Aug 10, 2017

समथिंग `स्पेस`ल

('मुंबई सकाळ'च्या श्रावण विशेष पुरावणीसाठी लिहिलेला लेख क्र. 3)
...


``आई, मी काय म्हणतो, तू यंदा नेहमीसारखी मैत्रिणीकडे जन्माष्टमीला जाणार नाहीयेस?`` वत्सलाबाईंसाठी स्वतः चहा करून आणून दिल्यावर केतन म्हणाला.

``अरे नाही रे बाबा, यंदा तीच घरी नाहीये. जन्माष्टमी बुडणार माझी.``
हे उत्तर ऐकून त्याचा चेहरा पडला.
``तुला नक्की काय हवंय? उगाच ताकाला जाऊन भांडं लपवू नये.``
`` भांडं लपवायचा प्रश्नच येत नाही. हल्ली टेट्रा पॅकमध्येच मिळतं ना ताक!`` त्यानं विनोदाचा प्रयत्न केला.
``बाळा, हेच संस्कार केले का रे मी तुझ्यावर? एवढा वाईट दर्जा आहे तुझ्या विनोदाचा?`` वत्सलाबाईंच्या या वाक्यावर त्याची बोलतीच बंद झाली.
...
रात्री सगळीकडे निजानीज झाल्यावर बेडरूममध्ये मात्र वातावरण एकदम तापलं...अर्थात, जोरदार खडाजंगीमुळे.
``तुला ना, एखाद्याला कसं पटवायचं, कळतच नाही!`` सोनाली धुसफुसत म्हणाली.
``निदान तू तरी हे बोलू नकोस. तीन वर्षांपूर्वीच तुला...``
``आगाऊपणा करू नकोस. मला पटवून खूप मोठा तीरच मारलायंस तू. मी आईला पटवण्याबद्दल बोलतेय.``
``अगं, पण ते बाबा बघून घेतील ना!`` केतनने पंच मारला खरा, पण त्यावर सोनाली फणकाऱ्यानं तोंड फिरवून झोपी गेली, तेव्हा हा पंच आपल्याला आज खूप महागात पडणार, याचा त्याला अंदाज आला.
...
रविवार, कृष्णाष्टमी आणि 15 ऑगस्ट अशा सलग तीन दिवस सुटीच्या काळात फिरायला जाण्याचा खर्च आत्ता शक्य नव्हता, पण निदान रोजच्या धबडग्यातून तरी सोनालीला जरा स्वतःसाठी `स्पेस` हवी होती. सासूबाई घरी असल्या, की अशी मोकळीक घेता येणार नव्हती. पण जन्माष्टमीची आठवण करून देण्याचा प्लॅन तर फसला होता. सासूबाई कुठे जाणार नाहीत हे कळलं आणि सोनाली जरा खट्टूच झाली. अगदी कुठे रिसॉर्टवर गेलो नाही, तरी निदान गाडीतून लांब कुठेतरी चक्कर मारून येऊ, असं त्यानं सुचवलं. सोनालीनं नाइलाजानं त्याला होकार दिला.
अखेर तो सुटीचा दिवस उजाडला. दोघं सकाळी लवकरच गाडीतून फिरायला बाहेर पडली. नेमका अर्ध्या तासातच सोनालीला कुणाचातरी फोन आला आणि तिनं वैतागून गाडी थेट घराकडे वळवायला सांगितली. घरी पोहोचल्यावर ती तातडीने दार उघडून स्वयंपाकघराकडे धावली.
``गॅस सुरू राहिलाय म्हणून आईंचा फोन आला होता. पण इथे तसं काहीच नाहीये! शी! आता पुन्हा कुठे बाहेरही पडता येणार नाही. सगळा मूड गेला!`` मागून आलेल्या केतनला सांगत सोनाली वैतागून खाली बसली. केतनने तिला शांत करण्यासाठी तिच्यासाठी कॉफी केली, तिच्या आवडीची गाणी लावली. आपण आता थेट उद्याच येऊ, असा निरोपही वत्सलाबाईंनी दिला होता. आता पुन्हा बाहेर जायला नको, घरीच एखादी फिल्म बघू, गप्पा मारू, एकमेकांसाठी वेळ देऊ, असं त्यानं ठरवलं. जेवणही त्यानं बाहेरूनच मागवलं. त्या दोघांचा वेळ खूप मजेत गेला.
पार दुसऱ्या दिवशी सकाळी वत्सलाबाई घरी आल्या, तेव्हा सोनालीनं त्यांचं उत्साहात स्वागत केलं, आस्थेनं चौकशी केली. थोड्यावेळाने मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या वत्सलाबाईंनी पुन्हा सोनालीला फोन केला, तेव्हा तिच्या काळजात धस्स झालं.
``काय गं, काल घरात पुरेशी स्पेस मिळालेय, की आजसुद्धा मला वेगळं काहीतरी निमित्त काढून आणखी एखाद्या मैत्रिणीच्या घरी दिवसभर वेळ घालवायला जावं लागणारेय?`` असं वत्सलाबाई म्हणाल्या तेव्हा कालचा त्यांचा फोन, गॅसचं बटण चालू राहिल्याचं निमित्त आणि त्यांच्या अचानक ठरलेल्या कार्यक्रमामागचं कारण सोनालीला कळलं आणि ती कानकोंडी झाली. मग दोघी फोनवरच मनसोक्त हसल्या. खूप `स्पेस`ल होतं ते मनमोकळं हास्य!

- अभिजित पेंढारकर.

(क्रमशः)

No comments: