Aug 11, 2010

मणिकांचन योग आणि माझ्या कर्माचे भोग!

गुरूपुष्य, अक्षय तृतीया वगैरे मुहूर्तावर सोने खरेदी करायची असते म्हणे.
- मी सर्वपित्री अमावस्येला करतो.
...
चतुर्थीच्या दिवशी गणपतीला, नवरात्रात चतुःशृंगीला जायचं असतं म्हणे.
- मी संध्याकाळी वेळ असेल तेव्हा पर्यटनासाठी म्हणून जातो.
...
संध्याकाळच्या वेळेत तेल, मीठ आणू नये, सोमवारी केस कापू नयेत, म्हणतात.
- मी हटकून त्याच दिवशीचा मुहूर्त धरतो.
...
बकवास रीतिरिवाज मी पाळत नाही. कुणी तसं सांगितलं तर मी मुद्दाम ते धुडकावण्याची खुमखुमी मला येते. पण अलिकडे का कुणास ठाऊक, (मुलीच्या लग्नाची चिंता सतावायला लागल्यामुळेही असेल कदाचित) सोने खरेदी करून ठेवण्याची खुमखुमी मला आली आहे. गेल्या महिन्यापासून तसा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडला. अलिकडच्या काळात सोन्याला सोन्याचा भाव आल्यापासून तर आपण त्यात गुंतवणूक करायलाच हवी, असं प्रकर्षानं वाटू लागलंय. त्यातून लॅपटॉपच्या "सरप्राइज गिफ्ट'साठी बायकोनं घरात जमवून ठेवलेलं सोनं उधळल्याचं रहस्योद्‌घाटन मला झाल्यानंतर तर हा किडा डोक्‍यात फारच वळवळायला लागला. गेल्या महिन्यापासून शिलकीतले पैसे सोन्यात घालायचा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडलाय. सोनं खरेदी करायचं ठरवणं, त्यासाठी वेळेत हातात पैसे असणं, हा "मणिकांचन योग'च! सुदैवानं तो जुळून आलाय.
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण असं, की याच सोन्यानं आज एका संभाव्य भुर्दंडातून मला वाचवलं.
सकाळी सकाळी बहिणीचा फोन आला. बॅंकेत लॉकरच्या किल्ल्यांवर एम्बॉसिंग करून मिळणार आहे आणि त्याची मुदत आज आणि आणखी एक दिवस, अशी दोनच दिवस आहे, असं तिनं सांगितलं. या मुदतीत करून न घेतल्यास ग्राहकांना स्वतःच्या पैशांनी ते करून घ्यावं लागणार आहे, असंही समजलं. तसं पत्र तिला बॅंकेकडून आल्याचं तिनं सांगितलं. मला असं काहीच पत्र आल्याचं आठवत नव्हतं. मी तिच्या सूचनेचं पालन करायचं ठरवलं आणि सकाळी सकाळी बॅंकेत जाऊन धडकलो. विचार केला, लॉकरची किल्ली घेऊन जात आहोत, तर लॉकर उघडून घरातलं काहीबाही ठेवूनही यावं. भविष्यकालीन योजनेसाठी घेतलेलं सोनंही त्यात होतंच.
