Feb 22, 2010

अर्धी-कच्ची "बात'

अचकटविचकट हावभाव करणारी- किंचाळणारी पात्रं, आचरटपणा आणि कशीही भटकणारी कथा... हल्लीच्या "कॉमेडी' चित्रपटांची ही व्याख्या. पण हे सगळं टाळलं, म्हणजे चित्रपट "हलकीफुलकी कॉमेडी' ठरत नाही. "टिप्स'निर्मित "तो बात पक्की' फक्त एवढ्याच पूर्वतयारीवर तसा आव आणतो. त्यामुळे बरीचशी "मेरे यार की शादी है' (मूळचा "माय बेस्ट फ्रेंड्‌स वेडिंग') आणि थोडीफार "दिलवाले दुल्हनियॉं ले जाएंगे'ची ही सुधारित (की बिघडलेली?) आवृत्ती. एक हलकाफुलका चित्रपट असला, तरी "कॉमेडी' किंवा मनोरंजक मात्र म्हणता येत नाही!
राजेश्‍वरी (तब्बू) हिला आपल्या मर्जीनुसार जगण्याची सवय लागली आहे. बहिणीच्या ("निशा' - युविका चौधरी) लग्नासाठी ती राहुल (शर्मन जोशी) या मुलाला हेरते. तो इंजिनिअर होणार आहे, आणि सक्‍सेना घराण्यातला आहे, हा मुख्य निकष. त्यासाठी खटपटी लटपटी करून ती त्या दोघांचं सूत जुळवूनही देते. नंतर अचानक युवराज (वत्सल सेठ) हा इंजिनिअर आणि श्रीमंत मुलगा तिच्या पाहण्यात येतो, म्हणून ती राहुलशी लग्न मोडून त्याच्याशी निशाची सोयरीक जुळविण्याच्या तयारीला लागते. फसवणूक झालेला राहुल भांडणतंटा न करता निशाला मिळविण्यासाठी अनेक उद्योग करतो, त्याचीच ही कथा.
हा केदार शिंदेंचा पहिला हिंदी चित्रपट म्हणून न वाटता, पूर्णतः "टिप्स'चा चित्रपट वाटतो. मुळातच प्रमोद शर्मा यांच्या कथेत आणि विभा सिंग यांच्या पटकथा-संवादांमध्ये काहीच जीव नाही. वधूची बहीण स्वतःच तिचं लग्न मोडून दुसऱ्याच्या ताब्यात तिला देऊ पाहते, एवढाच काय तो वेगळेपणा. चित्रपटात या घरातील घडामोडींच्या पलीकडे विशेष काही घडतही नाही. त्यामुळे एका संथ लयीत आणि कोणतीही उत्कंठा न वाढविता सरळ रेषेत चित्रपट सुरू राहतो. "हलक्‍याफुलक्‍या' शैलीतले विनोदही अपुरेच आहेत. त्यामुळे मनोरंजनाच्या पातळीवरही तो अपेक्षा पूर्ण करत नाही.
तब्बू नेहमीप्रमाणेच प्रसन्न, उत्स्फूर्त. शर्मन जोशी व्यक्तिरेखेत जखडल्यामुळे ठीकच. युविका, अयुब खान, शरद सक्‍सेना ठीकठाक. प्रीतमने "जिस दिन मेरा ब्याह होवेगा'सह बहुतेक गाण्यांत गायकांना किरकिऱ्या आवाजात गाणी म्हणायला लावलीत.
केदार शिंदेंनी त्यांना मिळालेल्या मर्यादित संधीत चमक दाखविली आहे. "सूर्यग्रहण' किंवा राजेश्‍वरी-युवराजची पहिली भेट विशेष उल्लेखनीय. त्यांच्या पुढच्या (हिंदी) चित्रपटाला शुभेच्छा!
---