Feb 11, 2011

अख्खा मसूर आणि दीड (शहाणे) आम्ही!


सातारा रस्त्यावरच्या "अख्खा मसूर'वर बऱ्याच दिवसांपासून डोळा होता. कधीतरी त्याचं नाव कुणाकडून तरी ऐकलं होतं. तिथं जायचं डोक्‍यात होतं, पण योग येत नव्हता. तसा मी फारसा हॉटेलप्रेमी नाही. आहारात चवीपेक्षाही "उदरभरण नोहे' हा मंत्र जपणाऱ्या अंतू बर्व्याचेच आम्ही अनुयायी. त्यामुळं अमक्‍या हॉटेलात तमकी डिश चांगली मिळते वगैरे तपशील माझ्या गावी नसतात. कुणी सांगितलं आणि सहज जमलं, तर मी ठरवून एखाद्या हॉटेलाकडे वाट वाकडी करतो. नाहीतर कुठेही हादडायला आपल्याला चालतं.
तर सांगण्याचा मुद्दा काय, की काल त्या "अख्खा मसूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॉटेलात गेलो होतो. सिटीप्राईडच्या अगदी समोर असलेलं हे हॉटेल. "अख्खा मसूर' म्हणजे तिथे मसूराचे बहुविध पदार्थ मिळत असावेत, अगदी चटण्या आणि कोशिंबिरीही मसूर घालूनच करत असावेत, असा आपला माझा समज. तशी चौकशीही एकाकडे केली होती. पण प्रत्यक्षात तिथे "अख्खा मसूर' ही एकच डिश मिळते, हे प्रत्यक्ष गेल्यावरच कळलं. तिथेच आम्ही निम्मे खचलो. मुळात त्या हॉटेलचं नाव "अख्खा मसूर' नसून "जगात भारी कोल्हापुरी' असं असल्याचा साक्षात्कारही तिथे गेल्यावरच झाला. आत जाऊन उत्साहानं मेनू कार्ड बघितलं, तर तिथे मसुराशी संबंधित फक्त "अख्खा मसूर' ही एकच डिश असल्याचं लक्षात आलं. ती मागविण्यावाचून पर्याय नव्हता. मग त्यासोबत रोटी मागवली.
रोटी एकाच प्रकारची होती. "व्हीट' वगैरे भानगड नव्हती. तरीपण ती करण्याची प्रक्रिया मनस्वीला दाखवण्याची संधी साधता आली. "अख्खा मसूर'ची चव चाखल्यावर आपण घरात मसुराची उसळ यापेक्षा उत्कृष्ट बनवतो, हे लक्षात आलं. रोटी आल्यावर पदरी पडलं आणि पवित्र झालं या भावनेनं समोर ठेवलेलं हादडायला सुरुवात केली. त्याआधी सभोवार एकदा बघून घेतलं. सगळी टेबल भरली होती आणि लोकही अतिशय प्रेमाने तो अख्खा मसूर रिचवत होते. इतर कसे खातात, हे बघून खाणं बऱ्याचदा श्रेयस्कर असतं. मागे एकदा पुण्यात नवीन असताना मी कॅंपमधल्या "नाझ'मध्ये बन-मस्का उत्तम मिळतो, असं ऐकून तिथे खायला गेलो होतो. ऑर्डर दिल्यानंतर वेटरनं "चहा हवाय काय,' असं प्रेमानं विचारलं. मी "नको' म्हणून गुर्मीत सांगितलं. त्यानं एक भलामोठा पाव समोर आणून ठेवला. हा "बन' असावा असा समज करून घेऊन मी हरी-हरी करत पुढच्या "मस्का'च्या डिशची प्रतीक्षा करत बसलो. तो काहीच आणीना, तेव्हा "बन-मस्का' म्हणजे मस्का लावलेला पाव असावा, असा साक्षात्कार मला झाला आणि मग निमूट चहा मागवून मी स्वतःचा पचका वडा करून घेत तो बन घशाखाली घातला.
या वेळी असं काही होऊ नये म्हणून ही काळजी घ्यावी लागली. सगळे जण मसुरावर ताव मारत होते. आम्ही देखील ते मसूर घाशाखाली घातले. चव बरी होती, पण त्यात 70 रुपये देण्यासारखं काही नव्हतं. बायको-मुलीला घेऊन जाऊनही जेवणाचं बिल 230 रुपये येणं एवढाच काय तो माझ्या दृष्टीनं "प्लस पॉइंट' होता.
फक्त मिसळपावाची, फक्त मस्तानीची, फक्त वडा-पावची हॉटेलं ऐकली, पाहिली होती. फक्त चहाच्या "अमृततुल्य'मध्येही हल्ली क्रीम रोल, पॅटीस, सामोसे वगैरे मिळतात. या "अख्ख्या मसूरा'त त्या भाजीशिवाय दुसरी कुठलीही भाजी निषिद्ध होती. "खायचा तर हा अख्खा मसूरच खा. नाहीतर अख्खे तसेच घरी परत जा,' अशी संचालकांची भूमिका असावी.
अख्खे 230 रुपये मोजून मसुराची उसळ आणि रोटी खाल्ल्यानंतर पुन्हा कुठल्या तरी हॉटेलात व्यवस्थित जेवण करायचं, असं आश्‍वासन हर्षदा आणि मनस्वीला दिल्यानंतरच मी अख्खाच्या अख्खा घरी येऊ शकलो!
...

