Nov 11, 2015

Operation `बाहु`बली

भाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात लावण्यापासून दुस-या दिवशी पहाटे दगडूशेठ गणपती लक्ष्मी रस्त्यावरून जाईपर्यंत मजबूत तंगडतोड करणं, हा वार्षिक सोहळाच होऊन गेला होता. भाड्याच्या घरात राहणं बंद झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर हा उत्साह क्रमाक्रमानं कमी होत गेला. लक्ष्मी रस्त्याच्या श्वासही घेता न येणा-या गर्दीत घुसून एका चौकापासून दुस-या चौकापर्यंत जाणं ही अहमहमिकाही बाद होऊन मुलांसह जायचं, तर आपला टिळक रस्ता बरा, हा विचार पक्का होत गेला. पण टिळक रस्ताही एवढा दगा देईल, याची मला अजिबात कल्पना नव्हती.


यंदाच्या चतुर्दशीला सकाळी फक्त मानाचे गणपती बघायचे आणि संध्याकाळी थोडा वेळ टिळक रस्त्याला चक्कर मारून परत यायचं, असंच नेहमीप्रमाणे ठरवलं होतं. तरीही सकाळी बाहेर पडलोच नाही. दिवसभर घरीच काम केल्यानंतर जरा कंटाळा आला, म्हणून फारसा उत्साह नसतानाही पाय मोकळे करण्यासाठी टिळक रस्त्याला जायचं ठरवलं. सहकुटुंब. निमिषला सकाळी मानाचे गणपती दाखवले होते, त्यामुळे त्याला घरीच ठेवून मी आणि मनस्वी, दोघांनीच जायचं आधी ठरत होतं, पण ते बदलून चौघं जायला निघालो. पर्वतीपर्यंत दुचाकीनं जायचं आणि तिथे जागा मिळेल तिथे गाडी लावून पायी भटकायचं, असा बेत होता. पर्वतीच्या पुलावरच एका बाजूला स्कूटी लावून टिळक रस्त्याच्या दिशेनं चालत निघालो. त्या दिवशी नेहमीपेक्षा गर्दी जास्तच वाटत होती. टिळक रस्ता जवळजवळ येत गेला, तशी ती आणखी वाढत गेली.


एखाद दुसरा गणपती बघून निघू, असाच विचार तेव्हा केला होता. थोडा वेळ एसपी collegeच्या चौकात थांबून रस्ता मोकळा मिळाल्यावर ओलांडून पलीकडे गेलो. काही वेळ थांबल्यानंतर एका मंडळाचा गणपती दृष्टिपथात आला. त्यांचं ढोलपथक ऐकून घरी परतू, असं ठरवलं होतं. ढोलपथक पाहायला पुढे गेलो, तेव्हाच मागून गर्दी वाढायला लागल्याचा अंदाज आला होता. निमिषला कडेवर घेतलं होतं. मनस्वी आणि हर्षदा आमच्या पुढेच, एकत्र होत्या. ढोलपथकाच्या स्वयंघोषित रस्तेसम्राटांनी दो-या लावून पथक पाहायला जमलेल्या लोकांना रस्त्याच्या कडेला रेटायला सुरुवात केली. ह्या लोकांच्या दांडगाईत आपण चेंगरायला नको, म्हणून लगेचच मागे जाऊन रस्त्याच्या कडेला उभं राहण्याचा निर्णय घेतला. एवढ्यात पुढच्या बाजूनं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून रांगा करून येणा-या लोकांनी मधल्या चिंचोळ्या जागेतून समोरच्यांना ढकलत पुढे जायला सुरुवात केली. माझ्या समोर दोन कमी उंचीच्या महिला होत्या. त्यांना या ढकलाढकलीची झळ बसू नये, म्हणून जास्तीत जास्त पाय रोवून त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत होतो. थोडी जागा मोकळी झाल्यावर तसाच मागे येऊन रस्तातून बाजूला जाण्यासाठी निघालो, तेवढ्यात रेटणा-या लोकांचा जोर वाढला. थोडासा बेसावध होतो, त्यामुळे त्या रेट्यानं तसाच पाठमोरा रस्त्यावर पडलो. कडेवर निमिष होता, त्याला वरच्यावर कुणीतरी उचलल्याचं दिसलं. मी पडलो, तिथून अगदी थोडीशी जागा सोडून बाजूला फक्त गर्दीचे पायच दिसत होते. निमिषला वरच्या वर कुणीतरी उचललं आणि कुणाकडे तरी दिलं, एवढंच दिसत होतं. आपटल्यामुळे माझा खांदा अचानक प्रचंड दुखायला लागला होता. काय होतंय, हे मला काही क्षण कळतच नव्हतं. हर्षदा आणि मनस्वी दिसत नव्हत्या, पण निमिषला कुणीतरी हर्षदाकडे दिलं असावं, असं वाटत होतं. पडल्यानंतर उठण्याचीही शुद्ध मला काही क्षण नव्हती. कुणीतरी मला खांद्याला धरून उठवण्याचा प्रयत्न केला, पण मीच त्यांना रोखलं, कारण उजवा खांदा प्रचंड दुखत होता. कसाबसा हात टेकून उठलो, पण आपला उजवा हात उचलताच येत नाहीये, हे जाणवलं. चक्कर आल्यासारखं होत होतं. पुन्हा गर्दीत सापडू नये, म्हणून बाजूला जाऊन दहा मिनिटं शांतपणे उभा राहिलो. हर्षदा, मनस्वी, निमिष एकत्र असतील आणि सुरक्षित असतील, असा फक्त अंदाजच करू शकत होतो. कारण खांद्याच्या असह्य वेदनांमुळे दुसरं काही सुचतच नव्हतं.


