Sep 1, 2009

प्रवास तपपूर्तीचा

ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 045
धुक्यात बुडालेला आंबा घाट. कोकणचे प्रवेशद्वार.
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 049
एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पाठवावा का हा फोटो?
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 054
निसर्गानं मन प्रसन्न केलं.
----
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 088
गणपतीपुळ्याला जाण्याचा भन्नाट रस्ता.
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 093
समुद्राची गाज ऐकत थांबण्याला पर्याय नाही!!
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 141
उंटावरच्या शहाण्या!
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 128
समुद्रात धमाल केली
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 114
किल्ला केला, वाहून गेला!
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 157
आरतीला मनस्वी पुढे होतीच...
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 078
अंगणात साफसफाईलाही पुढे!
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 226
गणपतीबाप्पाला निरोप
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 211
थिबा पॉइंटची नवी बाग
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 202
पलीकडे दिसतोय, तो भाट्याचा पूल! (भाट्याच्या खाडीत बुडणारा दालदी आठवतोय ना?)
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 188
कुरध्यात गेलो, ते नदी पार करून.
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 186
कुरध्यातलं निसर्गरम्य घर!
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 172
आडिवर्‍याचं मंदिर
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 177
कशेळीचा कनकादित्य : सूर्य मंदिर
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 256
..आणि परतीच्या प्रवासातला घाटातला धबधबा!
--------

