Jul 17, 2017

अटी लागू

10.30 am
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या ग्रुपचा सध्या दिवसेंदिवस गुणात्मक ऱ्हास होत चालला आहे. इतर ग्रुप्सपेक्षा आपले वेगळेपण जपण्यासाठी, आपण प्रत्येकाशी बोलून, चर्चा करून, निवडून मोजकेच असे 40 सदस्य ग्रुपमध्ये घेतले होते. परंतु सुरुवातीच्या काळात कुठल्याही विषयावर हिरिरीने आणि अभ्यासपूर्ण चर्चा करणाऱ्या सदस्यांना सध्या टाइमपास आणि चहाटळकीव्यतिरिक्त बोलण्यासाठी काही विषयच राहिलेले नाहीत, असे निदर्शनास आले असून, ही अतिशय गंभीर बाब आहे. आधी कला, साहित्य, राजकारण, सामाजिक समस्या, अर्थव्यवस्था, आर्थिक नियोजन अशा विषयांवर गांभीर्याने चर्चा करणारे सदस्य आता नटनट्यांच्या लफड्यांपासून आपापल्या कपड्यांच्या खरेदीपर्यंत कुठल्याही विषयावर अर्थहीन, चहाटळ, थिल्लर आणि वाह्यात चर्चा करू लागले आहेत, हे खरंच खेदजनक आहे. नाइलाजाने हा ग्रुप काही काळासाठी स्थगित करावा किंवा कायमचा बंद करावा, असा निर्णय घ्यावा लागत आहे. यापैकी योग्य पर्याय निवडून लवकरच जाहीर करण्यात येईल. कृपया कुणी याबद्दल वैयक्तिक गैरसमज करून घेऊ नये. या विषयावर कुठलीही चर्चा पर्सनल चॅटवर करू नये, ही विनंती.``
- आपला ॲडमिन.
....
12.30 pm
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपवरच्या काही गैरप्रकारांबद्दल स्पष्ट मत व्यक्त करून ग्रुप बंद करण्याचा किंवा स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक सदस्यांनी ग्रुपवर किंवा पर्सनली विनंती करून ग्रुप बंद करू नये, अशी मागणी केली आहे. ग्रुपची शिस्त आणि नियम यांसाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीसुद्धा दिली आहे. तरीही, थोड्या प्रमाणात मनोरंजन आणि वैयक्तिक गप्पा होणारच, अशी शक्यताही व्यक्त केली आहे. त्याचबरोबर जास्तच वाह्यातपणा करणाऱ्या सदस्यांना योग्य ताकीद द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. या सर्व सूचनांचा विचार करून ग्रुप बंद करण्याचा निर्णय सध्या घेऊ नये, असा विचार असून, ग्रुपच्या भवितव्याबद्दलचा पुढील निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल.``
- आपला, ॲडमिन.
....
2.30 pm.
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपच्या बिघडलेल्या शिस्तीबद्दल ग्रुपच्या बहुतेक सदस्यांशी वैयक्तिक चर्चा केल्यानंतर काही सदस्यांनी ग्रुपमध्ये थोडा मोकळेपणा असण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जास्त टाइमपास नको, पण अध्येमध्ये हलकेफुलके मेसेज यायला हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या सूचनेचा गंभीरपणे विचार करून, सरसकट सगळ्यांना अशा मेसेजचा त्रास होऊ नये आणि ग्रुपच्या मूळ नियमांना हरताळ फासला जाऊ नये, म्हणून आपल्याच मूळ ग्रुपचा एक सहग्रुप म्हणून वेगळा ग्रुप तयार करावा आणि त्यात या मोकळेपणाला, थोड्याफार टाइमपासला वाव द्यावा, असा विचार समोर आला आहे. या निर्णयाला मान्यता असलेल्या आणि नव्या ग्रुपमध्ये येण्यास इच्छुक असलेल्या सदस्यांनी कृपया पर्सनलवर मेसेज करावा.``
- आपला, ॲडमिन.
....
4.30 pm.
आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपबरोबरच एक नवा सहग्रुप स्थापन करण्याबद्दल काही सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, असा ग्रुप लवकरच तयार करण्यात येईल आणि त्यात इच्छुक सदस्यांना प्रवेश दिला जाईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.
- आपला ॲडमिन.
- ....
4.45 pm.
Admin created new group – `Serious friendship-on tp mode.`
Admin added 38 new members to the group.
सदस्यांच्या मागणीनुसार नवा ग्रुप तयार करण्यात आला असून, केवळ इच्छुक सदस्यांनाच त्यात प्रवेश देण्यात आला आहे. आधीच्या ग्रुपमधल्या एका सदस्याशी काहीच संपर्क होऊ न शकल्याने त्याला या ग्रुपमध्ये घेण्याबद्दलचा निर्णय झाला नाही. बाकी इच्छुकांना ग्रुपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.
आधीच्या ग्रुपची सर्व शिस्त आणि नियम इथे धाब्यावर बसवले जातील, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, ही नम्र विनंती.
- आपला, ॲडमिन.

नशीब


``काय काय नशीबाचे भोग आले नाही, आपल्या वाट्याला? आजचा दिवस कधी बघू शकेन, असं वाटलंच नव्हतं मला.`` ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकत म्हणाली.
``खरंच. माझ्या मनातलं बोललीस. मी तुला मधल्या काळात धीर देत होतो, पण मनातून पार खचून गेलो होतो. आपण कधी एकत्र येऊ, ही आशाच सोडून दिली होती.`` त्यानं हळूच डोळे पुसले.
``नशीब आपल्याला कुठेकुठे घेऊन जातं, नाही? तुला सांगू, नशीब वगैरे गोष्टींवर आधी माझा कधीच विश्वास नव्हता. `माझी वेळ चुकली,` `नशीबात असेल ते मिळतंच`, वगैरे गोष्टींची टर उडवायचे मी एकेकाळी. पण तुझ्याशी भेट झाली आणि मी हळूहळू बदलत गेले.``
``केवढी कचाकचा भांडली होतीस, पहिल्याच दिवशी माझ्याशी, आठवतंय? ह्या मुलीचं पुन्हा आयुष्यात कधी तोंड बघायचं नाही, असं ठरवलं होतं मी!``
``हो, मीसुद्धा!`` ती हसून म्हणाली.
``चोराच्या उलट्या बोंबा!``
``का? तुझी काहीच चूक नव्हती त्या दिवशी?``
``अजिबात नव्हती! रांगेत मीच पुढे होतो. तू उशिरा आली होतीस!``
``आता पुन्हा त्यावरून भांडणारेस का आज माझ्याशी? चार वर्षं झाली त्या गोष्टीला. त्याच्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय साहेब!``
``हो, आपण पुन्हा भेटलो तेव्हा पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यातच अडकलो होतो. तेव्हासुद्धा मला बघून तोंड फिरवलं होतंस तू. पण दुसरा काही पर्यायच नव्हता, म्हणून माझी छत्री, माझा रुमाल, माझी गाडी, सगळंच घेतलंस.``
``आणि तुझं मनसुद्धा, ना?``
``शी! खूपच पांचट होता हा!``
``असू दे. तुझ्याकडूनच शिकलेय!``
``विषय बदलू नकोस. बरं, नेलंस ते नेलंस, दुसऱ्या दिवशी वेळेवर आणूनसुद्धा दिलं नाहीस!`` त्यानं पुन्हा तिची खोडी काढली.
``हो क्का? बरं! मग आत्तासुद्धा तुझीच गाडी घेऊन मी घरी जाते. तू ये चालत.`` ती फणकाऱ्यानं उठली.
``अगं अगं! रागावतेस काय नुकतंच प्रेमात पडल्यासारखी? साडेतीन वर्षं झाली आपण प्रेमात पडून. आज आपलं लग्नसुद्धा झालंय. इथे मस्त समुद्रावर आलोय, जरा बसूया निवांत. गप्पा मारू. घरी जाऊन पुन्हा भांडायचंच आहे! `` त्याच्या या वाक्यावर तिला हसायचं नव्हतं, पण तिला ते आवरता आलं नाही.
