Sep 2, 2007

रामगोपाल वर्माचे "कोळसे'




तो अन्‌ हा...

तो भव्यदिव्य...एकमेवाद्वितीय.

हा एकाच वेळी "भव्यदिव्य' आणि (वेगळ्या अर्थानं) "एकमेवाद्वितीय.'


तो अभिनयाचा, संवादांचा, कथा-पटकथेचा, सादरीकरणाचा मेरुमण

अन्‌ हा...या सगळ्याच बाबतीत बटबटीत, भडक, आक्रस्ताळा, आचरट, भीषण आणि विकृत...!


"शोले'चा "रीमेक' नाही, असा डंका पिटत "फ्रेम टू फ्रेम' तस्साच चित्रपट काढण्याची कल्पना रामगोपाल वर्माला कुठल्या अभद्र वेळी सुचली असावी कुणास ठाऊक? "के सरा सरा' नावाचा चित्रपटांचा "कारखाना' त्यानं सुरू केला, तेव्हाच या भीषण स्थितीची कुणकूण लागली होती, खरं तर! पण ही विकृती "एक हसीना थी'मधला क्‍लायमॅक्‍स, नवा "शिवा', किंवा "जेम्स'मधील हिंसाचाराच्या पातळीपर्यंतच होती. "आग'मध्ये तिचा कळस गाठलाय आणि "रंगीला', "सत्या', "रात'सारखे अतिशय परिणामकारक चित्रपट देणारा हाच का तो दिग्दर्शक, अशा विचारापर्यंतची वेळ आणलीय.


तिथे एक पोलिस इन्स्पेक्‍टर...इथेही तोच. त्याचे हात तोडलेले...याची बोटे. तिथे गब्बर...इथे बब्बन. तिथे गावावर संकट...इथे गाव-कम-शहरावर. तिथे खंडणीचा मुद्दा...इथे जमीन लाटण्याचा. गब्बरला पकडले गेल्याचा राग...बब्बनला भाऊ मारला गेल्याचा..तिथे टांगा चालवणारी बसंती...इथे रिक्षा चालवणारी "घुंगरू.'


"शोले'ची फ्रेम न्‌ फ्रेम तशीच ठेवून, काही नवे संदर्भ देऊन रामगोपाल वर्मानं त्याची जशीच्या तशी नक्कल केलीय...ती देखील अत्यंत भ्रष्ट, टाकाऊ आणि टुकार! "शोले'च्या प्रदर्शनाच्या वेळचं वातावरण आणि त्या वेळचा परिणाम अनुभवण्याचं भाग्य आताच्या पिढीला लाभलेलं नाही. "शोले'बद्दल आधी भरपूर ऐकल्यानंतर मगच चित्रपट पाहणारे बरेच जण असतील. विशिष्ट प्रतिमा मनात घेऊन चित्रपट पाहण्याचा परिणाम वेगळा असतो. "आग'चा स्वतंत्रपणे विचार केला, तरीही त्याच्याबद्दलचं मत अजिबात बदलत नाही.


"शोले'मधला हिंसाचार, दहशत आताच्या काळात अजिबात परिणामकारक वाटत नाही. तरीही, प्रेक्षक त्यात गुंततो. गावातल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यांत ती पाहायला मिळते. मुख्य म्हणजे, ती आवश्‍यक तेवढीच आहे आणि विकृत, न पाहवण्यासारखी अजिबात नाही! "आग'मधल्या बब्बनची दहशत मात्र विकृत आहे. करवतीने इन्स्पेक्‍टरची बोटे कापण्याचं दृश्‍य म्हणजे याचा कळसच. त्यातून चित्रपटाला अगदी कर्कश, कानठळ्या बसवणारं पार्श्‍वसंगीत आहे. त्यामुळे संवाद अनेकदा ऐकूच येत नाहीत. ही कसली आग? हे तर कोळसेच!


"शोले'च्या कॉपीव्यतिरिक्त वेगळा चेहरा नसल्यामुळं सगळ्याच व्यक्तिरेखा टाकाऊ आहेत. अमिताभनं तर "बब्बन' साकारून आणखी एका वाईट भूमिकेवर नाव नोंदलंय. मोहनलाल, अजय देवगण यांनी फक्त काम केलंय, एवढंच. प्रशांत राजला अमिताभच्या मूळ भूमिकेत पाहताना त्रास होतो. त्यापेक्षाही त्रास होतो, दस्तुरखुद्द अमिताभला "गब्बर'च्या भ्रष्ट रूपात पाहताना! त्यातल्या त्यात सुश्‍मिता सेनच बरी. पण अमिताभ-जयाच्या संयत, अव्यक्त प्रेमाला उथळ रूप देऊन या भूमिकेचीही नंतर वाट लावलीय. ऊर्मिला मातोंडकरला बऱ्याच दिवसांनी रामगोपाल वर्माच्या चित्रपटात अंगप्रदर्शनाची संधी मिळालीय. (धन्य झाली पोरगी!)


आता कुणालाही भीती दाखवायला चित्रपटरसिकांना नवं शस्त्र मिळालंय..."चूप हो जा...वरना "आग' दिखाने ले जाऊँगा...'!!


-----

1 comment:

Chinmay 'भारद्वाज' said...

I really enjoyed you review.

This sort of movie was expected. What bothers me most is that I used to like RGV (specially for Satya and Company)Now that he is gone to trash, Hindi film industry is left with Karan Johar and his likes !!

Great writing. Looking forward for more such reviews.