थोडं सावरल्यानंतर आजूबाजूला पाहून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोप-यात उभी असलेली हर्षदा दिसली. मनस्वी तिच्याबरोबरच होती आणि मुख्य म्हणजे निमिषही होता. म्हणजे कुणीतरी वरच्या वर त्याला उचलून हर्षदाकडे दिलं असावं, हा माझा अंदाज बरोबर ठरला होता. हायसं वाटलं. मला नक्की काय झालंय, मी असं का करतोय, हे त्यांना कळतच नव्हतं. गर्दीतून मुलांना वाचवण्यासाठी हर्षदा सुरक्षित ठिकाणी उभी राहिली होती. मी प्रत्यक्षात पडल्यानंतर सुमारे दहा-बारा मिनिटांनी आम्ही एकमेकांना भेटलो. माझा हात प्रचंड दुखतोय आणि उचलताही येत नाहीये, हे तिला सांगितलं. त्या गर्दीत नक्की काय करावं, तेच कळत नव्हतं. कदाचित पडल्यामुळे मुकामार लागला असेल, काही वेळानं तो बरा होईल, असं मला वाटलं. सुदैवानं तिथेच एक ambulance होती. माझ्या कोपरालाही आपटलंय आणि जखम होऊन रक्त येतंय, हेही जाणवलं. तातडीनं काहीतरी उपचार घेणं भागच होतं. प्रत्यक्षात मला कोपराची जखम बघताही येत नव्हती, एवढा हात जखडला गेला होता. ambulance मध्ये शिरलो. तिथे doctor असतील आणि आपल्याला नक्की काय झालंय त्याचं निदान होईल, उपचार होतील, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली. तिथे फक्त एक कंपाउंडर होता. त्यानं कोपराच्या जखमेला मलमपट्टी केली आणि हात दुखतोय म्हटल्यावर एका साध्या बँडेज पट्टीनं तो गळ्यात अडकवून टाकला. दुसरा काहीच उपचार तिथे होऊ शकणार नव्हता. आता जवळचं हास्पिटल गाठणं भाग होतं.


गर्दी एवढी होती, की पुढच्याच चौकात सदाशिव पेठेत असलेलं मोडक हास्पिटल आठवलं, तरी तिथे पोहोचण्याचा विचारही करणं शक्य नव्हतं. एवढ्या गर्दीत ते सुरू असेल की नाही, याचीही खात्री नव्हती. त्यामुळे आधी टिळक रस्ता पार करून घराजवळच्या ग्लोबल हास्पिटलमध्ये पोहोचावं, असा विचार केला. एसपी बिर्याणीच्या बाहेरच्या कट्ट्यावर काही वेळ बसून विश्रांती घेतली. दुखणारा हात घेऊन तुफान गर्दीतून रस्ता कसा काढायचा आणि वेदना कशा सहन करायच्या, याचाच विचार डोक्यात सुरू होता. माझ्या कडेवर असताना पडल्यामुळे आणि गर्दीमुळे निमिष आधीच खूप घाबरला होता. मला नक्की काय झालंय, हे समजल्यामुळे हर्षदाही. घरापर्यंत पोहोचण्याचं दिव्य कसं पार पाडायचं, याची चिंता आम्हा दोघांनाही होती. पण आमच्यापेक्षाही जास्त चिंता असलेला माणूस शेजारीच येऊन माझ्याच परवानगीनं `श्रमपरिहारा`साठी बसला, तेव्हा तिथून हलावं, असा विचार मी केला. माझ्या नशीबातला `सश्रम कारावास` मात्र एवढ्या सहजासहजी संपणार नव्हता...!


(क्रमशः)

No comments: