पुण्यात सिंहगड पायथ्याजवळ रेव्ह पार्टीची नशा जगजाहीर झाली, त्या वेळी केलेलं हे लिखाण आहे. रेव्ह पार्टीनंतर सांस्कृतिक डोस पाजण्याचं पीकच आलं होतं. "पेशव्यांची परंपरा असलेल्या पुण्याचं काय झालं हो!' असा टाहो फोडला जात होता. विश्वास नांगरे पाटीलही सगळीकडे याच विषयावर बोलत होते. त्याचंच हे प्रहसन.
---------
बालगंधर्व (रंग) मंदिरात बुवांचं कीर्तन ऐन रंगात आलंय. समोर उपस्थित सदाशिव पेठी, नारायण पेठी, शनिवार पेठी, तबला-पेटी आणि समस्त सुसुसुसुसुसुसुसु-संस्कृत, सुसुसुसुसुसुसुसु-जाण आणि सुसुसुसुसुसुसुसु-शिक्षित मंडळी आणि पत्रकार-पत्रकारिणी धुंद ("मद्य' नव्हे) होऊन डोलताहेत...काही भावविव्हल आणि भक्तिवेल्हाळ श्रोते तर पार "समाधी अवस्थे'त गेलेत...(काही नतद्रष्ट यालाच सुखाची झोप असं म्हणतात...असो. अशा कपाळकरंट्यांना काय कळणार अशा अध्यात्मिक गोष्टी...(पुन्हा) असो.)
महाराजांच्या जिभेवर जणू सरस्वतीच भांगडा करतेय...आणि वाणीतून तर मध, साखर भसाभसा सांडतेय...(पवित्र, टापटीप "देऊळ' असूनही त्यामुळंच माशाही घोंघावताहेत...)जाहला संस्कारांत खंड । म्हणूनच "रेव्ह पार्ट्या' उदंड ।।"विश्वास' म्हणे असे हे "गुंड' । ठेचावेत करूनी "जेरबंद' ।।तर मंडळी, माऊलींनी काय सांगून ठेवलंय...या जगात अज्ञान आणि अंधकाराचं उदंड पीक आलंय...अधर्म आणि असंस्कार माजलाय...अशा परिस्थितीत एकच उपाय...पालकांनो, मुलांना भरपूर प्रेम द्या...नाहीतर आमच्याकडे पाठवा...आम्ही त्यांना कोठडीत त्यांच्यावर "प्रेमवर्षाव' करू...!!अनंतकोटी "रेव्हबाज'निर्दालक, सगुणतारक, दुर्गुणहारक संतशिरोमणी विश्वासराव नांगरे पाटील महाराज की जय...!!!!! (एकच जयघोष...)महामहोपाध्याय, संताधिसंत, शास्त्रज्ञाधिशास्त्रज्ञ ("देवाधिदेव'च्या सुरात) विजयराव भटकर महाराज की जय...!! (मंदिरा'तील मागच्या उजव्या कोपऱ्यातील गटाकडून आरोळी) संतशिरोमणी, महान संस्कृतीरक्षक श्री श्री श्री (किमान तीनदा आवश्यक. दोनदा चालेल. पण फक्त एकदा "श्री' खपवून घेणार नाही) बबनराव पाचपुते महाराज की जय! (हा "देशा'वरचा आवाज)
एवढा सगळा गदारोळ आणि घोषणांचा चित्कार यथासांग पार पडल्यानंतर नांगरे-पाटील महाराज पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाला (खरं तर तथाकथित उच्चभ्रूंच्या बेगडी अब्रूरूपी लंगोटीलाच) हात घालतात.मंडळी, ""आजची तरुण पिढी बहकण्यामागचं आणि रेव्ह पार्ट्यांसारख्या वाईट मार्गाला लागण्यामागचं कारण एकच आहे....आईवडिलांचं होणारं दुर्लक्ष आणि संस्कारांचा अभाव...!''""आज आईवडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही...सगळे पैशांच्या मागे लागलेत...त्यामुळेच हा दुराचार समाजात माजलाय. अशा पार्ट्यांत नाचणारी, अमली पदार्थांच्या आहारी जाणारी तरुण पिढी पाहताना आमचं हृदय हेलावतं...त्यांच्या (फक्त मुलांच्या) अंगावर हात टाकताना मनाला किती यातना होतात...पण इलाज नसतो..."पोलिसी खाक्या'नंच ठोक्यायला...आपलं..."ठोकायला' लागतं...किती वेदना होत असतील...मारणाऱ्यांना...! पण इलाज नाही ! आजच्या तरुण पिढीला योग्य जागेवर आणायचं असेल, तर त्यांना त्यांच्या "योग्य जागी' लाथा घालायलाच हव्यात...नाही का?''बोला...अनंतकोटी "रेव्हबाज'निर्दालक विश्वासराव नांगरे पाटील महाराज की जय !! ...पुन्हा एकमुखी गजर.त्यापाठोपाठ संताधिसंत, शास्त्रज्ञाधिशास्त्रज्ञ भटकर महाराज आणि संतशिरोमणी पाचपुते महाराज यांच्याही अनुयायांकडून (की समर्थकांकडून?) त्यांच्या नावांचा अनुक्रमे गजर.
