Mar 7, 2008

हा भार सोसंना!

याआधीच्या पोस्टवर एकपण कॉमेंट आलेली नाही. तरीही, नव्या जोमानं लिहायला बसलोय. आता तर कुणी कॉमेंट टाकली नाही, तर रोजच ब्लॉग लिहायची धमकी देईन मग! बसाल बोंबलत!

सध्या व्यायामाविषयी लिहावंसं वाटतंय. माझा अतिशय आवडीचा (टाळण्याच्या दृष्टीनं) विषय. "व्यायाम हा असा आयाम आहे, जो न करणं, हाच माझा नियम आहे,' अशी एखादी रद्दी "ग्राफिटी' मला स्फुरतेय. (एखादी म्हणजे? सगळ्याच रद्दी असतात!) असो.मी जवळपास 84 किलोचा ऐवज झालोय आता. तुम्ही समोरासमोर भेटलात, तर नाही जाणवणार, पण झालोय खरा. कदाचित सहा फुटांपर्यंतच्या उंचीमुळे जाडी झाकोळून जात असावी. झोकोळो बापडी. पण कमी तर होत नाही ना?

व्यायाम बियाम करून वजन कमी करण्याच्या तत्त्वावर माझा कधीच विश्‍वास नव्हता. किंबहुना, लग्नापर्यंत तशी वेळच कधी आली नव्हती. लग्नाआधी मी वजनाची साठी कधी गाठली नव्हती. "पाप्याचं पितर'च होतो मी. कुण म्हणायचं, जास्त पाणी पी. कुणी म्हणायचं, कार्लं-दोडका खा. कुणी म्हणायचं, जास्त खाऊ नको, तर कुणी न चावता न खाण्याचा सल्ला द्यायचं. प्रत्येकाच्या अकलेच्या उडीनुसार ते सल्ला द्यायचे. मला सगळ्यांचाच पटायचा आणि कुणाचाच पटायचा नाही. पण त्यानं मी जिवाला त्रास बिस करून घेतला नाही, आणि पोटभर खायचं सोडलंही नाही. एकतर खाण्याचा आणि भुकेचा काहीएक संबंध नाही, या तत्त्वावर माझा गाढा विश्‍वास. म्हणजे, समोर दिसलं की खायचं. त्यामुळं मला भूक लागलेय, असे प्रसंग जीवनात फारच क्वचित आले असतील. भुकेनं कासावीस वगैरे होणं तर आपल्याला बापजन्मात शक्‍य नाही!
अशी साथ असेल, तर जॉगिंगला
पहाटे सहालाच काय, चार वा.
कोण उठणार नाही?

पुण्यात आल्यावर कॉट बेसिसवर राहत होतो, तेव्हा सकाळी आंघोळादी आन्हिकं उरकून अण्णाच्या हॉटेलात मिक्‍स खिचडी नाहीतर मिक्‍स पोहे खाणारा लॉजवरचा मीच पहिला असायचो! एकतर नऊ वाजले की माझा भुकेनं जीव जायचा आणि बाकीच्यांसाठी थांबण्याचं शारीरिक आणि आर्थिक बळही नसायचं. कारण बाकीचे सगळेच कर्मदरिद्री! फुकट खायला मिळालं, तरच खाणारे. मग त्यांना कशाला उरावर घ्या? मी आपला एकटाच हादडून यायचो.तरीही जिवाला काही लागलं नाही. कदाचित, सगळ्याच टेन्शनमुळे असेल. मी मजेत असलो, तरी सुखा-बिखात नव्हतो. खाऊन-पिऊन सुखी असलो, तरी समाधानी वगैरे नव्हतो. बायको नावाचं प्रकरण माझ्या आयुष्यात आलं आणि आयुष्य बदललं. तिनं दिलेल्या प्रेमामुळे म्हणा, किंवा तिच्या हातच्या जेवणामुळे म्हणा; चांगला भरगच्च झालो. बाळंतपणात तिच्या जाडीवरून चिडवता चिडवता एके दिवशी मीच गोल-गरगरीत दिसायला लागलो आणि डॉक्‍टर मित्राकडे सहज गेलो असताना, त्यानं जबरदस्तीनं वजनकाट्यावर चढायला लावलं. 84 किलो! माझ्यासकट तो तीन ताड उडाला."अभ्या, वजन कमी कर लेका! मरशील अशानं. जिना चढला, तरी दम लागत असेल तुला!' अशी आर्त किंकाळी त्यानं ठोकली.पण मी त्याच्या बापाला दाद देणारा नव्हतो.एकतर, त्याच्या वैद्यकीय गणिताप्रमाणं माझ्या उंचीनुसार माझं वजन 74 किलो असायला हवं. ते मी कधीही करू शकतो, असा माझा दावा आहे. फक्त त्यासाठी वेळ देऊन पोहायला किंवा चालायला जायला हवं. तेच काही जमत नाहीये.



