर पाळायच्या आणि उरलेला वेळ चकाट्या पिटत, एकमेकांची उणीदुणी काढत बसायचं. काही मुलं पार बिघडलेली होती. कुणी विड्या फुंकायचं, कुणी मन मानेल ते करायचं, कुणी शिवराळ भाषा वापरायचं, कुणी अंगावर धावून जायचं...
या सगळ्या गोतावळ्यात एका प्रसिद्ध दिवंगत राजकीय नेत्याचा मुलगाही होता. घरात, परिसरात, कॉलनीत, गल्लीत उच्छाद मांडणाऱ्या आणि नकोशा झालेल्या मुलांना शिक्षा म्हणून होस्टेलला पाठवतात ना, तसंच त्यालाही "तीन महिने कटकट नको' म्हणून या शाळेत पाठवलं होतं. पण झालं भलतंच. त्याच्या खोड्या कमी व्हायच्या ऐवजी इथे येऊन आणखी वाढल्या होत्या. आपल्याबरोबर त्यानं बाकीच्या मुला-मुलींनाही बिघडवायला सुरवात केली होती... त्यांचा हा खेळ बघणारे लोकही त्याच्या या थेरांमुळे हवालदिल झाले होते.
या अनोख्या शाळेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होतं, की तिथे "बॉस'च्या, अर्थात "महाराजां'च्या ऑर्डर पाळण्याशिवाय दुसरी कोणतीही शिस्त नव्हती. त्यामुळं कुणीही कुणाच्याही बाथरूममध्ये घुसणं, एखाद्याची टवाळी करणं, अंगचटीला जाणं, अंधारात कुणाचा गैरफायदा घेऊ पाहणं, याही कृत्यांना मोकळं रान होतं. किंबहुना, जास्तीत जास्त लोकांनी हा खेळ बघावा, म्हणून त्यासाठी प्रोत्साहनच होतं...
तो खोडकर मुलगा या सगळ्यात आघाडीवर होता. शाळेच्या सगळ्या मोकळ्या वातावरणाचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला होता. रक्तरंजित पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेली मुलगी असो, वा चित्रपटांत बरीवाईट कामं करणारी मुलगी, त्याच्यासाठी दोघीही सारख्याच होत्या. शाळेनंही त्याला प्रोत्साहन दिलं होतं... त्याच्या या खोड्या, कुरापतीच खेळाचं आकर्षण ठरल्या होत्या.
अचानक काय झालं माहित नाही, पण मुलांच्या खोड्या कमी झाल्या. मुलं थोडी सुधारल्यासारखी वाटू लागली. तो खोडकर मुलगा तर जरा अधिकच. शोध घेतल्यावर कळलं, की कुणीतरी वरून दट्ट्या आणला होता. हा खेळ आयोजित करणाऱ्यांनाच झापलं होतं. त्यांच्यावर कारवाईची ताकीद दिली होती. त्यामुळं मुलंही सुतासारखी सरळ आली...

Oct 13, 2008

कुणाची गं तू?

अंगावर फाटक्‍या तुटक्‍या कपड्यांनिशी मुंबई स्वर्गाच्या दारात उभी होती। एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, वसंत बापट प्रभृतींची भेट तिला घ्यायची होती. चित्रगुप्तानं बऱ्याच रखडंपट्टीनंतर मुंबईला आत प्रवेश दिला. एसेम, अत्रे, बापटांसह संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांसमोर मुंबई जाऊन उभी ठाकली. सगळ्या नेत्यांना थोडंसं आश्‍चर्य वाटलं, पण त्यांना हे फार अनपेक्षित नव्हतं. कधी ना कधी मुंबई आपल्याकडेच गाऱ्हाणं घेऊन येणार, याची त्यांना खात्री होती.

