Jan 11, 2009

तात्या

भिकाजी हरी पेंढारकर। म्हणजे माझे आजोबा. आम्ही त्यांना "आजोबा'च म्हणायचो, पण प्रचलित नाव, तात्या. नाव कशावरून पडलं, ठाऊक नाही. मला कळायला लागलं, तेव्हापासून मी त्यांना कष्ट करतानाच पाहत आलोय. माझ्या लहानपणी ते आमच्याजवळच रत्नागिरीला होते. काकांचा मुलगा लहान असल्यानं आजी डोंबिवलीला राहायची. अधूनमधून रत्नागिरीत यायची. आजोबा आणि आजी दोघंही कष्टाळू. आजीला स्वयंपाकाची हौस, तर आजोबांना बाहेरच्या कष्टाच्या कामांची. नारळाच्या झावळा पडल्या, की त्या तोडून पाती काढून ठेवायच्या. मग त्याचे हीर काढायचे आणि केरसुणी तयार करायची. केरसुणी बांधायला शिकावी, तर आजोबांकडून! मला ते मदतीला घ्यायचे आणि मला जाम कंटाळा यायचा. त्यांची केरसुणी म्हणजे हल्ली बाजारात मिळतात, तसल्या झाडूसारखी पिचकी नसायची. एकत्र जमवलेला हिरांचा गठ्ठा नीट तासून घ्यायचा. कोयतीनं मागची, पुढची टोकं उडवायची. मग त्याच्या अधून-मधून अनेक बाजूंनी सुतळी खोचायची. ती कोयतीनं चांगली आतपर्यंत खचायची. हीर चांगले पसरून केरसुणी व्यवस्थित फाकेल, असं पाहायचं. ही सुतळ ओढून धरायची आणि खचण्याची कामं माझ्याकडे असायची. ती आजोबांच्या मनासारखी होईपर्यंत आमचा कस लागायचा.
दुसरं आवडतं काम म्हणजे अंगण करणं। आमच्या घराला छान अंगण होतं. एक छोटं, एक मोठं. मागे विहीरीच्या बाजूलाही एक अंगण. तिन्ही अंगणं साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीत केली जायची. आधी अंगण खणून घ्यायचं, मग ढेकळं फोडायची. दगड काढून टाकायचे. लागल्यास नुसती माती ओतायची. मग त्यावर पाणी मारून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी चोपणीनं (अंगण चोपण्यासाठीचं उपकरण) ते चोपून काढायचं. पुन्हा तसंच ठेवून त्यावर पाणी मारायचं. तिसऱ्या, चौथ्या दिवशी पुन्हा पाणी मारून व्यवस्थित चोप द्यायचे. मग सगळं सपाट झालं, की त्यावर सारवण घालायचं. आजोबांची ही अगदी आवडती कामं. आमचं अवसान गळायचं, पण आजोबा शेवटपर्यंत लढायचे.
कपडे धुणं, फुलं, पूजा, अंगणातला आणि घरातला केर, ही सुद्धा त्यांनी स्वतः मागून घेतलेली त्यांच्या आवडीची कामं। माडांना पाणी घालणं सुद्धा मनाजोगतं काम. वयाच्या ऐंशी-ब्याऐंशीव्या वर्षी स्वतःचे कपडे, चादरी, सतरंज्या आपटून, विहिरीवरून पाणी आणून धुताना मी त्यांना पाहिलंय.
व्यवसायानं ते हवालदार होते। त्याचे किस्सेही कधीकधी आम्हाला रंगवून सांगायचे.आजोबांच्या कष्टांची, अंगातल्या ताकदीची आणि इच्छाशक्तीची कमाल मी अनेकदा पाहिली आहे. संगमेश्‍वरला त्यांच्या मामांच्या गावी आम्ही अनेकदा जायचो. तिथे एकदा कुठल्यातरी नारायणमामाला भेटायला जायचं होतं. त्यांचं घर पार लांब, डोंगरावर होतं. हे तयार झाले. सोबत मी! सगळी घाटी चढून जाताना माझी फासफूस झाली, पण आजोबा थांबायला तयार नव्हते. तिथे जाऊन, जेवण करून संध्याकाळी पुन्हा मुक्कामी हजर!
संगमेश्‍वरजवळ असुर्डे या गावात रामनवमीला सगळी मुळ्ये कंपनी जमायची। दिवसभर कार्यक्रम झाले, की मग रात्री पत्त्यांचा "यज्ञ' चालायचा. सहा जणांमध्ये "लॅडीज'चा डाव रंगायचा. एकदा बसले, की आजोबांना कुणी उठू देत नसे. लॅडीज खेळण्यात आजोबा पटाईत. त्यांना तेवढा एकच डाव आवडायचा. नाहीतर पाच-तीन दोन. आम्ही लहानपणी त्यांच्याबरोबर ते खेळायचो. लॅडीज रंगलं, की रात्री दोन कधी वाजायचे, कुणाला कळायचंही नाही. मी आपला लिंबू-टिंबू असल्यानं, मला पानं टाकायची किंवा नुसतंच बघायची कामं मिळायची. एकदा हातात हुकमी पत्ते आले, की आजोबांचा चेहरा असा खुलायचा आणि बोटं अशी फिरायची, की विचारता सोय नाही! विशेषतः प्रतिस्पर्ध्याचा होणारा हात स्वतःच्या हुकमाच्या पत्त्यानं कापताना, किंवा एक्‍क्‍याची उतारी करतानाचा त्यांचा अभिनिवेश पाहण्यासारखाच!
पण रावसाहेबांसारखंच आजोबांचं तोंड म्हणजे अगदी "गटार'! शिव्यांचं गोदामच। त्यांची भाषा असंस्कृत नव्हती, पण रागावल्यानंतर, किंवा दुसऱ्याची अब्रू काढताना तिला "भ'हर यायचा. एखाद्याची मुक्त कंठानं प्रशंसा, स्वयंपाकाची तारीफ वगैरे त्यांना कधी माहीतच नव्हती. एकतर लहानपणापासून तुपाशी खायची सवय. त्यातून आजीही सुगरण मिळालेली. त्यामुळं जरा कुठे एखादा पदार्थ बिघडलेला त्यांना अजिबात चालायचा नाही.एकदा संक्रांतीला माझ्या आईच्या आईनं- आजीनं घरी गूळपोळ्या केल्या होत्या. जराशा करपल्या होत्या.
""अगो, काय राखुंडी केलेय की काय ही पोळ्यांची!'' आजोबांनी लगेचच शेरा मारून वासलात लावून टाकली।
मी म्हणालो, ""असू दे। उद्या सकाळी दात घासायला होईल!''
गोड, पक्वान्न वगैरे खाण्याचा त्यांना भलताच शौक। सणाचा दिवस म्हणजे दुपारी भरपूर जेवण, त्यानंतर झोप आणि संध्याकाळी चहाला सुट्टी! रात्रीसुद्धा थोडंसं ताक किंवा लंघन! एकदा नातीच्या लग्नात भरपूर श्रीखंड खाल्लं आणि मग महिनाभर खोकत होते! रात्री झोपताही येत नव्हतं!!
आजोबा कितीही रागीट असले, तरी आम्हाला त्यांची कधीच भीतीबिती वाटली नाही। एकतर माझ्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. माझ्यावर ते एकदाच रागावलेले आठवताहेत - खिडकीवर खेळताना उलटा आजीच्या पायावर पडलो होतो, तेव्हा. आजीच्या पायाचं मोठं खर्चिक प्रकरण झालं ते.
अमितला मात्र अनेकदा त्यांचा "प्रसाद' खावा लागायचा। एकदा तर रागाच्या भरात त्यांनी त्याच्या डोक्‍यातच लाकूड घातलं होतं. तो आंघोळीला लवकर येत नव्हता, म्हणून. डोक्‍यातून भळाभळा रक्त वाहायला लागलं आणि डॉक्‍टरांकडे धावावं लागलं.माझा पहिला लेख छापून आला आणि पहिली मुलगी मला सांगून आली, तेव्हा आजोबा नाचायचेच बाकी राहिले होते. बीए झालेली, सुस्वरूप आणि रूढ अर्थानं "सुयोग्य' मुलगी मला सांगून आली आणि तिला मी नाकारलं, तेव्हा तर त्यांनी माझ्याशी अबोलाच धरला होता...
सहस्रचंद्रदर्शनानंतरही आजोबा स्वतःची कामे स्वतःच करत होते। त्यांना अंथरूणावर झोपून राहिलेलं आम्ही कधीच पाहिलं नाही. पायाला सायटिका झाला आणि ते खचले. दोन-तीन महिने त्यांना चालताच येत नव्हतं. त्यातून त्यांच्या मनानं जी हाय खाल्ली, ती खाल्लीच! नंतर त्यांना अचानक कावीळ झाली. ती पोटापर्यंत पसरल्यानंतरच लक्षात आली. मी पुण्यात होतो आणि आजोबांना ऍडमिट केल्याचं कळलं. रत्नागिरीला जाण्याचा विचार करत होतो, पण एवढी इमर्जन्सी नाही, असं कळलं होतं. एके दिवशी सकाळी अचानक कळलं, आजोबांना घरी आणलंय. "घरी आणलंय' म्हणजे, आता डॉक्‍टरांचे उपचार थांबलेत आणि आता पुढे काही होऊ शकणार नाही. काही तासांतच ते गेल्याची बातमी कळली. मला त्यानंतर रत्नागिरीला जाणंही शक्‍य नव्हतं. तोपर्यंत अंत्ययात्रा थांबणार नव्हती. मला आजोबांचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही. खूप रडलो त्या दिवशी खोलीवर. पण रडूही येत नव्हतं.
आजोबांची शेवटची भेटही न होणं, हा कदाचित लहानपणापासून मिळालेल्या त्यांच्या प्रेमाबद्दलचा काव्यात्म न्याय असावा!