बरोब्बर बारा वर्षं. एक तप झालं मी रत्नागिरीहून स्कूटर घेऊन एकटाच पुण्याला आलो होतो, त्याला. गणपतीतच. असाच भन्नाट पाऊस होता. यंदाही तशीच सफर घडली. फरक फक्त दोन होते. एक रत्नागिरी-पुणे मार्गाचा आणि दुसरा गाडीचा. सन 1997 साली मी बजाज सुपर एफई घेऊन आलो होतो आणि यंदा "मारुती अल्टो'!
गाडी घेतली, तेव्हाच रत्नागिरीच्या गणपतीला यंदा गाडीनंच जायचं, असं ठरवून टाकलं होतं. त्यामुळं दरवर्षी 21 दिवस आधी रिझर्व्हेशनसाठी तडफडावं लागतं, बराच वेळ खोळंबूनही पाहिजे ती सीट मिळत नाही, ती गोष्ट वेगळीच. यंदा तो त्रास वाचणार होता. गणपतीच्या पहिल्या दिवशी यंदा जायला जमणार नव्हतं. यंदा एकूण सात दिवस बाप्पा घरी मुक्काम करणार होते. त्यामुळे पुण्यातील कामं आटोपून तिसऱ्या दिवशी रत्नागिरीकडे प्रयाण केलं. नाही म्हणता म्हणता पुण्यातून बाहेर पडायला सकाळचे साडेआठ वाजले. स्वाइन फ्लूच्या धोक्‍यामुळं कुठे हॉटेलाबिटेलात थांबणार नव्हतोच. पोटपूजेचं साहित्य सोबत घेतलं होतं. खंबाटकी घाटात थांबून आधी पोटपूजा केली. सकाळी गार वाऱ्यांच्या झुळकांत पोटभर नाश्‍ता करायला मजा आली. नंतर साताऱ्याच्या रस्त्याला लागलो. आम्हाला कोकरूडमागे (कोल्हापूरला वळसा घालून) रत्नागिरीकडे जायचं होतं. जाताना अपेक्षेप्रमाणेच, कोकरूड फाटा शोधताना दमछाक झाली. तो एकदा सापडल्यानंतर पुढे काही अडचण नव्हती.
कोकरूड गावाजवळ एकदा थोडी गडबड झाली, एके ठिकाणी चुकीच्या रस्त्याने थोडा पुढेही गेलो, पण लवकरच चूक लक्षात आली. नंतर मात्र कुठे चुकलो नाही. आंबा घाटात पोचलो आणि पहिल्यांदा पावसानं कृपा केली. गोमुखाच्या ठिकाणी पोचलो, तर तुफान पाऊस आणि धुक्‍यात बुडून गेलो. बाहेर उतरून फार वेळ थांबण्याचीही सोय नव्हती. उरलेला घाट जपूनच उतरावा लागला. पुढेही कोकणात उतरताना दोन-तीन ठिकाणी पाऊस लागला. वाटेत रमतगमत, फोटो काढत, थांबत गेलो. त्यामुळे रत्नागिरीत पोचायला पावणेचार वाजले. पण त्याची खंत नव्हती.
रत्नागिरीत पाच दिवस मुक्काम होता.
दुसऱ्या दिवशी आरे-वारे मार्गे गणपतीपुळ्याला गेलो. पण यंदा कोतवड्यातून न जाता काजरभाटीचा नवा रस्ता निवडला होता. या मार्गावरून रत्नागिरी-गणपतीपुळे अवघं 28 किलोमीटर अंतर आहे. समुद्रात काही वेळ खेळलो, किल्ले वगैरे केले. "कोकण दर्शन' प्रदर्शन पाहायचं या वेळीही राहून गेलं.
तिसऱ्या दिवशी राजापूरजवळ आडिवरे येथे आमच्या कुलदैवताला जायचं ठरलं. पावस-पूर्णगडमार्गे जाणारा हा रस्ता भन्नाटच आहे. आडिवऱ्याला मी पहिल्यांदाच जात होतो. पूर्णगडच्या पुढचा, गावखडीपासूनचा रस्ता तर समुद्रकिनाऱ्याला लागून असललेल्या सुरूबनाशेजारून जाणारा होता. मस्त गार वारा होता आणि आम्ही त्या भन्नाट रस्त्यावरून एकटेच निघालो होतो...
आडिवऱ्याचं पारंपरिकता जपणारं रवळनाथ आणि महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती मंदिर मन प्रसन्न करणारं होतं. देवाधर्माशी मला काही देणंघेणं नसलं, तरी देवळं पाहायला मात्र फार आवडतं. विशेषतः खेडेगावांत असणारी शांत, निवांत देवळं. त्यातूनही शंकराची देवस्थानं म्हणजेपर्वणीच! पण ते असो.