Jan 29, 2011

गोप्या पडदो उघड!

गोप्यानं पडदो उघडल्यान.

क्‍क्‍याण्णवावं अखिल भारतीय नाट्य संमेलन रत्नागिरीत धूमधडाक्‍यात सुरू झालंय. तसं 25 तारखेपासूनच बालनाट्य, एकांकिका महोत्सवाची नांदी सुरू झाली, पण संमेलनात जान आली ती गुरुवारी संध्याकाळी डॉ. विजया मेहता यांच्या झालेल्या सत्कारानं. स्वतःची नाट्यसृष्टी घडवणाऱ्या विजयाताई म्हणजे अभिनय, दिग्दर्शन, सादरीकरण यांचं विद्यापीठ. त्यांनी मराठी रंगभूमीला दिलेल्या विक्रम गोखले, रीमा, नीना कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, सुरेश भागवत, दिलीप कोल्हटकर अशा एकाहून एक ताऱ्यांनी, अर्थात त्यांच्या शिष्यांनीच त्यांचा सत्कार केला. रीमाताईंनी विजयाबाईंना कलाकारांच्या नव्या पिढीसाठी नाट्य शिबिरं घेण्याची गळ घातली. नीनाताईंनी विजयाबाईंची शिस्त, रंगभूमीबद्दलची निष्ठा, यांची आठवण सांगितली.

विक्रम गोखलेंनी या विजया मेहता नावाच्या या "आभाळा'ला आता तरी "पद्मभूषण' किताबाने सन्मानित करा, अशी गळ घातली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी भरपूर बॅटिंग केली. बहुधा नाट्य संमेलनात विजयाबाईंचा सत्कार होण्यासाठी उदय सामंत "आमदार' होण्याचीच सगळे जण वाट बघत होते, असा षटकारही ठोकला. केंद्र सरकार दरबारी प्रयत्न करून विजयाबाईंचा "पद्म'सन्मान करण्याचं त्यांनी दिलेलं आश्‍वासन आता किती खरं उतरतंय, ते लवकरच पाहायला मिळेल.

विजयाबाईंनीच 70च्या दशकात दिग्दर्शित केलेल्या "बॅरिस्टर' नाटकाचं आता त्यांचेच शिष्य विक्रम गोखलेंनी दिग्दर्शन करून ते पुन्हा रंगभूमीवर आणलं आहे. त्याच्याच सेटवर विजयाबाईंचा सत्कार होणं हे एक वेगळं औचित्य होतं. सेटची तयारी सुरू असल्यानंच सात वाजताचा सत्कार प्रत्यक्षात रात्री साडेआठला सुरू झाला आणि बसण्याच्या व्यवस्थेचं नियोजनही थोडं फिस्कटलंच. सावरकर नाट्यगृहात एवढी तुडुंब गर्दी झाली, की खुर्च्यांच्या दोन्ही बाजूला लोक दाटीवाटीनं उभे होते. शेवटी दरवाजे बंद करून घ्यावे लागले. थोडंसं मानापमान, भांडणंही झाली. रात्री "बॅरिस्टर'चा प्रयोग उत्तम झाला. काहीसं गंभीर नाटक असलं, तरी रात्री पावणेदोनपर्यंत लोक खाली बसून, दाटीवाटीनं नाटक बघत होते.