इन्स्ट्रक्‍टरही अशी असेल, तर
जिमचे पैसे वसूल!

दुसरं म्हणजे, मला जिना चढून दमबिम लागत नाही. पर्वतीही मी एका न थांबता चढतो आणि ट्रेकला
तर कुठेही, कधीही जातो. हल्ली पूर्वीपेक्षा थोडी जास्त फासफुस होते, एवढंच.व्यायामाचे थोडेफार प्रयत्न केले. नाही असं नाही. पण त्रास खूप आहे हो! मध्यंतरी योगासनं शिकलो. पण क्‍लास संपल्यावर ती बोंबलली. सायकल विकत घेतली, ती चोरीला गेली. आता दैवच मला साथ देत नाही, तर मी जायचं कुठं?तरीही, वजन कमी करायला हवं आणि नियमित व्यायामही करायला हवा, हे खरंच. पण खूप कष्ट आहेत हो! पहाटे उठा, शरीराला श्रम द्या, बूटबिट घ्या, पैसे घालवा!कोण करणार हे सगळं?
----------

Mar 3, 2008

सारखं छातीत दुखतंय!

या नावाचं एक झकास नाटक आहे.मला त्याविषयी बोलायचं नाहीये. मी माझ्या खर्‍याखुर्‍या छातीत दुखण्याविषयी सांगणार आहे.
गेल्या आठवड्यात एके दिवशी भल्या पहाटे सात वाजता उठलो, तो छातीतलं दुखणं घेऊनच. (म्हणजे, तसं, कॉलेजात, कोवळ्या वयात झालेल्या आणि ह्रुदयाला कायमच्या झालेल्या अनेक भळभळत्या (आणि भलभलत्या) जखमा रोजच त्रास देत असतात, पण तो विषय वेगळा. ते प्लटोनिक दु:ख म्हणा हवं तर!) खरंच माझ्या छातीत दुखत होतं. उभं राहिल्यावर कळ मारत होती, आणि झोपल्यावर तर ती सहन होत नव्हती. (बायको सोडून) तसा कुणाच्या बापाला न घाबरणारा मी जरासा टरकलोच. म्हटलं आधीच या ८४ किलोच्या अवजड देहाचा भार थोडासा हलका करा, म्हणून काही डॉक्तरांनी आणि नतद्रष्ट मित्रांनी दिलेला सल्ला! त्यात हे निमित्त! संपल आता आपलं ऐशोरामी आयुःय! अभिजितराव, उद्यापासून ५ वाजता उठून प्राणायाम-योगासनं वगैरे सुरू करायला लागणार!

त्यातून बायको हा प्राणी आधी स्वतह घाबरण्यासाठी आणि नंतर दुसर्‍याला घाबरवण्यासाठीच असतो ना!``काही सिरियस तर नसेल ना? आजच डॉक्तरांकडे जाऊन ये.'' आमच्या आदरणीय आणि परमप्रिय अर्धांगिनीचा अर्धांग वायू होईल, असा सल्ला. (म्हणजे ही विम्याच्या पैशांचा हिशेब करायला मोकळी!)मग सकाळीच डॉक्टरांच्या दवाखान्याचे उंबरे झिजवणं आलं! त्यांनी तपासून `अगदी किरकोळ मस्क्युलर पेन आहे' वगैरे सांगितलंच, पण वर आपला एक सुरक्षिततेचा उपाय म्हणून ई.सी.जी. करून घ्या, अशी मेखही मारून ठेवली.

झालं! पुन्हा टेन्शन! काय होईल नि काय नाहीए!शेवटी एका नरससमोर अर्धनग्न होउन (शर्ट काढून...ते कंपल्सरी असतं! इच्छा-अनिच्छेचा सवाल नाही!) छातीला कसल्या-कसल्या त्युबा चिकटवून आणि घाणेरडं, चिकट, बुळबुळीत रोगण लावून ई.सी.जी. करून घेतला.दोण दिवसांनी रिपोर्ट आणला. सगळं काही नॉर्मल होतलं, असं डॉक्टरांकडे जाऊनच कळलं.
निघताना डॉक्टर म्हणाले, `या रिपोर्टची झेरॉक्स काढून ठेवा. म्हणजे, नंतर कधी पुन्हा ई.सी.जी काढाल, तेव्हा तो याच्याशी ताडून पाहता येइल.

मी `तथास्तु' म्हटलं, आणि बाहेर पडलो!

Feb 23, 2008

चित्रपटयात्रा!

पुन्हा एकदा आमच्या लाडक्‍या मनस्वीवरचा लेख.