``स्वीट रास्कल आहेस तू. कितीही टोकाचं भांडण झालं, तरी दोन मिनिटांत नॉर्मलला येतोस आणि माझी समजूत काढतोस. तुझ्या याच स्वभावावर फिदा झालेय मी.``
``आणि मी तुझ्या वस्सकन अंगावर येण्यावर!`` त्यानं पुन्हा तिला चिमटा काढला.
``आपल्या भांडणाचं काही टेन्शन नाही रे, पण आपल्या घरच्यांची भांडणं कधीच मिटणार नाहीत, याची काळजी वाटतेय मला. माझ्या नशीबात सासरचे आणि माहेरचे दोन्ही नातेवाईक नसणारेत, यापुढे कधीच.``
``थोड्या दिवसांनी होईल सगळं सुरळीत. काळजी नको करू.``
``नाही होणार. मी दोन्ही घरच्यांना ओळखते. त्यांच्या मनातला आपल्याबद्दलचा आणि एकमेकांबद्दलचा राग बघितलाय मी. आणि खोट्या आशेवर जगायला मला नाही आवडत.``
``हं. खरंच आहे. आपल्या नशीबात ते नव्हतं, असं म्हणू आणि आपलं आयुष्य जगायला लागू.``
``करेक्ट बोललास. आणि मला कसलीही खंत नाहीये. घरच्यांचे आशीर्वाद मिळाले नसतील, पण रीतसर रजिस्टर लग्न झालंय आपलं. आता आयुष्यभर तू माझ्याबरोबर आहेस ना, मग बास! तुझी साथ असेल, तर नशीब साथ देईलच!``
ती त्याच्या मिठीत शिरली आणि त्यालाही भरून आलं.
...
संध्याकाळी समुद्राजवळच्या रस्त्यावर भरपूर गर्दी जमली होती. नुकताच एक भीषण अपघात तिथे झाला होता. पोलिसांचा घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. अपघात झालेली बससुद्धा एका इलेक्ट्रिक पोलवर धडकलेल्या अवस्थेत तिथेच उभी होती. तिच्या चाकापाशी रक्ताचं थारोळं साचलेलं दिसत होतं.
कुणीतरी शेजारच्या माणसाला म्हणत होतं, ``दोघं जण गेले म्हणे. आजच लग्न झालं होतं त्यांचं. बिच्चारे! समुद्रावर फिरायला आले होते. घरी जात असताना एकदम बसचे ब्रेक फेल झाले आणि या दोघांना धडक बसली. दोघंही ऑन द स्पॉट खलास!``
शेजारी म्हणाला, ``वाईट झालं. काय तरी नशीब असतं नाही एकेकाचं?``

शेजारधर्म!

``नमस्कार. आत येऊ का?`` दारात उभ्या असलेल्या त्या अनोळखी गृहस्थांनी नम्रपणे विचारणा केली आणि शंतनुनं अदबीनं त्यांना नमस्कार करून दार उघडलं.
``अहो या ना, प्लीज!`` त्यानं दारात उभ्या असलेल्या त्या दांपत्याचं स्वागत केलं, पण हे नक्की कोण आहेत, हा उलगडा काही त्याला झाला नव्हता.
``सॉरी, आपली ओळख नाही आणि आम्ही असे अचानक तुम्हाला न कळवता आलो. डिस्टर्ब तर नाही ना केलं? `` त्यांनी पुन्हा नम्रपणा दाखवला.
``नाही हो. इट्स ओके. बसा ना.`` शंतनुने त्यांना खुर्ची दिली. दोघेही जरा स्थिरावले.
``आम्ही शारंगधर. इथेच, ह्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर राहतो.`` त्या दांपत्यानं खुलासा केला, तेव्हा शंतनुच्या मनातलं प्रश्नचिन्हही दूर झालं.