घरातून लॉकरची किल्ली चटकन शोधून बॅंकेत पोचलो, तर हीऽऽऽऽ गर्दी होती. आधी लॉकर उघडून ते काम पूर्ण करावं, मग एम्बॉसिंगसाठी किल्ली द्यावी, असं ठरवलं. लॉकर उघडायला गेलो, तर किल्लीच लागेना. सोबत आलेल्या बाईंनी त्यांच्याकडची किल्ली लावली, तरी कुलूप ढिम्म. मग त्यांनी आलटून पालटून सगळ्या किल्ल्या लावून बघितल्या. दुसरा जुडगाही आणला. तरीही काहीही फरक नव्हता. मी चुकीची किल्ली आणली असेल, असं त्यांनी भीत भीत सुचवून पाहिलं, पण मी त्यांना धुडकावून लावलं. आमच्या घरात अशी दुसरी किल्लीच नाहीये, असं छातीठोकपणे सांगितलं. मग त्या थकल्यावर त्यांनी एका शिपायाला ते काम दिलं. त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले.
त्यांच्यावर उपकार केल्याच्या थाटात, "तरीही मी किल्ली चुकलेय का ते पाहतो,' असं मोठ्या मनानं मी त्यांना सांगितलं.
बाहेर पडल्या पडल्या हर्षदाला फोन केला आणि झाला प्रकार सांगितला.
""तू चुकीची किल्ली नेली असशील!'' तिनं पहिलेछूट सांगून टाकलं.
स्वतःबद्दलही नसेल, एवढा विश्‍वास बायकांना नवऱ्याच्या गबाळेपणाबद्दल कसा असतो, कुणास ठाऊक!
तरीही मी मनाचा हिय्या करून तिला प्रत्युत्तर देण्याचं धाडस केलं. तूच कुठली तरी किल्ली आणून ठेवली असशील, मी चुकणं शक्‍यच नाही वगैरे तिला सांगून पाहिलं.
घरी येऊन तपासलं, तर तिचंच म्हणणं बरोबर होतं.
चुकीची किल्ली नेली होती. आता मान खाली घालून पुन्हा बॅंकेत जाणं आलं. तरीही बॅंकेतल्या बाई माझ्याशी सौजन्यानं वागल्या.
"तुम्हाला एवढीही अक्कल नाही का हो,'च्या ऐवजी फक्त "बघा, मी तुम्हाला म्हणत होते ना,' एवढंच म्हणाल्या.
बाई देखण्या होत्या. त्यामुळे त्यांना "सॉरी' म्हणतानाही जिवावर आलं. त्यांनी त्याची दखलही घेतली नाही, हे सांगणे न लगे.
...
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, बॅंकेचं लॉकरसंदर्भातलं जे पत्र आलं नाही म्हणून मी त्या (देखण्या) बाईंशी भांडलोही होतो, ते आमच्या घरीच असल्याचं मला बायकोनं नंतर सांगितलं.
"मला आधी का सांगितलं नाहीस,' असा जाब विचारल्यावर, ते मीच फोडलं होतं, अशी मौलिक माहिती तिनं दिली.
"किल्लीच्या एम्बॉसिंगबद्दल मला का सांगितलं नाहीस,' असं विचारल्यावर "तू ते वाचलंही होतंस,' अशी आणखी मौलिक माहिती तिनं दिली.
"माझ्या दिव्य स्मरणशक्तीबद्दल कल्पना असूनदेखील, तूच ते लक्षात ठेवून मला का ठोठावलं नाहीस,' असा युक्तिवाद मी त्यानंतर केला.
कपाळावर हात मारून घेण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता!
---

