Oct 9, 2007

द ग्रेट अन"लॉयल' सर्कस...

""बाबा, सर्कसला जाऊया?''
"नको रे...कंटाळा आलाय. शिवाय गावाबाहेर आहे ती. खूप लवकर निघावं लागेल.''"
"शी बाबा! तुम्हाला नेहमीच कंटाळा. अहो, बरेच प्राणी असतात त्यात. मला बघायचेत.''"
"नको म्हटलं ना! आणि हल्ली मेनकाताईंच्या कृपेनं त्यात कुठलेच प्राणी नसतात. फक्त कुत्री-मांजरी, पोपट-मैना असतात.''"
"वाघ, सिंह, हत्ती नसतात?''"
"अजिबात नाही!''"
"मग...सर्कसमध्ये बघायचं काय?''
"अरे...सांगितलं ना, बघण्यासारखं काहीच नसतं हल्ली''"
"पण ते झुल्यावरच्या कसरती, मृत्युगोल, गाड्यांच्या कसरती तरी असतातच की!''"
"तू अगदी हट्टी आहेस बघ. अगदी आईवर गेलायंस. आपलं बोलणं खरं केल्याशिवाय राहणार नाहीस. अरे, गाड्यांच्या कसरती बघण्यासाठी सर्कशीच्या तंबूपर्यंत कशाला जायला हवं? मी तुला दाखवतो. आपल्या पुण्यातल्या रस्त्यांवर रोज अखंड कसरती चालू असतात.''"
"बाबा बाबा, आपण जायचं, रस्त्यावरची सर्कस बघायला?''"
"चल...''
-----
दृश्‍य दुसरे ः स्थळ ः टिळक चौक. (अलका टॉकीजच्या जवळचा. "टिळक' कोणाला माहित नाहीत, ना!)"

"हं. आता बघ गंमत. तुला वाहतुकीचे नियम शिकवलेत का शाळेत? हा हिरवा दिवा म्हणजे जा, पिवळा म्हणजे गाडी हळू करून थांबा आणि लाल म्हणजे पूर्ण थांबा. पण बघ हं आता...लक्ष्मी रस्त्यावरून येणाऱ्या या गाड्या आहेत ना, त्या पिवळा दिवा लागल्यावर थांबणारच नाहीत. उलट, आणखी वेगानं जातील. लाल दिवा लागल्यानंतरही पुढेच पळत राहतील.''"
"बाबा बाबा, तो बघा, सायकलवाला. तो काय उडवणार आहे का आता?''
""उडवू सुद्धा शकतो, बाबा! या सायकलवाल्यांचं काही खरं नाही. आता लकडी पुलावरून दुचाक्‍यांना बंदी आहे की नाही? पण सायकलवाल्यांना कुठलेच नियम नाहीत. ते कुठेही, केव्हाही, कसेही घुसू शकतात. बघ आता, कसा वाकडा-वाकडा शिरतोय, सिग्नल नसतानाही! अरे अरे अरे....तो बघ दुसऱ्याला पाडून निघून गेला!''"
"बाबा, लाल सिग्नल आत्ताच लागलाय ना, मग हे बाईकवाले गाड्या कशाला फुरफुरवतायंत?''
""अरे, मागच्या जन्मी मावळे होते ते. सारखी घोड्यावर टांग मारायची सवय. त्यामुळं गाडीचा चाबूक ओढल्याशिवाय करमत नाही. सिग्नल असताना गाडी बंद करणं त्यांना मान्य नाही.''"
"बाबा, ते कुठूनही वळवून, कसेही चालवणारे रिक्षावाले काका बघितलेत?''
""अरे बाबा हळू बोल! त्यांनी ऐकलं, तर त्यांच्या सगळ्या जातभाईंना गोळा करून आपल्या सळो की पळो करून सोडतील. दिसायला ही एवढीशी रिक्षा असली, तरी या काकांची "दादा'गिरी मोठी आहे. ते कुणालाही जुमानत नाहीत. तो रिक्षावाला तर बिनधास्त कडेला रिक्षा लावून दुसऱ्याशी बोलत बसलाय, बघ! रिक्षा एवढीशी असली, तरी तिचे दर विमानापेक्षाही जास्त असतात, माहितेय?''
-----------

दृश्‍य तिसरे ः अप्पा बळवंत चौक.

