आमची मारुती गाडी चालकासह घेऊन आई-वडील रत्नागिरीहून इथे पुण्याला आले होते. माझी मावशीही सोबत होती. त्यांच्यासाठी म्हणून मी रजा टाकली होती. दुसऱ्या दिवशी रांजणगावला जायचा बेत आखला. साधारण 11 वाजता निघालो. घरापासून निघून पुढच्याच चौकात आलो होतो, तर पोलिसांनी गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला. मी तर सिग्नल तोडला नव्हता, की झेब्रा क्रॉसिंग तुडवले नव्हते. "अपराध माझा असा काय झाला,' अशा पवित्र्यात मी भांडण्याच्या तयारीत होतो. तेव्हा समजलं, की सीटबेल्ट लावला नसल्यानं मला अडवण्यात आलंय. हे प्रकरण नवीन होतं. पुण्यात बेल्ट अत्यावश्यक आहे वगैरे ऐकलं होतं, पण पुण्यात कार चालविण्याची कधी वेळच आली नव्हती. प्रत्यक्षात आज आली आणि प्रथम ग्रासे मक्षिकापात जाहला. निमूटपणे काहीतरी कारणं सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शेवटी हो-नाही करता करता 50 रुपयांत मांडवली झाली. हुश्श करून पुढच्या प्रवासाला लागलो. पण पहिला अपशकुन झाला होता...जाताना प्रचंड रहदारी आणि रांगांमुळे पोचण्यास वेळ लागला. दुपारी जेवण करून निघालो. गाडी सुरू करण्यासाठी आलो, तर किल्लीच फिरेना. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर ती कशीबशी फिरली. गाडी सुरू झाली. येताना वाटेत दोन-तीनदा गाडी वेगात असताना अचानक बंद पडली. काय भानगड झाली, कळेना. बरेचदा किल्ली फिरवल्यानंतर ती पुन्हा सुरू होत होती. मला संध्याकाळी पाचला ऑफिस गाठायचं होतं. त्यामुळं पुण्यापर्यंत जाऊ आणि उद्या बघू, असं ठरवलं. शेवटी तीन-चारदा बंद पडून कोरेगाव भीमामध्ये पोचल्यानंतर गाडी हटूनच बसली. काही केल्या पुन्हा सुरू होईना. तिथे मेकॅनिक शोधणं भाग होतं. शिवाय, ऑफिसमध्ये माझ्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्याची दुहेरी जबाबदारीही सुरू झाली. फोनाफोनी करून काही व्यवस्था होते का, ते पाहिलं.
कोरेगाव भीमामध्ये मेकॅनिक शोधणं जिकिरीचं काम होतं. नशीबानं आमची गाडी बंद पडली, तो मुख्य बाजार होता. तिथेच जवळ एक गॅरेज होतं. तिथे जाऊन मेकॅनिकला गाठलं. त्यानं तपास केल्यावर बॅटरीतलं पाणी पूर्ण संपल्याचं निष्पन्न झालं. बाटलीभर पाणी ओतल्यानंतर भस्सकन वर आलं. मघाशी आम्हीही बॅटरीतलं पाणी तपासलं होतं....पण ते होतं ड्रायव्हर सीटखालचं. ते "वायपर'चं पाणी होतं, हे त्या मेकॅनिकनं सांगितल्यावर समजलं. पाणी पूर्णपणे संपल्यामुळे गाडी गरम झाली होती आणि बंद पडत होती. रबर कीटही जळालं होतं. गाडी लगेच दुरुस्त होणं शक्यच नव्हतं. तिथेच सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आमच्या तिथल्या एका सहकाऱ्याला साकडं घातलं आणि तेही देवासारखे धावून आले. त्यांच्याच गाडीतून मग आम्ही सगळे पुण्याला अगदी घरापर्यंत आलो.दुसऱ्या दिवशी बसने जाऊन गाडी घेऊन येण्याचा उद्योग करावा लागला. या सगळ्या प्रकरणात सुमारे दीड हजार रुपये खर्च झाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत गाडी बाहेर काढली नव्हती. संध्याकाळी बाजारात जाण्याची तयारी सुरू होण्याआधी एक छोट्या फेरीसाठी गाडी बाहेर काढली. येताना सोसायटीत आल्यावरच गाडी पुन्हा रुसली. गिअर पडत नव्हते आणि रेझ मात्र खूप होत होती. क्लचची गोची झाली होती. गाडी बाजूला लावून रिक्षानं जावं लागलं. त्यापुढच्या दिवशी ते काम करून घेतलं. तूर्त काम झालं होतं, तरी धाकधूक होतीच. रत्नागिरीपर्यंतचा प्रवास करायचा होता. सुदैवानं त्यानंतरच्या प्रवासात गाडीनं काही त्रास दिला नाही.
...पण माझ्या नेहमीच्या बाईकनं ती कसर भरून काढली। तिसऱ्याच दिवशी संध्याकाळी सातच्या एका मराठी चित्रपटाच्या प्रिमिअरला निघालो होतो। सिटीप्राईडच्या थोडेच अलीकडे बाईक अचानक पंक्चर झाली. तिथे दुकान शोधून पंक्चर काढून घेण्याएवढा वेळ नव्हता. गाडी तशीच रस्त्याच्या कडेला लावली. चित्रपट पाहिला. नंतर नऊ वाजता पंक्चरच्या दुकानाची शोधाशोध सुरू झाली. कुणी दुकान सोडून दुसरीकडे गेलेला होता, कुणी बंद करण्याच्या मार्गावर होता, कुणी येण्यास तयार नव्हता. कर्वे रोड फ्लायओव्हरपर्यंत फिरण्याची दगदग केली. काहीच उपयोग झाला नाही.रात्री पत्रकार परिषदेला जायचं होतं. ती आटोपल्यावर गाडी ढकलत घरी न्यावी, असा विचार केला. पण दोन-अडीच किलोमीटरचं अंतर होतं. रात्री अकराला एवढी गाडी ढकलणं म्हणजे दिव्यच होतं. हॉटेलातून मनाचा हिय्या करून निघालो खरा, पण अर्ध्या वाटेतच विचार बदलला. पुन्हा एकदा नशीबावर हवाला ठेवून गाडी उभी केली होती तिथेच रात्रभर सोडून चालत घरी आलो. सकाळी पंक्चर काढून घेण्याचं काम फारसं कठीण नव्हतं.दोन्ही गाड्यांनी असा मला मनसोक्त त्रास दिला, तेव्हाच त्यांची मनःशांती झाली.
---
असो। यंदाच्या कोकण दौऱ्यात दोन नवीन ठिकाणांना भेट दिली। जयगडजवळच्या कोळिसरे देवस्थानाला खूप लहानपणी गेलो होतो. यंदाच्या दौऱ्यात ते जमवलं. गाडी घेऊन सर्व जण गेलो होतो. अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेलं हे ठिकाण कुणालाही हरवून टाकणारं आहे. गणपतीपुळ्याच्या रस्त्यावर, पण दहा किलोमीटर अलीकडे हे देवस्थान आहे. साधारणपणे इ.स. 150 वगैरे मध्ये त्याची स्थापना झाल्याचं सांगतात. लक्ष्मी-केशवाची मूर्ती आणि देवळाचं एकूण स्थानच डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. दोन बाजूंना डोंगर, एकीकडे दरी आणि एकीकडे नदी, अशा या स्थानी मनाला शांतता लाभते. देवळाशेजारीच कायमस्वरूपी झरा हा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो.माझ्या मामेभावाच्या सासुरवाडीला, कळझोंडी या गावालाही भेट दिली. त्यांचं घर सुंदरच होतं. कोकणात एवढं सुंदर घर मी अनेक वर्षांनी अनुभवलं. भरपूर आंबे खाल्ले. फणस मात्र यंदा वाट्याला आला नाही. एकदा बरका फणस आणून हाणला, तेवढाच. मनस्वीसुद्धा मांडी ठोकून गरे खायला बसली होती. काप्यापेक्षा बरक्याचंच तिला जास्त आकर्षण होतं. गणपतीपुळ्याला मात्र या वेळी गेलो नाही.आता पावसाळ्यात पुन्हा या भागात जाण्याचा विचार आहे. पाहूया!
----
ही काही प्रकाशचित्रं :










2 comments:
मागच्या वर्षी गेलो होतो कोळिसरे देवस्थानाला. पण काम सुरु होते तिकडे. सगळा सुंदर परिसर आहे. तू बरोबर बोललास. पावसाळ्यामध्ये कसली मज्जा येइल रे इकडे. :)
Hello , Abhijit. This is your sister pradnya. I read your blog. It's very good. It's refreshing to read in marathi. Manaswi looks very cute. How is Harshada? Take care. Please continue writting, I will keep in touch.
Post a Comment