तसं तिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जावंसं कायमच वाटत असतं, पण दरवेळी ते शक्‍य होत नाही. काही वेळा नाइलाजानं न्यावं लागतं, तर काही ठिकाणी तिला नेलं नाही, तर चुकचुकायला होतं. गेल्या वर्षी मलेशियाला गेलो होतो, तेव्हा हर्षदा (माझी लग्नाची, अधिकृत बायको) आणि मनस्वी बरोबर असायला हवी होती, असं वाटलं होतं.

तरीही मनस्वीला एकट्यानं मी अनेक ठिकाणी फिरवत असतो. एकदा आम्ही दोघंच कात्रज सर्पोद्यानातही दिवसभर धमाल केली होती.

पिक्‍चरला मनस्वी आणि मी दोघं जाणं आता काही नवीन राहिलेलं नाही. पहिल्या "चक दे इंडिया', "हनुमान रिटर्न्स'पासून अगदी "जिंकी रं जिंकी', "पटलं तर घ्या', "वादळवारं सुटलं गं'पर्यंत तिनं मला साथ केली आहे. थिएटरची रेंजही अफाट आहे. सिटीप्राईडपासून अलका, प्रभात, "विजय'पर्यंत! (मी स्वतः सिनेमाच्या आवडीपायी अगदी "निशात', "भारत', "अल्पना', "सोनमर्ग' वगैरे थिएटरही पचवू शकतो, ही गोष्ट अलाहिदा! तरीही, "अप्सरा'त पायधूळ झाडायचं राहिलंय अजून!) तर, सांगायचा मुद्दा काय, की आजही तिला घेऊन गेलो होतो, "बाबा लगीन' बघायला. अभिराम भडकमकर लेखक-दिग्दर्शक. पण पिक्‍चर बोअर होता. आधी मनस्वी इडली खाऊन गेली होती. पिक्‍चरही बोअर असल्यानं जरा कंटाळली होती.

थिएटरमध्ये चिझलिंग, द्राक्षं वगैरे खुराक झालाच. नंतर इंटरव्हल झाल्यावर मला वाटलं, नेहमीप्रमाणे कंटाळून घरी चला म्हणेल. पण मलाच म्हणते, "बाबा, पुन्हा लागणारेय सिनेमा.' मग इंटरव्हलमध्ये शेंगदाणे घेतले. तिच्या हट्टापायी ""मिरिंडा'ही घेतलं. तेच चुकलं. आधी रसही प्यायला होता, त्यातून वर दाणे खाल्ले होते. "मिरिंडा' बाधलं आणि तिला उलटी झाली. मग आमचा पिक्‍चर बोंबललाच! फारसा बघण्यासारखाही नव्हता, त्यातून निमित्त मिळालं.

तिला स्वच्छ करून घरी जाण्यासाठी बॅग घ्यायला थिएटरच्या अंधारात पुन्हा घुसलो, तर आमची जागाच सापडेना. अंधारात बॅगही दिसेना. शेवटी कशीबशी सापडली आणि निघालो. रिकाम्या खुर्च्यांच्या मधून जाताना तोल जाऊन जरासा कोसळलो. मनस्वीलाही कुठेतरी चेमटलं. मग तिनंही भोकाड पसरलं. बाहेर पार्किंगमध्ये येऊन पाहतो, तर मनस्वीचा गॉगल पिशवीत नव्हता. मग तो शोधायला पुन्हा अंधारात घुसलो. त्या अवस्थेतही तिची विनोदबुद्धी (!) शाबूत होती. (बापावर गेलेय कार्टी!) मला म्हणते, "सारखं इकडून तिकडे-तिकडून इकडे. इकडून तिकडे-तिकडून इकडे!'

मी हसू दाबलं.

आम्ही प्रयत्न करून, किंवा शेजारच्यांनी मदत करूनही गॉगल सापडला नाही.
"बाबा, मोबाईलनं पकाश पाडा ना!' असा अनाहूत सल्लाही मनुताईंनी दिला.
शेवटी गॉगलचा नाद सोडून आम्ही बाहेर आलो. जाताना डोअरकीपरजवळ निरोप ठेवावा आणि त्यांना गॉगल सापडल्यास पुन्हा येऊन घेऊन जावा, असा विचार होता. म्हणून त्यांना सांगायला गेलो, तर तेच आमच्याबरोबर पुन्हा शोधायला आले.पुन्हा एकदा शोधमोहिमेचा सोपस्कार पार पडला.मग आम्ही "जाऊ दे तो गॉगल' म्हणून बाहेर आलो.

गाडीपाशी आलो आणि पिशवी ठेवायला डिकी उघडली तर काय! गॉगल डिकीत होता...!!
जाताना मीच तो तिथे ठेवला होता...आठवणीनं!

असो.

