Jul 14, 2015

प्रश्नांकित...!

लहानपणी गोष्टी ऐकताना किंवा वाचताना जिवावर उदार होऊन राजकन्येला आजारपणातून किंवा संकटातून वाचवणा-या एखाद्या गरीब बिचा-या तरुणाला राजा अर्धं राज्य देतो आणि राजकन्येचंही त्याच्याशी लग्न लावून देतो, याचं फार अप्रूप वाटायचं. (अप्रूपच. असूया नव्हे. कारण आपल्याला असा कुठला उदार राजा मिळणार नाही, याची शंभर टक्के खात्री असायची. आणि फक्त तेवढ्या आशेवर आपण एवढं साहस बापजन्मी करणार नाही, याची दोनशे टक्के. तर ते असो!)

माझ्या मुलांना अशाच काहीतरी गोष्टी रचून सांगताना हा लग्नाचा विषय मध्ये येणार नाही, याची काळजी मी आवर्जून घेतो. जेणेकरून माझ्या लहानपणी मला पडणारे प्रश्न त्यांना पडू नयेत. (मुलांचं मन निरागस, चौकस असतं. त्यांना प्रश्न विचारू द्यावेत, मुलं म्हणजे मातीचा गोळा छाप उपदेश श्यामची आई/बाबांनी करू नयेत.)

आज मुलाला (वय वर्षं साडेपाच) अशीच एक स्वैर रूपांतरित गोष्ट सांगत होतो. सगळ्यात शेवटी राजकन्येला वाचवल्यानंतर त्या तरुण गरीब मुलाला राजानं मोठ्ठं बक्षीस दिलं, असं सांगितलं. राजकन्येशी लग्नाचा विषय कटाक्षानं टाळला.

 ``बक्षीस म्हणजे काय दिलं?``

हा प्रश्न अचानक आला, पण अनपेक्षित नव्हता.

``म्हणजे, खूप सोन्याच्या मोहरा आणि एक मोठ्ठं घर दिलं राहायला.`` मी त्याची समजूत घालायचा प्रयत्न केला.

`` पण तो आणि त्याची आई, असं दोघंच आहेत ना? मग त्याला एवढं मोठं घर कशाला हवं?``

त्याच्या पुढच्या प्रश्नानं मी सर्द झालो...!

 

 

Jun 7, 2015

फटा पोस्टर, निकला... हिरो, हिरोइन, व्हिलन, सेकंड हिरो, सेकंड हिरोइन, ईटीसी ईटीसी...!

 

 

`दिल धडकने दो'चं पोस्टर पाहिलं आणि मळमळायला झालं.

छ्या...!

ह्याला काय पोस्टर म्हणतात? पोस्टर म्हणजे कसं हवं? सिनेमातल्या जवळपास प्रत्येक प्रसंगाचा तो छोटेखानी प्रोमोच हवा. नव्वदच्या दशकात आम्ही स्वतंत्रपणे थेट्रात जाऊन पिक्चर पाहायला लागलो. काय पोस्टर्स असायची त्या काळात....अहाहा...!!

एका हातात पिस्तुल, दुस-या हातात rocket launcher घेतलेला मिथुन, धर्मेंद्र, गोविंदा, चंकी पांडे, सनी देओल किंवा कधी कधी तर दस्तुरखुद्द बच्चन साहेब. त्याच्या कपाळावर रक्ताचा मळवट भरलेला. हातावर एखादी पट्टी. अंगात रक्ताळलेली बनियन. चेह-यावर खाऊ का गिळू छाप बद्धकोष्ठित भाव. त्याच्या सोबत अर्धी झाकलेली हिरवीण. (अर्धी झाकलेली म्हणजे, भीतीनं त्याच्या मागे अर्धी दडलेली. `तशा` अर्थानं अर्धी झाकलेली नव्हे. ती पण असायची, पण दुस-या कोप-यात.) दुस-या कोप-यात हिरोपेक्षाही संहारक शस्त्रं हातात घेऊन उभा असलेला व्हिलन किंवा व्हिलनची फौज. मल्टिस्टारर सिनेमा असेल, तर मग सगळे हिरो लायनीत आपापल्या हिरविणीबरोबर रांगेत उभे. पोस्टरच्या डाव्या वरच्या कोप-यापासून ते उजव्या वरच्या कोप-यापर्यंत फोटो फ्रेमला फुलांची माळ घातल्यासारखी छोट्या छोट्या चौकौनांमध्ये सिनेमातल्या इतर असंख्य कलाकारांची वेगवेगळ्या भावमुद्रेतली छायाचित्रं. उजव्या कोप-यात सिनेमातल्या बलात्कारासारख्या अत्यंत महत्त्वाच्या दृश्याची झलक. डाव्या कोप-यात एखाद्या होळीच्या किंवा तत्सम गाण्याची झलक. मधोमध सिनेमाचं नाव आणि त्याभोवती दोन, तीन थरांचं वलय.