``अरे, हो का? सॉरी, मी ओळखलं नाही. आम्हीसुद्धा इथे नवीनच आहोत ना, जेमतेम एक महिनाच झालाय आम्हाला इथे येऊन.``
``हो, कळलं आम्हाला अध्यक्षांकडून. म्हणूनच तुमच्याकडे आलोय. आम्हालाही फ्लॅट विकायचाय. त्यासाठी तुमची मदत हवी होती.``
``अवश्य. बोला ना. शेजाऱ्यांना मदत करणं, हे कर्तव्यच आहे आपलं.``
``आम्हाला सोसायटीचा सॅंक्शन्ड प्लॅन पाहिजे होता. तो कुठेच मिळत नाहीये.``
``काय सांगता? सोसायटीकडे पण नाहीये? ``
``नाही. सगळीकडे प्रयत्न केले, कुठेच मिळेना, म्हणून शेवटी तुमच्याकडे आलो. तुमचा नुकताच व्यवहार झालाय, तुमच्याकडे तो नक्की असेल असं वाटलं. ``
``बरं झालं, तुम्ही आमच्याकडे आलात. अहो, आमच्या फ्लॅटच्या व्यवहाराच्या वेळेलाही असाच त्रास झाला होता आम्हाला. घर घेणं म्हणजे बाळंतपण पार पाडण्यासारखंच असतं. सगळा त्रास सहन करावा लागतो!`` बायकोनं आणून दिलेला चहा त्या दोघांना देत शंतनू म्हणाला. त्या दोघांनीही नको नको करत चहा घेतला.
``आम्हाला तर कुणीच मदत केली नव्हती. सगळयांनी अडवणूक केली. एका क्षणी तर आता काही घर होत नाही, असंच वाटून गेलं होतं. अगदी पार माणुसकी विसरून जातात लोक अशा व्यवहारात.`` शंतनूनं त्याची व्यथा सांगितली.
``हो ना.`` शारंगधरांनीही दुजोरा दिला.
``हा मॅप शोधण्यासाठी आम्ही जंगजंग पछाडलं. महापालिकेत खेटे घातले, तिथल्या शिपायाला पैसे देऊन बघितलं, नगरसेवकाचा वशिला लावला, तरीही ढिम्म. शेवटी वैतागून गेलो. मग बॅंकेच्या वकिलानंच पाच हजार रुपये घेऊन करून दिलं आमचं काम. बहुतेक पैशांसाठीच अडवलं होतं!`` शंतनूचा सगळा संताप त्याच्या बोलण्यातून जाणवत होता.
``हे वकील इथून तिथून सारखेच. ग्राहकांना लुबाडण्यातच जन्म जाणार ह्यांचा!`` शारंगधरांनी त्यांचाही अनुभव सांगितला.
``खरंतर आमच्या आधीच्या मालकांनीच हा प्लॅन आम्हाला द्यायला हवा होता. पण काय करणार, गरज आमची होती ना, आमचे हात दगडाखाली होते. बॅंकेचें कर्ज नामंजूर झालं असतं, म्हणून आम्हीच सोसला तो भुर्दंड. अक्कलखाती गेले म्हणायचं, आणि गप्प बसायचं!`` शंतनूनं त्यांच मन मोकळं केलं.
``हो, हे खरंय. पण तुमच्यासारखी माणसं भेटली, की जगात माणुसकी शिल्लक असल्याची खातरी पटते.`` शारंगधर चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाले. एव्हाना शंतनूने तो प्लॅन शोधून त्यांच्यासमोर उलगडला होता. त्यात त्यांचा फ्लॅट स्पष्ट दिसत होता. त्यांचं काम झालं होतं. हा प्लॅन त्यांना चालणार होता. त्यांचा चेहरा एकदम खुलला.