आडिवऱ्यात दर्शन उरकून कशेळीचं सूर्यमंदिर पाहायला निघालो. भारतातल्या काही निवडक सूर्यमंदिरांपैकी ते एक आहे. सुमारे नऊशे वर्षांपूर्वी कशेळी समुद्रकिनाऱ्याजवळ समुद्रात एक जहाज अडकलं आणि त्यातली मूर्ती तिथल्या एका किनाऱ्यावरच्या गुहेत त्यांनी सोडून दिली, अशी आख्यायिका सांगितली जाते. गुजरातमध्ये मूर्तिभंजनापासून टाळण्यासाठी ही मूर्ती महाराष्ट्राकडे हलविण्यात आली होती. आडिवऱ्यात आणि कशेळी सूर्यमंदिरातही मी वेगळ्या प्रकारची पाणी काढण्याची व्यवस्था पाहिली. त्याला काय म्हणतात, कोण जाणे!
येताना वाटेवरच्या कुरधे गावात आमच्या एका परिचितांकडे जायचं होतं. त्यांच्या घराचा रस्ताही शेत आणि नदीतून जाणारा, एकदम कोकणाची सर्व वैशिष्ट्यं असलेला होता. मजा आली.
रत्नागिरीत काही गणपती पाहिले. मुख्य म्हणजे तिकडे स्वाइन फ्लूचं सावट नव्हतं. त्यामुळे कुठेही भटकण्यात काही बंधनं नव्हती. एके संध्याकाळी सहज थिबा पॉइंटला गेलो होतो, तर तिथल्या पूर्वीच्या नैसर्गिक सुंदर ठिकाणी भली मोठी बाग उभारलेली! आम्ही कॉलेजात होतो, त्या काळात संध्याकाळी भटकायची ही ठिकाणं! ते दगड, दरी...सगळं आता कृत्रिम सौंदर्यानं वेढलं होतं. तरीही, बागेची रचना आवडली. विशेष म्हणजे तिथला धोका आणि स्वैरपणा कमी करण्यात या बागेचा मोठा हातभार लागेल.
पुण्याला येतानाच्या प्रवासासाठी थोडा लवकर, म्हणजे साडेसातला निघालो. रात्री फार झोप झाली नव्हती, त्यामुळे थोडा थकवा होता. तरीही प्रवास उत्तम झाला. पण जाताना जास्त मजा आली होती. कारण सुरुवातीचा पुणे-कऱ्हाड महामार्गावरचा कंटाळवाणा प्रवास संपल्यानंतर पुढे आंबा घाट, कोकणात उतरण्याचा मार्ग, हा प्रवास प्रसन्नकारक आणि उत्साहवर्धक होता. येताना नेमकी उलट परिस्थिती होती. वाटेत कोकरूडच्या पुढे आम्हाला एक लांडोर चालत जाताना दिसली. नंतर वेगळ्या प्रकारचे तीन लांबलचक पक्षी उडत जाताना दिसले. ते पुढे गेल्यावर कळलं, ते मोर होते! वाटेत शेतात काही मोरांचा केकारव पण ऐकू आला, पण दिसले मात्र नाहीत!
मनस्वीनं जाताना तिच्या समस्त गाण्यांचं पारायण करून एवढा पिट्ट्या पाडला होता, की आम्ही पार वैतागून गेलो होतो. येताना खास तिच्यासाठी 50 गोष्टींची एमपी3 घेतली होती. पण दहा-बारा गोष्टी ऐकूनच तिने साडेदहाच्या सुमाराला जी ताणून दिली, ती एकदम पुण्यात आल्यावर तीन वाजताच उठली!
बारा वर्षांपूर्वी रत्नागिरीहून पुण्यात राहायला आलो, तेव्हा गणपतीनंतर स्कूटर घेऊन आलो होतो. तो प्रवास मात्र चिपळूण-कोयनामार्गे केला होता. एकट्यानं दुचाकीवरून एवढा मोठा प्रवास करायची ही पहिलीच वेळ होती. वाटेत तब्बल 11 जणांना विनामोबदला लिफ्ट दिली होती! या वेळच्या चार चाकीमधून केलेल्या प्रवासाच्या वेळीही त्याची आठवण झाली. विशेष म्हणजे, त्या प्रवासात एका ठिकाणी कुत्रं अंगावर आलं होतं. या वेळीही आलं, पण माझ्या गाडीला दोन चाकांची पडलेली भर त्याला लक्षात आली नसावी!