""बाबा, आपण इथे का आलोय?''"
"अरे, संतांच्या, ज्ञानवंतांच्या, विचारवंतांच्या, बुद्धिमंतांच्या आणि आता काही उपद्रवी जंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा एक हिस्सा आहे हा! ऐतिहासिक शनिवारवाडा इथून अगदी हाकेच्या अंतरावर. जगप्रसिद्ध बावनखणी....जाऊ दे जाऊ दे....! आणि तू असा उद्धटासारखा प्रश्‍न विचारतोयंस...? अरे आयशी-बापसानं हेच शिकवलं का?''"
"बाबा, तुम्ही तर मला आज पहिल्यांदाच इथे आणताय. आणि बावनखणी म्हणजे काय?''
""अं...अरे ते बघ..ते बघ...तू आईस्क्रीम खाणार?''"
"नको. विषय बदलू नका.''"
"आता इथे उभं राहून निमूट गंमत बघ. इथे पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्याचीच खरी सर्कस आहे. बघ, कुठल्याही बाजूनं वाहनं सुटली, तरी बाजीराव रस्ता ओलांडणंच शक्‍य नाही. ते पांढरे पट्टे दिसताहेत ना, ते क्रॉसिंगसाठी नव्हे, गाड्यांच्या रेससाठीच असावेत, असं वाटतं ना?''"
"बाबा, इथे पोलिस नसतात का?''
""असतात ना...अरे, पुण्यातले वाहतूक पोलिस कर्तव्यदक्ष आहेत. ते नेहमी ड्युटीवर हजर असतात. पिवळ्या दिव्यावर गाड्यांना थांबायला लावतात. नाही थांबल्या, तर दंड घेतात. चिरीमिरी अजिबात घेत नाहीत. पण ते नसले, की असा गोंधळ होतो बघ...!''
""बाबा, ते कोपऱ्यात तंबाखू मळत, गप्पा मारत उभे असलेले पांढरा शर्ट, खाकी पॅंटमधले काका कोण आहेत? मघाशी इथे रस्त्यातच उभे राहून वाहनांना सूचना करताना बघितलं होतं मी त्यांना...!!''"
"अं....ते ना... ते...आपले ते हे...जाऊ दे. घरी चल!''

-------

Oct 2, 2007

शुद्ध काही जीवघेणे...

"शुद्ध' काही जीवघेणे...

---------
व्याकरण, भाषा, यांचा आग्रह अस्मादिकांना पूर्वीपासूनचा.
मी काही तर्कतीर्थ नाही, की भाषासुधारक वि. दा. सावरकर.
पण माणसानं निदान शुद्ध, व्यवस्थित, दुसऱ्याला समजेल, अशा सोप्या पण स्वच्छ भाषेत बोलावं, एवढा बरीक आग्रह.
किंबहुना, हट्टच.
(त्यामुळं गृहस्वामिनीशीबरोबरही अनेकदा समरप्रसंग ओढवतात. असो.)

पुण्याची भाषा अधिक शुद्ध, व्याकरणाग्रही, आदीम आहे, असा आमचा आपला पूर्वीपासूनचा ग्रह. पण पुण्यात दहा वर्षांच्या मुक्कामातला अनुभव जवळपास नैराश्‍यजनकच. आता, काही तज्ज्ञ मंडळी म्हणतील, बाहेरून आलेल्या (आमच्यासारख्या) लोकांनीच पुण्याची भाषा बिघडवली. पण मी हे बोलतोय हे पुण्यात राहणाऱ्या, म्हणून पुणेकर असलेल्या बाहेरच्या बुणग्यांविषयी नाही; तर ज्याच्या पिढ्यान्‌ पिढ्या पुण्यातच जन्मल्या (आणि खपल्या) आहेत, अशा अस्सल पुणेकर म्हणवणाऱ्यांबद्दल.

"तुम्ही येणार आहे काय,' हे मराठी व्याकरण मला पुण्यात आल्यावरच लक्षात आलं.
"तू येणार आहेस काय,' "तो येणार आहे काय' आणि "तुम्ही येणार आहात काय,' ही वाक्‍यरचना योग्य, असं आमचं आपलं मराठीचं दुबळं ज्ञान आम्हाला सांगतं.
पण "तुम्ही येणार आहे काय' ही आमच्या ज्ञानात भरच.

