
२. नगारखान्यावरून पहाटे टिपलेला चंद्र.

३. छत्रपतींसोबत चंद्रही सूर्योदय पाहायला उत्सुक होता.

४. आम्ही सरसावून बसलो होतो, पण आदित्य महाराज वाकुल्या दाखवत होते.

५. अखेर त्यांनी हळूच डोकं वर काढलं.

६. लांबवर एक नजर टाकली...

७. मग डुलत डुलत अजून वर सरकले

८. प्रुथ्वीतलावरची पकड आणखी घट्ट केली...

९. आणखी घट्ट....!

१०. भेट दोन सूर्यांची

११. नगारखान्याच्या दरवाज्यातून टिपलेलं सूर्याचं लोभस रूप

रायगडावर स्वारीची ही माझी तिसरी आणि मुक्कामाची दुसरी वेळ होती. याआधी मुक्काम केला होता, तो जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाच्या व्हरांड्यात. या वेळी सहकुटुंब गेलो असल्याने जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाचं आधीच आरक्षण करून ठेवलं होतं. पण तोही प्रयोग फसला. विश्रांतीगृह अगदीच भकास आणि गलिच्छ अवस्थेत होतं. पण एमटीडीसीच्या विश्रामगृहात उत्तम सोय झाली. संध्याकाळी गडावर फिरून आम्ही खोलीवर परतलो, तेव्हा चंद्राची तांबूस-तपकिरी प्रभा पाहायला मिळाली. आत्तापर्यंत चंद्राचा असा रंग कधीच पाहिला नव्हता.
संध्याकाळी सूर्यास्तही पाहिला, पण सगळ्यात आकर्षण होतं सकाळच्या सूर्योदयाचं. मुक्काम गडावरच असल्यानं सकाळी हा मुहूर्त गाठायचाच, असं मी ठरवलं होतं. सकाळी सहा वाजता गजर लावून उठलो, तेव्हा बऱ्यापैकी फटफटलं होतं. वाटलं, सूर्य वर आला की काय! पटकन आवरून कॅमेरा सरसावून नगारखान्याकडे पळालो. सुदैवानं सूर्य वर आलेला नव्हता. तोपर्यंत मेघडंबरीचे आणि नगारखान्याच्या मुख्य दरवाज्याचे फोटो टिपले. चंद्रासह हे फोटो फारच आकर्षक वाटत होते. पहाटच असल्यानं बऱ्यापैकी अंधार होता आणि फ्लॅश टाकून स्पष्ट फोटो येत नव्हते. अखेर फ्लॅश बंद करणं जमलं आणि उत्तम फोटो टिपता आला.
धुंद-कुंद हवा आणि वारा वाहत होता आणि त्यात नगारखान्याच्या समोरच्या ध्वजस्तंभावरची लोखंडी साखळी स्तंभावर आपटून खण-खण आवाजात मधुर निवाद करत होती. त्या भारलेल्या वातावरणात तो मंद ध्वनी मंदिरातल्या पवित्र घंटानादासारखाच लयबद्ध वाटत होता. नगारखान्याकडून होळीच्या माळाकडे वळलो. बाजारपेठेसमोरच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आलो. तिथे काही अन्य लोक सूर्योदयाची छबी न्याहाळण्यासाठी जमले होते. सूर्योदयापूर्वीची प्रभा क्षितिजावर रंग उधळत होती, पण आदित्य नारायण उगवले नव्हते. बहुधा, धुक्यामुळे किंवा ढगाळ हवामानामुळे महाराजांचं कोवळं रूप पाहायला मिळणारच नाही, अशीच शंका मनात दाटून आली. 6.40 होत आले होते, तरी त्यांनी डोकं वर काढलं नव्हतं. "डोंगरावरून चढून यायला त्याला वेळ लागत असणार,' असा विनोदही कुणीतरी केला.
एका बाजूने चंद्रही आकाशात चमकत होता. बहुधा, त्यालाही सूर्याची उगवती प्रभा पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता! अखेर आमच्या प्रतीक्षेला फळ आलं आणि घरातल्या छोट्या खुर्चीच्या आधारानं लहानग्यानं उभं राहावं, तसं सूर्याच्या लालबुंद गोळ्यानं हळूच डोकं वर काढलं. आळसातून जागा होत असलेला रायगड आपल्याच कोवळ्या प्रकाशात दिसतो तरी कसा, हेच पाहण्याचा तो प्रयत्न करत होता बहुधा. बराच वेळ प्रतीक्षा करायला लावून एखादा "स्टार' कसा आल्याआल्या वातावरण भारून टाकतो, तसाच काहीसा अनुभव होता तो.
या "ताऱ्या'नं सगळ्यांना मनसोक्त फोटोबिटो काढू दिले. मग शिवाजी महाराजांच्या अस्तित्त्वाची आणि जबाबदारीची जाणीव झाली असावी बहुधा त्याला. लगालगा वर आला. आपली लालबुंद, कोवळी प्रभा झटकून टाकली आणि नंतर हळुहळू रंग बदलून कामाला लागला. मीदेखील मग त्याचा नि महाराजांचा निरोप घेऊन माझ्या आन्हिकांकडे वळलो...
for more photos click here