3 comments:

Anonymous said...

प्रिय अभिजीतजी, सहज शोधता शोधता आपला ब्लाॅग सापडला. आतापयर्ंत ग्राफिटी आणि सकाळमधील लेखांतून आपल्याला अोळखत होता. आज आपली आणखी सखोल अोळख झाली. आपल्या लेखनाच्या इतर पैलूंबद्दल माहिती मिळाली. बरे वाटले... आपल्या ब्लाॅगला शुभेच्छा.. सतत भेटत जाऊ..

विजयसिंह होलम
बातमीदार,
सकाळ, नगर

Anonymous said...

प्रिय अभिजीतजी, सहज शोधता शोधता आपला ब्लाॅग सापडला. आतापयर्ंत ग्राफिटी आणि सकाळमधील लेखांतून आपल्याला अोळखत होता. आज आपली आणखी सखोल अोळख झाली. आपल्या लेखनाच्या इतर पैलूंबद्दल माहिती मिळाली. बरे वाटले... आपल्या ब्लाॅगला शुभेच्छा.. सतत भेटत जाऊ..

विजयसिंह होलम
बातमीदार,
सकाळ, नगर
vijay.holam@gmail.com

Ruhi said...

hi,
Aajoban baddal cha post vachun mann bhutkalat gela... te gelyacha divas aathvala... :(
pan chaan lihile aahes.