Apr 6, 2011

अनुयायांची पंच्याहत्तरी!...

"मोठेपणी तू कोण होणार बाळा,' असं प्रत्येक (अवलक्षणी) कार्ट्याला त्याला दहावीत पास होणार की नाही, हे माहीत नसण्याच्या वयात विचारलं जात असतं. मग त्यानं अलिकडच्या काळात बघितलेल्या सिनेमामधल्या प्रमुख नायकानं जे पात्र रंगवलं असेल, तेच आदर्श मानून तो ठोकून देतो - डॉक्‍टर होणार, वकील होणार, क्रिकेटपटू होणार! मला अगदी लहानपणी सिनेमानट होण्याची आणि जरा नंतरच्या काळात राजकीय पुढारी होण्याची स्वप्नं पडायची. पण नट होण्यासाठी किमान अभिनयाची पातळी आणि पुढारी होण्यासाठी किमान अनुयायांची संख्या असावी लागते, हे माझ्या गावी नव्हतं. त्या वेळीही मला कुत्रं विचारत नव्हतं आणि आताही परिस्थिती फारशी बदललेली आहे, असं मला वाटत नाही. तर सांगायचं काय, त्या वेळच्या या दोन्हीही महत्त्वाकांक्षा काळाबरोबर पुसट होत गेल्या. सिनेमातला नाही, गेला बाजार हौशी रंगभूमीवरचा एखादा नवशा-गवशा नट होण्याची धुगधुगी अजूनही मनात आहे, पण आपल्याला कुणी अनुयायी मिळतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अर्थात, "ब्लॉग' नावाचं हुकमी हत्यार त्या वेळी मला सापडायचं होतं!
ऑफिसातल्या एक-दोन सहकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन ब्लॉग सुरू केला, तेव्हा त्यावर काय लिहायचं, हा प्रश्‍न मलाही भेडसावत होता. ब्लॉगवर लिहिण्यासारखं बरंच काही असतं आणि ते पेपरमध्ये किंवा अन्यत्र लिहिता येत नाही, ही कल्पना मला त्या वेळी यायची होती. बरं, तसं बघायला गेलं, तर ही खासगी डायरी असली, तरी सगळ्यांना वाचायला देण्याजोगीच होती. म्हटलं तर मुक्त चिंतन, म्हटलं तर शेअरिंग, म्हटलं तर दुसऱ्यांचे विचार, भावना जाणून घेण्याचं व्यासपीठ, असं सबकुछ या ब्लॉगमध्ये होतं. मला त्याचा उलगडा खूप उशिरा झाला.
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण असं, की मला ब्लॉगवर आता काय लिहायचं, असा प्रश्‍न पडण्याचं बंद होऊन युगं लोटली. "अरे, इथे लिहिण्यासारखं बरंच आहे की!' हे लगेचच कळलं आणि नंतर तर ब्लॉग लिहायला विषय आहे, पण वेळ नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. ब्लॉगवर प्रतिक्रियाही भरपूर येत गेल्या आणि त्यातून नवं लिखाण करण्याचा हुरूप वाढला. विशेषतः मनस्वीच्या जडणघडणीच्या टप्प्यातल्या गमतीजमती लिहिताना मजा आली. निमिषला घरी आणण्याची प्रक्रिया, त्याविषयीचे आमचे विचार (डोंबल!) हे लिहितानाही आनंद वाटला. त्यावर प्रतिक्रियाही उत्साहवर्धक होत्या.
ब्लॉगवर नवी पोस्ट कधी टाकणार, अशी विचारणा वाचकांकडून होऊ लागली आणि आपलं लिखाण लोकांना आवडतंय, याची खात्री झाली. एकेक "फॉलोअर' मिळत गेले आणि त्यातूनही लिहिण्याची ऊर्मी वाढली. गेल्याच महिन्यात या फॉलोअर्सची संख्या 74 झाली. त्यानंतर पंच्याहत्तरीचा टप्पा गाठायला बराच काळ जावा लागला. अखेर गेल्या आठवड्यात तोही टप्पा पार झाला. आता माझे स्वतःचे नाहीत, निदान माझ्या ब्लॉगचे 75 अनुयायी आहेत, असं मी अभिमानानं सांगू शकतो!
 