त्या काळात बी ग्रेड, सी ग्रेड अशी हीन, जातिवाचक, अपमानास्पद वर्गवारीच अस्तित्त्वात नव्हती. सगळे सिनेमे एकाच जातकुळीतले वाटायचे. जे वेगळ्या वाटेनं जायचे, ते कुठल्यातरी एकांड्या थेट्रात किंवा टीव्हीवरच बघायला मिळायचे.

`जंगल क्वीन' `डाकूरानी`छाप सिनेमांची पोस्टर्स तर विशेष आकर्षक असायची. किती दूरदर्शी विचार करणारे दिग्दर्शक आणि निर्माते होते, त्या काळात...! आपल्या सिनेमाचा प्रोमो प्रेक्षकांना कुठेही पाहता येणार नाहीये, त्यामुळे पोस्टरवरच तो स्थिरचित्र रूपाने का होईना, दिसला पाहिजे, अशी त्यांची प्रामाणिक भावना असायची. के. सी. बोकाडिया, कांती शाह, मेहुलकुमार, हे अशाच सामाजिक हेतूनं प्रेरित झालेले काही महापुरुष.

सिनेमाच्या मुख्य पोस्टरशिवाय अगदी खिडकीच्या एका झडपेच्या आकाराची छोटी पोस्टरही त्या काळात आकर्षक असायची. ती बाजारात, किंवा दुस-या थिएटरवर लावली जायची. ती बघून मोठं पोस्टर बघायची उत्सुकता चाळवायची.

याशिवाय जास्त उत्सुकता असायची ती सिनेमातल्या काही दृश्यांची झलक दाखवणारी साधारण छोट्या फ्रेमच्या आकाराची पोस्टर्स. प्रेक्षक म्हणून माझी कारकिर्द रत्नागिरीत घडली. त्यावेळी तिथे तीन थिएटर्स होती. राधाकृष्ण, श्रीराम आणि लता. `राधाकृष्ण`ला साधारण नवीन (एक महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेले) सिनेमे लागायचे. `श्रीराम`ला मराठी किंवा रिपीट रन मधले आणि `लता`ला तथाकथित बी किंवा सी ग्रेड. `राधाकृष्ण`मध्ये तिथल्या आणि `श्रीराम`मधल्या सिनेमांची ही छोटी फ्रेम साइज पोस्टर्स लागायची. प्रत्येक सिनेमाची साधारण दहा ते बारा. गुरुवारी तर मेजवानी असायची. सध्या सुरू असलेल्या आणि शुक्रवारपासून लागणा-या सिनेमाची, अशी दोन्ही पोस्टर्स बघायला मिळायची. मी तर चौथीपासूनच मधल्या सुटीत वेळात वेळ काढून, ही पोस्टर्स बघायला थेटरवर धावायचो.


या पोस्टरनी सिनेमांची चटक लावली आणि सिनेमानं जगण्याची!

Apr 22, 2015

पाऊले चालती...दिंडोशीची वाट...!