एवढ्या गदारोळातही मनस्वीला कपडे बदलून पुन्हा पिक्‍चर बघायला यायचं होतं. पिक्‍चर कितीही सुमार असला, तरी शेवटपर्यंत बघायचाच, हा तिचा पण होता. (पुन्हा एकदा) बापावर गेलेय कार्टी!
वर मला म्हणते, "बाबा, अहो, त्या काकांना सांगूया ना, गॉगल सापडला म्हणून!'
मी कपाळावर हात मारला.

तेवढ्यात ते डोअरकीपर काका समोर आलेच.
"कुठे सापडला गॉगल?' त्यांनी विचारलं.
प्रामाणिक व्हायचं मी जाणुनबुजून टाळलं. येताना वाटेत सापडल्याचं सांगितलं.
नशीब, आमची निरागस लेक काही बरळली नाही तिथे!

अशी आमची चित्रपटयात्रा घडली. मग घरी येऊन गुमान झोपलो.

पुढच्या वेळी मनस्वीला एकटीला सिनेमाला घेऊन जायचं नाही, असा निश्‍चय केलाय.

बहुधा, तो मोडेपर्यंत तरी टिकायला हरकत नाही...!

-------------

Feb 21, 2008

केमिकल "लोच्या'

संपतराव नुकतेच उठून मागल्या दारी मशेरी लावत बसले होते, तोच रंग्या तिरमिरत, धडपडत संपतरावांच्या नावानं बोंबलत तिथं आला.
""काय रे, सकाळीच तडमडलास? काय आभाळ कोसळलं की काय?''
रंग्याला धावून धाप लागली होती. कुत्र्यासारखा जीभ बाहेर काढून धापा टाकत होता. बोलताही येत नव्हतं. पाटाचं घोटभर पाणी प्याला आणि पुन्हा जीभ बाहेर काढली.
""अरे, जीव जाईस्तो धावायला सांगितलं कुणी तुला? काय झालंय काय एवढं?''
'"पाटील, अवो, आभाळच कोसळलंय. पण माज्या नव्हं, तुमच्या डोक्‍यावर!'
"काय सकाळी सकाळी ढोसलीस काय तू? डोस्कं ठिकाणावर आहे का तुझं?''
""माझं हाये. पण आता तुमचं ऱ्हाईल का बघा, हे वाचल्यावर!'' रंग्यानं हातातला ताजा पेपर संपतरावांसमोर नाचवला."
"अरे, आलंय काय एवढं त्यात?'' धोतराच्या सोग्याला तोंड पुसत संपतराव त्याच्याकडे वळले. ""ऐकलं का ओ, चहा टाका...!''"
"चहाचं राहू द्या संपतराव! सध्या हे बघा. पहिल्या पानावर छापलेय त्या बयेनं. तुमची अब्रूच काढलेय जनू!''
आता संपतरावांची झोप पुरती उडाली. रंग्याच्या हातातनं त्यांनी पेपर हिसकावूनच घेतला. पहिल्या पानावरचा मजकूर बघून भर थंडीत त्यांना घाम फुटला.
"काल रात्री ह्यांच्या हातून चूक घडली. पण मला मूल नकोय. आता काय करू?' असा काहीतरी मजकूर होता. सोबत एका बाईचा फोटो होता. खाली इंग्रजीमध्ये काहीबाही लिहिलं होतं. संपतरावांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. (लक्ष देऊन कळणार कुणाला होतं?)
"अरं रंग्या, काय झालं हे?''
त्यांचा चेहरा एकदमच पडला. अस्वस्थपणानं ते येरझाऱ्या घालायला लागले.
""नाय तर काय वो? तुमच्या मर्जीतली होती ना ती बाई? तालुक्‍यातल्या मित्राच्या ओळखीनंच गेला होतात ना तिच्या कार्यक्रमाला? मग असं कसं होऊन बसलं? आणि तुमाला काही पत्त्याच नाही लागला?''
""गप रे जरा! हळू बोल. आत वहिनी आहेत....पण असं काही झालेलं मला तरी आठवत नाही. आणि त्या बाईनं तरी डायरेक्‍ट पेपरात कशाला छापायचं हे प्रकरण? तेही लगेच एका दिवसात?''"
"संपतराव, या बाया ना, अजिबात भरोसा ठेवण्यासारख्या नसतात. तुमी उगाच भुललात. नको म्हणत असताना जास्त घेतलीत आणि आता गफलत करून बसलात.''"
"जळलं तुझं तोंड! जरा चांगलं बोल की. तसलं काही केलेलं मला आठवत नाहीये. मी एकतर जास्त धुंदीत होतो. तरीपण असं काही झालं असेल, असं मला वाटत नाही. पण आता काय करायचं?''
"तुमी काळजी करू नका. एवढी वर्सं मीठ खाल्लंय तुमचं. त्याला जागीन मी. करतो काहीतरी उपाय.''"