गणपतीपुळे रस्त्यावरचं मौजे पिरंदवणे वाडाजून हे रत्नागिरीचे थोर कलावंत कै. शंकर घाणेकर यांचं जन्मगाव. रंगभूमीवर काम करता करता आयुष्याची अखेर होणं हे कोणत्याही कलाकारासाठी भाग्यच. कै. घाणेकरांना हे भाग्य लाभलं. 1974 साली गावातच "वरून कीर्तन आतून तमाशा' या नाटकाचा प्रयोग साकारताना हृदयविकाराच्या झटक्‍यानं त्यांचा मृत्यू झाला. त्याच रंगमंचावर गुरुवारी सकाळी त्यांना आदरांजलीचा कार्यक्रम झाला. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ लेखक गंगाराम गवाणकर, शंकर घाणेकरांबरोबर काम केलेल्या अभिनेत्री आशालता वाबगावकर या वेळी उपस्थित होते. घाणेकरांच्या घरी जाऊन त्यांच्या भावजयीची भेटही या मंडळींनी घेतली.

आता आज (शुक्रवारी) संध्याकाळी नाट्यदिंडी आहे. बऱ्याच कलाकारांची नावं जाहीर करण्यात आल्येत. येतील तेवढे खरे म्हणायचे!

Jan 22, 2011

सिनेमा...सिनेमा

`भानुविलास' टॉकीजची परवाच्या अंकातली बातमी आणि आजचा म.टा.मधला अभिजित थिटेचा लेख वाचून माझ्याही आठवणींना धुमारे फुटले.
अभिजितनं "भानुविलास'च्या आठवणी छानच जागवल्या आहेत. आपली गोची हीच असते, की जुन्या आठवणी सोडवत नाहीत आणि नव्याही हव्याशा वाटतात. आपल्या बालपणाच्या वेळची शाळा, मित्र-मैत्रिणी, घरं, रस्ते, ते वातावरण, तो गणवेश, सगळं सगळं तसंच राहावंसं वाटत असतो. आपण मात्र खूप बदललेलो असतो. आणि ही बदललेली स्थिती आपल्याला सोडायची नसते. पण जुनंही सगळं हवंहवंसं वाटत असतं. "आम्ही लहान होतो ना, तेव्हा...' अशी आपली टेप सुरू झाली, की ती सध्याची पिढी कशी नालायक आहे आणि आपण कसे ग्रेट होतो, या तात्पर्यापर्यंत आल्याशिवाय थांबतच नाही! माझं गाव, माझं बालपण, माझ्या छोट्या-छोट्या गरजा...सगळ्याचं दळण दळायला आपल्याला फार आवडतं, पण पुन्हा त्या परिस्थितीत कुणी नेऊन ठेवतो म्हटलं, की लगेच आपण दोन पावलं मागे येतो. तर ते असो!
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे "भानुविलास'वरून मला झालेली आमच्या रत्नागिरीतल्या "लता टॉकीज'ची आठवण. हेदेखील तिथलं "भानुविलास'च. अगदी, राजा गोसावींनी तिथे काम केलेलं नसूदे. पण आमच्या लेखी त्याचं माहात्म्य "भानुविलास'एवढंच! रत्नागिरीत तीन थिएटर होती. त्याआधी दोन होती. एक नाटकाचं थिएटर होतं. त्याचं