
नव्या अल्टोची पहिली अधिकृत ट्रिप तशी शिरगाव-प्रतिशिर्डीला झाली होती. पण ती पूर्ण वेळेची ट्रिप नव्हती. म्हणून गेल्या रविवारी जेजुरीला जायचं ठरवलं. जेजुरी हे काही फार आकर्षणाचं केंद्र नव्हतं, पण घरच्याही काही जणांना पाहायचं होतं, म्हणून तिकडे जाण्याचा बेत पक्का झाला.
सकाळी आठला निघायचा बेत पक्का करून साडेनऊपर्यंत निघालो. गाडीची प्रवासी क्षमता पूर्ण झाली होती. आमची लाडकी कन्या पुढची सीट अडवून बसली होती. जाताना सिंहगड रस्त्यानेच निघालो आणि देहूरोड-कात्रज बायपासवर गाडी घेतली. माझं रस्त्यांचं ज्ञान अगाध! गाडीच्या आणि ड्रायव्हिंगच्या नादात मस्त नवा बोगदा वगैरे पार करून खेड शिवापूरच्या जवळ आलो, तेव्हा कळलं, आपल्याला कात्रजमधून कोंढव्याला जायचं होतं!
पुन्हा कात्रजचा घाट उतरून जावंसं वाटेना. बराच पुढेही आलो होतो. म्हणून पुढे थांबून चौकशी केली. खेडशिवापूर दर्ग्यापासून थेट सासवडला जाण्याचा एक खुश्कीचा मार्ग असल्याचं कळलं. मग त्या दर्ग्याची दोन-तीन ठिकाणी चौकशी केली. कुणी एक किलोमीटर सांगितलं, कुणी चार किलोमीटर! शेवटी अपेक्षित तेच घडलं. तो दर्गा आणि त्याजवळची कमान की काय ती...ओलांडून आम्ही पुढे गेलो. तिथून पुन्हा वळता येईना. मग शेवटी नारायणपूरमार्गेच सासवडला जाण्याचा निर्णय घेतला. फुक्कटचा 45 रुपयांचा टोल भरावा लागला!
सासवडमार्गे जेजुरीला पोचायला साडेअकरा वाजले. जेजुरीत गाड्यांचा आणि गर्दीचा भयंकर राडा होता. रस्त्यात लोकांचा महापूर होता. त्यातून मार्ग काढत गाडी हाकावी लागत होती. पार्किंगची खासगी जागा पण दिव्यच होती. मी लग्नाआधी जेजुरीला गेलो होतो, तेव्हा मागे बऱ्याच अंतरावर चालत जाऊन कडेपठारापर्यंतही जाऊन आलो होतो. या वेळी उन्हामुळे आणि उशीर झाल्याने तो बेत रद्द करावा लागला.

जेजुरी मंदिरात दर्शनासाठी भलीमोठी रांग होती. त्यातून आमच्याजवळ तीन-तीन पोरांची लटांबरं होती. मग दर्शन न घेता, थोडा वेळ टेकून काढता पाय घेतला. येताना वाटेत पहिले एक-दोन ढाबे टाळून तिसरं हॉटेल पकडलं. तेही दिव्यच होतं. रोटी आणि काहीबाही भाजी अशी "मेजवानी' झाली. येताना मात्र कुठेही न चुकता, दिवेघाटमार्गे पुण्यात चारपर्यंत आलो.

ट्रिप तशी बरी झाली, पण फार "छान' नाही. अल्टो बरीच लांबवर पहिल्यांदाच चालवली, तो एक आनंददायी अनुभव होता. पण पाचवा गिअर टाकायला काही फारसं झेपलं नाही. बहुधा, पाचवा समजून मी तिसराच गिअर टाकत होतो! पुढच्या वेळी नव्यानं प्रयत्न करायला हवा. एसीदेखील चटकन काम करत नव्हता. पहिल्या सर्व्हिसिंगपर्यंत थांबून नंतर निर्णय घ्यायला हवा!
पुढची ट्रिप कुठे करावी, याचा सध्या विचार करतोय!
1 comment:
पण पाचवा गिअर टाकायला काही फारसं झेपलं नाही. बहुधा, पाचवा समजून मी तिसराच गिअर टाकत होतो!
Ha common problem ahe, mazahi tasach zala hota. Pudhchya veles jamel :)
Post a Comment