May 15, 2012

सावकारी पाश


माझ्या आईची आईची आई मी कधी बघितली नाही. तिची माया मला लाभली नाही. पण पुण्यात आल्यानंतर याच नावाच्या बॅंकेचं भरभरून प्रेम मात्र मिळालं. आज तिच्या ऋणातून कायमचा उतराई झालो. पुन्हा तिच्याकडे न फिरकण्याच्या दृढ निर्धारासह!

रात्र वै-याची असते, तसा आम्ही या बॅंकेच्या कर्जाच्या विळख्यात सापडण्याचा निर्णय घेतला, तो दिवस वै-याचा असावा बहुतेक. त्यावेळी कुठल्याही राष्ट्रीय बॅंकेचं कर्ज घेणं आत्ताच्या एवढं सहजसोपं नव्हतं. त्यामुळे जे सहज आणि फारसा त्रास न घेता मिळेल, ते कर्ज घ्यायचं, असं ठरवून टाकलं होतं. पणजीच्याच मायेनं प्रेम करणारी बॅंक म्हणून आईचीआईची बॅंकेची त्या वेळी ख्याती होती. हापिसात म्हणू नका, घरी म्हणू नका, गोठ्यात म्हणू नका, कुठे सांगाल तिकडे येऊन तुमच्या हातात कर्जाच्या रकमेचा चेक देण्यात ही बॅंक पटाईत होती. आम्ही त्यांच्या आमिषाला भुललो. आम्ही म्हणजे...आदरार्थी बहुवचन नव्हे. तर, आम्ही सगळेच. त्यावेळी हापिसात कामाला असलेले आम्ही बरेच जण. एकतर उमेदीच्या त्या काळात लग्नाच्या बाजारात उतरण्यासाठी स्वतःचं घर असणं आवश्यक होतं. त्या भांडवलावर आम्ही निदान स्थिर नोकरी आणि स्वतःचा फ्लॅट, एवढ्या दोनच निकषांवर स्थळांचा विचार करणा-या मुलींच्या कॅटॅगरीपर्यंत तरी मजल मारू शकत होतो. त्यामुळे कुणीही गॅरेंटर न ठेवता, कुठलीही सरकारी कागदपत्रं गोळा न करता मिळणारं हे कर्ज म्हणजे आमच्यासाठी सुवर्णसंधीच वाटत होती. ती पटकन पटकावली आणि घर ताब्यात घेतलं.

नंतर नंतर ही सुवर्णसंधी आपल्याकडून सोन्याच्या भावाने व्याजवसुली करणार आहे, याची कल्पना यायला लागली आणि अस्वस्थता वाढत गेली. सुरुवातीला फ्लोटिंग रेटचा पर्याय निवडला होता. त्यामुळे मधल्या कर्जदरांच्या घसरणीच्या काळात आमच्या कर्जाचा दर सात टक्क्यांच्या पातळीपर्यंत कमी झाला, तेव्हा हापिसात आणि इतर सर्वच समकर्जबाजारी लोकांसमोर फिरताना मिशीला जरा जास्तच तूप लावून फिरत होतो. पण हा फ्लोटिंगचा फुगा लवकरच फुटला आणि बुडाला. व्याजदर फुगता फुगता अकरा टक्क्यांच्याही वर गेला, तेव्हा फ्लोटिंग आणि फिक्स, दोन्ही गटवारीत लुबाडणुकीच्या दृष्टीने काही फारसा फरक नव्हता, हेही लक्षात आलं.

मध्यंतरी दर कमी होण्यासाठी काही पैसे भरून गटवारी बदलून घेण्याचेही काहीतरी उद्योग केले. त्याने कितपत फरक पडला, कुणास ठाऊक. दर सहा महिन्यांनी व्याजदर बदलल्याचे (अर्थातच वाढल्याचे) पत्र यायचे आणि आणि आमची हताशा आणखी वाढायची. दुस-या बॅंकेत जाऊन कर्ज ट्रान्फर करून घेणे, अमूक ठिकाणी पैसे ठेवले असता किती फायदा झाला असता, इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अमक्या रकमेचे कर्ज ठेवले पाहिजे वगैरे व्यावहारिक गणितं तर मला आयुष्यात कधी जमली नाहीत. एवढी वर्षं दुचाकी आणि आता चार चाकी वापरूनही गाडी किती अव्हरेज देते, असा प्रश्न कुणी विचारला, तर माझी बोबडी वळते. (लोकांना काहीही शंका असतात. उदा. किती किलोमीटर रनिंग झालं, चॅसी कुठल्या मेकची आहे, अमकी शेड नाही का मिळाली, वगैरे वगैरे. तर ते असो.)

सांगायचा उद्देश काय, की मी आपला इमानेइतबारे दहा वर्षं अडीच लाखांच्या सावकारीचा हप्ता भरत राहिलो. यंदा नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि निदान आपलं थकित कर्ज आपण फेडू शकू, इपपत रक्कम आपल्या हातात येईल, अशी चिन्हे दिसायला लागली, तेव्हा मला हात आभाळाला टेकल्यासारखं वाटू लागलं. बाकी काही जमलं नाही, तरी पहिलं हे कर्ज फेडून टाकायचं. हे निश्चित केलं. गेल्या महिन्यात ती इच्छा सुफळ संपूर्ण झाली. आज बॅंकेकडून सगळी मूळ कागदपत्रंही ताब्यात घेऊन आलो, तेव्हा कुठे मनाला दिलासा मिळाला.
सावकारी पाशातून कायमची मुक्तता झाल्यावर एखाद्या पिचलेल्या शेतक-यालाही असाच आऩंद होत असेल काय??