Sep 24, 2010

स्मृतिभ्रंश!

बातमी खूप वाईट आहे.
गांभीर्यानं दखल घेण्याजोगी आहे. चिंता करायला लावणारी आहे. खचवून टाकणारी आहे.
माझ्या मोबाईलमधल्या "सॉफ्टवेअर'चं काल दि. 23 रोजी निधन झालं. अनंत चतुर्दशीनंतरच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज त्याचं "विसर्जन' करायला मला भाग पडलं. सॉफ्टवेअर बदलून घेणं किंवा त्यासाठी आलेला अडीचशे रुपये खर्च, हे दुःखाचं कारण नसून, माझ्या खात्यातील सर्व संपर्कही सॉफ्टवेअरसोबत गंगेला मिळाले, हे आहे!
काल रात्री काम करताना वरिष्ठांचे धपाधप पाच-सहा एसएमएस आले. बहुधा त्याचा ताण सहन न झाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, मोबाईलनं अचानक मान टाकली. सुरूच होईना. थोडासा "डिस्प्ले' येऊन गायब होत होता. मला वाटलं, झाला असेल "स्विच ऑफ'! पण मोबाईल नव्हे, त्यातलं "सॉफ्टवेअर' स्विच ऑफ झालंय, याची मज पामरास काय कल्पना?
सकाळी सगळे प्रयोग करून पाहिले. बायकोच्या मोबाईलमधलं सिमकार्ड काढून इकडे घाल, इकडची बॅटरी तिकडे लाव, मेमरी कार्ड तपासून बघ...सगळे निष्फळ होते. मोबाईल जो रुसून बसला, तो उजेडात यायला काही तयार नव्हता.
""सगळे नंबर सेव्ह करून ठेवायला काय होतं तुला? फोन मेमरी कशाला वापरतेस? सिम मेमरी वापरत जा ना! एवढंही कळत नाही का...'' वगैरे वगैरे स्तुतिसुमनं मी हर्षदावर वारंवार उधळली होती. त्यामुळं माझ्याकडील सर्व नंबर सिमकार्डमध्ये सेव्ह असणार, याची खात्रीच होती. माझं सिमकार्ड काढून दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकलं, तेव्हा त्यात ढिम्म एकसुद्धा नंबर दिसत नव्हता.
माझा पोपट झाला होता. मोबाईल बंद पडला होताच, वर सिम कार्ड कोरं होतं. सकाळी सगळा जामानिमा घेऊन मोबाईलच्या दुकानात जाणं नशीबी आलं.
"साहेब, काही होणार नाही. सॉफ्टवेअर बदलायला लागेल. मेमरी लॉस होईल...' तिथल्या कर्मचाऱ्यानं निष्ठूरपणे सांगून टाकलं.
""अरे लेका, आमची मेमरी लॉस झालेय म्हणून या मोबाईलच्या मेमरीवर अवलंबून राहतो ना! आता तीही लॉस झाली, तर "गझनी' होईल की नाही आमचा?'' असं म्हणायचं अगदी तोंडावर आलं होतं. पण मी ते माझ्या "मेमरी'तच ठेवलं. "डिस्प्ले' होऊ दिलं नाही.
मग खात्री करण्यासाठी आणखी दोन-चार दुकानं पालथी घातली. काहीही फायदा होणार नव्हता, हे लक्षात आलं होतं, तरी वेडी आशा काही सुटत नव्हती. "सध्याच्या स्थितीत फोन नंबर्स तरी सेव्ह होणार नाहीत का,' अशी अजीजी मी प्रत्येक ठिकाणी करत होतो आणि मी जणू काही त्यांची इस्टेट लिहून मागत असल्यासारखी प्रतिक्रिया ते देत होते.
शेवटी मनावर दगड ठेवून "सॉफ्टवेअर' बदलून घ्यायचं ठरवलं. दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून आधीच्या सॉफ्टवेअरला श्रद्धांजली वाहिली. काहीही झालं तरी त्यानं मला दोन वर्षं साथ दिली होती! संध्याकाळी मोबाईल कोरा होऊन माझ्या हातात आला, तेव्हा माझं मन मात्र आता सगळे नंबर पुन्हा जमविण्याच्या कल्पनेनंच भरून आलं होतं!
...
ता. क. : "तुमचा मोबाईल नंबर पाठवा,' असा एसएमएस माझ्या सर्व परिचितांना पाठवण्याचा विचार आहे. कशी वाटते कल्पना?