मुंबईच्या या अनपेक्षित आगमनानं सगळे नेते किंचित चिंतेत पडले। "गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाही, एवढी दुरवस्था मुंबईची झाली आहे. तिला नरकयातना भोगायला लावणाऱ्यांना संडास साफ करायला लावलं पाहिजे, नरकातही त्यांना जागा दिली जाऊ नये,' असं भाषणच त्यांनी संतप्त अवस्थेत ठोकलं. "जाहला न इतुका अवमान कधी, जाळली का यासाठीच आयुष्यें आम्ही' अशा स्वरूपाची कविता बापटांनी तत्काळ रचून गाऊन दाखवली. एसेम नेहमीप्रमाणे धीरगंभीर होते.परप्रांतीयांनी केलेलं आक्रमण, आपल्याच माणसांनी दलालांच्या हाती सोपवून शहराची केलेली माती, वाढतं प्रदूषण, गजबजाट, अस्वच्छता, गुन्हेगारी याबद्दलच मुंबईला गाऱ्हाणं मांडायचं असावं, अशी या सर्व नेत्यांना खात्री होती. "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,' ही घोषणा आपण का दिली आणि त्यातल्या "च'ला किती महत्त्व होतं, याची आठवण अत्र्यांनी पुन्हा एकदा करून दिली. हे करताना यशवंतराव चव्हाणांकडे जाणीवपूर्वक कटाक्ष टाकला. यशवंतराव आपल्या पेटीतून महाराष्ट्राचा मंगल कलश काढून त्याला पॉलिश करण्यात गुंगले होते. त्यांनी अत्र्यांकडे विशेष लक्ष दिलं नाही.

मुंबईचं खरं गाऱ्हाणं ऐकून घ्यायलाच कुणी तयार नव्हतं। खुद्द महाराष्ट्रात जी स्थिती भोगत आहोत, तीच संयुक्त महाराष्ट्राच्या अध्वर्यूंच्या दारी आल्यावरही अनुभवायला मिळावी, याचं तिला विलक्षण वैषम्य वाटलं. ती रडवेली झालेली पाहून सगळ्या नेत्यांना दया आली. आपण समजतो तसं नाही. मुंबईचं दुःख वेगळंच आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी आपापल्या भूमिका आणि मतभेद बाजूला ठेवून मुंबईला बोलण्याची संधी दिली.
"संयुक्त महाराष्ट्राच्या पदरात माझं कन्यादान करणाऱ्या माझ्या आदरणीय पित्यांनो, मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन. पण आता सध्याच्या राज्यकर्त्यांनी जो तमाशा मांडलाय, तो तुम्हाला कळला, तर तुमच्याच कामगिरीची तुम्हाला कीव येईल...'' मुंबई मुसमुसत म्हणाली
``काय झालं, काय झालं?'' सगळे चिंताक्रांत झाले
``खुद्द माझ्या पित्याच्या चारित्र्याविषयीच संशय घेतला जात आहे.''
``कोण आहे तो हरामखोर?'' अत्रे गरजले.
``सांगते, सांगते....आधी एका पोलिस अधिकाऱ्यानं माझ्या वडिलांविषयी संशय घेतला। मी कुणाच्याच `बापा'ची नाही, असे ते म्हणाले। आतापर्यंतचे राज्यकर्ते मला कायमच सावत्रपणाची वागणूक देत आले। त्यात या अधिकाऱ्यानं मी अनौरस असल्याचंच सांगून मला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही...'' मुंबई स्फुंदून स्फुंदून रडू लागली.
एसेमनाही गलबलून आलं.
``माझ्यावर कायमच प्रेम करणारे एक आजोबा मला धीर देतील, असं वाटलं होतं. पण त्यांच्याशी भांडण असलेल्या त्यांच्या पुतण्यानं मला आधार दिला. "रस्त्यावर उतरा, म्हणजे मुंबई कुणाच्या बापाची आहे हे कळेल,' असं त्या अधिकाऱ्याला सुनावलं. नंतर आमच्या या आजोबांचा दसरा मेळावा झाला. ते आता थकल्यामुळं त्यांच्या मुलानंच "मुंबई आमच्या "बापा'ची' असं जाहीर करून टाकलं.''
``हे बरं झालं। कुणीतरी न्याय दिला ना?'' बापटांनी सुस्कारा सोडला.''
``ते झालं हो, पण आता मलाच प्रश्‍न पडलाय ना, मी नक्की कुणाची ते!'' मुंबईच्या या प्रश्‍नावर सगळेच निरुत्तर झाले.
---------