Aug 15, 2009

पारतंत्र्यदिन!

mask
(खालील लेख हा आठ दिवस सर्व मनोरंजन बंद असल्याने भोगाव्या लागलेल्या मनस्तापाचा झालेला उद्रेक आहे. त्यातून "स्वाइन फ्लू'सारख्या जीवघेण्या समस्येबाबत गांभीर्य नसल्याची भावना झाल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा!)
----
पारतंत्र्यदिन!

छ्या! वैताग आलाय नुसता!
कुठे जाणं नाही, येणं नाही. नुसतं घर एके घर नि ऑफिस एके ऑफिस. पिक्‍चर नाही, नाटक नाही, चौफुला नाही की डान्स बार नाही!
आयचा घो या एच1एन1च्या!
गेल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती बरी होती. म्हणजे हा जो कुणी प्राणघातक विषाणू आहे, त्याच्या झळा जाणवत नव्हत्या. गेल्याच शनिवारी थेटरात जाऊन पिक्‍चर पाहिला होता. त्याच्या आदल्या दिवशी मुंबईला जाऊन आलो नव्हतो. फडकी नि मास्क लावून फिरायची फॅशन तोपर्यंत आली नव्हती. शनिवारी रात्री पुण्यात आणखी एकाचा घास त्या रोगानं घेतला आणि लोक बिथरले.
सोमवारी ऑफिसात आलो, तर निम्मे लोकं फडकी लावलेले! बोलतानाही ती काढण्याचं धाडस कुणी करत नव्हतं. (पुण्यात इतर वेळीही दहशतवाद्यांसारखी तोंडं झाकून फिरणाऱ्या मुलींनी "बघा, आमच्या नावानं बोटं मोडत होतात ना!' असे टोमणे मारून घेतले म्हणे!) मलाही लाजेकाजेस्तो दुसऱ्या दिवसापासून रुमाल लावून फिरणं नशीबी आलं. मनस्वीच्या (कन्या!) शाळेला आठ दिवस सुटी असल्याचं रविवारीच कळलं होतं. सोमवारी पालकमंत्र्यांनी सगळ्याच शाळा, थेटरं बंद करून टाकली. बसा बोंबलत!
मुघलांना जसे जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी-धनाजी दिसायचे, तसे मला ते एच1एन1 जागोजागी अदृश्‍य स्वरूपात दिसू लागलेत. एखाद्या अभयारण्यात पायी फिरताना कुठेही वाघबिघ असेल की काय, अशी भीती जशी वाटते ना, तसंच हल्ली बाहेर पडताना कुठे हा मेला विषाणू तरंगत असेल नि कधी आपल्या नाकातोंडातून शरीरात बसकण मारेल, अशीच दहशत जाणवते.
मास्कची विक्री दुप्पट, तिप्पट, दसपट, शेकडो पटीनं वाढली. दुकानदारांनीही त्यासाठी भरभरून सहकार्य केलं. (सदाशिव पेठेतल्या एका दुकानदारानं तर चक्क दुपारी एक वाजून तीन सेकंदांनी आलेल्या एका गिऱ्हाइकालाही तातडीने मास्क दिला म्हणतात!) मास्क कसा वापरावा, यावरून सरकारनं, प्रशासनानं, डॉक्‍टरांनी आणि स्वयंघोषित तज्ज्ञांनी मनसोक्त गोंधळ घातला. कुणी त्या डुकराच्या तोंडाचे मास्क वापरायला सांगितले. कुणी म्हणाले, ते नको, साधे सुद्धा चालतील. कुणी सांगितलं, मास्क नको...