वाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वाघा border ला प्रत्यक्ष जायचा योग आला नव्हता. अगदी हनीमूनच्या वेळी अमृतसरमध्ये राहून सुवर्णमंदिर वगैरे पाहिलं, पण `वाघा`वरचा भारत-पाकिस्तान सैनिकांचा `हनीमून` बघायचा हुकला होता. ती इच्छा या वेळी घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पूर्ण झाली.
साहित्य संमेलनाला जायचं प्लॅनिंग करताना मी, श्रीपाद ब्रह्मे आणि अरविंद तेलकर यांनी मुद्दामच जास्त दिवस राहायचं ठरवलं होतं. म्हणूनच संमेलनाच्या स्पेशल ट्रेनची निवड न करता आम्ही स्वतःचं ट्रेनचं वेगळं बुकिंग केलं आणि संमेलनानंतरही एक दिवस जादा राहायचं ठरवलं, त्यात वाघा आणि इतर ठिकाणी भटकंतीचा उद्देश नक्की होता. 3 ते 5 एप्रिलदरम्यान संमेलन आणि त्यानंतरचा 6 तारखेचा पूर्ण दिवस आमच्या हातात होता. अमृतसरपासून `वाघा` साधारण एक तासाच्या अंतरावर असल्यामुळे जाणं-येणं फार अवघड नव्हतं. संमेलनातच एखाद दिवशी दांडी मारून तिकडे जायचा विचार होता, पण ते काही शक्य झालं नाही. संमेलनात आम्ही रमलो होतो, म्हणूनही असेल कदाचित. शेवटी संमेलन संपल्यानंतर 6 तारखेला दुपारी `वाघा`ला जायचं निश्चित झालं.
कुठल्याही नव्या ठिकाणी जाताना आपण लोकांचे सल्ले ऐकले, तर ते आपल्याला माहिती देण्यापेक्षाही आपल्याला तिथलं सगळंच कसं माहितेय, याची फुशारकी मारण्यात धन्यता मानतात. तिथे केलेला जो शहाणपणा त्यांच्या अंगाशी आला, तो शक्यतो लपवून तुम्ही `असं करू नका अन तसं करू नका,` हे सांगण्यात त्यांना जास्त कौतुक वाटतं. त्यामुळे संमेलनाला आलेल्या आणि मधूनच एका दिवशी ताजे ताजे `वाघा`ला जाऊन आलेल्या सहका-यांचीही असेच सल्ले देण्यासाठी अहमहमिका लागली होती. `किमान दोन तास आधी जाऊन बसा आणि माणशी 120 रुपयांपेक्षा जास्त पैसे प्रवासासाठी देऊ नका,` हे त्यातले दोन सल्ले जास्त मौलिक होते. तरीही आम्ही रिक्षासाठी येणे-जाणे मिळून (तिघांसाठी) सहाशे रुपये मोजून दुपारी दीड वाजताच प्रवासाला सुरुवात केली. सहा आसनी रिक्षामध्ये आम्ही प्रत्येक दोनशे रुपये मोजल्याने मधल्या सीटवर आरामात बसलो होतो. आपला कोटा भरण्यासाठी रिक्षावाल्यानं पुढे आणि मागे आणखी चार प्रवासी (प्रत्येकी शंभर रुपयांत) घेतले होते. त्यांच्यापैकी कुणी मधल्या जागेत ऐसपैस बसलेल्या आम्हा तिघांकडे नुसतं बघितलं, तरी ``दोनशे रुपडे मोजलेत. चिंचोके नाही!`` असा अत्यंत माजुरडा लूक त्यांना द्यायचा आविर्भाव आणला होता.