नवे रस्ते शोधणं आणि त्यासाठी तंगडतोड करणं, ही खाज पहिल्यापासूनचीच. पुण्यात वास्तव्याला आल्यानंतरही पहिल्यांदा आसपासचे सगळे गल्लीबोळ पालथे घालण्याचं कर्म अगदी श्रद्धेनं पार पाडलं होतं. बोळ शोधताना वेगळ्याच `गल्ल्या` सापडल्या, तेव्हा तंतरली होती, ते वेगळंच. असो.

तर मुद्दा असा, की आता मुंबईत (अधून मधून का होईना,) राहायला लागल्यानंतर आसपासचे रस्ते शोधून काढणं हे आद्यकर्तव्य मानलं. त्यातून `सुजलायंस सगळीकडून. जरा शरीराला कष्ट देऊन चालायला जात जा,` हा धमकीवजा आदेश धर्मपत्नीकडून मिळाल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणंही क्रमप्राप्त होतं. ही हौस किती महागात पडू शकते, याचा मात्र अंदाज आला नव्हता. काल तोही आला.

गोरेगाव पश्चिम भागात आत्याकडे गेलो होतो. आमचा दिंडोशी भाग म्हणजे पूर्वेला रेल्वे स्टेशनपासून सुमारे तेवढंच अंतर. म्हणजे आत्याचं घर ते दिंडोशी अंतर सरळ रेषेत मोजलं, तर सुमारे पाच ते सहा किलोमीटर असावं. दिंडोशीपासून गोरेगाव स्टेशनपर्यंत (सुमारे अडीच कि.मी.) चालत जाण्याची हौस अनेकदा भागवली होती. काल आत्याकडून निघताना गोरेगाव स्टेशनवरून भाज्या घ्यायच्या होत्या. संसारसंसर्ग. दुसरं काय? आत्याला विचारलं, तर ती गोरेगावपेक्षा मालाडला चांगल्या मिळतील, असं म्हणाली. मी मालाड स्टेशनपर्यंत चालत जायचं ठरवलं. अंतर साधारण दीड किलोमीटर. भाज्या मनासारख्या मिळाल्या. गोरेगावहून दिंडोशी जेवढं अंतर आहे, तेवढंच मालाडहून असेल, असा आपला माझा एक स्वैर अंदाज. समोर दिसणारा रस्ता दिंडोशीच्या आधी लागणा-या पूर्व द्रुतगती मार्गालाच मिळणार, हा फाजील आत्मविश्वास. रस्त्याचं ज्ञान अगाध असतानाही चालण्याची खाज भागवण्याची ही नामी संधी होती. म्हणून चालत निघालो. पाठीला laptop, हातात भाजीची जड पिशवी होती. समोर दिसेल तो रस्ता आपलाच मानून चालत राहिलो. एकतर मुंबईचा उकाडा, पाठीला बॅग, हातात पिशवी आणि रस्ता संपता संपेना अशा अवस्थेत अंगानं घामाच्या धारा लागल्या. मिल्खासिंगनं ग्राउंडला राउंड मारून बनियन पिळपिळून मग भरला होता. मी हातातला नॅपकिन पिळत होतो. शर्टही संपूर्ण भिजून निथळत होता. (तो काढून पिळणं शक्य नव्हतं. असो.) साधारण साडेसहा वाजता मी घरातून निघालो होतो. पाऊण ते तासाभरात माझ्या घरी पोचेन, असा अंदाज होता. हायवे पर्यंत पोचायलाच दोन तास लागले. तिथूनही Oberoy mall चा चौक दृष्टिपथात नव्हता. आपण नक्की कुठे आलो आहोत, तेच कळेना झालं होतं. उजव्या बाजूनं चालत राहिलं, तर दिंडोशीला जाता येईल हे नक्की, पण किती चालायला लागेल, याचा अंदाज येत नव्हता. तरीही चालत राहिलो. रिक्षा करायचा घातक विचार एक क्षण मनाला शिवून गेला, पण भाज्यांचे पैसे वाचवण्यासाठी एवढी तंगडतोड केली आणि आता रिक्षावाल्याच्या नरड्यात तीसेक रुपये कोंबायचं जिवावर आलं होतं. बसनं जावं तरी हायवे ओलांडून जावं लागणार होतं आणि त्यासाठी कुठेच सोय दिसत नव्हती. ``इथून ओबेरायचा चौक किती लांब आहे हो साहेब...?`` असं गि-हाईक टिपायला टपलेल्या एका हवालदाराला विचारलं. ``हे इथेच. एक चौक.`` असं त्यानं उत्तर दिलं. मला तर नजरेच्या टप्प्यात कुठेच ओबेरायची इमारत दिसत नव्हती. तरीही त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहिलो. आणखी थोडं चालल्यावर ओबेरायचा चौक नाही, पण एक पादचारी पूल दिसला आणि जीवात जीव आला.