नंतर "श्रीराम' चित्रमंदिर झालं. माझ्या लहानपणापासून मी लता, श्रीराम आणि राधाकृष्ण ही तीन थिएटर्स पाहत आलो आहे. "राधाकृष्ण'चा दर्जा जरा उजवा. तिथे नवे हिंदी सिनेमे लागायचे. नवे म्हणजे मुंबई-पुण्यातल्या रिलीजच्या नंतर साधारणपणे दीड ते दोन महिन्यांनी आलेले. त्याचं तिकीटही इतरांपेक्षा जरा जास्त होतं. "जरा' म्हणजे "जरा'च! मी कॉलेजात असताना, म्हणजे 90च्या दशकाच्या सुरुवातीलाही तिथलं सर्वांत जास्त तिकीट होतं सहा रुपये! तेदेखील आम्हाला जास्त वाटायचं. असो.
त्यानंतर "श्रीराम'चा नंबर लागायचा. इथे साधारणतः बरे मराठी किंवा दुय्यम दर्जाचे हिंदी सिनेमे लागायचे. कधीकधी तर "राधाकृष्ण'ला खूपच नवा आणि गाजलेला सिनेमा लागलेला असेल, तर "श्रीराम'लाही तोच लावला जायचा. गंमत म्हणजे, दोन्हीकडे रीळ एकच असायचं आणि सिनेमाच्या खेळाच्या वेळा बदलून मग मधल्या वेळेत एक रीळ संपल्यावर ते शेजारच्या "श्रीराम'मध्ये नेलं जायचं. गंमत होती सगळी.
नंतर नंतर हॉलिवूडचे सिनेमे भारतात डब होऊन यायला लागल्यानंतर त्यांनाही "श्रीराम'चाच बऱ्याचदा आश्रय मिळत असे. नाहीतर हमसें ना टकराना, मुकद्दर का बादशहा, जीते हैं शान से, वर्दी, कानून क्‍या करेगा, अशाच चित्रपटांशी "श्रीराम'च्या पडद्याची गट्टी जमायची. "श्रीराम'ने एखाद्या चित्रपटाचा दुसरा आठवडा पाहिलाय, असं क्वचितच झालं असेल!
"लता'चा नंबर तिसरा होता. एक तर हे थिएटर खूप छोटं होतं. साधारणतः सहाशे ते सातशे क्षमतेचं असावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे तिकीट अगदी कमी होतं. माझ्या लहानपणी एकदा त्याचं "रिनोवेशन' झालं, त्यानंतरचं तिकीट होतं एक, दोन, तीन आणि चार रुपये! आमच्याकडे कमल नावाची मोलकरीण होती. तिलाही इथेच सिनेमा बघायला परवडायचं! एक रुपयात! त्या वेळी एक रुपया ही तिची एका घरची दिवसाची कमाई होती!! मी कॉलेजात असतानाही अनेकदा इथे साडेचार ते पाच रुपयांत सिनेमे पाहिले आहेत! "लता' म्हणजे मराठी सिनेमांचं माहेरघर होतं. नवे हिंदी सिनेमे इथे लागलेले मी क्वचितच पाहिलेत. अनेकदा इंग्रजी ढिशूम ढिशूम छाप सिनेमेही लागायचे.