"बघ बाबा. आता तूच मला वाचव यातनं. पेपरमधला त्या बाईचा फोटो बघितल्यापासून मला तर काही सुचतच नाहीये. वाट्टेल ते कर, पण यातनं आपण बाहेर पडलं पाह्यजे. पुढच्या महिन्यात निवडणूक आहे. काही झेंगट नकोय आपल्याला!''
"बरं ठीकाय. चहा घेऊन लागतोच कामाला...'' इति रंग्या."
"चुलीत घाल तो चहा! जा आधी!'' संपतराव डाफरले तसा रंग्यानं नाइलाजानं काढता पाय घेतला.
संपतरावांनी मग चहाऐवजी तो पेपरच चुलीत घातला. त्या मजकुराचं कात्रण तेवढं सदऱ्याच्या आतल्या बाजूच्या खिशात घालून ठेवलं
....
रंग्या जो तोंड घेऊन गेला, तो एकदम दुपारीच परतला.संपतरावांच्या तोपर्यंत जिवात जीव नव्हता. कसेबसे दोन घास त्यांनी पोटाखाली ढकलले होते. पण अन्न गोड लागलं नव्हतंच.काल संध्याकाळी मित्राच्या आग्रहास्तव ते तालुक्‍याला गेले होते. तिथं मित्रानं त्याच्या ओळखीतून एका सिनेमानटीची नाचगाण्याची मैफल ठेवली होती. तिथं संपतरावांना जरा जास्तच झाली होती. बस्स...! एवढंच आठवत होतं त्यांना. आणखी काहीच आठवत नव्हतं. पेपरातून आपली बदनामी करणाऱ्या या बाईला शोधावं कुठे, हाही प्रश्‍नच होता. कुणाला सांगायचीही चोरी झाली होती.
संपतरावांनी बसल्याबसल्या तालुक्‍यातल्या आपल्या मित्राला फोन लावला. पण तो "आऊट ऑफ रेंज' होता. संपतरावांची अस्वस्थता आणखी वाढली.रंग्या आल्यावर त्यांनी दाणकन त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. रंग्या जरा कळवळलाच.
"संपतराव, तुमच्यासाठीच मी पण पोटात अन्नाचा कण नसताना वणवण करतोय आणि तुमी माझ्याच जिवावर काय उठलाय?''रंग्या पाठ चोळत म्हणाला. तसे संपतराव जरासे वरमले.
"अहो, या बाईला "तू मराठी', "शी टीवी' का कुठल्यातरी टीवीवर कारेक्रमात बघितल्याचं म्हनत होत्या गण्या शिंपी. लखू लोहाराला पन काय माहित नवतं यातलं. फूलवाल्या तुळसाला पन विचारून बगितलं. पन तिनं बी बघितलेली नाई ही बाई कुठं.""
अरे देवा! म्हणजे या बाईचा पत्ता काढण्याच्या नादात रंग्यानं अख्ख्या गावभर बोभाटा केला की काय?संपतरावांच्या कपाळावरच्या आठ्या आणखी वाढल्या.
रंग्याला काहीच न बोलता त्यांनी आल्या पावली पिटाळून दिलं. या वेळी तरी चहा मिळेल, ही त्याची आशाही फोल ठरली
....
शेवटी एकदाचा बऱ्याच प्रयत्नांनी तालुक्‍याच्या मित्राचा फोन लागला. पण तो कुठल्या तरी राजकीय मीटिंगमध्ये होता. त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. बहुधा पक्षाच्या शिस्तपालन समितीची बैठक होती. बराच गोंधळ चालला होता. कान फुटायची वेळ आल्यावर संपतरावांनी रागानंच फोन आपटला
....
दिवसभर संपतराव घराबाहेर पडले नाहीत, की घरातही कुणाशी काही बोलले नाहीत. बायकोचं तर त्यांनी सकाळपासून तोंडही बघितलं नव्हतं. तिच्यासमोर जायची भीतीच वाटत होती त्यांना. काल आपल्या हातून असं विपरीत कसं घडलं आणि आपल्याला एवढीही शुद्ध कशी राहिली नाही, याची ठसठस त्यांना लागली होती.
संध्याकाळ झाली, तरी संपतराव आपल्या खोलीत अंधारात बसून होते. आता आपलं, आपल्या राजकीय कारकीर्दीचं कसं होणार, याची चिंता त्यांना खात होती. संध्याकाळच्या राजकीय गटाच्या बैठकीलाही ते गेले नाहीत. संपतरावांची बायको सावित्री संध्याकाळी त्यांना बोलवायला खोलीत आली.