``हेच तर हवं होतं मला. कॉपी काढून घेण्यापुरता मला हा द्याल का?``
``अरे, म्हणजे काय! अर्थातच. काही प्रॉब्लेम नाही. घेऊन जा तुम्ही. ``
``थॅक्यू. थॅंक्यू शंतनू साहेब.``
``अहो थॅंक्यू काय? शेजारी आहात तुम्ही आमचे. एवढं तर करायला हवंच ना माणुसकी म्हणून! `` शंतनूने हसून उत्तर दिलं आणि शारंगधर आणखी कृतकृत्य झाले. असे शेजारी आणखी काही काळ लाभायला पाहिजे होते, आपण उगाच फ्लॅटचा व्यवहार लवकर करतोय, असं त्यांच्या मनाला वाटून गेलं. ते दारातून बाहेर पाऊल टाकणार, तेवढ्यात शंतनूचे पुढचे शब्द त्यांच्या कानावर आले, ``आम्हाला प्लॅनसाठी पाच हजार रुपये पडले होते, म्हणून तेवढेच तुमच्याकडून घेतोय. झेरॉक्स काढून आणल्यावर दिलेत तरी चालतील. काही घाई नाही. माणुसकी सोडलेली नाही आम्ही वकिलांसारखी!``

ता. क.

``माझ्यासाठी हा निकाल अतिशय दुःखदायक होता. अशी कामं करायला कधीकधी जिवावर येतं, पण काय करणार, हा आमचा व्यवसाय आहे. असो. तुमच्या दोघांच्याही भावी आयुष्याला शुभेच्छा. आनंदी राहा.`` खूप जड अंतःकरणाने वकील साहेबांनी प्रणव आणि अवनीला शुभेच्छा दिल्या.
प्रणव आणि अवनीलाही काय बोलावं कळत नव्हतं. त्यांच्या आयुष्यातला हा कदाचित सर्वांत कटू दिवस होता. दोघांनी गेली दोन वर्षं एकमेकांशी खूप चर्चा केली, खूप संवाद साधण्याचा प्रयत्न केला, आपापसातले मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण काही जमलंच नाही. नाइलाजानं तो निर्णय घ्यावा लागला होता...एकमेकांपासून वेगळं होण्याचा.
खरंतर त्या दोघांचा प्रेमविवाह. एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असताना त्यांची ओळख झालेली. ओळखीतून मैत्री, मैत्रीतून प्रेम आणि प्रेमातून लग्न, असा रीतसर प्रवास पाच वर्षांचा होता. प्रेम आंधळं का कसंतरी असतं असं म्हणतात, ते प्रणवला लग्नानंतर जाणवायला लागलं. किरकोळ कारणावरून त्याचे अवनीशी खटके उडायला लागले. अवनीचा अतिव्यवस्थितपणा आणि नियमानुसार वागण्याचा अतिआग्रह हेच आधी त्यांच्यातल्या प्रेमाचं आणि नंतर विसंवादाचं कारण ठरलं होतं. अवनी मराठीची प्राध्यापक. अतिशय बुद्धिमान. तर प्रणव जगण्याकडे हसतखेळत बघणारा, छोट्या चुका नजरेआड करणारा, स्वच्छंदी. हे दक्षिण आणि उत्तर ध्रुव काही एकत्र येऊ शकले नाहीत. आपलं एकमेकांवर प्रेम असलं, तरी आपण एकत्र संसार करू शकत नाही, या निर्णयावर ते आले आणि सामंजस्याने वेगळं व्हायचा निर्णय त्यांनी घेऊन टाकला. पुढील कायदेशीर अडथळेही सुरळीत पार पडले.
घटस्फोट मंजूर झाल्याच्या दिवशी ते पुन्हा भेटले, तेव्हा नाही म्हटलं तरी दोघांच्याही काळजात काहीतरी हललंच. प्रणवनं तिला एक पत्र दिलं. ओळख झाल्यापासून अशी अनेक पत्रं त्यानं तिला लिहिली होती. आजचं हे कदाचित शेवटचं होतं. त्यानं लिहिलं होतं, ``अवनी, तू खूप चांगली आहेस. तुझ्यासारखी व्यक्ती ज्याच्या आयुष्यात असेल, तो खरंच भाग्यवान. काही काळासाठी मला हे भाग्य लाभलं, पण मी दुर्दैवी ठरलो. आयुष्यभरासाठी तुझी सोबत मिळू शकली नाही. पुढच्या काळात तुझी साथ नसली, तरी तुझ्याबरोबर घालवलेल्या काही चांगल्या क्षणांची आठवण काढून मी तो काळ निभावून नेईन.