Mar 25, 2011

गेले यायचे राहुनी...

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या काळात तीन-एक आठवडे सिनेमा थिएटर ओस पडली होती. प्रेक्षक टीव्हीसमोरच ठिय्या देऊन बसतील आणि थिएटरकडे फिरकणारही नाहीत, असा कयास बांधून निर्मात्यांनी मोठे चित्रपट लावायचे टाळले; पण जरा डोकं चालवलं असतं, तर चालू घडामोडींवरचे वेगवेगळे आणि आकर्षक चित्रपट आले असते आणि सहज "ब्लॉकबस्टर' ठरले असते. एक झलक...
...
फस गये रे ओबामा!
प्रमुख भूमिका ः बराक ओबामा, मुअम्मर गडाफी, होस्नी मुबारक, सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन आणि पाहुणे कलाकार म्हणून याच जातकुळीतले अनंत हुकूमशहा.

अमेरिकेने गल्लोगल्ली, गावोगावी, शहरोशहरी आणि देशोदेशी पोसलेल्या हुकूमशहांच्या इतिहासापासून कथा सुरू होते. मग हेच हुकूमशहा भस्मासूर बनून अमेरिकेवर कसे उलटतात, मग अमेरिकेचे हितशत्रू अमेरिकेला कसे उलटे करतात आणि आपणच त्यांना हुसकावल्याचा उलटा कांगावा करण्याची वेळ अमेरिकेवर कशी येते, अशा घटनांमधून ही कथा रंगत जाते. इजिप्तच्या ताज्या संदर्भामुळे ही कथा अधिक जिवंत आणि वास्तववादी ठरू शकेल. लीबियाचे हुकूमशहा गडाफी आधी घाबरल्याचं नाटक करून नंतर अमेरिकेलाच तोंडघशी पाडतात आणि ओबामांना इतर देशांना भरीला घालून हल्ले सुरू करण्याची वेळ येते, या टप्प्यावर शेवट होतो.
...
(फिर) तेरे बिन लादेन...
प्रमुख भूमिका ः ओसामा, ओबामा, जॉर्ज बुश.
चित्रपटाची पार्श्‍वभूमी "फस गये रे...'सारखीच. फक्त अफगाणिस्तानची पार्श्‍वभूमी हा "यूएसपी' ठरू शकेल. जॉर्ज बुश यांच्या बालपणापासून चित्रपट सुरू होतो. लहानगा जॉर्ज "लंडन लंडन'ऐवजी "लादेन लादेन', "रंग रंग कोणता'ऐवजी "लादेन लादेन कोणता', "खांब खांब खांबोळी'च्या ऐवजी "इराक-अफगाणिस्तान लांबोळी', असे खेळ खेळत असतो. लहानपणीच्या जॉर्जच्या भूमिकेत तेवढ्याच बालिशपणासह स्वतः जॉर्ज बुश बेमालूम अभिनय करतात. बुश आणि अमेरिका शेवटपर्यंत लादेनचा शोध घेत राहतात; पण तो त्यांच्या हाती लागत नाही. शेवटी "तेरे बिन लादेन'मध्ये लादेनची भूमिका करणारा कलाकारच त्यांच्या हाती लागतो, असा उत्कंठावर्धक क्‍लायमॅक्‍स. बुश यांची सद्दी संपल्यानंतर ओबामा पुन्हा लादेनच्या शोधावर निघतात, असं "कॅची' दृश्‍य दाखविल्यानं चित्रपटाच्या "सिक्वल'ची ("एक बार फिर' तेरे बिन लादेन) उत्कंठाही टिकून राहते.
...
सिंग इज किंग! (पार्ट 2)
प्रमुख भूमिका ः मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज.
एका दाट जंगलात बोधिवृक्षाखाली मनमोहनसिंग तपश्‍चर्या करीत बसले आहेत. समष्टीपासून दूर जाऊन मनःशांतीचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. अचानक सोनिया गांधींचा फोन येतो. मनमोहनसिंगांना पंतप्रधान केल्याचं सांगितलं जातं. मनमोहनसिंग भगवे कपडे बदलून पांढरे कॉंग्रेसवादी कपडे परिधान करून विमानातून थेट राष्ट्रपती भवनाच्या हिरवळीवर अवतीर्ण होतात. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर उभी केल्यासारखी त्यांची खुर्ची सतत डळमळीत राहते. अचानक तिची "डावी' बाजू कलते. मग "उजवी'कडून खुर्ची उलटविण्याचा जोरदार प्रयत्न होतो. तरीही ती स्थिर राहते. कुणीकुणी कुजके, मोडके टेकू आणून खुर्चीला लावतं. त्यामुळं खुर्ची डळमळीत राहते. त्यावर बसलेले मनमोहनसिंग मात्र निश्‍चल, निस्तब्ध, स्थितप्रज्ञ दिसतात. पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेऊन पुन्हा जागेवर येते, तरीही खुर्चीला काही होत नाही. मध्येच अवकाशातून अणुकरार, राष्ट्रकुल, "आदर्श', "विकिलिक्‍स' अशा वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचे वार होत राहतात. तरीही ते जागचे हलत नाहीत...
या चित्रपटाचा "यूएसपी' असा, की पाच वर्षांच्या काळात घडणारी कथा संथ, उत्कंठाहीन असली आणि नायक अगदीच "भारत भूषण' असला, तरी प्रेक्षक पुन्हा पाच वर्षांचा काळ बघण्यासाठी तिकीट काढून कौल देतात!
...
गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा

प्रमुख भूमिका ः विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, इत्यादी.
फिरत्या रंगमंचावर हा चित्रपट घडतो. प्रत्येक हिरो येऊन आपली भूमिका चांगल्या प्रकारे वठवण्याचा प्रयत्न करतो. मध्येच विंगेकडे बघत राहतो. प्रॉंप्टरच्या इशाऱ्याचा वेध घेत राहतो. "नेक्‍स्ट' असं करून ओरडल्याचा एका बाईचा आवाज पडद्यामागून ऐकू येतो. की लगेच स्क्रीनवर असलेला हिरो आपलं चंबूगबाळ आवरून प्रेक्षकांचा रामराम घेतो. गंमत म्हणजे, पडद्यावर असेपर्यंत अगदी "लार्जर दॅन लाइफ' असणारा हा हिरो त्याची भूमिका संपल्यानंतर अगदीच केविलवाणा दिसू लागतो. रंगमंचाच्या कोपऱ्यावर, आडोशाला उभे असलेले काही सहायक अभिनेते मध्येच विंगेत जाऊन ऑर्डर सोडणाऱ्या त्या बाईंना काहीबाही सांगताना दिसतात. हिरोच्या कपाळावर चिंतांचं जाळं पसरतं. तो विंगेकडे बघूनच "नेक्‍स्ट'ची आज्ञा कानी पडण्याची वाट बघत चंबूगबाळं आवरायला घेतो. पुढे काही घडणार, अशी उत्सुकता असतानाच "दी एन्ड'ची पाटी झळकते...

Mar 13, 2011

फुकट ते पौष्टिक?