"चला, जरा देवळात जाऊन येऊ. गणपतीला निवेद दाखवायचाय.''"
"अगं निवेद कसला दाखवतेस? इथं आयुष्याचं मातेरं व्हायची वेळ आलेय माझ्या!'' संपतराव डाफरले.
"अवो, असं काय बोलायचं ते तिन्हीसांजेला? लक्ष्मी घरात यायची येळ ही. जरा शुभ बोला की!''
"तू जा गं! माझं डोकं ठिकाणावर नाहीये. मला त्रास देऊ नको.''
"आज काय झालं? काल तर एवढं शान्यासारखं वागत होतात. डोकं दुखतंय म्हणून संध्याकाळी लवकर झोपलात आनि जेवलात पन नाही. तुमी चांगले वागायला लागलात, म्हणून गणपतीची पूजा करायची होती मला!''
"काय?'' संपतराव तीन ताड उडालेच!
"म्हणजे, मी काल इथेच होतो? कुठे गेलो नव्हतो? माझं डोकं दुखत होतं म्हणून लवकर झोपलो?''"
"अहो हो. खोटं सांगतेय का मी?''"
"बरं येतो मी. तू हो पुढे.'' संपतरावांनी सावित्रीला कसंबसं कटवलं....
म्हणजे आपण काल तालुक्‍याहून लवकर घरी आलो? घरीच होतो संध्याकाळपासून? त्या बाईचं काय मग? तिनं पेपरात अशी बोंब का ठोकली? ते प्रकरण अंगाशी तर येणार नाही ना?विचार करून करून संपतरावांचं डोकं फुटायची वेळ आली. तालुक्‍याच्या मित्राला फोन करावासा वाटला, पण तो विचार बदलला. तेवढ्यात फोन खणखणला. त्या मित्राचाच होता.
"संपतराव, काय म्हणत होता तुम्ही दुपारी? कशाला फोन केलता मला?''""अरे, माणूस मेल्यावरच चौकशीला जाशील तू त्याच्या. माझा जीव इथे टांगणीला लागला होता. त्या बाईचं काय झालं? तिनं पेपरात काय छापलंय, वाचलंस का तू?''"
"कोण बाई?''"
"अरे भुसनळ्या, ती नटी-बिटी कोण आहे ती! तुझ्याबरोबर आपण गेलो होतो ना ती!''"
"काय चेष्टा करताय संपतराव! अहो, तुमच्यासाठी तिचा कार्यक्रम ठरवला अन्‌ तुमची पाचावर धारण बसली. कुणीतरी बघेल म्हणून तुमी दारातूनच पाय लावून पळालात राव. आन्‌ आमचीच चेष्टा करताय होय?''"
"काय सांगतोस? म्हणजे मी आलोच नव्हतो मैफलीला? मग मला आठवतंय ते काय? ती नटीबिटी?''"
"हां...संपतराव, तुमच्या पण डोक्‍यात "केमिकल लोच्या' झालेला दिसतोय, त्या मुन्नाभाईसारखा. त्याला जिकडेतिकडे गांधीजी दिसत, तुम्हाला ती बाई दिसतेय. माणसानं एखाद्या गोष्टीची भीती घेतली ना, की मेलाच तो!''
आता संपतरावांच्या डोक्‍यात ट्यूब पेटली. म्हणजे बाईच्या मैफलीला जायचं त्यांनी कबूल केलं होतं, पण तिकडे गेलेच नव्हते. तालुक्‍याला जाऊन तसेच परत आले होते ते. वर डोकं भणभणत होतं म्हणून झोपीही गेले होते. त्या बाईकडची मैफल, त्यानंतर आपला तोल गेल्याचं अंधूक अंधुक आठवणं, सगळे मनाचेच खेळ होते त्यांच्या.
"अरे, मग त्या पेपरातल्या फोटोचं आणि त्या बाईनं ठोकलेल्या बोंबेचं काय?'' त्यांनी मनातली शंका मित्राला विचारली.
"कशाबद्दल बोलताय तुम्ही संपतराव? पहिल्या पानावर आलंय त्याच्याबद्दल? अहो, पाळणा लांबवण्याच्या गोळ्या वगैरे ऐकलंय का तुम्ही कधी? त्याची जाहिरात आहे ती! हे जाहिरातवाले आपला माल खपवण्यासाठी काहीही आगाऊ जाहिराती करतात हल्ली! तुम्हाला काय वाटलं त्यात?''"
"काही नाही...सहज विचारलं...'' आपली फजिती संपतरावांनी मित्राला कळू दिली नाही. उगाच होत्याचं नव्हतं करून सांगणाऱ्या रंग्यालाही जिथं असेल तिथं जाऊन बडवावं, असं मनात आलं त्यांच्या.
काही न बोलताच त्यांनी फोन ठेवून दिला.बायकोला हाक मारली.
"अहो, ऐकलं का, आम्ही पण येतोय देवळात. एक नारळ पण घ्या बरोबर. देवाला वाहू जोडीनं!''
-----