Aug 9, 2010

काचांची `लांबी' आणि गृहकृत्यदक्षतेची `रुंदी'

"घरच्या छपराचे कोने (दोन बाजूंच्या कौलांना जोडणारी वेगळ्या प्रकारची कौले) बसवायला माणूस मिळत नव्हता. घरी यायला नाटकं करत होता. शेवटी मी त्याला झिडकारून छपरावर चढून कोने बसवले...''
रायकर मास्तर आम्हाला सांगत होते.
""कुणी अडून बसला, तर त्याच्यावर अजिबात अवलंबून राहायचे नाही, हे धोरण अंगी आणायला हवे. जगात कुणाचं काही अडणार नाही!''...त्यांची भूमिका ठाम होती.
आज मी घराच्या खिडक्‍यांना लांबी बसवली, तेव्हा त्यांची आठवण झाली.
...
"घरात इतर काही करत नाहीस. निदान तेवढं तरी काम कर!''
...अगदी अशाच नाही, पण अशा भावना असलेल्या भाषेत सहधर्मचारिणीनं आमचा उद्धार केला होता. त्यामुळं आपल्यालाही घराची काळजी आहे, घरासाठी आपलंही काही योगदान आहे, हे सिद्ध करणं आवश्‍यक होतं.
घराच्या खिडक्‍यांच्या काचांची लांबी पडली होती. पण आमच्या मासिक आर्थिक नियोजनाची "रुंदी' कमी झाल्यानं लांबी लावण्याचं काम बाहेरच्या कुणाला देणं शक्‍य होत नव्हतं. एका कामगाराला बोलावलं, त्यानं सगळ्या काचांचे एक हजार रुपये सांगितले होते. त्याच वेळी त्याच्या पुढ्यात त्या सगळ्या काचा फोडून त्यावर त्याला नाचायला लावावं, असं मला वाटलं होतं. पण घरच्या "हेमा'नं रोखलं.
बाहेरच्या कुणालाही काम द्यायचं नाही, असं ठरवलं खरं, पण याचाच अर्थ ते काम मी करण्याला पर्याय नाही, असा झाला होता. त्यासाठी बाहेरून लांबी आणणं आणि वेळात वेळ काढून ती लावणं गरजेचं होतं. बरेच दिवस ते काही जमत नव्हतं. एक काच तर अगदी पडायला आली, तेव्हा चिकटपट्ट्या लावून तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. ती आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती.
अखेर आज मुहूर्त लागला. समोर बॅंकेत काही कामानिमित्त गेलो होतो, तेव्हा मनाचा हिय्या करून हार्डवेअरच्या दुकानात गेलो आणि अखेर लांबी खरेदी केली. घरी आणून लावूनही टाकली. ती तयार अवस्थेतलीच होती. त्यात काहीच मिक्‍स वगैरे करायचं नव्हतं. अवघ्या वीस रुपयांत दोन काचांचं काम उरकलं!
एवढे दिवस लांबी कुठे मिळेल, ती कशी वापरायची, हाच गहन प्रश्‍न होता. त्यामुळे टाळाटाळ चालवली होती. एखाद्या दुकानात जाऊन चौकशी करण्याची तसदीही घेतली नव्हती. आज अचानक मनात आलं आणि लांबी मिळूनही गेली!
काही गोष्टींना थेट भिडल्याखेरीज त्या हाताशी येत नाहीत, हेच खरं!!
...
ता. क. : या ब्लॉगपोस्टला फारशी "खोली' नाही, हे जरी खरं असलं, तरी "लांबी'च्या या मोहिमेबद्दल मला छाती "रुंद' करून सांगायचंच होतं! असो.

Aug 3, 2010

फ्रेंडशिप band (`बंद')!