Oct 7, 2008

सौजन्याची ऐशी तैशी

खादीच्या कपड्यावर असलेल्या सवलतीचा फायदा घेऊन भरपूर खरेदी करून आपण महात्मा गांधींचं स्मरण दरवर्षी करत असतो. ही झाली सर्वसामान्यांची पद्धत. मोठ्या लोकांचं सगळंच निराळं असतं. आता हेच बघा ना...ज्येष्ठ समाजसुधारक अंबुमणी रामदास (स्वामी) यांनी यंदाच्या गांधी जयंतीचं निमित्त साधून भारतातील समस्त मानवजातीला सिगारेटच्या व्यसनापासून वाचविण्याचा विडा उचलला. (खरं तर "विडा' हेही व्यसनच. पण ते असो!) तसंच आपल्या राजकीय नेत्यांनी सौजन्य सप्ताह पाळायचं ठरवलं.

वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका, हा गांधीजींचा संदेश. आपल्या धुरंधर राजकारण्यांनी त्यात थोडं "इम्प्रोवायझेशन' करून "वाईट करू नका आणि केलेलं निस्तरून टाका,' ही नवी शिकवण अंगी बाणवली। जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भावी अध्वर्यू अजितदादा पवार यांनी साताऱ्यात जाऊन कॉंग्रेसच्या एका बड्या मंत्र्यावर आणि अन्य काही नेत्यांवरही टीका केली। दुसऱ्या दिवशी गांधी जयंतीचा संकल्प आठवल्यावर त्याबद्दल खुलासा करून टाकला.

मुलायमसिंह यांनी जुने वैर विसरून सोनिया गांधींची विमानतळावरच धावती (की उडती?) भेट घेतली. अमरसिंहांनी नारायण राणेंची भेट घेतली. ही भेट "बिझनेस'संबंधी होती असं जाहीर झालं असलं, तरी ती राजकीय "धंदा' चालविण्याच्या दृष्टीनेची चाचपणी होती, अशी अफवा आहे।

पुण्यात पत्रकारांच्या अधिवेशनात शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे एकत्र आले। त्यांचाही कलगीतुरा रंगला, पण सौजन्यपूर्ण वातावरणात। पवारांनी राणेंना पुढील वेळी मुंडेंना सोबत घेऊन जाण्याचा सल्ला देऊन टाकला। मुंडेंनीही राणे, पवारांना कोपरखळ्या मारल्या, पण गोडीगोडीनं....आणि या सौजन्य सप्ताहाचा समारोप झाला तो थाटामाटात, वाजतगाजत आणि कुणीही कधीही अपेक्षा केली नव्हती, अशा घटनेनं. छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंवरील खटला मागे घेऊन आपली लढाई संपल्याचंही जाहीर करून टाकलं! उद्धव ठाकरेंसोबत त्यांची बैठकही झाली. लखोबा, टी. बाळू, अशा सर्व विशेषणं गोदावरीत विसर्जित झाली.

या सर्व घटनांत अर्थातच कोणाचाही स्वार्थ, राजकीय फायदा नव्हता। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांशी या घडामोडींचा संबंध जोडणाऱ्याला नतद्रष्टच म्हणावं लागेल. गांधी जयंतीनिमित्तानं पाळलेल्या सौजन्य सप्ताहाच्या यशस्वितेसाठी प्रत्येक नेत्यानं आपापल्या परीनं टाकलेली ती भर होती. प्रत्येकानं यथाशक्ती त्यासाठी मदत केली.मुख्य प्रश्‍न पुढे आहे. गांधी जयंतीनिमित्त या सर्वांनी अहिंसेचा, प्रेमाचा, वसुधैव कुटुंबकम्‌ चा संदेश बिंदेश दिला हे ठीक आहे! पण पुढच्या आठवड्यात रावणदहन आहे आणि त्यानंतर नरक चतुर्दशी! एरव्ही वर्षभर हा मुहूर्त साधणाऱ्या या नेत्यांवरची जबाबदारी आता वाढली आहे

---

Sep 30, 2008

गुहागरात...(कोरडी) सुहागरात...


