Dec 2, 2010

कुरकुरीत!

""बाबा, बघितलंत का, संजूबाबानं मान्यताला काय भेट दिलेय ती...? रोल्स रॉइस!'' चि. कुरकुरेंनी कधी नव्हे तो पेपर हातात घेतला होता आणि त्यावरून परममूज्यांना चाळवण्याची त्याला हुक्की आली होती.
""हो का? बरं!'' फार उत्सुकता दाखवणं श्री. कुरकुरेंना परवडण्यासारखं नव्हतं.
""अगं बाई, कुठला राईस? बरं झालं आठवलं. तांदूळ पार संपलेत! आणायला झालेत...अहो...''
""अगं आई, राईस नाही. रोल्स रॉइस! अडीच-तीन कोटींची गाडी आहे ती! त्यानं मान्यताला भेट दिली, तिच्या वाढदिवसानिमित्त!'' चि. कुरकुरे चिरकला.
""तिची मान्यता आहे ना एवढ्या खर्चाला? मग आपल्याला काय करायचंय? आम्हाला वाढदिवसाला रोल्स रॉइस काय, साधा जिरा राइस खायला घालत नाही कुणी हॉटेलात!'' सौ. कुरकुरे धुसफुसत म्हणाल्या.
""का? गेल्या आठवड्यातच गेलो होतो ना हॉटेलात? तेव्हा जिरा राइस कशाला, सगळ्यांनी चांगली बिर्याणी चापली होतीत की! एवढ्यात विसरलात?''
""हो! धाकट्या वन्संबाईं आल्या होत्या अमेरिकेहून! तेव्हा आमचं भाग्य उजळलं होतं! उगाच नाही काही! कुणाच्या कोंबड्यानं का होईना, उजाडलं म्हणजे झालं, असं आहे तुमचं!''
""बाबा, कोंबडी पण काय मस्त लागत होती ना त्या दिवशी? एकदम सॉल्लिड!''
""गधड्या, तोंड आवर की जरा! तुझ्या जिभेला काही हाड?'' सौ. कुरकुरे त्याच्या अंगावर वस्सकन ओरडल्या.
""का? हाडं चघळताना नाही जीभ अडखळत तुमची! मग आता तो बोलला तर काय होतंय? ऐकू देत शेजाऱ्यांना काय ऐकायचंय ते!'' श्री. कुरकुरेंनी मघाच्या टोमण्यांचं उट्टं काढलं.
""जाऊ दे. तो विषयच नको. बघू तरी कशी दिसत्येय मान्यता? बाळंतपणानंतर बघितलंच नाही बाई तिला! बाळंतपण चांगलंच मानवलंय नाही? आणि तिची बाळं कशी दिसत नाहीत काखोटीला? आणि हे काय? ओली बाळंतीण ना ही? तशीच फिरत्येय कानाला स्कार्फ वगैरे न बांधता? काय बाई या आया तरी!''
""आई किती चिंता तुला? तिची मुलं सांभाळायला नोकरांची फौज असेल. बाबा, कसलं भारी वाटलं असेल ना मान्यताला? तुम्ही पण अशीच एखादी भेट द्या ना आईला!'' चि. कुरकुरेनं पुन्हा खोडी काढली.
""गाढवा, एकतर अशी एखादी गाडी घ्यायची, तर तुझ्या बापालाच विकावं लागेल. आणि त्या मान्यताला जुळी मुलं झाल्येत म्हणून आनंद साजरा करतायंत ते! आपल्याकडे असं काही निमित्त आहे का आता...?''

Nov 28, 2010

सत्त्वपरीक्षा!

