Oct 25, 2008

मनुताईंचा किल्ला!


मनस्वीच्या शाळेच्या शेवटच्या आठवड्यात किल्ले बनविण्याची स्पर्धा होती. मी फोटो काढून "सकाळ'मध्येही दिले. खरं तर किल्ले स्पर्धेचा उद्देश मुलांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी, हा असतो. मला मात्र किल्ला बनवण्याचीच प्रेरणा मिळाली. मनस्वीलाही आवडेल, अशी खात्री होती. मग किल्ला बनविण्याचं नक्की करून टाकलं.
हातातली थोडी कामं आटपली आणि थोडी बाजूला ठेवली. मग किल्ला बनवायला घेतला. सहकारी होते दोघंच - मी आणि मनस्वी. एकतर जवळपास वीसेक वर्षांनी किल्ला बनवण्याचा उपद्‌व्याप करत होतो. त्यातून रत्नागिरीत आम्ही किल्ला करायचो, तेव्हा दगड-मातीला तोटा नसायचा. इथे पुण्यातल्या सोसायटीत कुठली आलीये दगड नि माती? तरीही, खाली जाऊन मोकळ्या मैदानातून कायकाय भरून आणलं. काही लोकांच्या घराच्या कामातला राडारोडा पडलेला होता. मागे मैदानात माती होती. वाईट होती, पण तात्पुरती कामाला येणारी होती. म्हटलं, चला! आपली गरज तर भागेल!
दोन पोती एकट्यानंच वर घेऊन आलो. मनुताईंना मदतीची इच्छा खूप होती, पण शरीर साथ देत नव्हतं. तरीही, झेपेल तेवढं खालून वर घेऊन आल्या. मग आम्ही किल्ला करायला घेतला. दगड रचून, त्यावर गोणपाट टाकणं आवश्‍यक होतं. ते भिजवून, चिखलात लोळवून रचलं. पायऱ्यांसाठी आणि शिवाजी महाराजांच्या आसनासाठी दोन फळ्या टाकल्या आणि वर गोणपाट पसरलं. त्यावर माती लिपली आणि झाला तयार किल्ला! मनस्वीनं माती कालवण्याचा आणि चिखलात बरबटून घेण्याचा मनसोक्त आनंद घेतला. मी तिला ओरडत होतो, पण मलाही लहानपणी असंच चिखलात लोळायला आवडत होतं. पण आता बाप झाल्यामुळं वेगळा अभिनिवेश घेणं आवश्‍यक होतं. असो! असतात काही व्यावहारिक अडचणी!
दोन दिवस पुन्हा त्याकडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही. माती कमीच पडत होती. मग शनिवारी समोरच्या नर्सरीतून पोतंभर माती घेऊन आलो. ती किल्ल्यासमोर पसरली आणि मग किल्ल्याला परिपूर्णता आली. आमच्या आधुनिक किल्ल्याशेजारून एक ट्रेनही धावते. हातात शस्त्रं घेतलेले पोलिस शिपाईसुद्धा आहेत.
मनस्वीनं तर शिवाजी महाराजांचं आणखी एक लग्नसुद्धा लावून टाकलं. एका बाहुलीला त्यांच्या शेजारी उभं करून त्यांची "नवरी' करून टाकलं. त्यानंतर काल अचानक त्या बाहुलीनं भूमिका बदलून आता ती हनुमानाची "मैत्रीण' झालेय. दिवाळी संपेपर्यंत आणखी दोन-तीन परकायाप्रवेश करेल बहुधा ती!
रोज किल्ल्याची नवी रचना आणि बाहुल्यांची अदलाबदल करण्याचं व्रत तिनं घेतलंय. मूळचा किल्ला तरी दिवाळी संपेपर्यंत टिकेल, ही अपेक्षा!
------

1 comment:

Abhi said...

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
मला हा ब्लॉग आवडला मी माझ्या ब्लॉग वरील यादीत तुमचा ब्लॉग सामील केला आहे.
धन्यवाद!!!