""बाबा, आपल्याकडे फ्रेंडशिप बॅंड आहेत?''
शी-शू करायची अक्कल आत्ता आत्ता आलेली आमची साडेपाच वर्षांची चिमुरडी मला विचारत होती.
"नाहीत,' असं सांगून मी टाळण्याचा प्रयत्न केला.
""मला उद्या पाच -सहा फ्रेंडशिप बॅंड हवेत!'' तिनं फर्मान सोडलं.
""कशाला गं?'' मी साळसूदपणाचा आव आणला.
""आमच्या वर्गातली मुलं आज एकमेकांना बांधत होती. माझ्याकडे एकही नव्हता. मला उद्या हवा म्हणजे हवा!'' तिनं ठणकावलं.
आपला गरीब बिच्चाऱ्या पित्याच्या भूमिकेत शिरून गप्प बसलो. संध्याकाळी आईनं तिला फ्रेंडशिप बॅंड आणून दिले. आज वर्गातल्या तिच्या आवडत्या मुलांना ती बांधूनही आली.
आमची शाळा आठवली.
फ्रेंडशिप म्हणजे काय, ते आम्हाला सातवी-आठवीत कळू लागलं. तेदेखील मुला-मुलांच्या फ्रेंडशिपबद्दलच. मुला-मुलींची फ्रेंडशिप वगैरे नाव काढायचीच सोय नव्हती. एक गाल शिक्षकांनी आणि दुसरा घरच्यांनी लाल केला असता, अशी परिस्थिती होती.
शाळेत मुला-मुलींच्या गप्पा, मैत्रीवर अघोषित बंदी होती. शाळेनं तशी घातली नव्हती, पण प्रथाही नव्हती. मुला-मुलींना चिडवणं वगैरे चालायचं. एखाद्या मुलीला एखाद्या मुलाच्या नावानं जास्तच चिडवलं जाऊ लागलं, की ती राखीपौर्णिमेला थेट त्याला राखीच बांधायची. मुला-मुलींमध्ये एकच नातं होतं - भावा बहिणींचं! कसं अगदी पवित्र नातं!
आम्ही वर्ग डोक्‍यावर घ्यायचो म्हणून सातवीत आम्हाला भयंकर "शिक्षा' झाली होती. मुलींच्या शेजारी एकाच बाकावर बसण्याची!
एखाद्या मुलीच्या शेजारी बसण्यासारखा अपमान आणि अवहेलना नव्हती!
आम्ही मग बेंचवर "हद्द' आखून घ्यायचो. माझ्या हद्दीत तू फिरकायचं नाही...हात ठेवायचा नाही...पेन इकडे येता कामा नये, एवढ्या पातळीवर ही खुन्नस चालायची.
झ्या शेजारी राहणारी मुलगी माझ्या पुढच्याच बाकावर बसायची, पण मी वर्गात तिच्याशी जेमतेम एक-दोनदा बोललो असेन. तेदेखील पेन खाली पडलंय, खोडरबर आहे का वगैरे प्रश्‍नांसाठी.
फ्रेंडशिप वगैरे करण्याचं वारं कॉलेजात गेल्यावरच डोक्‍यात शिरलं. स्लॅमबुक देखील वर्षाच्या अखेरीस हाती पडलं.
फ्रेंडशिप करायची क्रेझ असते त्या वयात ती केली नाही, पण पुण्यात आल्यावर मात्र मनसोक्त अनुभवली. प्रत्यक्ष फ्रेंडशिपच्या जागी इथे व्हर्च्युअल, अर्थात नेट फ्रेंडशिप अनुभवायला मिळाली.
त्या माध्यमातून मात्र अनेक चांगले मित्र मिळाले. कुणी माझ्या गावाचे निघाले, कुणाशी विचार जुळले, कुणाशी भावनिक तारा जमल्या, कुणी "ग्राफिटी'चे चाहते निघाले. अनेकांशी दृढ मैत्री झाली. ती केवळ व्हर्च्युअल न राहता प्रत्यक्षही भेटणं झालं.
असं असलं, तरी फ्रेंडशिप बॅंड वगैरे मैत्रीच्या देखाव्यात कधी अडकावंसं वाटलं नाही. तशा दिखाऊ मैत्रीपेक्षा खूप घट्ट मैत्री असली, तरी ती जगाला ओरडून सांगावीशी वाटली नाही. कधीकधी स्पष्ट बोलण्यानं, अलिप्त वागण्यानं काही मित्र दुखावले, काही दूर गेले, काहींनी अचानक रामराम ठोकला. पण जे उरले, त्यांच्याशी छान संवाद राहिला. त्यांच्या आयुष्यात वेगवेगळी स्थित्यंतरं आली...दरवेळी मला साथीला जाता आलंच असं नाही, पण त्यांच्याबद्दल प्रेम, आपुलकी, मदतीची भावना कायम राहिली.
आजही आहे...जे दूर गेले, त्यांनाही या निमित्तानं परत येण्यासाठी ही हाक आणि जे आहेत, त्यांच्याशी मैत्री अधिक घट्ट व्हावी, ही सदिच्छा!
मनस्वीच्या फ्रेंडशिप बॅंडच्या निमित्तानं बऱ्याच आठवणींवरचा पडदा निघाला.
लिहायचं होतं जरा हलकंफुलकं, पण जरा भावनांचे कढ जास्तच झाले.
असो. माणसानं दर वेळी मन हलकं करण्यासाठी विनोदाचा आधार घेतलाच पाहिजे का?
----
तळटीप ः आजही फेसबुक, ऑर्कुटवर ओळखपाळख, स्वतःची माहिती देण्याचंही सौजन्य न दाखविता थेट "फ्रेंडशिप रिक्वेस्ट' पाठवणारे उपटसुंभ भेटतात. मी त्यांची माहितीही न बघता रिक्वेस्ट फेटाळून लावतो!
 