लता टॉकीजमध्ये मी "फुकट चंबू बाबूराव', "जखमी वाघीण', "ठकास महाठक' असे अनेक सिनेमे पाहिलेत. "आज का अर्जुन'ही इथेच पाहिलेला. "लता'मध्ये एक छोटी बाल्कनीदेखील होती. "राधाकृष्ण' आणि "श्रीराम' ही मोठी थिएटर असूनही, तिथे बाल्कनीची सोय नव्हती. त्याउलट "लता'मध्ये ही लक्‍झरी मिळायची. ही बाल्कनी जेमतेम पाच ते सहा रांगांची होती. आपल्या "लक्ष्मीनारायण'च्या "मॅजेस्टी'पेक्षा थोडीशी मोठी. शिवाय तिथे पुढे (माझ्यासारखा) उंच माणूस बसला, की मागच्याला दिसायचं नाही. मग त्याला वाकून, दोन खुर्च्यांच्या आणि डोक्‍यांच्या मधून कसाबसा सिनेमा पाहायला लागायचा. मग मागच्याला दिसावं म्हणून मला खुर्चीत जवळपास झोपूनच सिनेमा पाहण्याची शिक्षा होत असे. (परवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये फुकटात आर-डेक्कनमध्ये बसून (झोपून) सिनेमा पाहिला, तेव्हा ही शिक्षा नाही, हे कळलं! असो.)
घरच्यांच्या धाकात त्या वेळी सिनेमा बघणं म्हणजे दुर्मिळ मेजवानीच असायची. साधारणपणे अकरावीनंतर आम्ही घरच्यांना न जुमानता, न सांगता आणि न सांगण्यासारखे (!) सिनेमे बघायला सुरुवात केली, तेव्हा "लता' आणि "श्रीराम'चाच मोठा आधार मिळाला. "लता'ला तेव्हा इंग्रजी ऍडल्ट सिनेमे लागायला सुरुवात झाली होती. ग्रुपनं जाऊन सिनेमावर भरपूर कॉमेंट करत तो पाहणं हा मोठा सोहळा असे!
चौथीत असल्यापासूनच सिनेमाची गोडी...गोडी कसली, व्यसनच म्हणा...लागलं होतं. शाळेपासून थिएटर जवळच असल्यानं मी आणि एक मित्र मधल्या सुटीत पळून थिएटरवर सिनेमाची पोस्टर बघायला जायचो. "राधाकृष्ण'मध्येच तिथे आणि "श्रीराम'मध्ये लागलेल्या सिनेमातली पोस्टर खिडकीतून दिसायची. "पोस्टर' म्हणजे मोठी नव्हेत. साधारण ए-3 आकाराची, एका काचेच्या चौकटीत लावलेली सिनेमातल्या दृश्‍यांची चित्रं. आता आपण टीव्हीवर "प्रोमो' पाहतो ना, त्याचं छायाचित्ररूप. ती बघून आम्ही तो सिनेमा "भारी' आहे की नाही, हे ठरवायचो. "लता'मध्ये मात्र ही सुविधा नव्हती. तिथे पोस्टर असायची, पण ती बाहेरून तिकीट न काढता दिसायची नाहीत. सिनेमासाठी तिकीट काढून आत गेल्यावरच ती पाहता येत असत. मग सिनेमा सुरू व्हायच्या आधी आणि मध्यंतरातही ती पोस्टर पाहून, कुठला सीन दाखवायचा राहिलाय, याची शहानिशा मी करायचो.
"लता'चे मध्यंतरी काही वाद झाले. त्यानंतर थिएटर बंद पडलं. मग तिथे वेगवेगळी प्रदर्शनं भरायला लागली. आता तर तिथे कायमस्वरूपी कार्यालयच झालं आहे!
 