कायम हसत राहा, सुखी राहा.
ता. क. :
आणि हो, आणखी कुणावर माझ्यासारखंच अमाप प्रेम केलंस, तर माझ्याप्रमाणे त्याच्या व्याकरणाच्या चुका काढत जाऊ नकोस. बाय!``
घरी आल्यावर प्रणवचं ते पत्र पुन्हा पुन्हा वाचताना अवनीचे डोळे भरून आले. आता बरंच काही घडून गेलं होतं, पण हा कटू निर्णय बदलता आला असता का, असा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला. तिनंही हातातली कामं बाजूला ठेवून प्रणवला एक भावनिक पत्र लिहिलं. आजपर्यंतचं कदाचित मायेचा सर्वाधिक ओलावा असलेलं ते पत्र होतं. सगळं पत्र पूर्ण झाल्यावर तिनं लिहिलं,
`ता. क. `व्याकरणा`च्या नाही रे, `शुद्धलेखना`च्या!`

रॉंग नंबर

``हाय!``
``हाय डिअर``
``व्हॉटस अप?``
``हो, व्हॉटस अपवरच आहे मी. बोल ना.``
``अगं, ते माहितेय. व्हॉटस अप म्हणजे, काय चाललंय?``
``बसलेय निवांत. तुला आज माझी कशी काय आठवण?``
``कशी काय म्हणजे काय? मला रोजच तुझी आठवण येते. ``
``खरंच? लव्ह यू डिअर. काय करतोयंस तू? ``
``ऑफिसमध्ये खर्डेघाशी. दुसरं काय करणार? बरं, तू डीपी का ठेवला नाहीयेस? ``
``सहज. तुला माहीत नाही, मी डीपी काढलेला? ``
``अं...अगं नाही, नसेल लक्ष गेलं. सॉरी.
``इटस ओके. पण नावावरून तर कळलं असेलच ना?``
``अगं नाही, मी तुझा नंबर वेगळ्याच नावानं सेव्ह केलाय. एनीवे. ऑफिसमध्ये जरा बोअर झालं म्हणून तुला पिंग केलं. ``
``सो नाइस ऑफ यू! आज एवढं छान वाटतंय ना, पहिल्यांदा बोलतोयंस तू असं.``
``अगं मनात असतं, पण नेहमी बोललं जातंच, असं नाही. You know, I am so lucky to have you in my life. ``
``रिअली?``
``I mean it. योग्य वेळी तू भेटली नसतीस, तर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक!``
``same here. आज तू एवढं मनापासून बोलतोयंस, खरंच खूप बरं वाटतंय. ``
``माझ्यासाठी खूप करतेस तू. मी खरंच त्याची परतफेड नाही करू शकत.``
``It's ok darling. असं बोलून दाखवायची गरज नसते. ``
``डार्लिंग म्हटलंस आणि अंगावर शहारा आला बघ. आता ऑफिसमध्ये लक्ष लागणार नाही माझं. ``
``हं. मग माझी आठवण काढत काम कर, म्हणजे फास्ट काम होईल. ``
``कधी भेटायचं? ``
``तुला वेळ झाला की, जानू. ``
``जानू? इश्श!! खूप वेगळं बोलतोयंस तू आज, सोनू. आता तर तुला भेटायची कधी नव्हे एवढी ओढ लागलेय. ``
``हं. भेटूच. बरं ऐक, एक महत्त्वाचं सांगायचं होतं. ``
``बोल ना. ``
``हे असं लाडिक आणि खाजगी चॅट करणं धोकादायक असतं. अशा नात्यात आपण जास्त काळजी घ्यायला हवी. तू चॅट लगेच डिलीट करून टाकत जा हां!``
``का रे? त्यात कसला एवढा धोका? ``
``अगं, उगाच प्रॉब्लेम नको. तुझ्या ऑफिसमध्ये, घरी कुणी तुझा मोबाईल बघितला तर... ``
``कुणी नाही बघत.``
``तरीही काळजी घे. आणि दुसरं म्हणजे माझ्याशी चॅट करताना चुकून दुसऱ्या कुणाला जाणार नाही, याची काळजी घे. ``
``म्हणजे? ``