पूल ओलांडून पलीकडे गेलो, तर एक बस stop लागला. कुरार गाव. दिंडोशी अजून खूप लांब आहे, निदान या अवस्थेत चालत जाण्यासारखं नक्की नाही, हेही लक्षात आलं. मग बसनं जाण्याचा शहाणपणा करायचं ठरवलं. पहिली गर्दीची बस सोडून दिली आणि पुन्हा मूर्खपणा केला की काय, असं वाटू लागलं. आणखी दहा मिनिटं बसच आली नाही. शेवटी मला हवी ती बस आली. फार गर्दीही नव्हती. एखादा आदिमानव बघितल्यासारखं लोक वळून वळून माझ्या अवताराकडे बघत होते. घामानं निथळणारा चेहरा, ओलाचिंब शर्ट, विस्कटलेले केस. माझा जवळपास `टारझन` झाला होता. फक्त अंगात वल्कलं नव्हती, एवढंच. उघडं व्हायची इच्छा होती, पण सार्वजनिक ठिकाणचे संस्कार आड येत होते.

दिंडोशी दहा मिनिटांत आलं, पण तेवढी आणखी पायपीट केली असती, तर माझी `दिंडी` काढायची वेळ आली असती, हेही लक्षात आलं. माझी ही रामकहाणी रूम पार्टनर्सना ऐकवली. त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली. बिच्चारे. काही बोलले नाहीत.

पुण्यात असतो, तर एवढ्या द्राविडी प्राणायामानंतरही...

``हे काय? कोबी कशाला आणलास परत?``

``अरे श्रावणघेवडा आणलाय मी कालच. तुला आणू नको म्हटलं होतं.``

``शी. किती सुकलेली आहे ही कोथिंबीर!``

``अरे देवा. ही मेथी बघून नाही का घेतलीस? सगळी किडकी आहे!``

 

...यापैकी काही ना काही सुवचन कानी पडलंच असतं.!!

 

असो. असतात एकेक भोग.

 


Apr 13, 2015

शाब्बास रे `वाघा`!

वाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वाघा border ला प्रत्यक्ष जायचा योग आला नव्हता. अगदी हनीमूनच्या वेळी अमृतसरमध्ये राहून सुवर्णमंदिर वगैरे पाहिलं, पण `वाघा`वरचा भारत-पाकिस्तान सैनिकांचा `हनीमून` बघायचा हुकला होता. ती इच्छा या वेळी घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पूर्ण झाली.

साहित्य संमेलनाला जायचं प्लॅनिंग करताना मी, श्रीपाद ब्रह्मे आणि अरविंद तेलकर यांनी मुद्दामच जास्त दिवस राहायचं ठरवलं होतं. म्हणूनच संमेलनाच्या स्पेशल ट्रेनची निवड न करता आम्ही स्वतःचं ट्रेनचं वेगळं बुकिंग केलं आणि संमेलनानंतरही एक दिवस जादा राहायचं ठरवलं, त्यात वाघा आणि इतर ठिकाणी भटकंतीचा उद्देश नक्की होता. 3 ते 5 एप्रिलदरम्यान संमेलन आणि त्यानंतरचा 6 तारखेचा पूर्ण दिवस आमच्या हातात होता. अमृतसरपासून `वाघा` साधारण एक तासाच्या अंतरावर असल्यामुळे जाणं-येणं फार अवघड नव्हतं. संमेलनातच एखाद दिवशी दांडी मारून तिकडे जायचा विचार होता, पण ते काही शक्य झालं नाही. संमेलनात आम्ही रमलो होतो, म्हणूनही असेल कदाचित. शेवटी संमेलन संपल्यानंतर 6 तारखेला दुपारी `वाघा`ला जायचं निश्चित झालं.

