Oct 27, 2011

आली माझ्या घरी ही दिवाळी

आंबा जसा फळांचा राजा, गुलाब जसा फुलांचा, तशी दिवाळी म्हणजे सणांचा राजा किंवा राणी वाटते मला. लहानपणापासूनच सगळ्यात जास्त आरर्षण दिवाळीचं असायचं. इतर सण सुरू झाले म्हणेपर्यंत संपून जायचे. पण दिवाळी छान चार दिवसांचा सण. त्याची तयारी आठ दिवसांची काय...महिनाभराचीच.
सहामाही परीक्षांच्या आधीच दिवाळीचे वेध लागायचे. परीक्षा कधी एकदा होतेय, असं होऊन जायचं. मग शेवटचा पेपर संपला, की आम्ही त्या दिवशी हमखास एखादा पिक्चर टाकायचो. नाहीतर चिंचीणीखाली, नाहीतर शाळेच्या मैदानात एखादी मॅच ठरलेली. अगदीच काही नसलं तर घरी येऊन मस्त लोळायचं. मग दिवाळीच्या कपड्यांची खरेदी आणि मुख्य म्हणजे फटाके. त्या वेळी 50-60 रुपयांचे फटाकेही दिवाळीभर पुरायचे.
``आम्ही लहानपणी फक्त एक ते दोन रुपयांचे फटाके घ्यायचो....माहितेय?`` असं पालुपद वडील आम्हाला ऐकवायचे. आता मी ते माझ्या मुलीला ऐकवतो. कारण त्या वेळच्या 50-60 रुपयांच्या फटाक्यांची किंमत आता 500 ते 600 रुपये झाली आहे. कालाय तस्मै नमः...असो.
दिवाळीचा किल्ला हाही एक चांगला टाइमपास असायचा. मी कधी फार समरसून किल्ला केला नाही, पण त्यात भुयारं, विहिरी, पाय-या वगैरे करायला मजा यायची. दरवेळी किल्ल्याची जागाही बदलायची. मग कुठे कुठे किल्ले बघायला जाण्याचा कार्यक्रम असायचा. इतर मुलांचे किल्ले बघून आपण फारच पाट्या टाकल्या आहेत, हेही लक्षात यायचं. त्या वेळी दिवसभर मातीत आणि चिखलात रंगून जाण्यात भूषण वाटायचं. मुख्य म्हणजे किल्ल्लासाठी कच्चे साहित्य म्हणजे माती आणि दगड यांची काही कमतरता नव्हती. मावळे इकडून तिकडून जमवले जायचे. आता मुलीसाठी किल्ला करताना मावळे तर विकत आणावे लागतातच, पण मातीही नर्सरीशिवाय दुसरीकडून मिळत नाही.
``यंदा दिवाळीत दिल्लीला जायचं की केरळला?`` असा प्रश्न आम्हाला त्या वेळी पडायचा नाही. कारण पर्यटन म्हणजे केवळ लग्नामुंजीकरता पुणे, मुंबई, बेळगाव किंवा कोल्हापूरला कुठल्यातरी नातेवाइकाच्या घरी मुक्काम ठोकणं, एवढंच आम्हाला माहिती होतं. त्यावेळी लग्नाची धामधूम आटपून आईवडील किंवा एखादा दादा उदार झालाच, तर एखादी बाग किंवा शनिवारवाडा दाखवून आणत असे. तेच आमचं पर्यटन.