Jul 30, 2010

`काका' मला वाचवा!

"सार्वजनिक काका' अशा नावाचा एक पुरस्कार पुण्यात दिला जातो. सार्वजनिक कार्यात अग्रेसर असलेल्या लोकांसाठी हा पुरस्कार असावा. आमच्याशी संबंधित दोन काकांनी मात्र त्यांच्या "सार्वजनिक' वागण्याने अलीकडच्या काळात उच्छाद मांडला.

गेल्या वर्षीपर्यंत मला वेळ असल्यानं मनस्वीला सकाळी शाळेत आणि दुपारी बाल भवनला सोडण्याची जबाबदारी मीच खांद्यावर (आणि कडेवर) घेतली होती. या वर्षी मात्र निमिषचं आमच्या घरात आगमन झाल्यापासून आणि मनुच्या शाळेची वेळ बदलल्यापासून तिच्या शाळेच्या वेळांच्या बंधनात अडकायला नको वाटू लागलं. मनुची शाळा यंदा सकाळी 7.20 ची झाली. त्यामुळं सहाला उठणं, तिला आवरून वेळेत तयार करणं आणि काकांच्या व्हॅनसाठी सातच्या आधी सोडणं, असा दिनक्रम झाला. महिनाभरच झाला शाळा सुरू होऊन आणि सगळं व्यवस्थित सुरू होतं. एके दिवशी मात्र मनस्वी दुपारी घरी आली, ती हिरमुसल्या चेहऱ्यानं. तिला शाळेत उशीर झाल्यामुळं शिक्षा झाली होती. मैदानात उभं राहायला आणि उठाबशा काढायला लावलं होतं.

सकाळी ती वेळेत खाली उतरली, पण काका आले, तेव्हा त्यांच्या गाडीचं चाक पंक्‍चर होतं. त्यांनी तशाच अवस्थेत मुलांना गोळा करून वाटेत दुसऱ्या गाडीत मुलं सोडली आणि त्यांच्या मार्फत ती शाळेत पोचली, तेव्हा थोडासा उशीर झाला होता. अशा कारणासाठी पाच-दहा मिनिटं उशीर झाल्यानंतरही मुलांना शिक्षा झाल्याचं कळल्यावर माझं डोकंच फिरलं.

दुसऱ्याच दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांना तीव्र नाराजी व्यक्त करणारं पत्र दिलं. त्यांनी त्याची दखल घेतली, पण फारसा फरक पडला नव्हता त्यांना. वर उठाबशा म्हणजे मुलांसाठी व्यायामच असतो, असंही ऐकावं लागलं.

या काकांनी दुसऱ्या काकांकडे मुलं सोपविताना शाळेपर्यंत व्यवस्थित निरोप पोचविण्याची व्यवस्था तातडीने करायला हवी होती. ती त्यांनी न केल्यामुळे या मुलांना नाहक शिक्षा झाली.

दुसऱ्या काकांची वेगळीच तऱ्हा.
मनस्वी बाल भवनला अधून मधून दांड्या मारतेच. कधी पाऊस, कधी कुठलं काम, कधी कार्यक्रम यामुळे ती जाऊ शकत नाही. दर वेळी ती एक-दोन दिवस गेली नाही, की तिसऱ्या दिवशी तिच्या काकांना फोन करून ती येणार असल्याचं कळवायला लागायचं. त्यातून हल्ली साडेचारच्या बाल भवनसाठी तिची रिक्षा खूप लवकर, म्हणजे पावणेचारलाच येते, म्हणून आम्ही जाताना तिला स्वतःच सोडायचं ठरवलं होतं. तरीही काकांना पैसे दोन वेळचेच देत होतो.