आपल्या बालपणातली आठवणींची एकेक स्मारकं उजाड, भकास होताना पाहिली, की काळजात कुठेतरी चरचरतं...

Dec 26, 2010

`कांदे'पालट!

कांद्यानं शंभरी गाठल्याचे संभाव्य परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर दिसून आलेच. पण इतर न दिसलेले आणि फारसे प्रकाशात न आलेले परिणामही देण्याचा हा प्रयत्न.
...
मुलगी "पाहण्याच्या' कार्यक्रमात शिष्टाचारसंमत आणि समाजमान्यताप्राप्त "कांदे-पोहे' जाऊन त्याजागी "बटाटा-पोहे' आले. त्यामुळे "अहो, शकूला कांदे-पोहे आणायला सांगा,' असं म्हणून "आमची शकू फर्मास कांदे-पोहे करते हो!' अशी भलामण करण्याची संधी वधुपित्यांच्या हातून निघून गेलेय. त्याऐवजी शकूला बटाटे-पोहे आणण्याची हाक दिली जातेय. "मुलगी नाकानं कांदे सोलणारी आहे हो!' असं म्हणण्याचीही वरमाईंची पंचाईत झालीय!
...
- परवाचीच गोष्ट. दिनकरकाका गोखले सदाशिव पेठेतून मंडईपर्यंत तंगडतोड करीत मंडईत कांद्याला चार रुपये कमी भाव असेल, या आशेने गेले. दोन-चार दुकानं फिरले, पण मनासारखा कांदा मिळेना. भावही कोणी ओरडून सांगत नव्हते. मंडईच्या कांदा बाजारात शुकशुकाट होता. एका ठिकाणी मनाचा हिय्या करून गोखलेकाकांनी भाव विचारला, तेव्हा सत्तर रुपये किलोचा भाव ऐकून तिथेच चक्कर येऊन पडले म्हणे. कांद्याच्या बाजारात असूनही त्यांना शुद्धीवर आणायला कुणी कांदाही फोडला नाही म्हणतात!
...
लपाछपी, डोंगर की पाणी, रंग रंग कोणता, विषामृत, असे खेळ सध्याच्या क्रिकेटच्या आक्रमणात भरडून गेलेच आहेत, पण अध्येमध्ये खेळला जाणारा "कांदेफोडी'चा खेळही मुलांच्या क्रीडाविषयक आयुष्यातून बाद झाला. परवा गल्लीत कुणी पोरं "कांदेफोड' खेळत होती, तर अण्णा दांडेकरांनी त्यांना बडवून काढलं. "ही कसली तुमची श्रीमंती थेरं' म्हणून ते त्यांच्या अंगावर खेकसले. पोरांना मार खाण्याचं कारणच न कळल्यामुळं ती नुसतीच धुमसत राहिली.
...
छापून तयार असलेल्या पुढच्या वर्षीच्या सर्व दिनदर्शिका "कालनिर्णय', "भाग्यलक्ष्मी'वाल्यांनी माघारी घेऊन त्यात महत्त्वाची दुरुस्ती केली म्हणे. कांद्याचे भाव उत्तरोत्तर वाढतच राहण्याची शक्‍यता असल्यानं "कांदेनवमी'च्या तिथीचा उल्लेख कॅलेंडरांतून काढून टाकण्यात आल्याची चर्चा आहे. जो सण साजराच होणार नाही, त्याचा उल्लेख तरी कशाला हवा कॅलेंडरात?
...
कांद्याची भजी, कांद्याचं थालीपीठ, कांदा-बटाटा रस्सा, कांदा-लिंबू "मारके' मिसळ, कांद्याची पीठ पेरून भाजी, कांदा उत्तप्पा, वगैरे पदार्थ अजिबात कांदा न वापरता कसे करता येतील, यावरच्या पुस्तकांना आणि "पॉकेट्‌स बुक'ना प्रचंड मागणी आल्याचं समजतं. काही पुस्तकांच्या तर तीस-चाळीस आवृत्त्या (प्रत्येक आवृत्ती पन्नास पुस्तकांची या हिशेबाने) निघाल्याचंही विश्‍वसनीय सूत्रांकडून कळलं आहे.
...
कांदा-लसूण खाणे वर्ज्य असलेल्या "चातुर्मासा'ची व्याप्ती वाढवून ती बारा महिन्यांपर्यंत करावी, या मागणीसाठीही मोठी आंदोलनं उभी राहत आहेत.
...
महाग झालेल्या कांद्याला पर्याय म्हणून अळवाचे कांदे, पालकाचे कांदे रोजच्या जेवणात वापरायला लोकांनी सुरवात केली आहे.
...
कांद्याचे भाव आणखी वाढू नयेत म्हणून चिडका कांदा, अकलेचा कांदा, असे शब्दप्रयोगही दैनंदिन व्यवहारातून काढून टाकण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे.
...
प्रत्यक्ष कांद्याऐवजी कांद्याचा इसेन्स बाजारात आलाय आणि तो प्रचंड खपतोय. हल्ली डाळीच्या पिठात हा इसेन्स घालून कांदा भजी केली जातात म्हणे! कांदा "एक्‍स्कूझिव्ह' झाल्यामुळं कांद्याच्या परफ्यूमला अचानक मागणी वाढलेय. "ऍक्‍स', "झटॅक'पेक्षा हा परफ्यूम जास्त "पॉवरफुल' असल्याची जाहिरात केली जातेय.
...
...आणि सरतेशेवटी...सर्वांत महत्त्वाचं.
"कांद्यानं केला वांदा' हे नाव चित्रपटाला मिळण्यासाठी पंचवीस जणांनी एकाच वेळी अर्ज केलाय आणि आपल्यालाच हे नाव पहिल्यांदा कसं सुचलं, असा दावा करण्यावरून मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांमध्ये भांडणं लागली आहेत!
 

Dec 15, 2010

अताशा असे हे...