फटाके चार दिवस पुरवून वापरण्यात मजा असायची. आधी फटाके आणल्यावर ते उन्हात वाळवण्याचा एक कार्यक्रम असायचा. चांगले तापले, की ते चांगले वाजतात, असा एक (गैर)समज वडीलधा-यांनी करून दिला होता. अॅटमबाॅब सगळ्यात दणदणीत आवाजामुळे आवडते असले, तरी सगळ्यात लाडके फटाके म्हणजे बंदुकीच्या केपा, सापगोळ्या आणि लवंगी बार. लवंगी तर दोन-चार रुपयांना मिळायची, त्यामुळे ती उडवण्यात जास्त समाधान असायचं. बंदुकीच्या केपा आम्ही बंदुकीतून कमी आणि हातोडा किंवा दगडानंच जास्त वाजवल्या. केपा किंवा टिकल्या एकावर एक गठ्ठा करून ठेवायच्या आणि दाणकन त्यावर दगड किंवा हातोडी घालून मोठ्या bomb सारखा मोठा आवाज काढण्यात जी मजा यायची, ती लक्ष्मीबारमध्येही नव्हती.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाक्यांच्या आवाजानेच जाग यायची. इतर वेळी झोपल्यानंतर ढोल वाजवूनही न उठणारा मी, नरक चतुर्दशीला मात्र पहाटे साडेचारलाच कुणीही हाक न मारता टुणकन उठून बसायचो. क्वचित एखाद्या वर्षी पाच वाजता जाग आली, तर फार अपराध्यासारखं वाटायचं. अख्ख्या परिसरात पहिला अॅटमबाॅब आपणच वाजवला पाहिजे, असा एक अलिखित नियम होता. पहिल्या दिवशी फराळ करण्यासाठी देवळात जाऊन येईपर्यंत धीर नसायचा. अशा वेळी देवाला नैवेद्य दाखवण्याच्या पद्धतीचा फार राग यायचा. फराळ झाला, की अकरा-साडेअकरानंतर काय करायचं, हा मोठा प्रश्न असायचा. घरातली मोठी माणसं लवकरच पथारी पसरून झोपून जायची. आम्ही पोरं मात्र बेवारस व्हायचो. खेळायला सवंगडी असले तर ठीक, नाहीतर वेळ जाता जायचा नाही.
फटाके वाजवण्याची मला फार क्रेझ नव्हती. रोज नियम म्हणून फटाके वाजवले जायचे. फार चित्रविचित्र फटाके, बाण वगैरेही कधी लावले नाहीत. लहानपणी एकदा अनावश्यक कुतूहल म्हणून भुईचक्र ज्यावर फिरतात, ती सगळी गोल चक्रं एकदा बसून काढून टाकल्याचं आठवतंय. ती चक्रं चुकून चिटकलेली असावीत, असं वाटलं होतं त्यावेळी. त्यानंतर असा काही मार खाल्ला होता, की विचारू नका.
फटाक्यांची काळी बाजू त्या वेळी कधी लक्षात आली नाही. आता मोठं झाल्यावर ती आली असली, तरी फटाक्यांशिवाय काही दिवाळी जात नाही. दोन वर्षांपूर्वी मनस्वीला घेऊन फटाका वाजवताना एकदा अनपेक्षितपणे भुईनळ्याचा स्फोट होऊन हात भरपूर भाजला होता. डोळ्यापुढे अंधारी आली होती. डोळ्यांना काही झालं नाही ना, असंही क्षणभर वाटून गेलं. फटाक्यांच्या बाबतीतला तो सगळ्यात मोठा अपघात.
गेल्या आठवड्यात मनस्वी घरी आली आणि एकदम बोट उगारून मला धमकी दिल्याच्या सुरात म्हणाली, ``बाबा, मला यंदा जास्त फटाके आणलेस, तर याद रख!`` (टीव्हीवरचे हिंदी कार्यक्रम बघून बिघडलेय कार्टी!)
मी घाबरत घाबरत `का` विचारल्यावर म्हणाली, ``फटाक्यांनी प्रदूषण होतं.`` शाळेतून बहुधा पट्टी पढवली होती. तिचा हा प्रदूषणमुक्तीचा ताप दिवाळी सुरू होईपर्यंतच टिकला. आता सोसायटीतल्या पोरांना ती जमवून आणते, तेव्हा आजच्यापुरते फटाके बास झाले, म्हणून रोज तिच्यामागे कंठशोष करावा लागतोय, हे सांगणे न लगे!