"सिंह' ( lion ) हा शब्द लिहिताना "सिंह' लिहायचा आणि "सिंव्ह' असा उच्चारायचा, अशी आपली आम्हाला पुस्तकातून, अभ्यासातून, शाळेतून मिळालेली शिकवण. पण पुण्यालाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला ज्याचा अभिमान असला पाहिजे, अशा सिंहगडाचा उच्चार अस्सल पुणेकरही "सिंव्ह'गड' नव्हे, तर "सिंह'गड असाच करताना पाहून, तानाजी नावाच्या नरसिंहाचे बलिदान व्यर्थ जाते की काय, अशीच शंका आमच्या मनाला (सिंहासारखी) चाटून गेली.

पाण्याची "टाकी' असते. पाण्याचं "टाकं' हा शब्द मला पहिल्यांदाच कळला.
पुठ्ठ्याचा खोका असतो. "खोकं'ही नवीन होतं.
माळावर वारा सुटतो. "वारं' मला न झेपणारं होतं.

बाकी तो लसूण की ती लसूण,
ती लसणीची चटणी, की ते लसणीचे तिखट.,
तो ढेकर की ती ढेकर,

तो लाईट की ते लाईट,

हे वाद तर आदीम आहेत. आणि त्यांना अंतही नाही. त्यांत मला पडायचं नाही. पण वानगीदाखल (वांगीदाखल) काही उदाहरणं दिली.

फुटाणे म्हणजे, साखर-फुटाणे.
इथे चण्यालाच फुटाणे म्हणतात.

आता यापुढची काही उदाहरणं अस्सल पुणेकराची नसतील, पण एकूण अनुभवावरची आहेत.
त्याबद्दल मी अस्सल पुणेकराला दोष देणार नाही.

वात आणणारे काही शब्द ः
(माझ्या मते) योग्य शब्द सुरुवातीला आणि त्याचं अपरूप शेवटी.
पोळी - चपाती
(अनेकवचनी) केस - केसं
किल्ली - चावी.
पेन्सिली/पेन्सिल्स - पेन्सिल्या
गटारे - गटारी
(एकवचनी) कारंजे - कारंजा
आमटी - डाळ
भात - राईस

--------------

आता, डोक्‍याची मंडई करणाऱ्या (हाही वाक्‍प्रचार पुण्यातलाच!) काही प्रश्‍नांची जंत्री

ः1. स्थळ ः अमृततुल्य हॉटेल कम टपरी. (इथे फक्त चहा आणि चहाच मिळतो. अगदी डोक्‍यावरून पाणी म्हणजे साधं बिस्कीट आणि क्रीम रोल.)
तिथे आपण एकटेच चहा प्यायला गेल्यावर, कळकटातला कळकट वेटर खुणेनंच विचारतो ः"एक' का?(म्हणजे बोटानं फक्त "एक'ची खूण. संभाषण नाहीच.)

अरे बैला, मी काय तुझ्याकडे "सुपरपॉवर रिन' विकायला आलोय? एकटा चहा प्यायला आलेलो दिसतोय ना? मग (शक्‍य असेल, तर बोटं बुडवून) चहाचा कप बोडक्‍यावर आपट, नाहीतर तोंडानं विचार ना! खाणाखुणा कसल्या करतोयंस?
---
2. स्थळ ः अस्मादिकांच्या सोसायटीचे पार्किंग, किंवा घराचा दिवाणखाना, किंवा कोणतीही जागा.
वेळ ः दुपारी अकरा, बारा, दोन किंवा तीन, चारपर्यंत कोणतीही.
समोरून कुणातरी परिचिताचे आगमन, किंवा फोनवरून संभाषण.
अगदी निरागस, प्रामाणिक विचारणा ः आज "सुटी' का?