अमृतसरचे कुजलेल्या कच-याच्या मंद सुवासाने बहरून गेलेले गल्लीबोळ पार करत, उघड्या गटारांच्या समुद्रांचे मंथन करत, रस्त्यावरच्या खड्ड्यांची जाणीव पटायला नको त्या ठिकाणी पटवून घेत कसेबसे आम्ही लाहोरच्या रस्त्याला लागलो आणि तासाभरात पोहोचलो. अटारी गावाची पाटी वाचल्यानंतर खरंच आपण देशाच्या सीमेवर आल्याची जाणीव झाली. सकाळीच केलेल्या खरेदीने लडबडलेल्या बॅगा आमच्याबरोबर होत्या. त्या आत नेता येणार नाहीत, फक्त पैशांचं पाकीट, ओळखपत्र, पैसे, पेन, कॅमेरा, मोबाईल, एवढ्याच गोष्टी नेता येतील, असं तिथे एका दुकानदारानं सांगितल्यावर पहिल्याच घासाला मिठाचा खडा लागल्यासारखं झालं. मग आम्ही मराठी असल्यामुळे आमच्यावर उपकार म्हणून तिथल्या एका मराठी कर्मचा-याच्या ओळखीनं त्यानं आमच्या बॅगा प्रत्येकी 50 रुपये मोजून त्याच्या कपाटरूपी खबदाडात ठेवायची तयारी दाखवली. गडबडीत खाण्याचं सामान तिथेच राहिलं. आम्ही स्वतःबरोबर न्यायला परवानगी असलेल्या वस्तू घेऊन बीएसएफच्या गुहेत शिरलो. साधारण दुपारचे अडीच वाजले होते. इथे पोचण्याच्या गडबडीत दुपारचं जेवण राहिलंच होतं. आत खायला मिळेल, अशा पाट्या असल्यानं आम्ही निश्चिंत होतो. जवानांनी रांगेत उभं केलं, तरी अनेक लोक संधी मिळेल तेव्हा घुसायचा प्रयत्न करून आपलं भारतीय रक्त सिद्ध करत होते. रांगेत आणि उन्हात फार काळ ताटकळत राहावं लागलं नाही. सुमारे पाऊण तास पुढे पुढे सरकल्यानंतर जवानांनी दोन ठिकाणी कसून तपासणी करून आत सोडलं. शेवटची तपासणी पूर्ण झाल्यानंतर मात्र सगळे रांगा सोडून आत गॅलरीत बसण्याची चांगली जागा पटकावण्यासाठी धावत सुटले. सुदैवानं आम्हाला चांगली जागा मिळाली. दुपारी तीनच्या त्या रणरणत्या उन्हात उघड्या गॅलरीत आम्हाला बसायचं होतं. बीटिंग रिट्रीट समारंभ संध्याकाळी साडेपाचला सुरू होणार होता. अडीच तास तसंच बसून राहणं हे एक दिव्यच होतं. तरीही आसपासच्या गर्दीच्या मारामा-या, भांडणं आणि भारत-पाकिस्तान सीमेशिवाय आसपासची `प्रेक्षणीय स्थळं` पाहण्यात दोन तास कमी त्रासाचे गेले. मधल्या काळात आसपास पाऊलही टाकता येणार नाही, एवढी गर्दी झाली होती. त्यातल्या अनेकांना तुडवत एकेक जण जाऊन खाऊन आणि `मोकळे होऊन`ही आलो.
डाव्या बाजूला पाकिस्तानची सीमा आणि त्यांचा प्रांत दिसत होता. काही पावलं चालून गेलं, तर आपण चक्क पाकिस्तानात पोहोचू, ही भावना वेगळीच होती. अर्थात, मध्ये सीमाभिंतीची आणि द्वेषाची कुंपणं होतीच. पलीकडे पाकिस्तानच्या बाजूच्या गॅलरीत फक्त महिलाच दिसत होत्या. इथल्या पुरुषांना हा समारंभ बघण्यात इंटरेस्ट नाही की काय, असं वाटत असतानाच काही वेळानं लक्षात आलं, की तिथे पुरुष आणि महिलांची गॅलरी वेगळी आहे. अगदी समोरासमोर. एकसारखी माती, एकसारखी झाडं, एकसारखी माणसं, तरीही देश दोन, असा विचार करत असतानाच दोन संस्कृतींमधला आणि प्रशासकीय मानसिकतेमधला हा मोठा फरकही बोचणारा होता.
आता इकडची आमची गॅलरी तुडुंब भरून गेली होती. सोमवार होता, तरी एवढी गर्दी, तर शनिवार-रविवारी काय होत असेल, या कल्पनेनंच अंगावर काटा आला. मुलांना घेऊन आलो नाही, ते बरंच झालं, असा विचारही मनात आला. `नामदेव महाराज की जय` अशा टोप्या घालून आलेल्या काही भक्तांनी मध्येच सर्वसामान्य प्रेक्षकांच्या गॅलरीच्या कठड्यांवरून उडी मारून व्हीआयपी गॅलरीत प्रवेश करून आपली देशभक्ती आणखी ठळक केली.
आमच्या गॅलरीसमोर एक रुंद रस्ता होता. त्याच्या एका बाजूला भारताचं मुख्य प्रवेशद्वार आणि डावीकडे पाकिस्तानचं गेट होतं. मध्येच दिल्ली-लाहोर ऐतिहासिक बसही त्याच रस्त्यानं पुढे गेली. सगळ्या प्रवाशांना भारतीय गेटच्या अलीकडे उतरवलं गेलं. बसची तपासणी झाली. सगळे प्रवासी सामान घेऊन ट्रालीवरून ढकलत त्याच रस्त्यावरून पाकिस्तानच्या गेटच्या दिशेने गेले. तिकडे जाऊन पुन्हा तपासणी आणि नंतर ती बस लाहोरच्या दिशेनं रवाना होणार होती. काही वेळानं पाकिस्तानातून आलेले काही प्रवासी अशाच पद्धतीनं भारताच्य हद्दीत आले. हा एक मजेशीर सोहळा होता. नंतर एका ट्रकमधून काही मालही अशाच पद्धतीनं भारतातून पाकिस्तानात गेला.