Aug 30, 2010

लगी रहो मुन्नीबाई!

काळीज विदीर्ण करणारी ती बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं झालं. गात्रं शिथील झाली. हाडांचा भुगा होऊन त्यांची पावडर हवेत धुक्यासारखी उडायला लागल्याचा भास झाला. धरणीमाता दुभंगून आपल्याला उदरात घेईल तर बरं, असं वाटायला लागलं.

तशीच भयाण परिस्थिती निर्माण झाली होती...

`

दबंग`मधील `मुन्नी बदनाम हुई` या गाण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कुण्या नतद्रष्टानं न्यायालयात धाव घेतली होती...

देशहितकारक, संस्कृतीरक्षक, समाजोपयोगी कार्य कुणी करायला घेतलं, की त्यात खोडा घालणारे उपटसुंभ रिकामटेकडे अनेक असतात. अरबाज खाननं केवढ्या उदात्त हेतूनं त्याच्या `दबंग`मध्ये हे गाणं टाकलं!स्त्रीला कवडीमोल समजणा-या, तिच्या भावनांना, विचारांना काडीचीही किंमत देणा-या आपल्या समाजाच्या तोंडात मारणारं हे गाणं. `मुन्नी बदनाम हुई..डार्लिंग तेरे लिये...` किती अर्थवाही शब्द. किती अप्रतिम चाल...आपल्यासाठी अतिप्रिय असलेल्या आपल्या प्रियकराला उद्देशून, समाजाची पर्वा करता, सर्व बंधनं झुगारून आपल्या प्रेमभावना मुक्तपणे व्यक्त करणारी ही रूपगर्विता...सगळ्या जगाला ओरडून सांगतेय, `मुन्नी बदनाम हुई...डार्लिंग तेरे लिये...` कुणी ऐकेल, तिला विरोध करेल, याची तिला अजिबात पर्वा नाही. आपल्या पवित्र, उदात्त प्रेमासाठी कोणत्याही त्यागाची तिची तयारी आहे. भले समाजानं नावं ठेवली तरी चालतील! तिचं प्रेम अढळ आहे. तिची निष्ठा अविचल आहे. तिचा निर्धार दबंग...साॅरी..अभंग आहे.

भारतीय संस्कृतीचं मोल आणि सार किती सार्थपणे मांडलंय मोजक्या शब्दांतून...किती समर्पक उपमा! किती नेमक्या भावना! काय उत्स्फूर्त नृत्य!!

गाण्यातल्या नेमक्या भावना, विचार आपल्या अंगप्रत्यंगातून समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी भारतीय सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेली तशीच समर्थ अभिनेत्री, नृत्यांगनाही हवी. अरबाज खाननं हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्या सहधर्मचारिणीलाच साकडं घातलं. तिनंही पतीची आज्ञा शिरसावंद्य मानून ही कामगिरी लीलया पार पाडलेय. प्रेक्षकांच्या हृदयांचा आणि स्वतःच्या हाडांचा चक्काचूर होईल, याची पर्वाही करता तिनं गाण्यातल्या भावना, विचार नेमकेपणानं प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी किती विद्युल्लतेच्या वेगानं कंबर लचकवलेय पाहा...

प्रत्यक्ष जीवनात नणंद-भावजयीचं पवित्र नातं कसं असावं, याचं किती यथार्थ दर्शन सलमान-मलायकाच्या नृत्यातून घडतं...वहिनी असावी तर अशी असं प्रत्येकाला वाटलं नाही, तर ज्याचं नाव ते.

