Apr 16, 2009

बाललीला

पोरगी सध्या तिच्या मधल्या मावशीकडे गेलेय. दोन दिवस मुक्कामाला. (आता राजा-राणीला रान मोकळं म्हणून चहाटळ कॉमेंट करू नका! रात्री साडेबाराला घरी जातोय रोज. नि सकाळी दोन तास फक्त राजा-राणीला मोकळे असतात. त्यातही स्वयंपाक, धुणीभांडी, केरवारे यातच जीव जातो. असो!) आज सहज फोन केला, तर तिच्या मावसभावाच्या उखाळ्यापाखाळ्या करत होती. ढकललं, मारलं, थुंकी उडवली वगैरे वगैरे. नेहमीचंच! आता "डायरेक्‍ट' उद्या घरी येतेय म्हणते.
manu in shilpa's wedding-14[2].02.09 011 सांगायचा मुद्दा काय, की कार्टीला शिंग फुटल्येत हल्ली. नि प्रश्‍नही पडायला लागलेत भयंकर. त्यांची उत्तरं देता देता नाकी नऊ येतात. परवा आईला विचारत होती - "आई, कैरी आंबट का असते?' आईनं लगेच नवऱ्याचा "सोर्स' वापरला. (अडल्यानडल्याला लागते गरज अशी!) मीही एसएमएसवरून उत्तर दिलं - "आंबा गोड व्हावा, म्हणून देवबाप्पा कैरी आंबट करतो.' खरं तर या उत्तराला काही लॉजिक नव्हतं. पण त्या वेळी खपून गेलं असतं. पण पोरीनं आम्हा दोघांची दांडी गुल करून स्वतःच स्वतःच्या गहन प्रश्‍नांच निराकरण करून टाकलं. - "अगं, देवबाप्पा ती आंबट करतो!'
तिच्या शाळेत तिला सांगितलंय, तुम्ही घरी दंगामस्ती करता, ते आम्ही "जादूच्या टीव्ही'तून बघत असतो. त्यामुळं मुलांवर जरा वचक राहतो, असा शिक्षकांचा आणि पालकांचा (गैर)समज. आता तिला सुटी लागल्यावर परवा म्हणते, "आई, आता शाळेला सुटी आहे म्हणजे बाईंचा जादूचा टीव्ही पण बंद असेल नाही?'
---
अलीकडेच तिला घेऊन दोनदा "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' पाहिला. जवळपास पाठ झाल्यासारखाच झाला होता तिचा. तिला मारामारी आवडत नाही, तरी अफजलखान वध वगैरे सहन केलं. पण शेवटी सचिन खेडेकरला दगड का मारतात, सिद्धार्थ जाधव त्या काकाला गोळ्या का झाडतो, तो माणूस चांगला आहे, तर मग त्याला सगळे का मारतात, या प्रश्‍नांना उत्तरं देता देता नाकी नऊ आले. वर एकदा मला विचारते, "बाबा, तो शिवाजी भोसले (दिनकर भोसले) रोज मासे का खातो?' मी म्हटलं, अगं, त्याला आवडतात म्हणून खातो. मग तिचं म्हणणं, "आवडतात, तर नुसता वास घेऊन ठेवून द्यायचे ना! खायचे कशाला?' मी गार! "तुला नागडा करून खिडकीतून फेकून देईन' असं तो काका का म्हणतो, असा प्रश्‍न विचारून तिनं आईलाही भंडावून सोडलं होतं!!
---
शाहरुख खान तिचा फेवरेट हिरो आहे. त्याला भेटण्याची तिला अनिवार इच्छा आहे. तशी मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधवशी तिची भेट मी करून दिली, पण शाहरुख खानला भेटणं तिला तिच्या बापजन्मात शक्‍य नाहीसं दिसतंय! तिला मात्र हे काही केल्या पटत नाही. तो मुंबईला राहतो, लोकांना भेटत नाही, खूप बिझी असतो, लांब राहतो, खूप गर्दी असते' वगैरे कारणं तिचं समाधान करू शकत नाहीत. एकदा मला म्हणाली, "बाबा, तुम्ही असं करा, शाहरुख खान आणि गलगलेला (भरत जाधव) एकत्र भेटायला बोलवा.' मी म्हणालो, "अगं, शाहरुख खान गलगलेला ओळखत नाही.'
तिचं उत्तर - "मग मी त्याला सांगेन ना, हा गलगले नि हा शाहरुख खान म्हणून!'
मी कपाळावर हात मारून घेतला!
त्यामुळं कधी मुंबईला जातो, असं सांगायचीही चोरी आहे. ती लगेच मागे लागेल, शाहरुख खानला भेटायचंय म्हणून!
शाहरुख खान "दर्दे डिस्को' गाण्यात उघड्या अंगानं नाचतो, म्हणून हिलाही उघड्या अंगानं फिरायचं असतं दिवसभर! काय सांगायचं आता या पोरीला?
---
बाकी रस्त्यावरून जाताना तो अमका लाल सिग्नलला का थांबला नाही, बाबा तुम्ही पांढऱ्या रेषेवर गाडी का उभी केलीत? डावीकडे जायला हिरवा सिग्नल नसताना का पुढे गेलात? तमका रस्त्यावर का थुंकला? सिग्नल तोडणाऱ्यांना पोलिस काका का पकडत नाहीत...एक ना अनेक प्रश्‍न!
---
तिला दुपारी अजिबात झोपायचं नसतं नि मला (तास-दीड तास!) डुलकी काढल्याशिवाय करमत नाही. मग "मला त्रास देऊ नकोस' असा दम देऊन, आतल्या खोलीचं दार ओढून घेऊन मी झोपतो. परवा असाच झोपलो होतो, तर एकदम केविलवाणा चेहरा करून रडतरडत माझ्याकडे आली. मी दचकून जागा झालो. कळेचना, काय झालंय! हाताला लागलं म्हणत होती. काय झालं विचारल्यावर म्हणाली, औषधाची बाटली फुटली. मी बाहेर येऊन पाहिलं, तर तिला आत ठेवायला सांगितलेली काचेची बाटली कार्टीनं पाडून फोडली होती. होमिओपथीच्या गोळ्यांचा सगळा कचरा बाहेर झाला होता. मला कळू नये, म्हणून हिनं फुटलेल्या काचा सुपलीत भरून कचऱ्याच्या डब्यात गुपचूप टाकल्या होत्या. त्या भरतानाच काहीतरी हाताला लागलं होतं. पण जखमबिखम नव्हती. बिचारी घाबरली होती. मग तिचीच समजूत काढावी लागली.
दोन दिवस पोरगी घरात नव्हती, तर घर जरा शांत होतं. सगळी कामं विनाअडथळा होत होती. आता उद्यापासून पुन्हा चिवचिवाट नि शंकांचा सुळसुळाट सुरू होईल!