पण त्याची ही निरागसता तळपायाची आग मस्तकाला नेऊन भिडवणारी.
अरे अकलेच्या खंदका! नतद्रष्टा! मी पत्रकार आहे! सकाळी उठल्यावर चहा ढोसताना तुला ज्या ताज्या बातम्या चवीचवीनं वाचायला आवडतात (आणि चॅनेलवरची एखादी बातमी त्यात रंगवून सांगितलेली नसली, तर तू शिव्या घालतोस,) त्यासाठी जोडे, लेखणी आणि की बोर्डची बडवाबडवी मला आणि माझ्या जमातीतल्या समस्त पोटार्थ्यांना रोजच करावी लागते. तुझ्यासारखं दहा ते सहा ऑफिस, मग निवांत घरी चहा-पोहे, पर्वती, रात्री साडेआठला वरणभात नाहीतर गुरगुट्या भात आणि पावणेदहापर्यंत गुडूप, असं सरळ, साधं, सोपं आयुष्य नाही आमचं! तुमच्या गरजेपोटी आम्हाला रात्री एकपर्यंत लोकांच्या कुलंगड्यांच्या उठाठेवी करत, सोमालियापासून हिरडोशी बुद्रुकपर्यंतची उष्टी-खरकटी आवरत बसावं लागतं. रात्री अकरा-बारा-एक कितीही वाजेपर्यंत उपाशी पोटी भरल्या घरच्या धन्यांच्या भाषणांच्या बातम्या देत बसावं लागतं.संध्याकाळी आणि रात्री ऑफिसमध्ये म्हटल्यावर सकाळी (आणि सकाळीच) मी घरी असणं अपेक्षित आहे ना? मग कशाला तेच तेच प्रश्‍न विचारून डोकं पिकवतोस?
---

3. तुम्ही "एडिटिंग' म्हणजे नेमकं काय करता? अग्रलेख पण तुम्हीच लिहिता का?

या प्रश्‍नावर त्या माणसासमोर लोटांगण घालणं किंवा स्वतःच्या डोक्‍याचे केस उपटून घेणं, याखेरीज दुसरा काहीच पर्याय नसतो.
असे हे काही प्रश्‍न.
काही शुद्ध, पण जीवघेणे!

यांतून सुटका बहुधा अस्मादिकांचे अवतारकार्य संपुष्टात येईपर्यंत तरी नाही!
-------------

Sep 30, 2007

ग्राफिटी नगरच्या भेटीला...

मित्रहो,

"ग्राफिटी'निमित्त मुलाखतींचे कार्यक्रम सध्या करतोय.
म्हणजे, मुलाखती देत फिरतोय.
आपल्याला काहीही वर्ज्य नाही...यशवंतराव, साधना कला मंच, हाउसिंग सोसायट्या, हळदीकुंकू, मंगळागौर, केळवण, डोहाळजेवणं...!!!
शनिवारी नगरला कार्यक्रम झाला. आमचे तिथले सहकारी अभय जोशी यांनीच आयोजित केला होता. तिथल्या उदय बुक एजन्सी या पुस्तकांच्या दुकानानं आयोजित केला.आदल्या दिवशी जायचं, सकाळी लवकर जाऊन नगर फिरायचं वगैरे मनसुबे अपेक्षेप्रमाणंच उधळले गेले. अखेर सहाच्या कार्यक्रमासाठी संध्याकाळी पाच वाजताच आम्ही नगरमध्ये पोचलो. चहा-पान (म्हणजे फक्त चहाच!) झाल्यानंतर सहाला कार्यक्रमस्थळी गेलो. सुरुवातीला चार-दोन टाळकीच होती, पण कार्यक्रम सुरू होईपर्यंत सगळा हॉल भरून गेला. दाराच्या बाहेरही काही लोक उभे होते.

मी बॅटिंग व्यवस्थित केली, लोकांचे हशे आणि टाळ्याही मिळवल्या. नगरकरांची गंमत करण्याची आणि खवचट प्रश्‍न विचारणाऱ्यांना तोंडावर पाडण्याची संधी सोडली नाही.प्रभाकर भोसलेनं त्याच्या ब्रशचे फटकारे ड्रॉइंग शीटवर ओढले आणि त्याची कला दाखवली. हा अगदी वेगळा प्रयोग छान रंगला. मजा आली.