चित्रपट संगीताची ओळख बदलून टाकणा-या, गीतलेखन-नृत्यशैलीला नवी दिशा दाखवणा-या, भारतीय संस्कृतीची महती नेमक्या शब्दांत पटवून देणा-या या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करणं, त्यासाठी निर्मात्यांना कोर्टात खेचणं, याला करंटेपणा म्हणावं नाहीतर काय..

...

दुःखालाही सुखाची सोनेरी किनार असते म्हणतात. `मुन्नी बदनाम हुई`वर बंदी येण्याच्या नैराश्यजनक, विदारक बातमीच्या सोबत एक आशेचा किरण आहेच....त्यातल्या हिंदुस्थान एवढ्याच शब्दाला याचिकाकर्त्याचा आक्षेप आहे. त्यामुळे देशाचा अवमान होत असल्याचा त्याचा दावा आहे. चला...म्हणजे तेवढा शब्द काढला, तर गाणं या भीषण संकटातून सहीसलामत सुटण्याची चिन्हं आहेत. देव पावला!
 

Aug 23, 2010

राखी अमावस्या!

राखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा अश्‍वत्थामा पुन्हा गत आठवणींच्या भोवऱ्यात भिरभिरत राहतो...
शाळेच्या आवाराच्या तटबंदीपेक्षा जास्त भक्कम तटबंदी त्या वेळी आमच्या मनांची होती. मुलीकडे पाहणं म्हणजे "शांतम्‌ पापम्‌' म्हणायचे ते दिवस. त्यातून आम्ही रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातल्या सर्वांत "सुसंस्कृत' शाळेत, सर्वांत हुशार समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गातले सहाध्यायी. सर्व जगाच्या संस्कृतीरक्षणाची जबाबदारी आमच्यावरच! "मैत्रीण' असणं वगैरे गोष्टी वर्ज्यच होत्या, साधं वर्गातल्या मुलीशी बोलणंही दुरापास्त होतं. शाळेच्या व्हरांड्यात मुलं-मुली घोळक्‍यानं गप्पा मारताहेत, एकत्र नाटकं-सिनेमे बघताहेत, टाळ्या देऊन खिदळताहेत, अशी दृश्‍यं पाहिली, की आपण शाळेत भोगलेल्या "नरकयातना' नको नको म्हणताना आठवतात.
आम्ही सातवीच्या वर्गात होतो. आमचा वर्ग जाम दंगा करायचा, त्यामुळे शिक्षा म्हणून आम्हाला एका बेंचवर एक मुलगा-एक मुलगी असं बसवण्यात आलं होतं. केवढा घोर अपमान, अन्याय वाटला होता आम्हाला तेव्हा! तेव्हा आम्ही एकमेकांशी घेतलेली खुन्नस, बेंचवर आखून घेतलेली हद्द वगैरे गोष्टी ब्लॉगवर लिहिल्या आहेतच.
वर्गात मुला-मुलींच्या जोड्या लावायची फॅशन होती. कुणी मुलगा एखाद्या मुलीच्या जागेवर बसला, की त्याला तिच्या नावानं चिडवलं जायचं. किंवा साधारणपणे मुलग्यांमधला हुशार क्रमांक एक आणि मुलींमधली हुशार क्र. 1, अशा क्रमानेही जोड्या लागायच्या. एकमेकांच्या नावांमधली सामायिक अक्षरं शोधून त्यानुसार जोड्या लावल्या जायच्या. शेजारी पाजारी किंवा एकाच भागात राहणाऱ्या मुलामुलींच्या जोड्या लावायला तर सोप्पंच होतं. एकाच भागात राहत असलो, तरी शाळेत एकत्र वगैरे जाण्याची सोयच नव्हती. साधं एखाद्या मुलीच्या मागून गेलो, तरी हा मुलगा आपल्या मागे लागलाय की काय, असा संशय या मुलींना यायचा. "दहशतवाद' त्या काळीही फोफावलेला होताच!