मध्यंतरी एक-दोनदा काकांना फोनवरून न कळवल्यामुळं ते मनस्वीला घेऊनच आले नाहीत. मग उगाच धावतपळत तिला आणायला पुन्हा जावं लागलं. दरवेळी त्यांचं कारण ठरलेलं असायचं - ती कुठेतरी खेळत होती, बाईंनी मला सांगितलंच नाही, काका काही बोललेच नाहीत..वगैरे वगैरे.
आज पुन्हा ते तिला तिथेच ठेवून निघून गेले, तेव्हा या संतापानं टोकच गाठलं. मनस्वी ताईंबरोबर घरी आली. मी फोनवरून त्यांना झापलं. पण तरीही ते ढिम्म होते. आजही त्यांची कारणं तयार होती. मी रिक्षा बंद करून टाकली, तरी त्यांना फारसा काही फरक पडलेला नव्हता.

आता मनस्वीला दुसरी व्हॅन शोधायचेच. पण स्वतः करीत असलेल्या कामावर विश्‍वास असलेले काका कुठे मिळतील?
 

Jul 29, 2010

व्यसनेशु सख्यम!

आज दुपारी ऑफिसातील काम उरकल्यानंतर थोडासा वेळ हाताशी होता म्हणून बऱ्याच दिवसांनी सीडी खरेदी आणि विंडो शॉपिंगसाठी लक्ष्मी रस्त्यावरच्या माझ्या आवडत्या दुकानात गेलो होतो. इथूनच मी पहिल्यांदा सीडी प्लेअर घेतला, तेव्हापासून तिथल्या सीडी, कॅसेट कलेक्‍शनच्या प्रेमात पडलो होतो. तिथली शिस्त आणि सगळं साहित्य व्यवस्थित मांडण्याची पद्धत फार आकर्षक आहे. आपल्याला हवी ती सीडी विकत घ्यायला फार सोयीचं जातं. असो.

अलिकडच्या काळात बरेच हिंदी, मराठी चित्रपट पाहायला वेळ झालेला नाही. अनेक सिनेमे घरी कॉंप्युटरच्या हार्डडिस्कवर असले, तरी ते बघणं झालेलं नाही. काही सिनेमे तर अर्धवट बघितले, पण इंटरव्हलनंतर बघायचे राहिले, ते राहिलेच. अनेक जुने, अर्धजुने सिनेमेही मी पाहिलेले नाहीत. पूर्वी घरून परवानगी नव्हती, कुठले सिनेमे बघायची त्याची अक्कल नव्हती, रत्नागिरीत फार काही बघण्याची संधी नव्हती...बरीच कारणं. बॅकलॉग बराच राहिलाय, एवढंच खरं.

हाच बॅकलॉग भरून काढण्याचे आता प्रयत्न चाललेत. त्यामुळे आज वेळ होता म्हणून थोड्या सीडी खरेदी कराव्यात, असा विचार करून दुकानात शिरलो होतो. दहा-पंधरा मिनिटांत खरेदी उरकून निघायचं होतं, पण सीडींचा खजिना पाहून रमायलाच झालं. मोझर बेअरच्या अलिकडे आलेल्या स्वस्तातल्या सीडी हे माझं पहिलं लक्ष्य होतं. पण डीव्हीडी पाहिल्या आणि त्यांच्या प्रेमात पडलो.