कुठल्याही नव्या ठिकाणी जाताना आपण लोकांचे सल्ले ऐकले, तर ते आपल्याला माहिती देण्यापेक्षाही आपल्याला तिथलं सगळंच कसं माहितेय, याची फुशारकी मारण्यात धन्यता मानतात. तिथे केलेला जो शहाणपणा त्यांच्या अंगाशी आला, तो शक्यतो लपवून तुम्ही `असं करू नका अन तसं करू नका,` हे सांगण्यात त्यांना जास्त कौतुक वाटतं. त्यामुळे संमेलनाला आलेल्या आणि मधूनच एका दिवशी ताजे ताजे `वाघा`ला जाऊन आलेल्या सहका-यांचीही असेच सल्ले देण्यासाठी अहमहमिका लागली होती. `किमान दोन तास आधी जाऊन बसा आणि माणशी 120 रुपयांपेक्षा जास्त पैसे प्रवासासाठी देऊ नका,` हे त्यातले दोन सल्ले जास्त मौलिक होते. तरीही आम्ही रिक्षासाठी येणे-जाणे मिळून (तिघांसाठी) सहाशे रुपये मोजून दुपारी दीड वाजताच प्रवासाला सुरुवात केली. सहा आसनी रिक्षामध्ये आम्ही प्रत्येक दोनशे रुपये मोजल्याने मधल्या सीटवर आरामात बसलो होतो. आपला कोटा भरण्यासाठी रिक्षावाल्यानं पुढे आणि मागे आणखी चार प्रवासी (प्रत्येकी शंभर रुपयांत) घेतले होते. त्यांच्यापैकी कुणी मधल्या जागेत ऐसपैस बसलेल्या आम्हा तिघांकडे नुसतं बघितलं, तरी ``दोनशे रुपडे मोजलेत. चिंचोके नाही!`` असा अत्यंत माजुरडा लूक त्यांना द्यायचा आविर्भाव आणला होता.