नांगरे-पाटील महाराजांच्या कीर्तनात पुन्हा एकदा समाजातील अव्यवस्था, सगळीकडे माजलेला भ्रष्टाचार, संस्कृतीचा ऱ्हास, वाढता चंगळवाद, यांची ओघवत्या आणि मधाळ वाणीत उजळणी होते. (मधासाठी आलेल्या माशा आता सगळीकडे घोंघावून श्रोत्यांना "नको तिथे' चावू लागल्या आहेत.) (मध्येच कुणीतरी सदाशिव पेठी पुणेकर "पोलिस खात्यात भ्रष्टाचार नाही काय?' असा भोचक प्रश्न आपलं तोंड कुणाला दिसणार नाही, अशा बेतानं विचारतात. त्यामुळं महाराजांची गैरसोय होते, पण ते तिच्याकडे (आणि त्याच्याकडे) सोयीस्कर दुर्लक्ष करतात.)
संदीप खर्डेकर बुवांना बुक्का लावायला उठतात. त्यांच्या कपाळावर आधीच नाकापासून केसांपर्यंत शेंदूर असल्याने त्यांच्या बुक्का कुठे लावायचा, असा प्रश्न बुवांना पडतो. प्रत्येकाच्या कपाळाला बुक्का लावून कीर्तनाची सांगता होते.
(टीप ः - नांगरे-पाटील बुवा सध्या (बदली होईपर्यंत) शाल-श्रीफळ आणि सव्वाअकरा रुपये या दराने पुणे जिल्ह्यात कुठेही "बहकलेली तरुणाई' या विषयावरील कीर्तनासाठी उपलब्ध आहेत.)
------
जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Apr 14, 2008
Apr 13, 2008
"गोष्ट' तशी चांगली, पण "विनोदा'ला टांगली!
"क्रेझी 4'ची जाहिरात फसवी आहे.ती पाहून, चित्रपटातले मुख्य कलाकार अर्शद वारसी, इरफान खान, राजपाल यादव आणि सुरेश मेनन हे चित्रपटातले "क्रेझी 4' आहेत, असा अंदाज होतो. प्रत्यक्षात तसं नाही. राकेश रोशन, राजेश रोशन, लेखक अश्वनी धीर आणि दिग्दर्शक जयदीप सेन हे ते "क्रेझी 4' आहेत, हे चित्रपट पाहिल्यावर कळतं.
"क्रेझी 4' म्हणजे धमाल कॉमेडी वगैरे असल्याचा समज त्याच्या प्रचंड जाहिरातबाजीतून उगाचच होतो. ही एक साधी, थोडीशी रहस्यमय आणि थोडीशी थरारकथा आहे. हल्ली कोणतीही गोष्ट कॉमेडीत नुसती लपेटून नव्हे, तर चांगली बरबटून द्यायची पद्धतच असल्याने ती वाहवत गेलेय. काही ना काही मानसिक उणिवांमुळे मानसोपचार सुरू असलेले चार तरुण. जूही चावला ही त्यांची डॉक्टर. ती एकदा त्यांना क्रिकेट सामना पाहायला बाहेर नेते, तेव्हा तिचंच अपहरण होतं. मग त्यात तिच्या जवळच्यांचाच हात असल्याचं या चौघांना कळतं. त्यातून ते तिची आणि आपली सुटका करून घेतात, अशी कथा. कथेत काही विशेष नाही म्हटल्यावर ते पटकथेत तरी हवं. पण केवळ प्रत्येकाच्या वैचित्र्यावर आधारित संवाद लिहून आणि घटना रचून वेळ मारून नेण्याचा कार्यक्रम लेखक राकेश रोशन/अश्वनी धीर आणि पटकथालेखक अश्वनी धीर यांनी राबविल्यानं हा प्रवासही बेचव झाला आहे.