"सर, यू हॅव बीन सिलेक्‍टेड फॉर ए फ्री गिफ्ट व्हावचर...'
लाडिक आवाजातल्या एका "तरुणाचा' दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. सहसा अशा फोनना काय उत्तर द्यायचं, त्याला आता मी सरावलोय. पण इथे जरा माझ्या इंटरेस्टचा विषय होता. चकटफु पर्यटनाचा.
"क्‍लब महिंद्रा'कडून हा फोन होता. त्यासाठी आम्हा दोघांना जोडीनं त्यांच्या हापिसात गिफ्ट व्हावचरचा आहेर साकारण्यासाठी जायचं होतं. रविवारचा दिवस ठरला. दुपारी साडेबाराला बोलावलं होतं, बाणेर रोडवर दुपारच्या उन्हात बोंबलत तो पत्ता शोधेपर्यंत एक वाजला. एक तासाचं प्रेझेंटेशन ऐकावं लागणार, ते कुठल्या तरी मेंबरशिपची गळ घालणार, कशात तरी अडकवण्यासाठी भुलवणार, सगळं ठाऊक होतं. पण काहीही घ्यायचं नाही, असं आधीच ठरवलं होतं. अर्थात त्यांच्याच ऑफिसात त्यांच्या गळ घालण्याला बळी न पडता त्यांच्याकडून गिफ्ट व्हावचर घेऊन बाहेर पडण्यासाठी जरा जास्तच निगरगट्टपणा हवा होता. तेवढा आजच्या पुरता अंगी आणला होता.
प्रेझेंटेशन म्हणजे त्यांच्या योजनेचं आणि कंपनीचं दुकान लावण्याचा कार्यक्रम होता. पर्यटन किती वेळा करता, कधी करता, किती खर्च करता, कसं करायला आवडेल, परवडलं तर फाइव्ह स्टार हॉटेल आवडेल का वगैरे प्रश्‍न विचारून झाले. वरवरची अशी माहिती घेण्यात काहीतरी गौडबंगाल आहे, हे लक्षात येत होतंच. पण आमचा अंतिम निर्णय आधीच तयार असल्यानं फारशी चलबिचल होत नव्हती.
माहिती देणाऱ्या माणसानं चार-पाच कोऱ्या कागदांची चवड सोबत घेतली होती. त्यावर गिरबटावून तो आम्हाला कायकाय समजावून देत होता. अर्थातच तुम्हाला काय आवडतं आणि त्याचा स्टॅंडर्ड एवढ्याच पैशात वाढवून मिळाला, तर आवडेल का, हे विचारण्यावर भर होता. आमची बहुतांश उत्तरं सकारार्थीच होती. शेवटी दीडेक तासांनी त्यांनी मुद्द्याला हात घातला. "क्‍लब महिंद्रा'च्या मेंबरशिपची ती ऑफर होती.
या ऑफरमध्ये दोन प्रकार होते. एक स्पेशल ऑफर आणि दुसरी साधी ऑफर. साध्या ऑफरमध्ये ज्या दिवशी मेंबरशिप घेऊ, त्याच दिवशी दर वर्षी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी फिरायला जायची अट होती. ते ठिकाण देखील ते तीन दिवस आधी सांगणार. त्यात आपण प्रवास वगैरे सगळी व्यवस्था करायची. म्हणजे ही ऑफर फक्त दिखाऊच होती. कुणी घेऊ नये अशीच.
स्पेशल ऑफर आकर्षक होती. त्यात फाइव्ह स्टार हॉटेलात राहण्याची सोय दिवसाला हजार रुपये या दरानं करून देण्याचं प्रलोभन होतं. तिकीटांची व्यवस्था, आणायला-जायला टॅक्‍सी सेवा, तिथल्या आणखी सुखसोयी, अशी काय काय व्यवस्था होती. त्यासाठी सगळ्यात स्वस्ताची ऑफर अशी होती - दर महिन्याला 4085 रुपये चार वर्षं भरायचे. ही रक्कम साधारण दोन लाखांपर्यंत जाते. त्यांनी दाखविलेल्या एकूण भरायच्या रकमेत मात्र एक लाख 60 हजार दाखविले होते. शिवाय त्याच्या दहा टक्के म्हणजे 16 हजारांची रक्कम आजच्या आज, ताबडतोब भरायची होती. व्हिसा, मास्टर कार्ड चालणार होतं.! अर्थातच, याची कल्पना आम्हाला आधी देण्यात आली नव्हती. बहुधा मी पंधरा-वीस हजार रुपये शिशात घेऊन फिरणारा मालदार माणूस असावा, अशीच त्यांची अपेक्षा असावी. असो.