अमृतसरचे कुजलेल्या कच-याच्या मंद सुवासाने बहरून गेलेले गल्लीबोळ पार करत, उघड्या गटारांच्या समुद्रांचे मंथन करत, रस्त्यावरच्या खड्ड्यांची जाणीव पटायला नको त्या ठिकाणी पटवून घेत कसेबसे आम्ही लाहोरच्या रस्त्याला लागलो आणि तासाभरात पोहोचलो. अटारी गावाची पाटी वाचल्यानंतर खरंच आपण देशाच्या सीमेवर आल्याची जाणीव झाली. सकाळीच केलेल्या खरेदीने लडबडलेल्या बॅगा आमच्याबरोबर होत्या. त्या आत नेता येणार नाहीत, फक्त पैशांचं पाकीट, ओळखपत्र, पैसे, पेन, कॅमेरा, मोबाईल, एवढ्याच गोष्टी नेता येतील, असं तिथे एका दुकानदारानं सांगितल्यावर पहिल्याच घासाला मिठाचा खडा लागल्यासारखं झालं. मग आम्ही मराठी असल्यामुळे आमच्यावर उपकार म्हणून तिथल्या एका मराठी कर्मचा-याच्या ओळखीनं त्यानं आमच्या बॅगा प्रत्येकी 50 रुपये मोजून त्याच्या कपाटरूपी खबदाडात ठेवायची तयारी दाखवली. गडबडीत खाण्याचं सामान तिथेच राहिलं. आम्ही स्वतःबरोबर न्यायला परवानगी असलेल्या वस्तू घेऊन बीएसएफच्या गुहेत शिरलो. साधारण दुपारचे अडीच वाजले होते. इथे पोचण्याच्या गडबडीत दुपारचं जेवण राहिलंच होतं. आत खायला मिळेल, अशा पाट्या असल्यानं आम्ही निश्चिंत होतो. जवानांनी रांगेत उभं केलं, तरी अनेक लोक संधी मिळेल तेव्हा घुसायचा प्रयत्न करून आपलं भारतीय रक्त सिद्ध करत होते. रांगेत आणि उन्हात फार काळ ताटकळत राहावं लागलं नाही. सुमारे पाऊण तास पुढे पुढे सरकल्यानंतर जवानांनी दोन ठिकाणी कसून तपासणी करून आत सोडलं. शेवटची तपासणी पूर्ण झाल्यानंतर मात्र सगळे रांगा सोडून आत गॅलरीत बसण्याची चांगली जागा पटकावण्यासाठी धावत सुटले. सुदैवानं आम्हाला चांगली जागा मिळाली. दुपारी तीनच्या त्या रणरणत्या उन्हात उघड्या गॅलरीत आम्हाला बसायचं होतं. बीटिंग रिट्रीट समारंभ संध्याकाळी साडेपाचला सुरू होणार होता. अडीच तास तसंच बसून राहणं हे एक दिव्यच होतं. तरीही आसपासच्या गर्दीच्या मारामा-या, भांडणं आणि भारत-पाकिस्तान सीमेशिवाय आसपासची `प्रेक्षणीय स्थळं` पाहण्यात दोन तास कमी त्रासाचे गेले. मधल्या काळात आसपास पाऊलही टाकता येणार नाही, एवढी गर्दी झाली होती. त्यातल्या अनेकांना तुडवत एकेक जण जाऊन खाऊन आणि `मोकळे होऊन`ही आलो.

डाव्या बाजूला पाकिस्तानची सीमा आणि त्यांचा प्रांत दिसत होता. काही पावलं चालून गेलं, तर आपण चक्क पाकिस्तानात पोहोचू, ही भावना वेगळीच होती. अर्थात, मध्ये सीमाभिंतीची आणि द्वेषाची कुंपणं होतीच. पलीकडे पाकिस्तानच्या बाजूच्या गॅलरीत फक्त महिलाच दिसत होत्या. इथल्या पुरुषांना हा समारंभ बघण्यात इंटरेस्ट नाही की काय, असं वाटत असतानाच काही वेळानं लक्षात आलं, की तिथे पुरुष आणि महिलांची गॅलरी वेगळी आहे. अगदी समोरासमोर. एकसारखी माती, एकसारखी झाडं, एकसारखी माणसं, तरीही देश दोन, असा विचार करत असतानाच दोन संस्कृतींमधला आणि प्रशासकीय मानसिकतेमधला हा मोठा फरकही बोचणारा होता.

आता इकडची आमची गॅलरी तुडुंब भरून गेली होती. सोमवार होता, तरी एवढी गर्दी, तर शनिवार-रविवारी काय होत असेल, या कल्पनेनंच अंगावर काटा आला. मुलांना घेऊन आलो नाही, ते बरंच झालं, असा विचारही मनात आला. `नामदेव महाराज की जय` अशा टोप्या घालून आलेल्या काही भक्तांनी मध्येच सर्वसामान्य प्रेक्षकांच्या गॅलरीच्या कठड्यांवरून उडी मारून व्हीआयपी गॅलरीत प्रवेश करून आपली देशभक्ती आणखी ठळक केली.

आमच्या गॅलरीसमोर एक रुंद रस्ता होता. त्याच्या एका बाजूला भारताचं मुख्य प्रवेशद्वार आणि डावीकडे पाकिस्तानचं गेट होतं. मध्येच दिल्ली-लाहोर ऐतिहासिक बसही त्याच रस्त्यानं पुढे गेली. सगळ्या प्रवाशांना भारतीय गेटच्या अलीकडे उतरवलं गेलं. बसची तपासणी झाली. सगळे प्रवासी सामान घेऊन ट्रालीवरून ढकलत त्याच रस्त्यावरून पाकिस्तानच्या गेटच्या दिशेने गेले. तिकडे जाऊन पुन्हा तपासणी आणि नंतर ती बस लाहोरच्या दिशेनं रवाना होणार होती. काही वेळानं पाकिस्तानातून आलेले काही प्रवासी अशाच पद्धतीनं भारताच्य हद्दीत आले. हा एक मजेशीर सोहळा होता. नंतर एका ट्रकमधून काही मालही अशाच पद्धतीनं भारतातून पाकिस्तानात गेला.

संध्याकाळी पाच वाजता समोरच्या बीएसएफच्या आफिसमधून एक तरुण लष्करी अधिकारी दोन ध्वज घेऊन बाहेर आला. तोपर्यंत मधल्या काही जवानांनी काही महिलांना रस्त्याच्या मधोमध रांग करून उभं केलं होतं. ते कशासाठी, असा विचार करत असतानाच ह्या बाबानं दोघींच्या हातात ते ध्वज दिले आणि समोर सीमेपर्यंत धावत जायला सांगितलं. भारताच्या सीमेवर आपल्याला सगळ्यांच्या समोर ध्वज घेऊन धावायला मिळतंय, हा आनंद प्रत्येकीच्या चेह-यावरून ओसंडून वाहत होता. चार-पाच आज्याही तिथे आल्या होत्या. त्या ध्वज घेऊन धावल्या, तर बीटिंग रिट्रीटच्या ऐवजी त्यांना अखेरची सलामी देण्याचा सोहळा इथे घडवावा लागेल, अशी भीती त्या अधिका-याला वाटली असावी. त्यानं त्या दोघींना ध्वज दिले नाहीत. तरीही नंतर भांडून भांडून त्यांनी ते मिळवलेच. आणि कसंबसं लुटुलुटू त्या धावल्या. त्यांच्या उत्साहाची कमाल वाटली.

याच्यानंतरचा सोहळा अनपेक्षित आणि धक्कादायकही होता. आधीपासूनच काही देशभक्तीपर हिंदी गाणी स्पीकरवर वाजत होती. आता त्यांचा आवाज वाढला आणि काही महिलांना मध्ये रस्त्यावर नाचायला बोलावण्यात आलं. त्यानंतर bollywood च्या गाण्यांच्या ठेक्यावर पंधरा वीस मिनिटं महिलांचा `देशभक्तिपर` नृत्याचा अनुपम सोहळा पाहताना डोळे दिपून गेले. श्रीपादनं या सगळ्या वातावरणाचं `patriotic tourism` असं बारसं करून टाकलं, तेही अगदी सार्थ होतं.

प्रत्यक्ष बीटिंग रिट्रीट सोहळ्याचं एवढं कौतुक ऐकलं होतं, पण तो काही खास वाटला नाही. दोन्ही देशांच्या सैनिकांनी उगाच उसनं अवसान आणून लाथा झाडत एकमेकांच्या गेटपर्यंत समोरासमोर यायचं, एकमेकांना उगाचच नाटकी आवेश दाखवायचा, `आम्ही तुम्हाला जुमानत नाही`छाप हावभाव करायचे, असा सगळा नाटकी प्रकार सुरू होता. शेवटी गेटवरचे दोन्ही देशांचे ध्वज उतरवून आणि दाणकन दार आपटून ह्या `नाटका`चा समारोप झाला.

गॅलरीतलं वातावरण देशभक्तीने भारून गेलं होतं. लष्करी अधिका-यानं आधीच सूचना दिल्यामुळे कुणी पाकिस्तानचा थेट उद्धार करत नव्हतं, एवढंच. पण प्रत्येकाच्या मनात देशभक्ती संचारली होती.

...सोहळा संपवून परत येताना गॅलरीत बसल्या जागी आपापल्या पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचरा टाकून त्या हजारो देशभक्तांनी आपली देशभक्तीची पातळी सिद्धही केली.