आमच्या सह्या घ्यायलाही झुंबड उडाली होती. चाहत्यांचा प्रतिसाद पुण्यापेक्षा उदंड होता. मी वाचलेल्या सगळ्या ग्राफिटी त्यांना तोंडपाठ होत्या. आम्ही खरंच भारावलो. श्रीफळ (नारळ नव्हे!), पुष्पगुच्छ आणि छानसं पाकीटही मिळालं.जेवण खास नव्हतं, पण सीताफळाचं आईस्क्रीम भारी होतं. उशीर झाल्यानं काही खरेदीही करता आली नाही. रात्री 11 च्या गाडीनं दोनपर्यंत पुण्यात परतलो.

पुण्याबाहेरचा हा पहिला कार्यक्रम झकास झाला. आता सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर वगैरे ठिकाणच्या निमंत्रणांची वाट पाहतोय!
-आपल्याही शुभेच्छा हव्या आहेत!

Sep 23, 2007

हरिहरेश्‍वर महाराज की जय!

परवाच्या गणपतीच्या पोस्टला दणकून प्रतिसाद मिळाला. बऱ्याच जणांना कोकणातले अनुभव आवडले. आणखी लिहिण्याचा आग्रह झाला, म्हणून पुन्हा कीबोर्ड बडवाबडवी.
(टीप ः वरील विधानाशी या ब्लॉगचे वाचक आणि "कॉमेंट'दार सहमत असतीलच, असे नाही. असो. म्हणजे...."नसो.')

आरत्यांवरून आठवण झाली. आमच्या आजोळी, शिपोशीला (ऐकायला विचित्र वाटलं, तरी असं गाव आहे. शी-पो-शी. ता. लांजा, जि. रत्नागिरी.) कार्तिक नवमी ते पौर्णिमेपर्यंत हरिहरेश्‍वराचा उत्सव असतो. नुसती धमाल! उत्सव म्हणजे "जत्रा' बित्रा नाही. मोठमोठाले पाळणे, खेळ, स्वतःच्याच भयानक प्रतिमा दाखवणारे आरसे वगैरे नाही. अगदी हरिहरेश्‍वराच्या छोट्याशा देवळातला छोटासा, लहानगा, "ब्राह्मणी' उत्सव. पण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण.

किती वर्षांची परंपरा असेल, ठाऊक नाही, पण मी मात्र माझ्या लहानपणापासून अनुभवतोय. लहानपणी तर आम्ही पडीक असायचो शिपोशीत. मे महिन्यात आंबे-फणस-कैऱ्या-चिंचा-करवंदं-बोरं-जांभळं-आवळे खायला. आजीनं केलेलं आंब्याचं रायतं, तक्कू, कोयाडं, आमटी, साटं, सुकंबा, मुरांबा, खारवलेला आंबा, ताज्या फोडांची आणि सुकंबाची लोणची, फणसाची साटं, सांदणं, भाकऱ्या, गऱ्यांची कढी, आठिळांची भाजी आणि फणसाची साकटा भाजी, गऱ्यांची भाजी, मोरावळे, चटण्या, कोशिंबिरी...काय नि काय!शिवाय पोट फुटेस्तोवर आमरस आणि पडीचे-अडीचे-आंबे!असो. आंब्या-फणसांच्या दिवसांविषयी नंतर कधीतरी. सध्या फक्त हरिहरेश्‍वराच्या उत्सवाबद्दल.

हरिहरेश्‍वराचं म्हणजे शंकराचं अगदी फार देखणं नाही, पण नीटनेटकं मंदिर आहे शिपोशीत. आमच्या मामाच्या घरापासून एक नदी ओलांडून गेलं, की लगेचच मंदिर. आरत्या सुरू झाल्या, की रात्रीच्या शांततेत घरापर्यंत आवाजाची साद घेता येते. आरत्या हे तर सगळ्यात मोठं आकर्षण. दशावताराची आरती झक्‌मारेल, अशा एकेक भन्नाट आणि लंब्याचौड्या, उत्तमोत्तम आरत्या घुमायला लागल्या आणि त्यांच्या चालीवर घंटा घणघणायला लागली, की मन कसं डोलायला लागतं. बरं, एकजात सगळ्यांच्या आरत्या तोंडपाठ. आरत्या झाल्या, की भोवत्या.