त्याशिवाय दर वेळी भारतात किंवा परदेशात पर्यटनाला जाताना "फक्त' 9 हजार भरायचे होते. म्हणजे या नऊ हजारांत सात दिवसांची हॉटेलची राहण्याची सोय होणार होती. साधारणपणे दिवसाला साडेनऊशे रुपयांत फाइव्ह स्टार हॉटेल! म्हणजे, असा त्यांचा दावा होता. त्याआधी भरलेल्या दोन लाखांचा हिशेब ते जमेत धरत नव्हते.
सगळ्यात महत्त्वाची मेख म्हणजे ही स्पेशल ऑफर त्या-त्या दिवसापुरतीच लागू होती! घरी जाऊन विचार करू, मग सांगू वगैरे काही नाही! आज, आत्ता, ताबडतोब!!
म्हणजे 16 हजार त्यांच्या ताब्यात द्यायचे, चार वर्षे दर महिन्याला 4 हजार रुपये भरायचे. शिवाय दर वेळी फिरायला जाऊ, तेव्हा 9 हजार भरायचे. राहण्याची व्यवस्था, इतर सवलती हे सगळं झकास होतं. मला खटकल्या त्या दोन गोष्टी. एक तर आजच्या आज 16 हजारांचं डाऊन पेमेंट करायची सक्ती आणि चार वर्षांसाठीचा ईएमआय. दोन लाख रुपये भरून 25 वर्षांसाठी ही योजना वापरता येणार होती. पण आपले पैसे अडकणार होते, एवढी रक्कम दर महिन्याला परवडणार नव्हती, हे तर होतंच. शिवाय आपण पुढे-मागे खपलो, तर काय? 25 वर्षं पर्यटन करू, असं कुणी बघितलंय? भले आपलं कार्ड ट्रान्सफर करण्याची किंवा विकण्याची सवलत असली, तरी त्यासाठीचं गिऱ्हाईक कोण शोधून देणार? शिवाय आपण आधीच पैसे भरून टाकलेले असताना त्याच्या घशात फुकटात हे कार्ड कशाला घालायचं?
असे बरेचसे प्रश्‍न मला पडले. शिवाय ताबडतोब निर्णय घेण्याच्या सक्तीबाबतही मनात शंकेची पाल चुकचुकली. वेळ आणि पैशांनुसार जमेल तेव्हा जमेल तिथे फिरायला जायची आपली पद्धत. यांच्यासाठी फाइव्ह स्टारमध्येच जाऊन राहा आणि त्यासाठी आधी पैसे भरा, हे उद्योग कुणी सांगितलेत? मला ताबडतोब 16 हजार वगैरे भरणं परवडणारं नव्हतं आणि दर महिन्याचा ईएमआयही. त्यातून त्यांची ही घाई म्हणजे लपवाछपवीचाच उद्योग वाटला. आम्ही त्यांना सप्रेम नकार देऊन आणि अर्थातच, फुकटातलं व्हावचर घेऊन बाहेर पडलो.
येऊन-जाऊन साडेतीन तास गेले होते. दुपारचे साडेतीन वाजल्यानं सहचारिणीनंही स्वयंपाकघरावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. त्यामुळं हाटिलातच हादडावं लागलं. तिथे ते फ्री गिफ्ट व्हावचर पाहताना लक्षात आलं, की तीन दिवस दोन रात्री फुकटात राहण्याची ऑफर मिळवण्यासाठीदेखील सगळ्यात जवळचं ठिकाण कुर्ग (कर्नाटक) हे होतं. "सहा महिन्यांसाठी ही ऑफर व्हॅलिड आहे,' असं सांगणाऱ्यांनी त्याच्या मागे मात्र तीनच कालावधी नमूद केले होते. त्यातला एक 20 मार्चपर्यंतचा होता, जो अशक्‍य होता. दुसरा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातला आणि तिसरा असाच कुठलातरी. म्हणजे सहा महिन्यांत जाऊ शकता, ही ऑफरही फसवीच ठरली.
तुम्हाला कुणाला आलेय का अशी ऑफर? तुम्ही काय केलं त्या वेळी? की खरंच आहे काही त्यात तथ्य?
प्रतिक्रियांची वाट पाहतोय. या वेळी फक्त अनुभव लिहिण्याबरोबरच दुसऱ्यांचे अनुभव कळावेत, ही मनापासूनची इच्छा आहे....तेव्हा लिहा प्लीज!