फक्त स्वच्छ धुतलेले रुमाल बांधा! ("स्वच्छ धुतलेले' ही अट फारच जाचक होती, ही गोष्ट अलाहिदा!) ते भारीतले (एन 95) मास्क म्हणे स्वाइन फ्लू झालेल्या पेशंटच्या आसपास वावरतानाच घालायचे. आता रिक्षात, बशीत, टमटमीत, बाजारात, दुकानात, ऑफिसात स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आसपास आहे की नाही, कसं ओळखायचं? मनोरुग्ण वगैरे वागण्यावरून ओळखू शकतो हो, स्वाइन फ्लूचा रुग्ण कसा ओळखायचा? बरं, शिंकतोय-खोकतोय म्हटलं, तरी ते आपण बारा महिने करत असतो! "स्वाइन फ्लू'त म्हणे घसा खवखवतो. ते शेजारच्या माणसाला कसं कळणार?
साधे मास्क घेतले, तर ते म्हणे दोन-तीन दिवसच वापरायचे. नंतर योग्य रीत्या त्यांची विल्हेवाट लावायची. (खरं तर मास्कबाबत अशी गोंधळ वाढवणारी माहिती देणाऱ्यांचीच विल्हेवाट लावायला हवी. पण ते "स्वाइन फ्लू' गेल्यानंतर बघू!) "योग्य रीत्या विल्हेवाट' हा अगदी पुणेरी फसवेपणा बरं का! ते मास्क एकतर जाळून टाकायचे, किंवा जमिनीत पुरायचे. आता मला सांगा, कुठला माणूस घरातून खाली उतरून ते मास्क जाळून किंवा पुरून टाकणार आहे?
रुमालांचीही एक गंमतच आहे बरं का! नाका-तोंडात विषाणू जाऊ नये, म्हणून रुमाल बाळगायचा. पण रुमाल मात्र घरी जाऊन स्वच्छ धुवायचा. आता तीन ते आठ तास हवेत स्वतंत्रपणे जिवंत राहू शकणारा हा विषाणू रुमालावर बसलेला असेल, तर तो घरात जाऊन रुमाल धुवायला टाकेपर्यंत दुसरीकडे कुठेतरी दडून नाही का बसू शकत? आणि नंतर आपण झोपल्यावर, जेवताना, लोळताना नाही का आपला डाव साधू शकत?
गेल्या आठवड्यात त्या विषाणूनं दहा-बारा बळी घेतल्यानंतर लोक जामच घाबरले. जिवाचाच प्रश्‍न आला, तेव्हा बाहेरही पडायचे बंद झाले. कुणी सांगितलं, निलगिरी हा बेस्ट उपाय! लगेच सगळे बेशुद्ध पडेपर्यंत ती निलगिरीच हुंगायला लागले. दुकानांतली निलगिरीच संपून गेली!
"स्वाइन फ्लू'नं जे बळी घेतले, त्यात नात्यांचा-आपुलकीचा घेतलेला बळी सर्वांत क्‍लेशकारक आणि धक्कादायक होता. जिवाला घाबरून लोक आपल्या जवळच्या व्यक्तींनाही विचारेनासे होण्याएवढे स्वार्थी झाल्याच्या बातम्या मन विदीर्ण करून गेल्या.
असो. यंदाचा स्वातंत्र्यदिन पारतंत्र्यात गेला असला, तरी गणपती सुरळीत पार पडतील आणि तोपर्यंत या राक्षसाचा आपण नायनाट करू, ही आशा!!
--