ए खादा मोठा दरोडा घालण्यापूर्वी दरोडेखोर कुलदैवताला जाऊन साकडं घालतात, तसं मी आज करणार आहे. मला कुठे दरोडा घालायला नसला, तरी चार-दोन खडे बोल सुनावायचे आहेत. कदाचित तो माझा अवास्तव संताप असेल किंवा आततायीपणादेखील. पण मला जाणवलंय, ते मांडायचं नक्की आहे. त्यामुळं आधी जरा दोन चांगल्या गोष्टी लिहिणं आवश्‍यक आहे.
माझ्या ब्लॉगला आता 70 फॉलोअर्स मिळालेत. निदान त्यापैकी निम्म्यांना तरी मी काय लिहितो, याविषयी उत्सुकता असल्यानंच ते माझे अनुयायी झाले असावेत, असा दावा करायला हरकत नाही. काहींना ओझरता दृष्टिक्षेप टाकायचा असेल, आणि सोय म्हणून ते फॉलोअर झाले असतील. काही जण केवळ ब्लॉगने पुरविलेल्या सोयीचा एक भाग म्हणून औपचारिकता पूर्ण करण्यासाठी झाले असतील, तर काही चुकून!...या सगळ्यांनाच माझे मनापासून धन्यवाद. ब्लॉगवर मी जे काही (बाही) लिहितो, ते एवढे दिवस सहन करणाऱ्या 35 व्हिजिटर्सनाही माझा सलाम! माझ्या लिखाणात त्यांना वाचण्यासारखं किंवा निदान माझ्या ब्लॉगला भेट देण्यासारखं काहितरी वाटलं, ही भावनाच मला आनंद देते.
माझ्या विविधांगी (भरकटलेल्या?) लेखनावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांनाही धन्यवाद. ते दर वेळी नेमाने पोस्ट वाचून त्यांचेही अनुभव शेअर करतात, मतेही मांडतात.
मला थोडीशी तक्रार करायचेय ती ही, की एखाद्या चांगल्या लेखावर भरभरून प्रतिक्रिया देणारे माझे हे चाहते, वाचक, हितचिंतक, गुणग्राहक, स्तुतिपाठक वगैरे वगैरे मी अनेक दिवसांत ब्लॉग अपडेट केलाच नाही, तर काहीच कसे म्हणत नाहीत? हल्ली मी काही ना काही कारणांनी बिझी आहे. ब्लॉग अपडेट करायला, नवे अनुभव लिहायला वेळ नाही. मला नेहमी उत्सुकता असते, की ब्लॉगला भेट देणारे, नेहमी वाचणारे मला विचारतील, बाबा रे, काही लिहिलं का नाहीस बऱ्याच दिवसांत? कुठेतरी ई-मेलवर, फेकबुकात तसा उल्लेख करतील. पण तसं काहीच घडत नाही.
ब्लॉग लोक वाचतात, तो त्यांना आवडतोही. त्यांच्या प्रतिक्रियांतून ते जाणवतं. मग लोकांना नवी पोस्ट टाकली नाही तर काही मिस केल्याचं का वाटत नाही? की तसं वाटूनही ते उल्लेख करायचं विसरतात? की अन्य बरंच काही चांगलं वाचायला उपलब्ध असल्यानं माझ्या ब्लॉगची उणीव वगैरे जाणवत नाही?
हा विषय फक्त ब्लॉगपुरताच मर्यादित नाही. मैत्रीबाबतही हीच परिस्थिती मला हल्ली त्रास देते. कितीतरी मित्रांशी महिनोन्‌ महिने भेट होत नाही. कधीतरी कामानिमित्त बोलणं होतं, पण पुन्हा आपण आपापल्या कामांत गुंतून जातो. कुणा मित्रानं "अरे बरेच दिवसांत भेटला नाहीस, खूप उणीव जाणवतेय तुझी. भेट की एकदा!' असं म्हटल्याचंही फारसं घडत नाही.
मी ही तक्रार करताना मी स्वतःदेखील हल्ली काही दिवस खूप बिझी आहे आणि मित्रांना स्वतःहून भेटण्याचा, कुणाचं नवीन काही वाचून त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केलेला नाही, हेही खरंच. त्यामुळं या तक्रारीचा बराचसा दोष माझ्याकडेही जातोच. म्हणून तर सुरुवातीला म्हटलं, की तक्रारीपेक्षाही केवळ भावना मांडण्याचा हा प्रयत्न होता.
असो. तुम्हाला काय वाटतं यावर? अगदी मनमोकळ्या प्रतिक्रिया द्या. चुकीचं वाटलं तर कान उपटा. होऊन जाऊ द्या!