अशा चिडवाचिडवीला वैतागून मग त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे राखीपौर्णिमेचा "पवित्र' सण होता. आपल्याला ज्या नावाने चिडवलं जातं, त्या मुलाला राखी बांधली, की भानगडच मिटून जायची. मग कोण कशाला धाडस करतंय चिडवायचं? असे आगंतुक "भाऊराया' बनायला काही लोक अगदी उतावीळ असायचे, तर काहींच्या हृदयाची अगदी शंभर शकलं व्हायची.
वर्गातून गायब होऊन किंवा आवडत्या मुलीला टाळून या दहशतवादातून सुटण्याचा मार्ग होता. पण शाळेत होणाऱ्या सामूहिक रक्षाबंधनाचं काय? संघाच्या माध्यमातून शाळेत येणाऱ्या गोंड्याच्या राख्या प्रत्येकाच्या हातावर दिसल्याच पाहिजेत, असा शाळेचा दंडक होता. जणू सगळ्या मुलींचा संभाव्य तेजोभंग टाळण्याचा घाऊक मक्ताच शाळेने घेऊन टाकला होता! जेवढी मुलं, तेवढ्या राख्या वर्गात मागवल्या जायच्या आणि मग प्रत्येकाला समोर बोलावून एकेका मुलीनं त्याच्या प्रेमभावनांच्या सामूहिक कत्तलीचा साग्रसंगीत सोहळा पार पडायचा! तरीही शक्‍यतो आपली आवडती मुलगी आपल्याला राखी बांधायला येऊ नये, म्हणून मुलं जागांची अदलाबदल, बेंचखाली दडून राहणं, वगैरे वगैरे उपद्‌व्याप करायचे. कश्‍शाकश्‍शाचा म्हणून निभाव लागायचा नाही.
अर्थात, राखी बांधून घेण्यातही एक गंमत होतीच म्हणा! आपल्याला मुलगी राखी बांधतेय, म्हणजे इतरांपेक्षा जास्त भाव देतेय, असाही एक सर्वमान्य समज होता. हातावर राख्यांची संख्या जेवढी जास्त, तेवढा तो मुलगा मुलींचा लाडका, असंही एक गृहीतक होतं. त्यातून मुलीच्या नाजूक हातातून राखी बांधून घेताना होणारा अलगद स्पर्शही त्या वयात मनाला मोहरून टाकायचा, ही गोष्ट अलाहिदा! शिंगं फुटली, तशी राख्यांची जागा "फ्रेंडशिप बॅंड'नी घेतली. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली त्यांचेही पेव फुटायच्या आतच आम्ही कॉलेजातून बाहेर पडलो होतो!
मनगटांतील राख्यांची आणि अपवादात्मक परिस्थितीत फ्रेंडशिप बॅंडची सद्दी संपली आणि लग्नाच्या वेळी हातात बांधलेला हळकुंडाचा दोरा हातात बांधला. दुसऱ्या दिवशी तो उतरवला असला, तरी आयुष्यभराची बेडी हातात पडली ती पडलीच!