Feb 16, 2008

उद्‌घाटन, नको रे बाबा!-----------

बाबूराव पाटील म्हणजे अवली माणूस. गोंधळे बुद्रुक गावाचे सरपंच; पण रुबाब पंतप्रधान असल्याचा. अडल्यानडल्याची कामं करतील, पण प्रत्येक ठिकाणी मिरवायला मिळालं तर!

लग्न असो, मुंज असो, साठी-पंच्याहत्तरी असो की श्राद्ध; बाबूरावांना काही वर्ज्य नाही. श्रद्धांजली सभेतही असं भाषण ठोकणार, की निवडणुकीच्या प्रचाराची सभा आहे की काय, असंच वाटावं.

या अतिउत्साहापायी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यातही बाबूराव पटाईत. कधी तोंडघशी पडतील, याचा नेम नाही. बरं त्याचं यांना सोयर ना सुतक. आजूबाजूची मंडळीच खजील व्हायची. बाबूराव मात्र जय की थय!

एकदा काय झालं, गावातल्या कुणातरी मान्यवराचं दुःखद निधन झालं होतं. दुसऱ्या दिवशी श्रद्धांजली सभा होती. आता राजकारणातच लुडबूड करणारं कुणीतरी म्हातारं गचकलं होतं, त्यामुळं बाबूरावांना आणखी चेव आला होता. बाकीच्यांच्या श्रद्धांजल्या संपून आपल्याला भाषणाची संधी मिळेपर्यंत बाबूरावांना धीर नव्हता. शेवटी एकदाची त्यांची भाषणाची वेळ आली. धोतरबितर सावरत बाबूराव मध्यभागी पोचले. चांगलं पल्लेदार भाषण ठोकलं. गेलेल्या माणसाचे कधीच न पाहिलेले, जाणवलेले अनेक गुण त्या वेळी उपस्थितांना कळले. (श्रद्धांजली सभांच्या वेळी बऱ्याचदा असंच होतं ना?) बाबूराव भाषणाच्या ओघात असंही म्हणून गेले, ""तर, असं सगळं महान काम करणाऱ्या आमच्या गणपतरावांसारखा दुसरा पुढारी होणार नाही. त्यांनाच यंदाच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा!''तिथं असणाऱ्यांची तोंडं पाहण्यासारखी झाली. काही जणांची तर हसून हसून मुरकुंडी वळली.
बाबूरावांचा बंदोबस्त कसा करायचा, याचीच सगळ्यांना चिंता लागून राहिली होती. बाबूरावांना आवरायला तर हवं होतं, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी?गोंधळे बुद्रुकला सरकारी योजनांचंही अलीकडे वावडं नव्हतं. कुठलीही नवीन सरकारी योजना आली, की आपल्या गावात ती सगळ्यात आधी पोचली पाहिजे, असा बाबूरावांचा कटाक्ष होता. एकदा तर "पल्स पोलिओ'ची लस त्यांनी बायाबापड्यांसकट म्हाताऱ्याकोताऱ्यांनाही घ्यायला लावली होती आणि नसबंदी शिबिराच्या मोहिमेचे शाळेत बोर्ड लावले होते.
गावातली हागणदारी मुक्त करून "सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृह' बांधण्याची योजना सरकारनं जाहीर केली. मुळात ज्या ठिकाणी जाऊन अंगातली घाण निस्तरायची, त्याला "स्वच्छतागृह' कसं म्हणायचं, असाच प्रश्‍न गावातल्या सगळ्यांना पडला होता. पण बाबूरावांनी त्याचं निराकरण केलं. शेवटी "शरीराची स्वच्छता करण्याचं ठिकाण', असा सगळ्यांनी अर्थ काढला. पण मग तिथे जाऊन आंघोळ का करायची नाही, या बायाबापड्यांच्या प्रश्‍नाला बाबूरावांनी सफाईनं बगल दिली.

स्वच्छतागृहाच्या उद्‌घाटनासाठी बाबूरावांनी जंगी तयारी केली होती. एकतर आपण करून आणलेलं किंवा न आणलेलं कुठलंही काम असलं, तरी बाबूरावांचा आब बघण्यासारखा असे. त्यातून हे तर गावाच्या स्वच्छतेचं, कल्याणाचं काम. बाबूराव पेटलेच होते. रांगोळ्या, पायघड्या, सनई-चौघडे, फटाके, सगळी जय्यत तयारी होती. स्वच्छतागृहाचं उद्‌घाटन आहे, की एखादं संमेलन, हेच कळत नव्हतं. कुठल्याही गोष्टीचं उद्‌घाटन करायचं, म्हणजे तिथं प्रत्यक्ष तो अनुभव घ्यायचा, हा हिशेब बाबूरावांच्या डोक्‍यात पक्का. त्यामुळं मटण शॉपचं उद्‌घाटन मटण खाऊन, या तत्त्वानुसार केशकर्तनालयाचं उद्‌घाटन केस कापून घेऊन, देवळाच्या जीर्णोद्धाराचं उद्‌घाटन पूजा करून, हे ठरलेलं होतं. तसंच, स्वच्छतागृहाचं उद्‌घाटन ज्या उद्दिष्टासाठी ते बांधलं होतं, ते उद्दिष्ट साध्य करूनच बाबूरावांनी पार पाडलं.

