
ताम्हिणीत जाण्यात "रिस्क' होती.
दरवर्षीप्रमाणे दणकून पाऊस, दरडीबिरडी कोसळण्याची भीती म्हणून नव्हे. तर अजिबात पाऊस नसल्याच्या बातम्या होत्या म्हणून!
जूनपासून पावसाची वाट पाहूनपाहून थकलो होतो. गाडीतून दोन ट्रिपा केल्या, दोन्ही कोरड्या! जेजुरी आणि कार्ला इथे घामानं पुरेवाट झाली होती. ताम्हिणीत पाच जुलैला जायचं हे तर ठरलं होतं, पण धाकधूक होतीच. ताम्हिणीत जायचं म्हणजे मस्त पाऊस, धुकं, धबधबे, असं समीकरण गेली आठ-दहा वर्षं डोक्यात पक्कं बसलं होतं. पहिल्यांदा तिथे गेल्यापासून गेल्या वर्षीचा अपवाद वगळता दरवर्षीची एक फेरी कधीच चुकली नव्हती. रोज पावसाच्या बातम्यांवर आणि आभाळाकडे लक्ष ठेवून होतो. आज पाऊस येईल, उद्या येईल, असं गेले दोन आठवडे वाटत होतं. रोज निराशाच पदरी येत होती. ताम्हिणीचा "व्हेन्यू' बदलायला लागतो की काय, अशी परिस्थिती होती. आदल्या दिवसापर्यंत "अपडेट्स' घेणं सुरू होतं.
अखेर गेल्या आठवड्यात पुण्यात हलका पाऊस झाला आणि जरा जीवात जीव आला. तरीही जिल्ह्यात फार दमदार पाऊस झाल्याची वार्ता नव्हती. ऑफिसातल्या एका सहकाऱ्यानंही तिथं जाण्याविषयी नकारघंटाच लावली होती. शेवटी गुरुवारी त्याच भागात राहणारा एक सहकारी निदान तिकडे प्रसन्न वातावरण असल्याची सुवार्ता घेऊन आला. हा खरंच थोडा दिलासा होता. तरीही, मी सोडून कुटुंबीयांपैकी बहुतेक जणांचा तिकडे जाण्याबाबत आग्रह कमीच होता. निघण्याच्या आदल्या दिवशी एका मित्रानं खबर आणली, की थोडे-थोडे धबधबे आहेत. जरा आणखी उमेद आली.
पाच जुलैला सकाळी दहा जणं मिळून दोन गाड्यांतून ताम्हिणीकडे कूच केले. साधारणपणे चांदणी चौक ओलांडला, की ताम्हिणीच्या वातावरणाचा वास यायला लागतो. या वेळी पिरंगुट ओलांडले, तरी फारसे काही वातावरण नव्हते. पौडमध्ये मिसळ खाल्ली, तेव्हाही "पाऊस नाही' या चर्चेनं जरा धडधड वाढली. "सगळ्यांना घेऊन आलोय खरं, पण धबधबे मिळाले नाहीत तर आपली काही खैर नाही,' या विचारानं जीव खालीवर होत होता. वाटेत एके ठिकाणी हवा भरायला थांबलो, तर तिथेच आमचा नेहमी थांबण्याचा फेवरेट स्पॉट होता. जरा पुढे जाऊन बघितलं, तर धबधबा! डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता! ज्याच्या शोधात पुण्याहून 80 किलोमीटरवर बोंबलत आलो होतो, तो साक्षात पुढ्यात हात जोडून उभा होता!
आम्ही तिथे फोटोबिटो काढले, पण भिजलो मात्र नाही. कारण भिजायला घाटमाथ्यावर भरपूर धबधब्यांच्या सान्निध्यात जायचं होतं! मग वाटेत थांबतथांबत निघालो होतो. एका पठारावर आलो, तर रस्ता धुक्यात बुडून गेलेला. समोरची गाडीही दिसत नव्हती. दोन्ही बाजूला पाणी आहे आणि आपण बंधाऱ्यावरून निघालो आहोत, असंच भासत होतं. शेवटी गाडी धांबवली आणि मस्त धुक्यात बुडून गेलो. धुकं जसं आलं त्याच वेगानं नाहीसंही झालं. चला, ताम्हिणीचा आटापिटा अर्धाअधिक सत्कारणी लागला होता!
घाटमाथ्यावर गेलो, पण धबधब्यांची रांग काही दिसत नव्हती. एखाददुसरा ओघळ दिसत होता. वाटेत एक-दोन धबधबे लागले, पण तिथे थांबावंसं वाटलं नाही. शेवटी धबधब्यांच्या शोधात घाटउतारापर्यंत गेलो. शेवटी तिथून परत फिरलो. परतीच्या वाटेवर जो धबधबा लागला, त्यात मस्त भिजलो. फार मोठा नव्हता, पण आनंद घेण्याएवढ्या धारा होत्या.
दरवर्षीपेक्षा जरा लवकरच यंदा ताम्हिणीत गेलो होतो. पावसाची स्थिती नव्हती, तरी निराशा झाली नाही. उलट, सहल फलदायी झाल्याचाच अनुभव आला!


अभ्यंगस्नान!

अधिक्रुत पत्नीबरोबरचा अधिक्रुत फोटो!


2 comments:
अधिक्रुत पत्नीबरोबरचा अधिक्रुत फोटो!
ha ha :)
मस्त लिहिलंय रे. मजा करतोस.
Post a Comment