
सातारा रस्त्यावरच्या "अख्खा मसूर'वर बऱ्याच दिवसांपासून डोळा होता. कधीतरी त्याचं नाव कुणाकडून तरी ऐकलं होतं. तिथं जायचं डोक्यात होतं, पण योग येत नव्हता. तसा मी फारसा हॉटेलप्रेमी नाही. आहारात चवीपेक्षाही "उदरभरण नोहे' हा मंत्र जपणाऱ्या अंतू बर्व्याचेच आम्ही अनुयायी. त्यामुळं अमक्या हॉटेलात तमकी डिश चांगली मिळते वगैरे तपशील माझ्या गावी नसतात. कुणी सांगितलं आणि सहज जमलं, तर मी ठरवून एखाद्या हॉटेलाकडे वाट वाकडी करतो. नाहीतर कुठेही हादडायला आपल्याला चालतं.
तर सांगण्याचा मुद्दा काय, की काल त्या "अख्खा मसूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॉटेलात गेलो होतो. सिटीप्राईडच्या अगदी समोर असलेलं हे हॉटेल. "अख्खा मसूर' म्हणजे तिथे मसूराचे बहुविध पदार्थ मिळत असावेत, अगदी चटण्या आणि कोशिंबिरीही मसूर घालूनच करत असावेत, असा आपला माझा समज. तशी चौकशीही एकाकडे केली होती. पण प्रत्यक्षात तिथे "अख्खा मसूर' ही एकच डिश मिळते, हे प्रत्यक्ष गेल्यावरच कळलं. तिथेच आम्ही निम्मे खचलो. मुळात त्या हॉटेलचं नाव "अख्खा मसूर' नसून "जगात भारी कोल्हापुरी' असं असल्याचा साक्षात्कारही तिथे गेल्यावरच झाला. आत जाऊन उत्साहानं मेनू कार्ड बघितलं, तर तिथे मसुराशी संबंधित फक्त "अख्खा मसूर' ही एकच डिश असल्याचं लक्षात आलं. ती मागविण्यावाचून पर्याय नव्हता. मग त्यासोबत रोटी मागवली.
रोटी एकाच प्रकारची होती. "व्हीट' वगैरे भानगड नव्हती. तरीपण ती करण्याची प्रक्रिया मनस्वीला दाखवण्याची संधी साधता आली. "अख्खा मसूर'ची चव चाखल्यावर आपण घरात मसुराची उसळ यापेक्षा उत्कृष्ट बनवतो, हे लक्षात आलं. रोटी आल्यावर पदरी पडलं आणि पवित्र झालं या भावनेनं समोर ठेवलेलं हादडायला सुरुवात केली. त्याआधी सभोवार एकदा बघून घेतलं. सगळी टेबल भरली होती आणि लोकही अतिशय प्रेमाने तो अख्खा मसूर रिचवत होते. इतर कसे खातात, हे बघून खाणं बऱ्याचदा श्रेयस्कर असतं. मागे एकदा पुण्यात नवीन असताना मी कॅंपमधल्या "नाझ'मध्ये बन-मस्का उत्तम मिळतो, असं ऐकून तिथे खायला गेलो होतो. ऑर्डर दिल्यानंतर वेटरनं "चहा हवाय काय,' असं प्रेमानं विचारलं. मी "नको' म्हणून गुर्मीत सांगितलं. त्यानं एक भलामोठा पाव समोर आणून ठेवला. हा "बन' असावा असा समज करून घेऊन मी हरी-हरी करत पुढच्या "मस्का'च्या डिशची प्रतीक्षा करत बसलो. तो काहीच आणीना, तेव्हा "बन-मस्का' म्हणजे मस्का लावलेला पाव असावा, असा साक्षात्कार मला झाला आणि मग निमूट चहा मागवून मी स्वतःचा पचका वडा करून घेत तो बन घशाखाली घातला.
या वेळी असं काही होऊ नये म्हणून ही काळजी घ्यावी लागली. सगळे जण मसुरावर ताव मारत होते. आम्ही देखील ते मसूर घाशाखाली घातले. चव बरी होती, पण त्यात 70 रुपये देण्यासारखं काही नव्हतं. बायको-मुलीला घेऊन जाऊनही जेवणाचं बिल 230 रुपये येणं एवढाच काय तो माझ्या दृष्टीनं "प्लस पॉइंट' होता.
फक्त मिसळपावाची, फक्त मस्तानीची, फक्त वडा-पावची हॉटेलं ऐकली, पाहिली होती. फक्त चहाच्या "अमृततुल्य'मध्येही हल्ली क्रीम रोल, पॅटीस, सामोसे वगैरे मिळतात. या "अख्ख्या मसूरा'त त्या भाजीशिवाय दुसरी कुठलीही भाजी निषिद्ध होती. "खायचा तर हा अख्खा मसूरच खा. नाहीतर अख्खे तसेच घरी परत जा,' अशी संचालकांची भूमिका असावी.
अख्खे 230 रुपये मोजून मसुराची उसळ आणि रोटी खाल्ल्यानंतर पुन्हा कुठल्या तरी हॉटेलात व्यवस्थित जेवण करायचं, असं आश्वासन हर्षदा आणि मनस्वीला दिल्यानंतरच मी अख्खाच्या अख्खा घरी येऊ शकलो!
...