Aug 8, 2009

ड्यूक्‍स नोजचा धडा

ड्यूक्‍स नोजला पहिल्यांदा गेलो, तेव्हा म्हणजे साधारण 1999 सालापासून मी कोणत्याही वर्षी हा ट्रेक चुकविलेला आठवत नाही. एखाद्‌ वर्षाचा अपवाद असावा. अलीकडच्या काळात त्यात तोरणा आणि ढाक-भैरीचीही भर पडली होती. पण त्यात अनेकदा खंड पडला. ड्यूक्‍स नोजचा नेम मात्र कायम होता. यंदाही जूनमध्ये कोरड्या वातावरणात तोरणा कटाक्षानं टाळला. त्याची पुरेपूर भरपाई ड्यूक्‍स नोजला झाली.
नेहमीप्रमाणं "सिंहगड एक्‍स्प्रेस'नं खंडाळा गाठून तिथे पोटपूजा करून चालायला सुरवात केली. पहिल्या धबधब्यापाशीच पावसाच्या जोराचा अंदाज आला होता. हा ट्रेक म्हणजे जंगलातून जाणारी, दोन-तीन रॉक-पॅचची थोडीशी अवघड, पण भन्नाट वाट! वाटेत एक-दोन छोटे धबधबे आणि ओहोळ व नंतर डोंगरावरून फेसाळत येणारा मोठा धबधबा. यंदा धबधब्यापर्यंत पोचेपर्यंत त्याविषयीचं आकर्षण वाढलं होतं. धबधबा मस्त फेसाळत वाहत होता. यंदा तर त्याचा जोर एवढा होता, की थोडासा आधार घेऊनच पार करावा लागणार होता. आम्ही अर्थातच धबधब्यात मस्त तासभर डुंबलो. मनसोक्त भिजून-भिजवून झालं. निसर्गाची करामत म्हणजे, यंदा धबधब्याच्या वरच्या भागातला डोह दरड कोसळून नाहीसा झाला होता. तिथल्या धबधब्याचा प्रवाहदेखील बदललला होता. खालच्या धबधब्याचाच जोर एवढा होता, की त्याखाली उभंही राहवत नव्हतं. मग तिथेच धमाल केली.
धुक्‍यानं दरीचा बराचसा भाग व्यापला होता. पावसाचं कृपाछत्र असल्यावर ड्यूक्‍स नोजच्या ट्रेकची मजा वाढते. यंदा तर पावसानं नुसता धुमाकूळच घातला होता. धबधब्यात भिजल्यानंतर बदलायला मी कधी कपडे घेत नाही, पण यंदा घेतले होते. पण बदलावेसे वाटले नाहीत. ओले कपडे अंगावर वाळवण्याच्या आनंदाने ट्रेकचा उत्साह आणखी वाढतो. हाच निर्णय नंतर नडला!
वाटेत एका ठिकाणी मस्त लोटांगण घातलं. हाता-पायाला थोडं झाजरलं, कपडे चिखलात लोळले. पठारावरही भरपूर धुकं होतं. ड्यूक्‍स नोजवर पोचायला साडेबारा वाजले. तिथेही पावसानं झोडपून काढलं. धुक्‍यामुळं दरी दिसण्याचा प्रश्‍नच नव्हता. धबधब्यानंतर कॅमेराही बाहेर काढण्याची सोय नव्हती. साधारणपणे दोन वाजेपर्यंत खाली उतरलो. आता उतारावरची बरीचशी माती धूप होऊन वाहून गेल्यामुळे आणि खाली सुरू असलेल्या नव्या रस्त्याच्या कामामुळे उतारावरून घसरत येण्याचा आनंद कायमचा गेला!
जीन्स घातली होती, ती ओली (पावसामुळे!) राहिल्यानं पायाला घासून पाय आतल्या बाजूने मस्त सोलपटून निघाले! दोन दिवस विदूषकासारखं चालावं लागत होतं! भरपूर दिवसांनी केलेल्या ट्रेकमुळे पाय (आणि मन!) भरूनही आलं होतं. ("कुणी सांगितलं होतं नको तिथे शेण खायला!' अशी सुवचनं सहधर्मचारिणीनं ऐकवली, ती गोष्ट वेगळीच!)
असो. पुढच्या ट्रेकला जाण्याआधी 85 किलोच्या या देहाला आता थोड्या व्यायामाची सवय लावली पाहिजे, असा निश्‍चय केलाय. बघूया, कितपत अमलात येतोय ते!!