``अगं, चुकून आपलं चॅट दुसऱ्या कुणाला गेलं, तर प्रॉब्लेम होऊ शकतात. परवा आमच्या ऑफिसमधल्या एका मित्राचा असाच लोच्या झाला. ``
``काय? ``
``त्याला वाटलं आपण आपल्या गर्लफ्रेंडशी चॅट करतोय आणि चुकून तो बायकोशी बोलत होता. घरी गेल्यावर बायकोनं धू धू धुतला.``
``वा! पण तू हे मला का सांगतोयंस, मला कळलं नाही. नवऱ्याशी काहीही बोलेन मी चॅटवर. कुणाची भीती बाळगायची काय गरज आहे? ``
``डार्लिंग, आपण नवरा-बायको झालो नाहीये अजून. आपल्याला एकत्र येण्यात अनेक अडथळे आहेत. यू बेटर नो. ``
``तू काय बोलतोयंस? बरा आहेस ना? आपलं लग्न होऊन पाच वर्षं झालेयंत राजा! मी प्रणिती बोलतेय, तुझी बायको! मला वाटलं आता नोकरीसाठी मी नाशिकला असते, म्हणून तू माझ्याशी चॅट करत होतास. तुला नक्की कुणाशी बोलायचं होतं?``
(काही मिनिटं स्मशानशांतता....)
``अनिकेत, r u there? Hello…reply immediately. अनिकेत....हे बघ, तू आहेस ऑनलाइन. मला दिसतोयंस तू. उगाच रेंज नाही वगैरे कारणं सांगू नकोस. मला उत्तर दे. थांब...मी उद्याच्या उद्या पुण्याला येतेय. मग करू आपण समोरासमोर चॅटिंग!``

सहानुभूती


``तुला तर माहितीच आहे ना, मी कसा माणूस आहे ते? माझ्यावर विश्वासघाताचा आरोप केलाय तिनं! विश्वासघाताचा आरोप! मी तिला फसवू शकतो का? तिलाच काय, मी कुणालातरी फसवू शकतो का? असा लबाड माणूस वाटतो का मी?`` तो अगदीच सैरभैर झाला होता. खचून गेला होता. त्याला एवढं निराश झालेलं कधीच कुणी बघितलं नव्हतं. तो आत्तापर्यंत कायम स्वाभिमानानं, ताठ मानेनं जगत आला होता. कधी कुठल्याही गोष्टीसाठी कुणावर अवलंबून राहिला नव्हता. आज मात्र त्याची उमेद पार खचली होती. आता तो पुन्हा उभा राहू शकेल की नाही, असंच कुणालाही त्याच्याकडे बघून वाटलं असतं.
``एवढी वर्षं एकत्र राहिलो आम्ही आणि आता ती माझ्यावर असे आरोप करतेय. मी तिला फसवलं, असं सांगून आजच घटस्फोटासाठी अर्ज केलाय तिनं. मी काय करू? तिच्यावरचं प्रेम पुन्हा सिद्ध करून दाखवू का? `` तो पुन्हा रडायला लागला.
``एवढं प्रेम होतं आमचं एकमेकांवर, तरीही तिनं माझ्यावर फसवणुकीचा आरोप केला! मी इमोशनल बोलून कायम सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणाली ती. इमोशन्स वापरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो? मी? तुला तरी पटतं का हे? तुझ्या बाबतीत तरी कधी केलंय का मी असं?`` त्यानं पुन्हा डोळ्यांत पाणी आणून तिला विचारलं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो पुन्हा हमसाहमशी रडायला लागला.
``राजा, तू रडू नकोस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू कधीच अशी दुसऱ्याची भावनिक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार नाहीस रे, माझ्या सोन्या!`` ती त्याच्या केसांतून बोटं फिरवत म्हणाली. तिनं त्याला आधार देण्यासाठी मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रूधारा ओघळायला लागल्या...