Aug 10, 2017

हॅशटॅग सूनबाई!

(`मुंबई सकाळ`च्या श्रावण पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 2)

...


सोनाली आज सकाळपासून नेटवर काहीतरी शोधाशोध करत होती, पण तिला हवं ते सापडत नव्हतं. एकदोनदा केतननं तिला विचारायचा प्रयत्न केला, पण तिची प्रतिक्रिया बघून तो खचला. थोड्या वेळानं तीच शोधाशोध थांबवून त्याच्या आसपास घुटमळायला लागली, तेव्हाच तिला काहीतरी हवंय, याचा अंदाज त्याला आला.

``केतन, ऐक ना...`` थोड्याशा लाडिक स्वरात तिनं सुरुवात केली.
``हे बघ, आई घरात आहे आत्ता. तेव्हा आत्ता काही...``
``आगाऊपणा करू नकोस. मला जरा तुझा गायडन्स हवाय.``
`` हे म्हणजे काजव्यानं सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे!``
``चेष्टा पुरे. आमची इकडून अशीच थट्टा होणार असेल, तर एक माणूस कट्टी आहे मग स्वारीशी.`` सोनालीनं पुन्हा `जयश्री गडकर` पवित्रा घेतला.
``सोनाली, मी तुला हवी ती मदत करतो, पण प्लीज साठच्या दशकात शिरू नकोस.`` 
``मला नारळीभात करायचाय, पण प्रॉपर रेसिपीच मिळत नाहीये कुठे.`` सोनाली सकाळपासून कशात गुंतली होती, हे केतनला आत्ता समजलं.
``अगं एवढंच ना? आमच्या आईला विचार. आईच्या हातचा नारळीभात अप्रतिम असतो. तिच्या हातांची चव कुणालाच येणार नाही!`` ज्या वाक्याची सोनालीलाच काय, कुठल्याही सुनेला सर्वाधिक भीती असते, ते वाक्य अखेर केतनने उच्चारून टाकलं. सोनालीनंही तो सल्ला ताबडतोब शिरोधार्य मानला. `तू सांगितलंस, म्हणून जातेय हं,` असं तिला स्वतःच्याच मनाचं समाधान करून घ्यायचं असावं, असं केतनला उगाचच वाटलं.

पुढचे दोन दिवस घरात अधूनमधून नारळीभाताचाच विषय निघत राहिला. सोनाली सासूबाईंकडून नारळीभात करण्याच्या टिप्स घेतेय, त्याबद्दल काही शंका अतिशय सौम्य स्वरात विचारतेय, सासूबाई प्रेमानं तिला समजावतायंत, बदाम, काजू किती घालावेत, कसे चिरावेत असं अगदी साग्रसंगीत वर्णन करतायंत, असं दुर्मिळ दृश्य दिवसातून अनेकदा बघायला मिळालं.

..आणि अखेर तो दिवस उजाडला. सोनाली गेल्या दोन तीन दिवसांत जे काही शिकली होती, त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याची वेळ आता आली होती. तिनं नारळीपौर्णिमेच्या आधीच नारळीभाताचा प्रयोग करून बघितला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. सोनाली स्वतःवरच जाम खूश झाली. आपण केलेल्या नारळीभाताची भरपूर सजावट करून तिनं त्याचे फोटो काढले, स्वतःचे आणि सासूबाईंचे स्वयंपाकघरात फोटो काढले. त्या दिवशी काही तिला ते फेसबुकवर अपलोड करायला वेळ मिळाला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती फोटो अपलोड करण्यासाठी ते सिलेक्ट करत असतानाच मैत्रिणीचा फोन आला.
``अगं, तू नारळीभाताचे फोटो फेसबुकवर अपलोड केलेस का, असं विचारायला मीच तुला फोन करणार होते!`` सोनाली म्हणाली, ``आपल्या सगळ्या ग्रुपचं आजच फोटो टाकायचं ठरलं होतं ना? विसरलीस की काय?``
``मी नाही विसरलेले. पण तू काहीतरी विसरल्येस.`` मैत्रिणीनं सुनावलं, ``आपलं ठरलं होतं, की स्वतः नारळीभात करायला शिकायचं आणि त्याचे फोटो टाकायचे.``
``हो, मग! मी स्वतःच केलाय नारळीभात कुणाचीही मदत घेतलेली नाही.`` सोनालीनं ठसक्यात उत्तर दिलं, पण आपण फोटो अपलोड न करताही हिला आपण सासूबाईंची मदत घेतल्याचं कसं कळलं, असा प्रश्न सोनालीच्या मनात आलाच.
तेवढ्यात मैत्रीण म्हणाली, ``तुझ्या सासूबाईंनी अपलोड केलेत तुमचे दोघींचे नारळीभात करतानाचे फोटो. तुला टॅग केलयं, `सेलिब्रेटिंग श्रावण : सेल्फी विथ सूनबाई`, अशा हॅशटॅगसकट. कुठल्यातरी सिनेमाच्या प्रमोशनसाठीचा फंडा आहे, त्यालाच रिस्पॉन्स दिलाय बहुतेक, तुझ्या सासूबाईंनी!`` मैत्रिणीचं बोलणं संपता संपताच सोनालीनं फेसबुक चेक केलं, तेव्हा तिला सासूबाईंनी अपलोड केलेले त्या दोघींचे फोटो आणि त्यावरच्या ढीगभर कमेंट्स, लाइक्स दिसल्या आणि तिनं कपाळावर हात मारून घेतला. नारळीभात करताना काल सहज म्हणून काढलेले फोटो सासूबाईंनी आपल्या मोबाईलवर मुद्दामहून का मागवून घेतले, याचं गूढ तिला आत्ता उकललं होतं. आता तिचं कडू झालेलं तोंड नारळीभातानं तरी गोड होणार का, हा प्रश्नच होता.

- अभिजित पेंढारकर.


(क्रमशः)

No comments: