Aug 28, 2012

एक तरी `वारी` अनुभवावी!

पहिल्यापहिल्याने आपण आयुष्यात जे करतो, ते कायम लक्षात राहतं आणि मनात घरही करून राहत असतं. तो पहिला अनुभव एकदम सुपर असेल, तर मग विचारायलाच नको. ड्यूक्स नोजच्या बाबतीतही माझं असंच झालंय.
मी पहिला ड्यूक्स नोज केला तो झेप संस्थेबरोबर. त्या वेळी मी भाऊ महाराज बोळात Cot Basis  वर राहत होतो. तिथल्या दोन मित्रांना घेऊन ट्रेकला गेलो होतो. त्याआधी बहुधा रोहिडा किल्ला पाहिला होता. ड्यूक्स नोज ही ख-या अर्थानं ट्रेकर्सची पंढरी. फार दमछाक करणारी वाट नाही, धोकादायक रस्ता नाही, तरीही ट्रेकिंगची मजा देणारा असा हा धमाल अनुभव. जाताना वाटेत लागणारा धबधबा, त्यात यथेच्छ धिंगाणा घालण्याची सोय, असा सगळा मस्तीचा मामला. झेप बरोबर पहिल्यांदा गेलो, तेव्हा फक्त निसर्ग आणि ट्रेकिंगशिवाय दुसरा कुठला आनंद घेता आला नव्हता. काही ट्रेकिंग क्लब त्यांच्यासोबत येणा-या ट्रेकर्सना धबधब्यात घेऊन जात नाहीत.
एका ट्रेकमध्ये अजित रानडे या गिरीप्रेमी मित्राची अशीच कुठेतरी द-याखो-यांत ओळख झाली. अजितमुळेच गिरीदर्शन ट्रेकिंग क्लबबरोबर ट्रेकिंग करू लागलो. तेव्हापासून (साधारण 1999) ड्यूक्स नोजची दरवर्षीची वारी ठरूनच गेलेली. जाताना सिंहगड एक्स्प्रेसनं खंडाळ्याला उतरायचं, तिथून ड्यूक्स नोजकडे कूच करायची, वाटेत धबधब्यात मस्ती करायची आणि मग दोन तीन चढणी आणि तेवढेच Rock Patch पार करून ड्यूक्स नोजच्या शिखरावर पोचायचं. येताना डोंगरावरच्या निसरड्या वाटेवरून धावत, घसरत उतरायचं हीसुदधा आणखी एक धमाल.
ड्यूक्स नोजची चटक लागल्यापासून कुणा ना कुणा नव्या माणसाला दरवर्षी सोबत नेलं. ट्रेकिंगची फार आवड नसलेल्या माणसालासुद्धा मनापासून आवडणारं वातावरण असल्यानं पाय दुखण्यापलीकडे त्याची फारशी तक्रार येत नाही. मुख्य म्हणजे पाऊस आणि धुकं अशा वातावरणात ट्रेक केल्यानं फारसं दमायला होत नाही आणि पाण्यावाचून हालही होत नाहीत. त्यामुळे दरवर्षी कुणा ना कुणाला मी नव्यानं ट्रेकर बनवलं. काही मित्र, मैत्रिणी, नंतर पत्नी हर्षदा आणि आता गेल्या वर्षीपासून मुलगी मनस्वीही सोबत येऊ लागली. गेल्या वर्षी अपेक्षा नसताना तिनं खूप छान सहकार्य केलं आणि अजित रानडेच्या Wanderers सारखा अगदी कुटुंबवत्सल ग्रुप मिळाल्यामुळं तिला ते फारसं जडही गेलं नाही.
यंदा अजित परदेशात असल्यामुळं माझी दरवर्षीची ड्यूक्स नोजची वारी चुकणार असं वाटत होतं. गिरीदर्शनच्या ट्रेकच्या वेळी मनापासून जायची इच्छा नव्हती, म्हणून ते राहून गेलं. पण अजितनं ड्यूक्स नोजचा ट्रेक ठरवल्यानंतर मी मनस्वीला सहज म्हटलं आणि तीसुद्धा उड्या मारायला लागली. खरंतर पुढच्या वर्षी पुन्हा ड्यूक्स नोजला जायचं, असं तिनं गेल्या वर्षीच ठरवून टाकलं होतं. पण तो निश्चय अजूनही कायम असल्याचं पाहून मलाच आश्चर्य वाटलं. ट्रेकला जायचं ठरलं, तरी पूर्वतयारीच्या बाबतीत नेहमीची धावपळ कायम होती. आदल्या दिवशी रात्री तिच्यासाठी बूट घेतले. ते सुदैवानं तिच्या मापाचे निघाले. आमच्या अडचणी एवढ्यातच संपणा-या नव्हत्या. स्विमिंग करताना आदल्या दिवशीच तिच्या पायाला काहीतरी लागलं. छोटीशी जखमही झाली होती. ट्रेकच्या दिवशी सकाळी ती थोडीशी कुरकुरत होती. तिची झोपही झाली नव्हती आणि पायही दुखत होता. मग तिला न्यायचा हट्ट नको, असं ठरवलं. ती जाऊन झोपलीसुद्धा. तिच्यासाठी केलेले पराठे, चिरीमिरी खाणं, बूट, कपडे, एवढी तयारी फुकट जायला नको, असं वाटत होतं. तिच्या पायाची जखमही फार मोठी नव्हती. मग हर्षदानं तिला पुन्हा पटवलं. ती पुन्हा उठून ट्रेकसाठी तयार झाली, तेव्हा 5.35 झाले होते. सकाळी 6.10 ची सिंहगड एक्स्प्रेस आम्हाला शिवाजीनगर स्टेशनला गाठायची होती. अक्षरशः दहा मिनिटांत आवरून बाहेर पडलो.
खंडाळ्याला पोचलो, तर जोरदार पाऊस सुरू झाला होता. पुण्यात पावसाची काहीच लक्षणं नसल्यानं रेनकोटही आणायचं लक्षात आलं नव्हतं. मनस्वीला दिवसभर भिजून त्रास झाला असता. मग ट्रेकिंग ग्रुपमधल्या तेजलनं तिचा जर्किन मनस्वीला दिला. त्याचा खूपच फायदा झाला. नेहमीप्रमाणे धबधब्यात धमाल केली, सगळ्या चढणी पार पडल्या. शेवटच्या Rock Patch पाशी मात्र मनस्वी गळाठली. तिला अचानक उंचीची भीती वाटून रडायला यायला लागलं. खरंतर घाबरायला व्हावं, असं या ट्रेकमध्ये काहीच नाही. पण तिच्या मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू असावेत. गेल्या वर्षी तर तिनं हाच ट्रेक मोठ्या उत्साहात केला होता. यंदा झोप आणि पायाच्या जखमेचं निमित्त झालं होतं. शेवटी कसंबसं तिला तिथून वरपर्यंत नेलं.
येताना मात्र तिला पुन्हा मूड आला होता. एकटीनं सगळा डोंगर उतरली. दोनतीनदा घसरली, परत सावरली. यंदाचा ट्रेक एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणा-या गिरीप्रेमी संस्थेच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेतले अनुभव आणि आव्हानांबद्दल संस्थेच्या काही गिर्यारोहकांनी उदबोधक आणि थरारक माहिती सांगितली. मनस्वीला नाट्यछटेसाठी फर्माईश होतीच. तिला कधी एकदा ती सादर करतेय, असं झालं होतं. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तिनं टाळ्या मिळवल्या. त्याबद्दल cHOCOLATES चा गठ्ठाही तिला मिळाला.
ड्यूक्स नोजबरोबरच इतरही अऩेक आनंददायी ट्रेक आहेत. आता त्यांची वाट पाहतोय. पुढच्या ट्रेकमध्ये सादर करायला मनस्वीसाठी आणखी एखादी नाट्यछटा लिहायला हवी!!