सर्वसाधारण "थ्रिलर' चित्रपट म्हणून "क्रेझी 4' मनोरंजक आहे, पण कॉमेडीचा हट्ट धरल्याने राखी सावंत, शाहरूख खान आणि हृतिक रोशन (याचं तर चित्रपट संपल्यावर!) यांचे आयटम सॉंग निष्कारण टाकल्याने त्याची चव गेलेय. तरीही, अपेक्षाभंग झाला, तरी कंटाळा येत नाही, हे बाकी खरं!
अभिनयात अर्शद वारसी, इरफान खान बाजी मारतात. जूही चावला, राजपाल यादव, सुरेश मेनन यांना काहीच संधी नाही. राकेश रोशन यांचं दिग्दर्शन असल्याशिवाय चांगलं संगीत द्यायचं नाही, असं बंधू राजेश रोशन यांनी ठरवलंच आहे. छायाचित्रण आणि नृत्यदिग्दर्शन उत्तम आहे. आकर्षक वेष्टणातला जुनाच मसाला बघायचा असेल तर "क्रेझी 4' ठीक आहे.
---
Apr 10, 2008
संवादाची ऐशी तैशी
तसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्न आणि वाक्ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल. बघा बरं आठवून...!
1. हा...कोन बोल्तय?
- अरे गाढवा! फोन तू केलायंस ना? मग तू आधी सांग, तू "कोन' बोल्तोय्स ते! मग माझं बघू.
---
2. कुठे आहेस?
- मसणात! तुला काय करायचंय? तुझं काम काय आहे, ते बोल ना!
---
3. काय म्हणतोस?
- वयाच्या साधारणपणे वर्षापासून, म्हणजे बोलता यायला लागल्यापासून मी बरंच कायकाय म्हणतोय. त्यापैकी काय काय सांगू?
---
4. काय, हल्ली भेट नाही, बोलणं नाही!
- तुझा मुडदा बशिवला! मसण्या, भेटायला वेळ आहे का तुला? कामाशिवाय तोंड उचकटतं का तुझं? समोर दिसलो, म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं?
---
5. काय विशेष?
- डोंबल! आमच्यासारख्या यःकश्चित मध्यमवर्गीय जंतूंच्या आयुष्यात काय असणार आहे विशेष? अवशेष आहेत फक्त!
---
6. बाकी काय?
- शून्य. भाज्य आणि भाजक यांचा भागाकार पूर्ण होतोय. बाकी काहीच उरत नाही.
---
7. या की एकदा घरी!
- हो, येतो हां "एकदा' घरी! अरे कंजूषनारायणा, "कधीपण या' म्हण की! "एकदा' या म्हणजे काय? तुझ्या समोरच तर राहतो मी! घरात जोरात शिंकलास, तरी आम्हाला अभिषेक होतो. मग कधीही आलो, तर तुझी इस्टेट कमी होणारेय काय?
---
8. ठेवू का मग?
- प्लीज! अजून किती वेळ पिडशील?
----
Mar 7, 2008
हा भार सोसंना!
याआधीच्या पोस्टवर एकपण कॉमेंट आलेली नाही. तरीही, नव्या जोमानं लिहायला बसलोय. आता तर कुणी कॉमेंट टाकली नाही, तर रोजच ब्लॉग लिहायची धमकी देईन मग! बसाल बोंबलत!सध्या व्यायामाविषयी लिहावंसं वाटतंय. माझा अतिशय आवडीचा (टाळण्याच्या दृष्टीनं) विषय. "व्यायाम हा असा आयाम आहे, जो न करणं, हाच माझा नियम आहे,' अशी एखादी रद्दी "ग्राफिटी' मला स्फुरतेय. (एखादी म्हणजे? सगळ्याच रद्दी असतात!) असो.मी जवळपास 84 किलोचा ऐवज झालोय आता. तुम्ही समोरासमोर भेटलात, तर नाही जाणवणार, पण झालोय खरा. कदाचित सहा फुटांपर्यंतच्या उंचीमुळे जाडी झाकोळून जात असावी. झोकोळो बापडी. पण कमी तर होत नाही ना?