गेल्याच आठवड्यात भन्नाट योगायोगांविषयी लिहिलं होतं। तसाच योग पुन्हा एकदा जुळून आला। गुहागरला जायचं बऱ्याच वर्षांपासून राहिलं होतं। स्वतः रत्नागिरीचा असूनही मी अद्याप हेदवी, वेळणेश्‍वर पाहिलं नव्हतं। सारखी हुरहूर लागत होती, पण जायचं काही घाटत नव्हतं। एकदा एन्‍रॉनच्या निमित्तानं लेख करण्यासाठी गुहागर शहरात आणि अंजनवेल, वेलदूर भागात गेलो होतो। पण तेवढाच। ते काही फिरणं नव्हतं. ते अचानक, अनपेक्षितपणे परवा जुळून आलं.
"गोड गुपीत', "नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे' या चित्रपटांचा दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर हा बऱ्यापैकी मित्र। पुण्यात भेटला, तेव्हा मी आणि श्रीपाद ब्रह्मे यांनी त्याला एखाद्या वेळी शूटिंगला बोलावण्याची गळ घातली होती. एरव्ही शूटिंग रिपोर्टसाठी जाणं म्हणजे फक्त औपचारिकता असते. तासभर थांबायचं आणि बोलून निघायचं. आम्हाला तसं नको होतं. जरा निवांत आणि स्वतंत्र हवं होतं. त्यानं ते लक्षात ठेवलं होतं बहुधा. श्रीपादला फोन करून त्यानं गुहागरला त्याच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला येण्याचं निमंत्रण दिलं. श्रीपादनं मलाही भरीला घातलं. काही कारणांनी माझंही प्रभुलकरशी काही दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं आणि मलादेखील ही चांगली संधी वाटली.
रविवारी सुटीच्या दिवशी जायचं आणि सोमवारी सकाळी निघून दुपारी ड्युटीला परत यायचं, अशी आमची अटकळ होती। रजा वगैरे घेण्याचा प्रश्‍न नव्हता आणि राहण्याची सोयही तो करणार होता. एकूणात काय, की फक्त बस प्रवासाचं भाडं आम्हाला पदरचं घालायचं होतं. त्यामुळे दोघंही तयार होतो. शेवटी जाण्याचं शुक्रवारी निश्‍चित झालं.जुजबी सामान घेऊन रविवारी सकाळी साडेसातची गाडी पकडली. दुपारी एक दीड पर्यंत पोचायचं, असा आमचा अंदाज. गुहागरला पोचायला सव्वाचार होतील, असं कंडक्‍टरनं सांगितलं, तेव्हा आमचा धीरच खचला. म्हटलं, उद्या दांडी मारावी लागणार बहुधा! मग एकदा तो विचार मनात आला आणि तोच मग पक्का केला
प्रवास उत्तम झाला. एकतर मी एसटीच्या लाल डब्यातून दिवसा बऱ्याच वर्षांनी एवढा मोठा प्रवास करत होतो. पण काही त्रास झाला नाही. वारा छान होता, एसटीही मोकळी होती आणि ऊनही फारसं नव्हतं. कुंभार्ली घाटात एसटीतूनच फोटो काढले, कोयनानगरला जेवलो आणि बरोब्बर सव्वाचारला गुहागरात पोचलो. त्यांनी कळविलेल्या हॉटेलवर पोचलो, तर तिथे कुणालाच काही पत्ता नव्हता. मग पुन्हा फोनाफोनी झाली. शेवटी आम्हाला बॅगा टाकायला आणि तोंडं विसळायला जागा मिळाली. आंघोळ कुणाला करायची होती?आत्ता येऊ मग येऊ करता करता दोन तासांनी, साडेसहाला आम्हाला न्यायला गाडी आली. तिथून चहा पिऊन पालशेत नावाच्या बारा किलोमीटरवरच्या गावात पोचलो. तिथे एका कोकणी चौसुपी घरात शूटिंग चाललं
"सुंदर माझं घर' असं चित्रपटाचं नाव. मधुराणी गोखले, राहुल मेहंदळे हे कलाकार. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते आदल्या दिवशीच येऊन गेले होते. कोकणात मोठ्या कुटुंबात राहणारी एक मुलगी मुंबईत विभक्त झालेल्या कुटुंबात जाऊन राहते आणि तिथे सर्वांना एकत्र आणते, अशी ही कथा. प्रभुलकरनं आमचं चांगलं स्वागत केलं. गेल्या गेल्या भोपळ्याच्या घारग्यांचा भरपेट नाश्‍ता झाला.नंतर थोडा वेळ गेल्या दोन दिवसांतलं शूटिंग टीव्हीवर पाहिलं आणि मग प्रत्यक्ष शूटिंग. शूटिंगच्या गमतीजमतीही अनुभवायला मिळाल्या. अंगणात एकत्र जेवणाचं दृश्‍य होतं, पण जेवणच तयार नव्हतं। मग चिडाचिडी, आरडाओरडी झाल्यावर जेवणाची तयारी करण्यात आली। तोपर्यंत दिग्दर्शकानं तो शॉटच बदलून टाकला होता।
नायिकेच्या मोठ्या बहिणीच्या मांडीवर देण्यासाठी आणलेलं गावातलं कुणाचं तरी बाळ भोकाड पसरून रडायला लागलं. म्हणून मग बाहुलीचं बाळ तयार करण्यात आलं. ते बिचारं रडलं नाही!रात्री दहापर्यंत शूटिंग चाललं. आम्ही म्हणजे तिथे विशेष पाहुणेच होतो. त्यामुळं बसायला खुर्च्या, पाणी, खाणं, सगळ्याची ददात होती. साडेदहाला जेवलो। मग शूटिंगची मंडळीही पॅक अप करून आली. सगळ्यांशी गप्पा झाल्या. साडेअकरापर्यंत "हॉटेल निसर्ग'वर आलो. येतानाचा अंधारातला प्रवासही छान झाला. वाटेत एक कोल्हा पाहिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचा बेत रद्दच केला होता. ऑफिसला कळवून दांडी टाकली होती. मग सकाळी प्रभुलकरांनी आमच्या दिमतीला एक गाडी दिली. तिच्यातून हेदवीला जाऊन आलो. येताना चालकानं हेदवीच्याच समुद्रकिनाऱ्यावरचा एक भन्नाट स्पॉट दाखवला. आमच्या श्रीपादला तो आधी माहीत असल्यानं जरा पुढे जाऊन व्यवस्थित पाहिला. बामणघळ त्याचं नाव. डोंगराच्या कुशीत दोन खडकांमध्ये चर तयार होऊन त्यातून लाटा आत येतात. जोरात लाट आली, की ती उसळून फेसाळत वर येते आणि अक्षरशः आंघोळ घालते. पाहायला हे दृश्‍य फारच भन्नाट आहे. आम्ही अर्धा तास तिथे काढून मग निघालो.
गुहागरात आल्यावर तिथल्या किनाऱ्यावरही फेरफटका मारला। मग दुपारी पुण्याची गाडी धरली...