बाबूरावांचा हा "धुमाकूळ' आता आवरणं आवश्‍यकच झालं होतं. गावातल्या जुन्या जाणत्यांची आणि तरुण तुर्कांची बैठक झाली. बाबूरावांच्या "उद्‌घाटनरोगा'ला कंटाळलेले त्यांचे समर्थकही त्यात सामील झाले. त्यांनी मिळून एक योजना आखली. बाबूरावांच्या डोक्‍यातलं खूळ कायमचं उतरवण्याची.ठरल्याप्रमाणे बेत आखण्यात आला. एका नवीन इमारतीचं उद्‌घाटन करायचं होतं. इमारत पूर्ण होईपर्यंत बाबूरावांना खबर लागू देण्यात आली नाही. तयारी पूर्ण झाल्यावर गावकऱ्यांनी बाबूरावांना घरी जाऊन निमंत्रण दिलं. उद्‌घाटनाचं निमंत्रण म्हटल्यावर बाबूराव एका पायावर तयार झाले. त्यांच्यासाठी गाडी पाठवण्यात आली.
बाबूराव आणि दोघे-चौघे तयारी करून त्या ठिकाणी अगदी वेळेवर पोचले. बघतात तो काय, सगळा गावच तिथे जमा झाला होता. बाबूरावांच्या वाऱ्यालाही कधी न उभे राहणारेही मोठ्या उत्साहात तिथे आले होते. बाबूरावांना हे गौडबंगाल कळेना. आपली लोकप्रियता वाढलेली दिसतेय, एवढाच समज त्यांनी करून घेतला.सनई-चौघडे वाजू लागले आणि इमारतीची फीत कापण्यासाठी बाबूरावांच्या हाती कात्री देण्यात आली.

सोपस्कार उरकून, फोटो-बिटो काढून बाबूराव मोठ्या ऐटीत आत शिरले. आत बघतात तो काय, कुणाच्या तरी मरतिकाची तयारी चालली होती. पिंड-बिंड लावले होते. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, पण कुणाला विचारायची सोय नव्हती. बाबूराव पुढे चालत राहिले. मागे गावकऱ्यांचा जथा. आणखी आत गेल्यावर मोठ्या गुहांसारखी दोन ठिकाणं होती. भक्कम दारांनी त्यांची तोंडं बंद केली होती. बाबूरावांना आता स्वस्थ बसवेना.

"गण्या, अरे काय आहे हे?' त्यांनी एकाला विचारलं.

"बाबूराव, अवो, आपल्या गावात चांगली मसणवट नव्हती ना! कुठंतरी लांब जावं लागायचं मरतिकाला. आता सरकारनंच ही सोय केलेय. इलेक्‍ट्रिक मरतिकाची! या गुहेत एकदा बॉडी ठेवली, की दोन मिनिटांत खेळ खल्लास! अस्थी जमा करणं नाय, अन्‌ काय नाय. सगळं झट की पट!'

बाबूराव जागच्या जागी खाली बसले. थोडं पाणी प्याल्यानंतर भानावर आले.

"अरे, स्मशानाचं उद्‌घाटन? आणि माझ्या हस्ते? काय अवदसा आठवली ही तुम्हाला?'"

"हां बाबूराव...! अवो, तुम्ही आमचे नेते. गावचे पुढारी. तुमच्याशिवाय कुणाला बोलवायचं? आता हार नाय मानायची. तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतः अनुभव घेता ना! मग आता इथं मागं नाय हटायचं. इथं पन प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघितलाच पायजे. अवो, इज्जतीचा प्रश्‍न हाय तुमच्या!'' गण्यानं भरीला घातलं.


बाबूराव आता लटलट कापायलाच लागले. कुणाशी काही बोलायचीही त्यांची हिंमत राहिली नाही. मागल्या पावली जी धूम ठोकली, ते पुढे कुणाला दिसलेच नाहीत.

तेव्हापासून बाबूरावांनी कधी उद्‌घाटनाचं, भाषणाचं नाव काढलं नाही.

आता शेंबडं पोरदेखील बाबूरावांच्या दारावरून जाताना म्हणतं, "काय बाबूराव, येता का शाळेत उद्‌घाटनाला?'

बाबूराव दाण्‌कन दार लावून घेतात.