भोवत्या (प्रदक्षिणा) म्हणजे नुसती धमाल. नवमी ते पौर्णिमा चढत्या क्रमानं भोवत्या. भोवत्या म्हणजे देवळाच्या बाहेरून पटांगणातून भजन गात मोठी प्रदक्षिणा म्हणायची. सगळ्यांच्या मागे पालखी. प्रदक्षिणा संपताना सगळ्यांनी देवळासमोरल्या मोठ्या पटांगणात रिंगण करायचं. मग वेगळाच अभंग घेऊन त्यावर लयबद्ध नृत्य. म्हणजे एक पाय पुढे, एक पाय मागे किंवा बसून, उकिडव्यानी, असलं अतिशय लयबद्ध आणि तालबद्ध नृत्य. मध्ये तालासाठी ढोलकीचा गजर. अभंग संपल्यावर तर नुसतंच ढोलकीवर नाचायचं. सोबतीला झांजांचा झंकार.
"राधे राधे' हा प्रकार म्हणजे ताक घुसळल्यासारखे हात करत दोन पावले पुढे, दोन मागे. आणि "ग्यानबा तुकाराम' तर घाम फोडणारा, भयंकर दमछाक करणारा आणि लयीचा आणि तालबद्धतेचा कस पाहणारा प्रकार. त्यातल्या सात स्टेप्स सगळ्यांच्या साथीनं बरोबर जमवणं, हे महाकठीण काम. मला आतापर्यंत एकदाच जमलंय.

शिपोशीची बहुतांश मंडळी मुंबई-पुण्यात स्थिरावली असली, तरी उत्सवाला हमखास हजेरी लावणार. आपला अभिनिवेश बाजूला ठेवून देवळातली सगळी कामं करणार. उत्सवातली नाटकं ही देखील एक मोठी मेजवानी. संगीत नाटकांचा शौक फार. मधुवंती दांडेकर, मोहन मुंगी, विजय गोखले, अशा मंडळींना आम्ही लहानपणापासून पाहत आलोय. या कलाकारांचा तिथला मुक्काम आणि सहवास याचं भलतंच आकर्षण असायचं.

उत्सवाच्या शेवटच्या रात्री उशिरापर्यंत भोवत्या आणि त्यानंतर पहाटेपर्यंत कीर्तन. मध्यंतरातला चुलीवरचा चहा म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद. कीर्तनाला आम्ही लहानपणी देवळातल्या कोपऱ्यात निद्रावस्थेत आणि थोडी शिंगं फुटल्यावर बरेचदा बाहेर उनाडक्‍या करतानाच सापडणार. पण त्यातही एक मजा असायची. मोठ्यांनी दामटून कीर्तनाला बसवायचं आणि आम्ही कारणं काढून तिथून सटकायचं, हा नेमच. शेवटच्या दिवशीच्या महाप्रसादाचीही मोठी रंगत. लांबच्या लांब पंगती आणि आग्रहानं वाढलेलं श्रीखंडाचं किंवा जिलबीचं जेवण! उदबत्त्यांचा सुगंध आणि रांगोळ्यांच्या पायघड्या.

चार वर्षांपूर्वी हरिहरेश्‍वराचा शंभरावा उत्सव झाला. लग्नानंतर मला तिकडे जायला जमलं नाहीये. यंदा मात्र दिवाळीनंतर जायचा बेत पक्का आहे. सध्या तरी.

--------

Sep 19, 2007

लेट्‌स एन्जॉय गणपती!


आज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. "शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूडच्या जंगलातला तो भयानक रस्ता. रात्री जाग आली, तर बाहेर किर्रर्र अंधार. पण एक बरं होतं, दणकून झोप लागली गाडीभर. स्वारगेट आल्यावरच कळलं. आजपासून पुन्हा कामाचा रामरगाडा सुरू.चार दिवस मजेत गेले.