Sep 26, 2008

योगायोगाच्या गोष्टी!

"आपल्या चुकांबद्दलची सोपी पळवाट म्हणजे नशीब' अशी व्याख्या कुणी केली असली, तरी नशीबावर आणि योगायोगांवर माझा प्रचंड विश्‍वास आहे. अशा अनेक अनपेक्षित गोष्टी आयुष्यात कधीकधी घडतात, की त्यांना योगायोगाशिवाय दुसरं काही नाव देता येत नाही।
श्रीनिवास देशपांडे नावाचा एक डॉक्‍टर मित्र ऑर्कुट परिवारात समाविष्ट आहे। मला भेटण्याचा प्रस्ताव त्यानं अनेक दिवस-महिन्यांपूर्वी दिला होता. आम्ही वेळ पण ठरवत होतो, पण काही जमत नव्हतं. खरं तर तो राहतो गणेशमळ्यात आणि मी पानमळ्यात. अगदी दहा मिनिटांचं अंतर होतं. पण त्याला वेळ फक्त रविवारी. आणि रविवारी आमच्या सांसारिक जबाबदाऱ्या.एकदा भेटण्याविषयी बोलणंही झालं, पण कुठेतरी माशी शिंकली. शेवटी गणपतीनंतर भेटू, असं मी त्याला सांगून टाकलं. तरीही त्याला पंधरा दिवस उलटून काही निश्‍चित होत नव्हतं. भेटायची इच्छा दोघांनाही होती, पण मुद्दाम वेळ काढण्याचं घाटत नव्हतं.