Mar 7, 2011

शर्यत रे जिंकली!







"कासव' हा काही उत्साहानं पाहायला जाण्याजोगा प्राणी नाही. मुलांनाही ससा आणि हत्ती-वाघाची जेवढी क्रेझ वाटते, तेवढी कासवाबद्दल वाटण्याची काहीच गरज नाही. एवीतेवी पडला हळू चालणारा, सगळ्यांच्या मागे असलेला आणि कुणाच्या अध्यात-मध्यात न येणारा प्राणी. पण वेळासच्या महोत्सवानं कासव ही सुद्धा पाहण्याची गोष्ट असते, हे सिद्ध केलं. आम्ही वेळासला गेलो, तर किनाऱ्यावर नुसती कासवाची पिल्लं पाहायला दीड-दोनशे पर्यटक मुंबई-पुणे, अन्य कुठल्या कुठल्या शहरांतून आले होते!
एका सहकाऱ्यानं ही टूम काढली होती. मलाही बऱ्याच दिवसांत कुठेतरी उलथायचं होतंच. त्यामुळं सहकुटुंब जायचं ठरवलं. मंडणगडला आधी कधी गेलो नव्हतो. दापोली पाहून झाली, पण मंडणगड तसं अनभिज्ञ होतं. ताम्हिणीमार्गे जायचं तर पाच तासांपासून आठ तास, असा कितीपण रस्ता कुणीही सांगत होतं. वेळास महोत्सवाच्या वेबसाईटवरून थोडीशी माहिती मिळाली होती, पण रस्ता शोधण्याला, चुकण्याला आणि डोकेफोड करण्याला काही पर्याय नव्हता.
तुलनेनं सकाळी पावणेआठला निघाल्यापासून रस्त्याबाबत तरी फारशी काही अडचण आली नाही. एकूण दोनशे किलोमीटरचा प्रवास होता. ताम्हिणीमार्गे माणगावात गेल्यानंतर तिथून वाट शोधत शोधत मंडणगडला पोचलो. तिथूनही वेळास 40 किलोमीटर होतं. दुपारी एकच्या सुमारास आम्ही वेळासमध्ये पोहोचलो. समुद्राच्या काठानं जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यानं वेळासमध्ये आम्ही पोहोचलो. जेमतेम दोन-अडीचशे उंबऱ्याचं गाव. छान नारळीपोफळीच्या बागांमधून जाणारा रस्ता. प्रकाश जोशी यांच्या घरी आम्ही आमच्या राहण्याची व्यवस्था सांगून ठेवली होती. वेळास हे छोटं गाव असल्यानं इथे राहण्याची सोय घरगुतीच आहे. जोशींचं घर अगदी जवळच होतं. तिथे पोहोचलो आणि अगदी कोकणी मातीचा आणि घराचा सुगंध आला. पुढे अंगण, मागे परसदार, पोफळीची बाग...असा मस्त कोकणी थाट होता. जोशींची आणि आमची साता जन्मांची ओळख असावी, अशा थाटात मुलं आणि त्यांच्या मागून आम्हीही त्यांच्या सगळ्या घरात बागडू लागलो. बाहेरचे पाहुणे म्हणून स्वतंत्र खोली वगैरे प्रकार नव्हता. माजघरात एकत्रित जेवण, कुठेही बसून गप्पा, असा सगळा घरगुती मामला होता.
दुपारी जरा वेळ परसातच पडी टाकून आम्ही संध्याकाळी कासवं बघायला समुद्राकडे लोटलो. समुद्र तसा दीडेक किलोमीटरवर होता. मुख्य म्हणजे थेट किनाऱ्यापर्यंत गाड्या जाऊ नयेत, अशीच व्यवस्था कासव महोत्सव आयोजित करणाऱ्या सह्याद्री निसर्ग मंडळानं करून ठेवली होती. बाहेरच्या रस्त्यावर गाड्या लावायच्या आणि आत शेतातून जवळपास तीनेकशे फूट चालत जायचं. जाताना वाटेत दोन काठ्यांची बेडी. (कुंपणं.) जेणेकरून दारूड्यांना धडपणे समुद्रावर तमाशे करण्यासाठी