व्यायाम बियाम करून वजन कमी करण्याच्या तत्त्वावर माझा कधीच विश्वास नव्हता. किंबहुना, लग्नापर्यंत तशी वेळच कधी आली नव्हती. लग्नाआधी मी वजनाची साठी कधी गाठली नव्हती. "पाप्याचं पितर'च होतो मी. कुण म्हणायचं, जास्त पाणी पी. कुणी म्हणायचं, कार्लं-दोड
का खा. कुणी म्हणायचं, जास्त खाऊ नको, तर कुणी न चावता न खाण्याचा सल्ला द्यायचं. प्रत्येकाच्या अकलेच्या उडीनुसार ते सल्ला द्यायचे. मला सगळ्यांचाच पटायचा आणि कुणाचाच पटायचा नाही. पण त्यानं मी जिवाला त्रास बिस करून घेतला नाही, आणि पोटभर खायचं सोडलंही नाही. एकतर खाण्याचा आणि भुकेचा काहीएक संबंध नाही, या तत्त्वावर माझा गाढा विश्वास. म्हणजे, समोर दिसलं की खायचं. त्यामुळं मला भूक लागलेय, असे प्रसंग जीवनात फारच क्वचित आले असतील. भुकेनं कासावीस वगैरे होणं तर आपल्याला बापजन्मात शक्य नाही!अशी साथ असेल, तर जॉगिंगला
पहाटे सहालाच काय, चार वा.
कोण उठणार नाही?
पुण्यात आल्यावर कॉट बेसिसवर राहत होतो, तेव्हा सकाळी आंघोळादी आन्हिकं उरकून अण्णाच्या हॉटेलात मिक्स खिचडी नाहीतर मिक्स पोहे खाणारा लॉजवरचा मीच पहिला असायचो! एकतर नऊ वाजले की माझा भुकेनं जीव जायचा आणि बाकीच्यांसाठी थांबण्याचं शारीरिक आणि आर्थिक बळही नसायचं. कारण बाकीचे सगळेच कर्मदरिद्री! फुकट खायला मिळालं, तरच खाणारे. मग त्यांना कशाला उरावर घ्या? मी आपला एकटाच हादडून यायचो.तरीही जिवाला काही लागलं नाही. कदाचित, सगळ्याच टेन्शनमुळे असेल. मी मजेत असलो, तरी सुखा-बिखात नव्हतो. खाऊन-पिऊन सुखी असलो, तरी समाधानी वगैरे नव्हतो. बायको नावाचं प्रकरण माझ्या आयुष्यात आलं आणि आयुष्य बदललं. तिनं दिलेल्या प्रेमामुळे म्हणा, किंवा तिच्या हातच्या जेवणामुळे म्हणा; चांगला भरगच्च झालो. बाळंतपणात तिच्या जाडीवरून चिडवता चिडवता एके दिवशी मीच गोल-गरगरीत दिसायला लागलो आणि डॉक्टर मित्राकडे सह
ज गेलो असताना, त्यानं जबरदस्तीनं वजनकाट्यावर चढायला लावलं. 84 किलो! माझ्यासकट तो तीन ताड उडाला."अभ्या, वजन कमी कर लेका! मरशील अशानं. जिना चढला, तरी दम लागत असेल तुला!' अशी आर्त किंकाळी त्यानं ठोकली.पण मी त्याच्या बापाला दाद देणारा नव्हतो.एकतर, त्याच्या वैद्यकीय गणिताप्रमाणं माझ्या उंचीनुसार माझं वजन 74 किलो असायला हवं. ते मी कधीही करू शकतो, असा माझा दावा आहे. फक्त त्यासाठी वेळ देऊन पोहायला किंवा चालायला जायला हवं. तेच काही जमत नाहीये.इन्स्ट्रक्टरही अशी असेल, तर
जिमचे पैसे वसूल!