परवाच्या मंगळवारी मी सहज रजा घेतली होती आणि गाडी सर्व्हिसिंगला टाकायला गेलो होतो. येताना व्यायाम म्हणून चालत घरी निघालो होतो. टिळक रोडवर एका दुकानावर कॅमेऱ्यांची जाहिरात पाहत असताना एक माणूस उगाचच संशयाने माझ्याजवळ घुटमळत असलेला जाणवला. मी त्याच्यावर उचकणार तेवढ्यात तो म्हणाला, ""तुम्ही अभिजित पेंढारकर ना?''मी चमकलो.""मी श्रीनिवास देशपांडे!'' त्यानं ओळख करून दिली.भरदार शरीरयष्टीचा (खरं तर भरगच्च वजनाचा म्हणायला हवं, पण ते बरं दिसत नाही ना!) हा ऑर्कुटवरचा माझा कधीही न पाहिलेला, न भेटलेला मित्र असा रस्त्यात भेटेल आणि मला फक्त फोटोवरून ओळखेल, अशी मुळीच कल्पना नव्हती! मग आम्ही कॉफी वगैरे पिऊन योगायोगानं झालेल्या भेटीचा आनंद साजरा केला।
एकाच आठवड्यात अशीच दुसरी गोष्ट घडली...बायकोच्या मैत्रिणीच्या माध्यमातून गेल्या वर्षी एक एलआयसी पॉलिसी काढली होती. पण ती कधी माझ्यापर्यंत पोचलीच नाही. दरम्यान काही कौटुंबिक कारणांमुळे तिनंही कामातून विश्रांती घेतली होती। पॉलिसी मिळाली नाही, म्हणून मी जाम अस्वस्थ होतो. पुढचे हप्ते भरण्याच्या नोटिसा आल्या, पण पॉलिसीच असल्याने पैसे फुकट जातील, या विचाराने हप्ते भरले नाहीत.त्या मैत्रिणीच्या कनपटीला बसल्यानंतर तिनं पॉलिसीची कुंडली आणली. एलआयसीकडून कधी रवाना झाली, कोणतं पोस्ट ऑफिस, डिस्पॅच क्रमांक वगैरे. पोस्टात चौकशी केली. त्यांना रजिस्टर उकरायला लावलं. काहीही नव्हतं. हाही प्रयत्न फुकट गेला.आगपाखड करून झाल्यानंतर शेवटी स्वतःच हे "मिशन' हाती घ्यायचं ठरवलं. एकतर तिचं एलआयसी कार्यालय होतं गणेशखिंड रस्त्याला. आमच्या घरापासून खूप लांब. तरीही, उन्हातून बोंबलत तिकडे तडमडलो. तिथून फॉर्म बिर्म आणले. पण तेही पडूनच राहिले.मग एक ओळखीचा दुसरा एलआयसी एजंट गाठला. तो सगळं करून देतो म्हणाला. त्यासाठी दोनशे रुपयांचा बॉंड पेपर लागणार होता. त्यासाठी गावात चार-पाच चकरा मारल्या. कुठेच मिळाला नाही. एक दुकान सापडलं, ते दोनदा बंद होतं. नंतर दोनशे रुपयांचा बॉंडच मिळत नाही, असं कळलं. मग त्याला साक्षात्कार झाला, की बॉंड पेपरऐवजी फ्रॅंकिंग पण चालेल. मग फ्रॅंकिंगसाठी प्रयत्न सुरू झाले. दोन-तीनदा कॉसमॉस बॅंकेतली ही सेवा बंद होती. एकदा राजस्थान बॅंकेत संप होता. खेपा फुकट जात होत्या. अखेर हिय्या करून एकदा ती मोहीमदेखील यशस्वी करून दाखवली.
आता उरला होता प्रश्‍न फॉर्म भरण्याचा आणि त्या एजंटकडे ते सगळं गबाळं सुपूर्द करण्याचा। परत त्याची माझी वेळ जमत नव्हती. आता सगळं दिलं की मिळणार डुप्लिकेट पॉलिसी, हे निश्‍चित होतं.
अचानक काल आमच्या डोक्‍यावर राहणारे शेजारी सकाळी सकाळी दारावर आले। मी चहा पीत होतो। बायको काहीतरी त्यांच्याशी बोलत होती। त्यांना फ्लॅट सोडायचा असल्यानं एनओसी साठी आले असतील, असं वाटलं. बाहेर जाऊन पाहतो, तर कुठल्या तरी पॉलिसीची चर्चा सुरू होती.नंतर मला उलगडा झाला, की जी पॉलिसी मिळवण्यासाठी मी आकाशपाताळ एक केलं होतं, ती मूळ पॉलिसी आमच्या डोक्‍यावरच्या त्या शेजाऱ्यांच्या घरी सापडली होती! तीदेखील बिऱ्हाड हलवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यानंतर उपसाउपशी सुरू केली, तेव्हा!
खरं तर माझा जळफळाट झाला होता. ज्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, एवढ्या चकरा मारल्या, भरपूर वेळ फुकट घालवला, ती पॉलिसी माझ्यापासून अगदी दहा-बारा फुटांवर आरामात पहुडून होती.पैसे, वेळ, श्रम खर्च करून बराच मनस्ताप घेतल्यानंतर हा आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. त्यांच्या गबाळेपणाबद्दल थयथयाट करण्यापेक्षा मला पॉलिसी मिळाल्याचा आनंद अधिक वाटला!