पोहोचताच येऊ नये. आम्ही गेलो, तेव्हा कासवांना बाहेर काढण्याची तयारी सुरू व्हायची होती. ऑलिव्ह रिडले जातीची कासवं या किनाऱ्यावर येऊन डिसेंबरपासून अंडी घालायला सुरुवात करतात. पूर्वी ही अंडी बहुतेकदा स्थानिकांच्या पोटात जायची. सह्याद्री मंडळाचे भाऊ काटदरे यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करून या कासवांना वाचविण्याची मोहीम हाती घेतली. सन 2002 पासून अव्याहतपणे हा उपक्रम सुरू आहे. आता स्थानिक लोकच या कासवांना वाचविण्यात आघाडीवर आहेत. ओरिसानंतर सर्वाधिक प्रमाणात या वेळास किनाऱ्यावरच ही कासवं येतात. अंडी घालून गेली, की पुन्हा या आया मुलांकडे परतत नाहीत. वाळूखाली दीड फुटांवर ही अंडी घातलेली असतात. स्थानिक रक्षक ही अंडी एका सुरक्षित ठिकाणी हलवतात. पुन्हा तेवढाच खड्डा करून, तशाच प्रकारे अंड्यांची रचना करावी लागते...तीदेखील सहा तासांत! पहाटेपासून ही मोहीम सुरू होते. किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी अंडी ठेवल्यानंतर 55 दिवसांनी पिल्लं वाळूतून वर येतात. कावळे-कोल्हे-कुत्र्यांपासून त्यांना वाचविण्यासाठीही हे कुंपण उपयोगी ठरतं. प्रत्येक घरट्याच्या (अंडी ठेवलेली जागा) वर टोपल्या असतात. पिल्लं वाळूतून वर येऊन या टोपलीखाली येऊन बसतात. सकाळी सात आणि संध्याकाळी सहा वाजता समुद्रापर्यंत त्यांची पाठवणी करण्याचा कार्यक्रम होतो
.
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाला टोपल्या उघडण्यात आल्या. आठ-दहा घरट्यांपैकी एकाच घरट्यातून सात पिल्लं बाहेर आलेली होती. कधीकधी एका वेळी 50 ते 100 पिल्लंही मिळू शकतात. आमचं नशीब एवढं थोर नव्हतं. पण आम्ही गेलो त्या दिवशी सकाळी आणि आदल्या दिवशीही एकही पिल्लू मिळालं नव्हतं. त्या मानानं आम्ही नशीबवान होतो.
एकेक पिल्लू टोपलीत घेऊन समुद्रापासून ठराविक अंतरावर त्याला वाळूत उतरवण्यात आलं. पिल्लं लगेच धडपडत समुद्राकडे धावत सुटली! लोकांच्या पायाखाली ती येऊ नयेत म्हणून कुंपणही घालण्यात आलं होतं. पाचेक मिनिटांतच ती समुद्राच्या लाटांवर स्वार झाली....आपापल्या आयुष्याची वाट शोधत!
एवढा दहा मिनिटांचा खेळ पाहण्यासाठी आम्ही चारशे किलोमीटरचा प्रवास, दोन दिवसांची सुटी, दगदग सगळं सहन केलं होतं. पण कासवांबरोबरच कोकणी गावातल्या आदरातिथ्यानंही सगळे श्रम वसूल झाले.
वेळासहून हरिहरेश्‍वरही अगदी जवळ आहे. जेटीतून कारसह पलीकडे जावं लागलं फक्त. तिथून दहा किलोमीटरवर हरिहरेश्‍वर होतं. तिथेही भेट देऊन संध्याकाळपर्यंत परत आलो. दीड दिवसांच्या या प्रवासानंतर मला संध्याकाळी पुन्हा ड्युटीवर जायचं होतं. कासवांना त्यांची वाट शोधायला समुद्राचा अफाट परीघ होता. आम्हाला मात्र पोटापाण्यासाठी नोकरीशिवाय (तूर्त) पर्याय नव्हता!
...
 