संध्याकाळी पाच वाजता समोरच्या बीएसएफच्या आफिसमधून एक तरुण लष्करी अधिकारी दोन ध्वज घेऊन बाहेर आला. तोपर्यंत मधल्या काही जवानांनी काही महिलांना रस्त्याच्या मधोमध रांग करून उभं केलं होतं. ते कशासाठी, असा विचार करत असतानाच ह्या बाबानं दोघींच्या हातात ते ध्वज दिले आणि समोर सीमेपर्यंत धावत जायला सांगितलं. भारताच्या सीमेवर आपल्याला सगळ्यांच्या समोर ध्वज घेऊन धावायला मिळतंय, हा आनंद प्रत्येकीच्या चेह-यावरून ओसंडून वाहत होता. चार-पाच आज्याही तिथे आल्या होत्या. त्या ध्वज घेऊन धावल्या, तर बीटिंग रिट्रीटच्या ऐवजी त्यांना अखेरची सलामी देण्याचा सोहळा इथे घडवावा लागेल, अशी भीती त्या अधिका-याला वाटली असावी. त्यानं त्या दोघींना ध्वज दिले नाहीत. तरीही नंतर भांडून भांडून त्यांनी ते मिळवलेच. आणि कसंबसं लुटुलुटू त्या धावल्या. त्यांच्या उत्साहाची कमाल वाटली.
याच्यानंतरचा सोहळा अनपेक्षित आणि धक्कादायकही होता. आधीपासूनच काही देशभक्तीपर हिंदी गाणी स्पीकरवर वाजत होती. आता त्यांचा आवाज वाढला आणि काही महिलांना मध्ये रस्त्यावर नाचायला बोलावण्यात आलं. त्यानंतर bollywood च्या गाण्यांच्या ठेक्यावर पंधरा वीस मिनिटं महिलांचा `देशभक्तिपर` नृत्याचा अनुपम सोहळा पाहताना डोळे दिपून गेले. श्रीपादनं या सगळ्या वातावरणाचं `patriotic tourism` असं बारसं करून टाकलं, तेही अगदी सार्थ होतं.
प्रत्यक्ष बीटिंग रिट्रीट सोहळ्याचं एवढं कौतुक ऐकलं होतं, पण तो काही खास वाटला नाही. दोन्ही देशांच्या सैनिकांनी उगाच उसनं अवसान आणून लाथा झाडत एकमेकांच्या गेटपर्यंत समोरासमोर यायचं, एकमेकांना उगाचच नाटकी आवेश दाखवायचा, `आम्ही तुम्हाला जुमानत नाही`छाप हावभाव करायचे, असा सगळा नाटकी प्रकार सुरू होता. शेवटी गेटवरचे दोन्ही देशांचे ध्वज उतरवून आणि दाणकन दार आपटून ह्या `नाटका`चा समारोप झाला.
गॅलरीतलं वातावरण देशभक्तीने भारून गेलं होतं. लष्करी अधिका-यानं आधीच सूचना दिल्यामुळे कुणी पाकिस्तानचा थेट उद्धार करत नव्हतं, एवढंच. पण प्रत्येकाच्या मनात देशभक्ती संचारली होती.
...सोहळा संपवून परत येताना गॅलरीत बसल्या जागी आपापल्या पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचरा टाकून त्या हजारो देशभक्तांनी आपली देशभक्तीची पातळी सिद्धही केली.
......
`वाघा` सीमेवर जाऊ इच्छिणा-यांसाठी....
- अमृतसरपासून खाजगी वाहनाने जाण्यास सुमारे एक तासाचे अंतर.
- रोज संध्याकाळी 5.30 ते 6 या वेळेत हा सोहळा होतो.
- चांगली जागा मिळण्यासाठी किमान दोन किंवा तीन तास आधी पोहोचणे महत्त्वाचे.
- कमीत कमी सामान न्या. बॅगा आपापल्या गाडीतच ठेवा.
- आत पाणी, काही स्नॅक्स मिळण्याची सोय आहे.
- उन्हाचा त्रास टाळण्यासाठी टोपी, goggle अत्यावश्यक.
- सैन्यदलात कुठेतरी वशिला लावून VIP एन्ट्री मिळवल्यास अधिक उत्तम.
- देशभक्ती सिद्ध करण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध असतील, तर या सोहळ्यासाठी नाही गेलात, तरी चालेल. काही बिघडत नाही!
-