दुसरं म्हणजे, मला जिना चढून दमबिम लागत नाही. पर्वतीही मी एका न थांबता चढतो आणि ट्रेकला
तर कुठेही, कधीही जातो. हल्ली पूर्वीपेक्षा थोडी जास्त फासफुस होते, एवढंच.व्यायामाचे थोडेफार प्रयत्न केले. नाही असं नाही. पण त्रास खूप आहे हो! मध्यंतरी योगासनं शिकलो. पण क्लास संपल्यावर ती बोंबलली. सायकल विकत घेतली, ती चोरीला गेली. आता दैवच मला साथ देत नाही, तर मी जायचं कुठं?तरीही, वजन कमी करायला हवं आणि नियमित व्यायामही करायला हवा, हे खरंच. पण खूप कष्ट आहेत हो! पहाटे उठा, शरीराला श्रम द्या, बूटबिट घ्या, पैसे घालवा!कोण करणार हे सगळं?
----------
Mar 3, 2008
सारखं छातीत दुखतंय!
या नावाचं एक झकास नाटक आहे.मला त्याविषयी बोलायचं नाहीये. मी माझ्या खर्याखुर्या छातीत दुखण्याविषयी सांगणार आहे.गेल्या आठवड्यात एके दिवशी भल्या पहाटे सात वाजता उठलो, तो छातीतलं दुखणं घेऊनच. (म्हणजे, तसं, कॉलेजात, कोवळ्या वयात झालेल्या आणि ह्रुदयाला कायमच्या झालेल्या अनेक भळभळत्या (आणि भलभलत्या) जखमा रोजच त्रास देत असतात, पण तो विषय वेगळा. ते प्लटोनिक दु:ख म्हणा हवं तर!) खरंच माझ्या छातीत दुखत होतं. उभं राहिल्यावर कळ मारत होती, आणि झोपल्यावर तर ती सहन होत नव्हती. (बायको सोडून) तसा कुणाच्या बापाला न घाबरणारा मी जरासा टरकलोच. म्हटलं आधीच या ८४ किलोच्या अवजड देहाचा भार थोडासा हलका करा, म्हणून काही डॉक्तरांनी आणि नतद्रष्ट मित्रांनी दिलेला सल्ला! त्यात हे निमित्त! संपल आता आपलं ऐशोरामी आयुःय! अभिजितराव, उद्यापासून ५ वाजता उठून प्राणायाम-योगासनं वगैरे सुरू करायला लागणार!
त्यातून बायको हा प्राणी आधी स्वतह घाबरण्यासाठी आणि नंतर दुसर्याला घाबरवण्यासाठीच असतो ना!``काही सिरियस तर नसेल ना? आजच डॉक्तरांकडे जाऊन ये.'' आमच्या आदरणीय आणि परमप्रिय अर्धांगिनीचा अर्धांग वायू होईल, असा सल्ला. (म्हणजे ही विम्याच्या पैशांचा हिशेब करायला मोकळी!)मग सकाळीच डॉक्टरांच्या दवाखान्याचे उंबरे झिजवणं आलं! त्यांनी तपासून `अगदी किरकोळ मस्क्युलर पेन आहे' वगैरे सांगितलंच, पण वर आपला एक सुरक्षिततेचा उपाय म्हणून ई.सी.जी. करून घ्या, अशी मेखही मारून ठेवली.
झालं! पुन्हा टेन्शन! काय होईल नि काय नाहीए!शेवटी एका नरससमोर अर्धनग्न होउन (शर्ट काढून...ते कंपल्सरी असतं! इच्छा-अनिच्छेचा सवाल नाही!) छातीला कसल्या-कसल्या त्युबा चिकटवून आणि घाणेरडं, चिकट, बुळबुळीत रोगण लावून ई.सी.जी. करून घेतला.दोण दिवसांनी रिपोर्ट आणला. सगळं काही नॉर्मल होतलं, असं डॉक्टरांकडे जाऊनच कळलं.
निघताना डॉक्टर म्हणाले, `या रिपोर्टची झेरॉक्स काढून ठेवा. म्हणजे, नंतर कधी पुन्हा ई.सी.जी काढाल, तेव्हा तो याच्याशी ताडून पाहता येइल.
मी `तथास्तु' म्हटलं, आणि बाहेर पडलो!
Subscribe to:
Posts (Atom)