Feb 27, 2011

नायगावकर उवाच!

``काय सुंदर विडंबनं आहेत!
"हा माणूस स्टेजवर परफॉर्म करत असेल, तर नक्की स्टेज गाजवत असेल...''
 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कवितासंग्रहात मी दिलेल्या कविता वाचून साक्षात (महा)कवी अशोक नायगावकर यांनी माझ्या विडंबनांचा केलेला गौरव!

याच त्या कविता...

मी बुडताना गाव माझा
डोळे भरून पाहिला होता
"दिवाळी' साजरी करायला सारा गाव
किनाऱ्यावर उभा राहिला होता
---------
बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला
मी तिच्याजवळ नव्हतो,
कारण त्या वेळी वाढत्या लोकसंख्येवर
मी भाषण झोडत होतो
----
पावसाची सर चुकून
त्या दिवशी घरातच पडली
आणि त्यानिमित्ताने मला
बऱ्याच दिवसांनी आंघोळ घडली
-------
गावाबाहेर आडोशाला
एक पडका वाडा आहे...
तिथेच भरलेला माझ्या
तारुण्यातल्या पापांचा घडा आहे...
----
मैत्रीण दाराशी आली; म्हटलं,
"तुला शंभर वर्षं आयुष्य आहे!'
बायको घरी नाही पाहून ती म्हणाली,
"हा काय मनुष्य आहे!'
------
बोन्साय केलेल्या झाडालाही
नवी पालवी फुटली...
त्यालाही कळेना,
ही वाढायची जिद्द कुठली?
-----
ठाऊक असतं, तुझं येणं अशक्‍य आहे
तरी मन "पॉइंट'वर जाणं सोडत नाही
तुला शोधताना मग नजर
एकही "पाखरू' सोडत नाही...
------
मरताना वाटलं,
आयुष्य नुसतंच वाहून गेलं
करायचंय, करायचंय, म्हणताना
लग्न करायचंच राहून गेलं...
----
घराभोवती कुंपण हवं
म्हणजे ते सुरक्षित ठरवता येतं
आपल्या गुरांना मात्र
दुसऱ्याच्या आवारात चरवता येतं...
------
सिगारेटची थोटकं मिळाली
परवा कपाट लावताना
किती माझी उडाली धांदल
असले "धंदे' लपवताना...
---------
कुणी बरोबर असेल, तर
सिनेमा पाहायला अर्थ आहे
एकट्यानेच पाहायचा असेल,
तर आतला "अंधार'ही व्यर्थ आहे!
--------
दाढीतला एक ढेकूण
एकदा चुकून मिशीत शिरला
इथे सुरक्षित राहू म्हणून
मिशीतल्या मिशीत हसला
---
कुणी म्हणो वाचाळ,
कुणी म्हणो निर्लज्ज आहे,
कोणत्याही "परस्त्री'ला
तोंड द्यायला मी सज्ज आहे...
---
बरसण्याची वेळ आली,
तेव्हा डोळेही फितुर झाले
त्याच वेळी खांदे माझे
तुला "पोचवायला' आतुर झाले...