परीक्षणासाठी काल "अग्निपरीक्षा' पाहायचा होता. अलका आठल्येचा सिनेमा असला, तरी आपल्याला कुठलाच सिनेमा वर्ज्य नसल्यानं कंटाळा येण्याचा प्रश्‍नच नव्हता. शुक्रवारी त्याच्या प्रेस शो ला जायला जमलं नव्हतं आणि नंतर दिवसभरातही माझ्या वेळेशी त्याची वेळ जमत नव्हती. शनिवारी काहीही करून सिनेमा पाहणं भागच होतं.
"लक्ष्मीनारायण'ला दुपारी साडेबाराचा खेळ होता. एका कामात अडकल्यानं थिएटरवर पोचायला उशीर झाला. तरीही, जेवूनखाऊन गेलो नव्हतो. खरं तर मला चित्रपटाची सुरुवात वगैरे चुकलेली अजिबात आवडत नाही. सिनेमा सुरू व्हायच्या आधी पंधरा मिनिटं आपण थिएटरच्या आवारात उपस्थित पाहिजे आणि अगदी सुरुवातीच्या "फिल्म्स डिव्हिजन की भेंट'पासून काहीही चुकता कामा नये, असा माझा लहानपणापासूनचा खाक्‍या. पण हल्ली जास्तच बिझी झाल्यामुळं अनेकदा हा दंडक मोडतो. असो. हल्ली कधीतरी सुरुवातीचा सिनेमा चुकला आणि ओळखीचं थिएटर असेल, तर पुढच्या शो च्या वेळी चुकलेला भाग पुन्हा बसून पाहायचा, असेही उद्योग करावे लागतात. अर्थात, वेळ जमणारी असेल, तर! मराठी सिनेमाचे मुळातच दोन-तीन खेळ असतात. तेही कुठल्या कुठल्या लांबच्या थिएटरात! हे गणित कसं जमायचं?
"लक्ष्मीनारायण'च्या दारात पोचलो, तेव्हा एक वाजून पाच मिनिटं झाली होती. थिएटरचं गेट बंद झालं होतं. वॉचमनला विचारलं, तर म्हणाला, "तिकीटविक्री बंद झालेय आता.' मी त्याला समजावून पाहिलं. मी चित्रपट पाहणं कसं महत्त्वाचं आहे आणि उद्याच्या पेपरात परीक्षण आलं नाही, तर कसं आकाश कोसळेल, हेही पटवून पाहिलं. तो बधला नाही. त्यानं कुण्या उपलब्ध वरिष्ठाला बोलावलं. त्याच्यापुढेही मी हीच टेप वाजवल्यानंतरही त्याला पाझर फुटला नाही. मी गेल्या पावली परत आलो.
आज सिनेमा पाहून परीक्षण लिहिणं आवश्‍यकच होतं. एकदा हा आठवडा चुकला, की पुढच्या आठवड्यात पुन्हा सिनेमा पाहण्याची, त्याचं परीक्षण छापून येण्याची आणि मुळात तो थिएटरात टिकण्याची काय गॅरेंटी? तर ते असो. "लक्ष्मीनारायण'ची संधी हुकल्याने नंतर "मंगला'मध्ये सव्वाचा खेळ असल्याचं कळलं. मी जेवणखाण सोडून आलो होतो. त्यामुळे मग जेवण करूनच जायचं ठरवलं. सुदैवानं थेटरवर पोचल्यावर दीडचाच शो असल्याचं कळलं. दहा मिनिटांचाच चित्रपट हुकला होता. त्यानं फारसं काही बिघडलं नाही.
मध्यंतरी आमच्या हक्काच्या "प्रभात'मध्येही एकदा ऍडव्हान्स बुकिंगच्या वेळेनंतर तिकीट काढायला गेलो होतो. नियमांचा निष्ठावान पाईक असलेल्या तिथल्या कर्मचाऱ्यानं वेळ संपून गेलेली असल्यामुळं मला तिकीट देण्यास नकार दिला. खरं तर त्यांचा धंदा वाढवायलाच मी मदत करत होतो. पण त्याला ते मंजूर नसावं.
मी "मल्टिप्लेक्‍स' संस्कृतीच्या बाजूनं नाही, पण तिथे पैसे मोजून का होईना, प्रेक्षकांना मिळणाऱ्या सोयी निश्‍चितच चांगल्या असतात. उरलीसुरली गिऱ्हाइकं टिकवण्यासाठी "एक पडदा'वाल्यांनी त्यांच्या काही सवयी बदलायला नकोत?