Jun 23, 2008

थरार!


एखाद्या ठिकाणी नवं काहीतरी साहस करून पाहण्याची आमची हौस दांडगी. त्यातून पैसे वाचवण्याची आणि अंगाला कष्ट वगैरे देण्याची स्पर्धा असेल, तर विचारताच सोय नाही! त्यातूनच कधीतरी साल्हेरवरून जीवघेण्या उतारानं पाठीवरून तोफेचा गोळा वगैरे आणण्याचं शहाणपण सुचतं.

पाच-सहा वर्षांपूर्वी आम्ही तिघे मित्र भरतपूरच्या केवलदेव अभयारण्यात गेलो होतो, तेव्हाची कथा. आमच्या एका मित्राला त्या पक्ष्याबिक्ष्यांचं फारच वेड होतं. आम्हाला दोघांना मात्र जंगलात दोन दिवस राहून कंटाळा आला होता. एके दिवशी जयपूरला जायचं ठरवलं. दिवसभर फिरून रात्री यायला उशीर झाला. अकरा वाजले. आम्ही राहत होतो, ते फॉरेस्टचं रेस्ट हाऊस अभयारण्याच्या मुख्य दाराच्या आत दीडेक किलोमीटरवर होतं. मुख्य दारापर्यंत सायकलरिक्षावाल्यानं आम्हाला सोडलं, पण आत येण्याची काही सोय नव्हती. वॉचमननं आमच्यावर उपकार करून आम्हाला आत घेतलं, पण जाणार कसं? मिट्ट अंधार होता. त्यातून त्या अभयारण्यात बिबट्याही असल्याची एक वदंता. कोल्हेबिल्हे तर होतेच! गेटवर तर रात्रभर थांबता येणं शक्‍यच नव्हतं. शेवटी मनाचा हिय्या करून जायचं ठरवलं.
आपण टरकलो नाही आहोत, असं तोडानं म्हणत आणि गप्पा मारत कसेबसे रस्त्यानं निघालो. तशी कुठलीच अडचण आली नाही, पण जाम तंतरली होती. शेवटी एकदाचं ते रेस्ट हाऊस आलं. गेटमधून आम्ही आत गेलो आणि आतापर्यंत असलेली भीती समोर उभी ठाकली. तीही अनपेक्षितरीत्या! रात्रीच्या मिट्ट काळोखात आणि थंडीत गुडूप झोपलेल्या कुत्र्यांना अचानक जाग आली. एकाच्या हाकेनं दुसरा उठला आणि सगळे वास्सकन अंगावर आले. तेवढ्यात तिथल्या वॉचमननं सगळ्यांना हुसकावून लावलं, म्हणून बरं. नाहीतर आमचा कोथळा काढायला त्यांनी मागेपुढे पाहिलं नसतं.

दुसऱ्या दिवशी आमच्या धाडसाचं तिथल्या वॉचमनसकट सगळेच कौतुक करत होते. कोल्हे मागे न लागल्याबद्दल आश्‍चर्यही करत होते. आम्ही कसा प्रवास केला, ते आमचं आम्हालाच माहीत होतं!

आत्ता ही घटना नव्यानं आठवायचं कारण म्हणजे, उटीतला नुकताच आलेला अनुभव!

तिथंही आम्ही (अर्थात, मी!) अतिशहाणपणानं धाडस करायला गेलो होतो. झालं काय, की उटीतलं साईट सीइंग आटोपून संध्याकाळी सहा साडेसहाला आम्ही गावात परत आलो. आमचं हॉटेल स्टॅंडपासून बऱ्यापैकी अंतरावर होतं आणि तिथे काही खायचं चांगलं मिळतही नव्हतं. त्यामुळं उटी लेकपाशी असलेल्या हॉटेलापर्यंत जाऊ आणि तिथून खायचं पार्सल घेऊन हॉटेलवर रिक्षानं जाऊ, असा बेत केला. चालत निघालो, पण आधी जवळ वाटलेला तो लेक काही दृष्टिपथात येईना. अर्ध्या वाटेवरून परतावंसंही वाटेना. काही हॉटेल्स मागे टाकल्यानंतर रस्ता पार सुनसान झाला आणि मी, बायको आणि कडेवर मुलगी, असे तिघेच राहिलो. रस्त्याला दिवेही नव्हते. तसे साडेसातच वाजले होते, पण उटीच्या त्या हिल स्टेशनवर ते रात्रीचे दहा वाटत होते. पुढे जाऊन हॉटेल तरी चालू असेल की नाही, अशी शंका आली. उलट्या बाजूनं येणारा एक रिक्षावालाही "साब, ऑटो..?' विचारत घुटमळून गेला. आम्ही त्याला सन्मानानं परत पाठवलं.

तसेच पुढे चालत राहिलो आणि "आत्ता या वळणानंतर आहे तो लेक' असं म्हणूनही एक-दोन वळणं झाली, तरी लेक येईना. कुठे दिवेही दिसेनात. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या एका माणसाची चालही मंदावली होती. मनात उगाच भलते विचार येऊ लागले. म्हणून मग शेपूट घालून परतायचा निर्णय घेतला. स्टॅंडच्या दिशेने तसेच उलटे फिरलो. रिक्षा पकडून थेट हॉटेलवर गेलो.

मनस्वीला काही कळत नव्हतं. ती कडेवर बसून मस्त "एन्जॉय' करत होती. येताना बाजूची झाडी आणि अंधार बघून म्हणते कशी, "बाबा, या झाडीत वाघ नाहीतर सिंह कुणीतरी असेल, बरं का!' तिला कसं समजावणार, की आधी वाघ झालेल्या तिच्या बापाचीच शेळी झाली होती आणि भीतीच्या सिंहानं तिला खाऊन टाकलं होतं...!
-----------
(ता. क. : वरील मजकुरातील अनुभव आणि छायाचित्र यांचा संबंध असेलच, असे नाही. असल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा.)

2 comments:

Anonymous said...

mast lihile aahe..

shirashaka pana chan aahe

Tharar....

Nandkumar Waghmare said...

kay pendarkar parat sakriya zalat. good. changala tharar aahe. pan ase dhadas karatana jara japun. nantar mulagi mane `BABA ZA SHELI`