......

`वाघा` सीमेवर जाऊ इच्छिणा-यांसाठी....

- अमृतसरपासून खाजगी वाहनाने जाण्यास सुमारे एक तासाचे अंतर.
- रोज संध्याकाळी 5.30 ते 6 या वेळेत हा सोहळा होतो.
- चांगली जागा मिळण्यासाठी किमान दोन किंवा तीन तास आधी पोहोचणे महत्त्वाचे.
- कमीत कमी सामान न्या. बॅगा आपापल्या गाडीतच ठेवा.
- आत पाणी, काही स्नॅक्स मिळण्याची सोय आहे.
- उन्हाचा त्रास टाळण्यासाठी टोपी, goggle अत्यावश्यक.
- सैन्यदलात कुठेतरी वशिला लावून VIP एन्ट्री मिळवल्यास अधिक उत्तम.
- देशभक्ती सिद्ध करण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध असतील, तर या सोहळ्यासाठी नाही गेलात, तरी चालेल. काही बिघडत नाही!
-

Mar 25, 2015

विक्रमादित्यांचा हट्ट!


वर्ल्ड कप स्पर्धेत रोज नवनव्या विक्रमांची नोंद होत आहे. काही विक्रम तर कल्पनेच्याही पलिकडचे आहेत. त्यांची नोंद कशी ठेवली जाते, याचंच आश्चर्य वाटतं.
उदाहरणार्थ, आपल्या देशात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज, अमक्या मैदानावर तमक्या विशिष्ट स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज, सातव्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी करणारी जोडी, वगैरे वगैरे.

तरीही काही विक्रमांची नोंद राहिली आहे, असे वाटते. ते खालीलप्रमाणेः

- बायकोशी भांडण झालेलं असतानाही मैदानावर जास्त वेळ टिकून राहणारा फलंदाज.
- गर्लफ्रेंडने तिच्या आयुष्यातून हाकलून दिल्यानंतरसुद्धा विरुद्ध संघाच्या खेळाडूंशी सर्वाधिक वेळ सौजन्याने वागणारा गोलंदाज.
- विरुद्ध संघाच्या खेळाडूंना सर्वाधिक कालावधीसाठी आणि वैविध्यपूर्ण शिव्या देणारा खेळाडू.
- आपल्या संघाच्या खेळाडूंना सर्वाधिक कालावधीसाठी आणि वैविध्यपूर्ण शिव्या देणारा खेळाडू.
- कुणाचाही उल्लेख न करता तोंडातल्या तोंडात सर्वाधिक कालावधीसाठी आणि वैविध्यपूर्ण शिव्या देणारा खेळाडू.
- आपल्या सहकारी फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाचकवून धावचित करणारा फलंदाज.
- `मी घेतो,` `मी घेतो,` असं करून समोरच्याला थांबवून, स्वतः आयत्या वेळी सर्वाधिक झेल सोडणारा क्षेत्ररक्षक.
- पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या सध्याच्या गर्लफ्रेंडला सर्वाधिक वेळा बॅट उंचावून दाखवणारा फलंदाज.
- पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या माजी गर्लफ्रेंडला सर्वाधिक वेळा बॅट उंचावून दाखवणारा फलंदाज.
- पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या भावी गर्लफ्रेंडला सर्वाधिक वेळा बॅट उंचावून दाखवणारा फलंदाज.

याशिवाय
- सर्वाधिक वेळा चेंडू कुरतडणारा
- चेंडू घासून कपडे सर्वाधिक लालेलाल करणारा
- उगाचच साईड स्क्रीन वगैरे हटवायला सांगून दोन-चार धावा करून बाद होणारा
- रात्री सर्वाधिक काळ पार्टी करूनही दुस-या दिवशी त्याचा हॅंग ओव्हर दिसू न देणारा

अशाही काही विक्रमांची नोंद करता येईल.
कृपया आयसीसीने दखल घ्यावी.