Sep 12, 2008

माफीनामा!

"अनफर्गेटेबल टूर' संपवून मी परतीच्या प्रवासाला लागलो असताना वाटेत ढीगभर एसएमएस मिळाले। जयानं मुंबईत काहितरी विधान केल्याबद्दल गदारोळ उडाल्याचं कळलं. भावना दुखावल्या गेल्या आहेत, ही माझी त्यावरची पहिली प्रतिक्रिया होती. तसं झालं असेल, तर आम्ही माफी मागतो.महाराष्ट्र ही आमची आई आहे आणि आईचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही. आईच्यान!

मराठी आणि महाराष्ट्राने आम्हाला भरपूर काही दिले आहे आणि आम्ही हे उपकार कधीच विसरणार नाही। आम्हीही आमच्या परीने मराठी माणसांवर, मुंबईवर, शिवसेनेवर, मनसेवर, मूळ आणि "नवनिर्माण' झालेल्या ठाकरे परिवारावर प्रेमच केले आहे. कृतघ्नतेची भावना आमच्या मनात कधीच नव्हती.मराठीवर प्रेम नसल्याचा आरोप आमच्यावर सातत्याने होतो. तो चुकीचा आहे. मराठीसाठी आम्ही काय केले नाही? कुठलेही संकट आले, की आम्ही पाया पडतो, ते दादरच्या सिद्धिविनायकाच्याच. मी यूपीचा आहे, म्हणून सारखी काशी-मथुरेकडे धाव घेत नाही.

मध्यंतरी अभिषेकच्या लग्नाच्या वेळी मंगळ "शनी' ठरू नये, म्हणून तिकडच्या काही देवळांत यज्ञयाग केले, पण ते तेवढ्यापुरतेच। म्हणून सिद्धिविनायकावर आमचा विश्वासच नाही, असं कुणी म्हणू शकत नाही. मी, जया, अभिषेक, ऐश्वर्या सगळ्यांनी अनेकदा त्याची पायी वारी केली आहे.मध्यंतरी मी बाराबंकीत जमीन घेतली, तशीच पुणे जिल्ह्यातल्या मावळ खोऱ्यातही घेतली. उत्तर प्रदेशात आमच्या मित्राचं सरकार आहे, म्हणून महाराष्ट्रावर अन्याय होऊ दिला नाही. जयाचं शिक्षण पुण्यात झालं, तसं अभिषेकचं शिक्षण आम्ही मुंबईतच केलं. त्यासाठी आम्ही दोघंही आग्रही होतो. डेहराडूनला त्याला ठेवण्याचा मित्रपरिवाराचा सल्ला आम्ही मानला नाही.मुख्य म्हणजे, आमचे सगळे चित्रपट आधी मुंबईत प्रदर्शित झाले. त्याबाबतही मी कुणाचे काही ऐकले नाही. मुंबई ही आमची कर्मभूमी आहे आणि इथेच चित्रपट प्रदर्शित व्हायला हवेत, याबाबत मी स्वतः आग्रही होतो.