Aug 12, 2010

ये रे माझ्या "माग'ल्या!

युवतीहृदयसम्राट, गालखळीचा बादशहा जॉन अब्राहम तसा नेहमीच चर्चेत असतो, पण या वेळची "पार्श्‍वभूमी' जरा वेगळी होती.
बातमी अशी होती, की जॉननं दहा कोटी रुपयांचा विमा करण्याचा घाट घातलाय...विमा कशाचा माहितेय? त्याच्या पार्श्‍वभागाचा! हो हो...!
`दोस्ताना'मध्ये त्यानं ज्याची झलक दाखवल्यानंतर त्याला त्याची जास्तच काळजी वाटू लागली असावी...
कुणी कुणाच्या कुठल्या अवयवाचा विमा करावा, याविषयी आपला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही, पण ज्या विशिष्ट अवयवाचा त्यानं विमा करायचं ठरवलं, त्यावरून भुवया उंचावल्या जाणं साहजिक होतं. शिवाय, त्यासाठी दहा कोटी रुपये कुठली कंपनी मोजायला तयार होणार, ते विमा म्हणून नक्की कशाची हमी देणार, याविषयीचं कुतूहल जास्त होतं.

बातमीतून तरी ते काही स्पष्ट झालं नाही. माझ्या मनात मात्र अनेक कल्पना, शंकाकुशंकांनी थैमान घातलं. त्यातल्याच या काही...
1. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या पार्श्‍वभागाचा विमा करून घेतला आणि कंपनीनं त्याला त्याच ठिकाणी लाथ मारून हाकललं, तर विम्याची संपूर्ण रक्कम मिळते का?
2. बूडही न हलवता तासन्‌ तास एकाच जागी बसून जास्तीत जास्त काम करावं, अशी कंपनीची अपेक्षा असेल तर त्यासाठीच्या विम्याचा हप्ता कंपनीनंच भरायला नको का?
3. पार्श्‍वभागाचं दर्शन घडविणाऱ्या जीन्स घातल्या, तर विम्याच्या हप्त्यात काही सवलत मिळते का?
4. "हिप्स डोन्ट लाय' असं कुणीतरी शकीरा नामक गुरूमाता म्हणून गेलेय, असं ऐकतो. "हिप्स'बाबतची "पॉलिसी' पण डोन्ट लाय, याची हमी कोण देणार?
5. ** फाटणे, ** मारणे, ** उदास होणे, अशा दुर्घटना/आपत्तींसाठी पण विमा योजना लागू होणार का?
---

Aug 11, 2010

मणिकांचन योग आणि माझ्या कर्माचे भोग!