नव्या, जुन्या सिनेमांच्या अनेक डीव्हीडी खुणावत होत्या. माझे अलिकडच्या काळात चुकलेले अनेक सिनेमे एकत्रित उपलब्ध होते. त्यातही सर्वांत चांगल्या पॅकेजसाठी बरीच शोधाशोध केली. कमिने, वेन्सडे, देव डी, अशा एकूण सहा चित्रपटांची डीव्हीडी अवघ्या 55 रुपयांना पाहून मी थक्क झालो. अलिकडे पायरसी बोकाळल्यापासून 50 रुपयांत पाच, सहा चित्रपट की गोष्ट काही नवी नव्हती. पण ती बनावट सीडींच्या बाबतीत होती. अधिकृत, चांगल्या दर्जाच्या आणि कंपनीच्या सीडीसुद्धा एवढ्या स्वस्तात उपलब्ध असल्याची मला कल्पनाच नव्हती.
अवघ्य 55 रुपयांत सहा सिनेमे खरेदी करताना मला रत्नागिरीचे सिनेमा पाहण्यासाठीचे संघर्षाचे दिवस आठवले. तेव्हा थिएटरला तिकीट दहा रुपयांच्या आतच होते, पण तरीही घरून सिनेमा पाहायला जायला परवानगी मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागायचा. "टीव्हीवर येईल तेव्हा बघ सिनेमा!' हे उत्तर ठरलेलं असायचं. मग काहीतरी कारण सांगून, बाबापुता करून परवानगी मिळवायला लागायची. नववीत असताना आईनं "थरथराट' बघायला परवानगी दिली नाही, तेव्हा तेवढा "थयथयाट' केला होता मी! दहावीच्या अख्ख्या वर्षात मी एकच चित्रपट पाहिला होता. मोठं झाल्यावर मी यंव करीन नि त्यंव करीन अशी स्वप्नं पाहायचं वय होतं ते. मी त्यावेळी मोठं झाल्यावर आपण तिन्ही थिएटरला लागलेले सगळेच्या सगळे सिनेमे दर आठवड्याला पाहायचे, असली स्वप्नं रंगवायचो. आमच्या महत्त्वाकांक्षेची झेप तेवढीच!

अनेकदा उन्हाळ्यात सार्वजनिक पूजेच्या निमित्तानं मळ्यात, मैदानात सिनेमे प्रोजेक्‍टरवर दाखवले जायचे. शेजारपाजारचा कुणीतरी जोडीदार शोधून मी ते पाहायला जायचो. टिपिकल मिथून, अमिताभ, नाहीतर जीतेंद्रचे सिनेमे असायचे. पण तरीही कुठेतरी शेणार, चिखलात, काट्यात, गडग्यावर बसून डोळे तारवटून ते सिनेमे पाहायचो. रस्त्यात बसलेलो असताना बस आली म्हणून चंबूगबाळं आवरून मध्येच उठावं लागायचं. पडद्याच्या समोरच्या बाजूला जागा मिळाली नाही, तर मागच्या बाजूनं उजव्या हातानं फायटिंग करणारा अमिताभ पाहावा लागायचा. मध्येच कुठून तरी सापबिप निघाला, तर पळापळ व्हायची. धुरळा, मातीनं कपडे खराब व्हायचं. पण "की न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने' या निर्धारानं आम्ही टिकून राहायचो.
"राम तेरी गंगा मैली' पाहायला असाच कुठेतरी रस्ता तुडवत गेलो होतो. तिथे व्हिडिओवर सिनेमा होता आणि आम्ही सुमारे वीस-पंचवीस फुटांवर होतो. मंदाकिनीचं नखसुद्धा दिसणं शक्‍य नव्हतं! मग हिरमुसून परत फिरलो होतो.
मजा होती त्या दिवसांत!

आज 55 रुपयांत 6 सिनेमे, म्हणजे नऊ रुपयांना एक सिनेमा कायमस्वरूपी विकत घेताना हे सगळं आठवलं आणि फार वाईट वाटलं. आपण जिवापाड प्रेम केलेलं हे व्यसन एवढं स्वस्त आणि सहज होईल, अशी कधीच कल्पना केली नव्हती.
आपल्या आवडीच्या, अतीव प्रेमाच्या गोष्टीसाठी थोडेफार कष्ट करायला लागले पाहिजेत. सुखसोयी आयत्या मिळाल्या, तर त्यातली गंमत कमी होते, हेच खरं!