Aug 5, 2009

राखी : देवस्थळी ते सावंत!

rakhi

राखीपौर्णिमेचं लहानपणापासूनच कधीही फारसं अप्रूप नव्हतं. एकतर मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे तिच्याकडून राखी बांधून घेण्याची क्रेझ नव्हती. मामेबहिणी कधीतरी असायच्या रत्नागिरीत. तेव्हा राखीबंधनाचा सोहळा व्हायचा. पण ती राखी नैसर्गिक न वाटता, "बंधन'च वाटायचं. शेजारची स्वरूपा लहानपणापासून राखी बांधायची. आजही बांधते. तेवढं एक बंधन अतूट राहिलं.
त्या काळी वर्गातल्या, शेजारच्या मुलीशी बोलणंही पाप मानलं जायचं. वर्गात दंगा करणाऱ्या मुलाला शिक्षा म्हणून मुलीशेजारी बसवायचे! सातवीत एकदा अशीच "शिक्षा' आमच्या अख्ख्या वर्गाच्या वाट्याला आली होती. मग आम्ही बेंचवरच आपापली "हद्द' कर्कटकाने आखून घेतली होती. त्या हद्दीच्या पार कुठली वस्तू आली की जप्त करायची किंवा शेजारच्या मुलीला काहितरी शिक्षा करायची, असा नियम होता!
आमच्या घराच्या पल्याड काही अंतरावर राखी देवस्थळी नावाची एक मुलगी राहायची. घराशेजारी राहणाऱ्या, वर्गातल्या, नात्यातल्या, किंवा परिचयातल्या कोणत्याही समवयस्क मुलीच्या नावानं मुलांना चिडवण्याचा त्या काळी दंडकच होता! त्यामुळं मलाही तिच्या नावानं चिडवलं जायचं. हातावरच्या राखीनंतरची आयुष्यातली दुसरी "राखी' ही! बाकी, मामेबहिणी, अन्य शेजारणींच्या नावानंही चिडवणं व्हायचंच.
शाळेत रक्षाबंधनाचा सामूहिक, पारंपरिक, बंधनकारक सोहळा व्हायचा. मुला-मुलींची समसमान वाटणी करून प्रत्येकाला साधारणपणे एक या प्रमाणात राखी बांधण्याचा सार्वजनिक कार्यक्रम असायचा. या कुंभमेळ्यात आपली "लाइन' ("शाळा'!) आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी सर्वांची धडपड असायची. शाळेत ज्याच्या नावानं आपल्याला चिडवलं जातं, त्याला राखी बांधण्याचीही भयंकर प्रथा त्या काळी अस्तित्त्वात होती. मग या दहशतीमुळे अनेक जण राखीपौर्णिमेच्या दिवशीच नेमके आजारी पडायचे! तरीही नंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्यांना गाठून हा कार्यक्रम पार पाडला जायचाच! एकदा का त्या मुलाला राखी बांधली, की आपण "पवित्र' झालो, असा अनेक मुलींचा समज होता बहुधा!! पण राखी बांधली, तरी आम्ही "दादाभाई नवरोजी' व्हायला तयार आहोत, असा आमचा दावा असे.
हातावरची राखी जास्तीत जास्त दिवस टिकवणं हेदेखील एक पवित्र कर्तव्य होतं. आंघोळ करताना तिला पाणी लागू न देण्याचं कसब त्यासाठी पार पाडावं लागे. चित्रपटांच्या नावांच्या, भल्या मोठ्या स्पंजच्या आणि हल्लीच्या "पेस्ट्री'ला लाजवतील, अशा राख्याही बाजारात असायच्या. पण त्या हातावर बांधणं म्हणजे आपण अगदीच "ह्यॅ' असल्याचं लक्षण मानलं जायचं. शाळेत मिळायच्या त्या संघाच्या राख्या. मऊसूत गुंडा आणि एक साधा, केशरी दोरा. बस्स!
कॉलेजात असताना शेवटच्या वर्षात एकुलत्या एक वेळेला प्रेमात पडलो होतो. ही बया आपल्याला आता राखी बांधते की काय, अशी प्रचंड भीती त्या वर्षीच्या राखीपौर्णिमेला होती! पण सुदैवानं तसं काही झालं नाही. आणि तसं झालं असतं, तरी फरक पडला नसता, हे कॉलेज संपल्यानंतर उमगलं.
पुण्यात आल्यानंतर काही वर्षं बहिणींनी पोस्टानंही राखी पाठवली. साधारणतः राखीपौर्णिमा झाल्यानंतर आठवडाभराने ती मिळायची. त्यानंतरही ती हातावर बांधून मिरवण्यात एक प्रकारचं समाधान असायचं. विशेषतः एकटा राहत होतो, तेव्हापर्यंत!
...अगदी अलीकडच्या काळात आणखी एक "राखी' आयुष्यात आली. म्हणजे, खासगी नव्हे, तर सार्वजनिक आयुष्यात! ही राखी भलतीच मजबूत, बोल्ड आणि आकर्षक (हॉट?) होती! तीच ती..."महाराष्ट्राची खंत'. कुण्या पंजाब्यानं तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोण तीळपापड झाला होता अंगाचा!!
...पण हाय रे कर्मा! तिचं अगदी दोनच दिवसांपूर्वी लग्न ठरलं. आमचा मेव्हणा सातासमुद्रापारचा कुणी राजकुमार आहे म्हणे! आता त्याचे कान उपटायला जाईन म्हणतो!!