गुरूपुष्य, अक्षय तृतीया वगैरे मुहूर्तावर सोने खरेदी करायची असते म्हणे.
- मी सर्वपित्री अमावस्येला करतो.
...
चतुर्थीच्या दिवशी गणपतीला, नवरात्रात चतुःशृंगीला जायचं असतं म्हणे.
- मी संध्याकाळी वेळ असेल तेव्हा पर्यटनासाठी म्हणून जातो.
...
संध्याकाळच्या वेळेत तेल, मीठ आणू नये, सोमवारी केस कापू नयेत, म्हणतात.
- मी हटकून त्याच दिवशीचा मुहूर्त धरतो.
...
बकवास रीतिरिवाज मी पाळत नाही. कुणी तसं सांगितलं तर मी मुद्दाम ते धुडकावण्याची खुमखुमी मला येते. पण अलिकडे का कुणास ठाऊक, (मुलीच्या लग्नाची चिंता सतावायला लागल्यामुळेही असेल कदाचित) सोने खरेदी करून ठेवण्याची खुमखुमी मला आली आहे. गेल्या महिन्यापासून तसा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडला. अलिकडच्या काळात सोन्याला सोन्याचा भाव आल्यापासून तर आपण त्यात गुंतवणूक करायलाच हवी, असं प्रकर्षानं वाटू लागलंय. त्यातून लॅपटॉपच्या "सरप्राइज गिफ्ट'साठी बायकोनं घरात जमवून ठेवलेलं सोनं उधळल्याचं रहस्योद्‌घाटन मला झाल्यानंतर तर हा किडा डोक्‍यात फारच वळवळायला लागला. गेल्या महिन्यापासून शिलकीतले पैसे सोन्यात घालायचा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडलाय. सोनं खरेदी करायचं ठरवणं, त्यासाठी वेळेत हातात पैसे असणं, हा "मणिकांचन योग'च! सुदैवानं तो जुळून आलाय.
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण असं, की याच सोन्यानं आज एका संभाव्य भुर्दंडातून मला वाचवलं.
सकाळी सकाळी बहिणीचा फोन आला. बॅंकेत लॉकरच्या किल्ल्यांवर एम्बॉसिंग करून मिळणार आहे आणि त्याची मुदत आज आणि आणखी एक दिवस, अशी दोनच दिवस आहे, असं तिनं सांगितलं. या मुदतीत करून न घेतल्यास ग्राहकांना स्वतःच्या पैशांनी ते करून घ्यावं लागणार आहे, असंही समजलं. तसं पत्र तिला बॅंकेकडून आल्याचं तिनं सांगितलं. मला असं काहीच पत्र आल्याचं आठवत नव्हतं. मी तिच्या सूचनेचं पालन करायचं ठरवलं आणि सकाळी सकाळी बॅंकेत जाऊन धडकलो. विचार केला, लॉकरची किल्ली घेऊन जात आहोत, तर लॉकर उघडून घरातलं काहीबाही ठेवूनही यावं. भविष्यकालीन योजनेसाठी घेतलेलं सोनंही त्यात होतंच.
घरातून लॉकरची किल्ली चटकन शोधून बॅंकेत पोचलो, तर हीऽऽऽऽ गर्दी होती. आधी लॉकर उघडून ते काम पूर्ण करावं, मग एम्बॉसिंगसाठी किल्ली द्यावी, असं ठरवलं. लॉकर उघडायला गेलो, तर किल्लीच लागेना. सोबत आलेल्या बाईंनी त्यांच्याकडची किल्ली लावली, तरी कुलूप ढिम्म. मग त्यांनी आलटून पालटून सगळ्या किल्ल्या लावून बघितल्या. दुसरा जुडगाही आणला. तरीही काहीही फरक नव्हता. मी चुकीची किल्ली आणली असेल, असं त्यांनी भीत भीत सुचवून पाहिलं, पण मी त्यांना धुडकावून लावलं. आमच्या घरात अशी दुसरी किल्लीच नाहीये, असं छातीठोकपणे सांगितलं. मग त्या थकल्यावर त्यांनी एका शिपायाला ते काम दिलं. त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले.
त्यांच्यावर उपकार केल्याच्या थाटात, "तरीही मी किल्ली चुकलेय का ते पाहतो,' असं मोठ्या मनानं मी त्यांना सांगितलं.
बाहेर पडल्या पडल्या हर्षदाला फोन केला आणि झाला प्रकार सांगितला.
""तू चुकीची किल्ली नेली असशील!'' तिनं पहिलेछूट सांगून टाकलं.
स्वतःबद्दलही नसेल, एवढा विश्‍वास बायकांना नवऱ्याच्या गबाळेपणाबद्दल कसा असतो, कुणास ठाऊक!
तरीही मी मनाचा हिय्या करून तिला प्रत्युत्तर देण्याचं धाडस केलं. तूच कुठली तरी किल्ली आणून ठेवली असशील, मी चुकणं शक्‍यच नाही वगैरे तिला सांगून पाहिलं.
घरी येऊन तपासलं, तर तिचंच म्हणणं बरोबर होतं.
चुकीची किल्ली नेली होती. आता मान खाली घालून पुन्हा बॅंकेत जाणं आलं. तरीही बॅंकेतल्या बाई माझ्याशी सौजन्यानं वागल्या.
"तुम्हाला एवढीही अक्कल नाही का हो,'च्या ऐवजी फक्त "बघा, मी तुम्हाला म्हणत होते ना,' एवढंच म्हणाल्या.
बाई देखण्या होत्या. त्यामुळे त्यांना "सॉरी' म्हणतानाही जिवावर आलं. त्यांनी त्याची दखलही घेतली नाही, हे सांगणे न लगे.
...
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, बॅंकेचं लॉकरसंदर्भातलं जे पत्र आलं नाही म्हणून मी त्या (देखण्या) बाईंशी भांडलोही होतो, ते आमच्या घरीच असल्याचं मला बायकोनं नंतर सांगितलं.
"मला आधी का सांगितलं नाहीस,' असा जाब विचारल्यावर, ते मीच फोडलं होतं, अशी मौलिक माहिती तिनं दिली.
"किल्लीच्या एम्बॉसिंगबद्दल मला का सांगितलं नाहीस,' असं विचारल्यावर "तू ते वाचलंही होतंस,' अशी आणखी मौलिक माहिती तिनं दिली.
"माझ्या दिव्य स्मरणशक्तीबद्दल कल्पना असूनदेखील, तूच ते लक्षात ठेवून मला का ठोठावलं नाहीस,' असा युक्तिवाद मी त्यानंतर केला.
कपाळावर हात मारून घेण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता!
---