बाळासाहेबांशी मैत्री केली, ते केवळ ते मराठी आहेत म्हणून। त्यामागे काही स्वार्थ नव्हता. मुंबईत राहणाऱ्या, काम करणाऱ्या अनेक मराठी माणसांशी मी प्रसंगानुरूप अनेकदा स्वतः बोललो आहे. माझ्या युनिटमधल्या मराठी माणसांशीही मी संवाद साधत असतो.अभिषेकच्या लग्नाची सर्व खरेदी आम्ही मुंबईतच केली आहे. पॅरिस किंवा ऍमस्टरडॅमहून सूट आणावा, अशी अभिषेकची मागणी होती, पण मी त्याला सविनय नकार दिला. आता, मराठी माणसाच्या दुकानातून खरेदी केली की नाही, हे नेमकं सांगता येणार नाही. मात्र, याबाबत मी अधिक काही विधान करणार नाही. नाहीतर, "मुंबईत मराठी माणसाची दुकानं आहेत तरी कुठे, ' असं मी म्हटल्याचा नवा वाद निर्माण होईल.

आम्ही शांतताप्रिय आणि कायदेप्रिय माणसं आहोत। लाखो रुपयांचा कर बुडवल्याबद्दल, जमिनीच्या मालकीबाबत शेतकरी असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल, पैशांच्या घबाडासाठी अनिवासी भारतीय म्हणून नोंदणी केल्याबद्दल, जेव्हा जेव्हा आम्ही कायद्याचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या, तेव्हा सरकारी दट्ट्या आल्यानंतर त्याची प्रामाणिक कबुली देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. त्याबद्दल आमच्याविरुद्ध कुणी बोट दाखवू शकत नाही. "एबीसीएल' गाळात गेली, तेव्हा मुलायमसिंहांनी, अमरसिंहांनी आम्हाला मदत केली असेल, पण ती केवळ मैत्रीपोटी. महाराष्ट्रातल्या कुण्या नेत्यानं आम्हाला मदतीचा हात दिला असता, तर आम्ही तो नाकारला असता, असे नव्हे!

ऐश्वर्याच्या नावानं उत्तर प्रदेशात आम्ही शाळा सुरू केल्यावरून गहजब माजला. बच्चन परिवारातल्या कुणाला ना कुणाला सतत चर्चेत ठेवायचं, ही मीडियाची हल्ली गरजच झाल्यासारखी वाटते. आम्ही मात्र त्यामागे वाहवत जाणार नाही. ऐश्वर्याच्या नावाची शाळा यूपीमध्ये काढली, ती काही केवळ तिकडच्या प्रेमापोटी नव्हती. कुणीही आपल्या मातृभूमीसाठी एवढं करतोच ना! आता नातवाच्या नावे गडचिरोलीत महाविद्यालय सुरू करण्याचा आमचा विचार आहे. त्या संधीच्या सध्या प्रतीक्षेत आहे.आणखी एक. ब्लॉगही आता मराठीतून लिहिण्याचा विचार आहे. पण माझ्या लॅपटॉपवर फॉंटचा प्रॉब्लेम आहे. तो दूर झाला, की करेनच सुरुवात! मराठी वाचकांना ब्लॉग वाचण्यास आणि मराठीतून त्यावर कॉमेंट टाकण्यासही माझी अजिबात मनाई नाही. एवढे मराठीद्वेष्टे आम्ही नक्कीच नाही. कुणाला काहीही वाटले, तरी!!

-आपला,
अमिताभ बच्चन.