कोकणात गेलो, की मन नेहमीच प्रसन्न होतं. कोकणातल्या गावांत, भटकंतीत जी मजा आहे, ती महाराष्ट्राच्या अन्य कुठल्याही भागात नाही. कोकणातल्या गावासारखं शांत, निवांत, निसर्गानं नटलेलं, प्रेमळ गाव एकतरी शोधून दाखवा अन्यत्र. बकाल स्टॅंड, उकिरडे, डुकरं, घाण, कचऱ्यांनी भरलेल्या गल्ल्या, बजबजपुरी तुम्हाला कुठेच दिसणार नाही. कोकणातही ही "परंपरा' आणू पाहणारे काही सन्माननीय अपवाद आहेत म्हणा, पण अगदीच तुरळक.घरीच गणपती असल्यानं वातावरण प्रसन्न होतंच. त्यातून लाडक्‍या लेकाला रोज काहितरी नवं, गोडधोड खाऊ घालण्यात माऊली चार दिवस व्यग्र होती. त्यामुळं लेकही धन्य आणि माऊलीही. जमलं, तर नैवेद्याचा वास मिळालेला गणपतीबाप्पाही.



लहानपणी आरत्यांची धमाल असायची. शेजारीपाजारी रात्री अकरापर्यंत सामूहिक आरत्या चालायच्या. इतर वेगळी गावावरून ओवाळून टाकलेल्या सर्वांना गणपतीच्या काळात मग फारच मानाचं स्थान मिळायचं. आरत्यांसाठी त्यांना निमंत्रणं जायची. उत्तमोत्तम प्रसादांची आमिषं दाखवली जायची. मग त्या बोलीवर तास-तासभर आरत्या चालायच्या. स्पष्ट उच्चार, चोख पाठांतर आणि खणखणीत आवाज (बामणाला दुसरं जमतंय काय?) यामुळं अस्मादिकांनाही गणपतीच्या काळात मागणी फार. पण हळूहळू चित्र बदललं. गणपतीची, आरत्यांची, प्रसादाची "क्रेझ' कमी झाली. आरत्यांची गर्दी हळुहळू विरळ व्हायला लागली, घरं रिकामी व्हायला लागली. माणसं एकटी पडायला लागली. सात दिवसांचे गणपती दीड दिवसांवर आले. एकमेकांकडे गणपती पाहायला जाणं, हा उत्साहाचा, भेटीगाठीच्या निमित्ताचा भाग न बनता औपचारिकता व्हायला लागली. टीव्हीच्या आक्रमणामुळं आरत्याही आटोपत्या घेतल्या जाऊ लागल्या, मोठ्या शहरांतल्या सार्वजनिक भव्यदिव्य देखाव्यांपुढं घरच्याच माणसांनी राबून केलेल्या पण सुबक, आकर्षक देखाव्यांची किंमत वाटेनाशी झाली.


हल्ली दरवर्षी गणपतीतल्या मुक्कामात हेच जाणवतं. मित्रांच्या भेटीगाठी होतात, लांब गेलेले गणपतीच्या निमित्तानं एकत्र येतात, एवढंच काय ते सुख.असो. आता पुण्यातल्या धुमाकुळाचा सामना करायचाय.


पुण्यातले देखावे मला आवडतात, पण दरवर्षी तोच गणपती रंगवून वापरणं, (हो, "वापरणं'च!) दिवसा देखावे बंद ठेवणं, गणेशभक्तीचा बडेजाव करणं, त्या जोरावर रस्ते अडवणं, उकरणं आणि देखावे पाहायला आलेल्या "पर्यटकां'ना "गणेशभक्त' वगैरे म्हणणं, याचा आपल्याला प्रचंड तिटकारा आहे.


...आणि हो! सोन्या-चांदीत-हिरेमाणकांत लपेटलेला (खरं तर घुसमटलेला) तुमचा तो दगडूशेठ हलवाई गणपती तर मला अजिबात "देव'बिव वाटत नाही. "देव' कसा हवा, सगुण, निराकार, शांत, प्रसन्न, निर्मळ, नैसर्गिक...एवढा "कृत्रिम' आणि "श्रीमंत' देव कसा असतो बुवा?


तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण कोकणातल्या साध्याच दोन-चार ढोलताशांच्या गजरात जी मजा आहे, ती मानाच्या मंडळांपुढच्या अफाट ढोलपथकाच्या शिस्तबद्ध वादनात नाही.


पण रात्र-रात्र चालणारी गणेश विसर्जन मिरवणूक आपल्याला प्रचंड "एन्टरटेन्मेंट' असते.


सो, लेट्‌स एन्जॉय गणपती!


-----