Jul 18, 2009

अटॅचमेंट!

मनस्वीच्या आयुष्यातील पहिली शाळा संपून एक वर्ष झालं. गेल्या वर्षी मार्चमध्ये तिची शिशु गटाची शाळा संपली. पहिल्या दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता ती कधी रडली नाही. नव्या शाळेत गेल्या वर्षी बालवाडीसाठी प्रवेश घेतला, तिथेही रमली. आता नव्या शाळेहून येताना बऱ्याचदा आम्ही तिच्या पहिल्या म्हणजे शिशु गटाच्या "पाखर' शाळेवरूनच बरेचदा जातो. अनेकदा त्यामागचा उद्देश असतो - तिच्या शाळेच्या आठवणी कायम ठेवणं!
हा आजार "अटॅचमेंट'चा! भावनिक जवळिकीचा. अशा भौतिक वस्तूंशी माझी कदाचित प्रत्यक्ष नात्यांपेक्षाही जास्त अटॅचमेंट आहे. आणि मुलीचीही तशी असावी, अशी (अनाठायी) अपेक्षा आहे. तिला मात्र पहिल्या "पाखर' शाळेतलं ढिम्म काही आठवत नाही. एकदा तिथल्या मुख्य बाई भेटल्या, त्यांनाही तिनं फारसं ओळखलं असावं, असं वाटलं नाही. बाकीच्या बाया आणि मुलांची नावं तर तिला अजिबात आठवत नाहीत. तिथली बाग, झोपाळा, घसरगुंडी आणि रचनाही आठवत नाही. कदाचित, ती नव्या शाळेत रमलेय म्हणूनही असेल. पण तिनं यापैकी काहीच विसरू नये, असं मलामात्र वाटत राहतं.
माझी सगळ्याच गोष्टींशी अटॅचमेंट व्हायची, होते. बालवाडीत मी एका नगरपालिकेच्या शाळेत होतो, तिथलं काही आठवत नाही. पण पहिली ते चौथी ज्या शाळेत शिकलो, तिथल्या पाण्याच्या टाकीपासून गॅदरिंगच्या रंगमंचापर्यंत सर्व काही लख्ख आठवतं. किंबहुना, ते बदलू नये, असंच वाटायचं. तीच गत माध्यमिक शाळेबद्दलची. सातवीत आम्ही शाळेच्या दुसऱ्याच इमारतीत होतो. पण एकच वर्ष. बाकी जवळपास नऊ वर्षं एकाच शाळेच्या दोन इमारतींत काढली. आजही तिथली रचना, खोल्या, प्रयोगशाळा, शिक्षकांची खोली, आमचे वर्ग, मैदान, पाण्याच्या टाक्‍या, जिने, आमची दंगामस्ती करण्याची जागा, सगळं काही डोळ्यांत भरलेलं आहे. मोकळ्या वेळी हे आठवणींचे अल्बम चाळायला घेतले, की एकही फोटो खराब झालेला नाहीये, याची खात्री पटते.
नव्या युगाच्या गरजेनुसार दोन्ही शाळांचं रूप मात्र बदललं. इमारती पाडून नव्या आधुनिक पद्धतीनं बांधण्यात आल्या. आताच्या इमारतींशी तेवढी अटॅचमेंट वाटत नाही.
कॉलेजशी पहिल्या काही वर्षांत माझी फारशी जवळीक नव्हती. बारावीत एकदा, एसवायला एकदा नापास झाल्यानंतर आणि एखादाच अपवाद वगळता बहुतेक वार्षिक परीक्षांत "एटीकेटी'च्या शिडीच्या आधारे वर सरकल्यानंतर कॉलेजविषयी फार काही आस्था असण्याचं कारण नव्हतं. पण टीवायला मात्र मी अगदी सिन्सिअर वगैरे विद्यार्थी झालो होतो. फर्स्टक्‍लासच्या रूपानं त्याचं फळही मिळालं. सुदैवानं, आम्ही कॉलेजात होतो, तेव्हाची रचना आहे तशी कायम आहे. अजूनही त्याच वर्गात, त्याच प्रयोगशाळेत पुन्हा जाऊन बसावंसं वाटतं. पण कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता!!
पुण्यात राहायला आल्यानंतर पहिली सहा-सात वर्षं जिथे काढली, त्या भाऊ महाराज बोळातील लॉज म्हणजे माझं दुसरं घर झालं होतं. रत्नागिरीनंतर सर्वाधिक काळ राहिलो, असं दुसरं ठिकाण! तिथून कधी सोडावंसंच वाटत नव्हतं, पण नंतर वेगळं राहण्याची खुमखुमी आली, म्हणून सोडावं लागलं. त्यानंतर शनिवार पेठेतल्या त्या भाड्याच्या कोंदट, एकलकोंड्या खोलीशीही माझी कायमची सलगी झाली. आत्ता नुकताच तो वाडा पाडून अपार्टमेंट बांधायला घेतल्याचं कळलं, तेव्हा जीव गलबलला. गेली सात वर्षं आता पुण्यात स्वतःच्या हक्काच्या घरात राहतोय. कधीकाळी परवडलं तर, अधिक सुविधांसह मोठा फ्लॅट घ्यायचा विचार आहे. पण त्या वेळी सुद्धा या घराशी नातं तोडण्याच्या कल्पनेनंही कसंनुसं होतं!
रत्नागिरीचं आमचं घर पूर्वी कौलारू होतं. 89 सालाच्या दरम्यान ते पाडून स्लॅब घातला. आमच्या जुन्या घराचा फोटो काढून ठेवायला हवा होता, ही रुखरुख कायम मनात राहील. अजूनही डोळ्यांच्या अल्बममधून ते दूर गेलं नसलं, तरी माझ्या मुलीला, बायकोला दाखवायला त्याच्या स्मृती छापील स्वरूपात तरी शिल्लक नाहीत! म्हणूनच आता डिजिटल कॅमेरा घेतल्यापासून कुठल्याही गोष्टी कॅमेऱ्यात टिपून तारीख-वारासह साठवून ठेवण्याचं व्रत अंगीकारलं आहे.
आयुष्याच्या संध्याकाळी बाकी काही नाही राहिलं, तरी या स्मृती कायम सोबत राहणार आहेत!