Nov 8, 2016

`काळा` सोकावतो!


 

काळाकुट्ट अंधार.

शेजारी घोरणारं कुणी नाही, की कुठल्या जयंती, वाढदिवसाची `शांताबाई` गोंगाट करत नाहीये.

कुठल्या कुत्र्याचं केकाटणं नाही, की सोसायटीत कुणी रात्रीअपरात्री गाडी चिरचिरत आलेलं नाही.

आणि अचानक `ती`ची चाहूल लागली. `ती`... मदमस्त सुंदरी. रूपगर्विता, मदनाची मंजिरी. जिला पाहताच लाखोंची हृदयं घायाळ होतात, ती. आज मात्र ती अगदी निस्तेज दिसत होती. कुठल्यातरी भयंकर चिंतेचं सावट तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं.

 

तिचा सगळीकडे वावर. अगदी उच्चपदस्थ अधिकाऱ्यापासून गावगुंडापर्यंत प्रत्येकाला घायाळ करणारी ती. अगदी दारूच्या गुत्त्यापासून, डान्स बारपासून पॉश कॉर्पोरेट कल्चरपर्यंत कुठलंच ठिकाण तिला वर्ज्य नाही. उलट सगळीकडे मानाची जागा. प्रत्येक जण तिच्यासाठी जीव टाकायचा. तशी ती मनानं दिलदार. ज्याच्या ताब्यात असेल, त्याचीच होऊन जाणारी. कधी ती कुणाला जगण्यासाठी दोन वेळची रोटी घेऊन द्यायची, तर कधी एखाद्याला संपवण्यासाठीचं हत्यारसुद्धा. तिला कुणाचंच घर निषिद्ध नाही. कुणाला ती निषिद्ध नाही.

 

हां, ती जास्त रमायची ती मात्र जरा मोठ्या वर्तुळांत. एकदा तिथली सवय झाली, की मग ती साध्यासुध्या लोकांशी जरा फटकून वागायची. ते लोक तिला बॅंक किंवा बाजार यापलीकडची दुनिया दाखवत नव्हते. मोठेमोठे लोक मात्र तिला वेगवेगळ्या ठिकाणांची, जागांची, देशविदेशाची सफर घडवायचे.

पण काळाचं चक्र कधी कुणासाठी थांबलंयं का? जो उगवतो, तो कधी ना कधी मावळणारच. तशी तीसुद्धा मावळली अचानक. काल रात्री आठ वाजता. तिलाही कल्पना नव्हती आपली गरज संपल्याची. आणि एखाद्याची गरज संपल्यावर त्याचं काय होतं, हे वास्तव तिलाही भोगावं लागलं. एका क्षणात ती टाकाऊ झाली. फक्त टाकाऊच नाही, तर पांढऱ्या पायाची, अवलक्षणी वगैरे वाटू लागली. ज्यांनी तिला आपल्याकडे आणण्यासाठी खरंच मेहनत घेतली होती, प्रामाणिक कष्ट केले होते, त्यांनी पुन्हा पुन्हा तिला कुरवाळलं, तिचे लाड केले, ती आता कायमची डोळ्यांसमोरून जाणार, यासाठी अश्रूही ढाळले. आणि ज्यांना ती कष्टाशिवाय मिळाली होती, कुणाकडून तरी त्यांनी ती ओरबाडून घेतली होती, त्यांना मात्र तिचं घरात असणंही नकोसं झालं. हिला बदलून आपण दुसऱ्या कुणाला का आणलं नाही, याचवेळी नेमकं का घरी आणलं, असं त्यांना वाटायला लागलं होतं.

 

दया आली बिचारीची. म्हटलं, काय करू तुझ्यासाठी?

उदास चेहऱ्यानं म्हणाली, ``भाऊ, एवढंच करा. जे मला वैतागलेत, त्यांना सांगा, म्हणावं गावात बदनामी झाली तरी चालेल, पण त्या भीतीनं मला नाहीसं करून टाकू नका. हवंतर माझ्या जागी दुसरी आणा, कुणा वैऱ्याला देऊन टाका. पण माझं अस्तित्त्वच नष्ट करू नका. कधीकाळी तुमच्यासाठी खूप काही केलंय, याची आठवण ठेवा. जमलं तर त्यांची आठवण ठेवा, ज्यांना मी फक्त स्वप्नातच दिसते.``

 

तिचं सांत्वन करून उपयोग नव्हता. तिला अखेरची घरघर लागली होती. मी काही बोलणार, एवढ्यात जाग आली. समोरच पाकीट पडलं होतं आणि त्यातून कालच बॅंकेतून काढलेल्या पाचशेच्या दोन करकरीत नोटा डोकावत होत्या. त्यांचं तेजःपुंज रूपही एकाएकी म्हातारं, दीन वाटायला लागलं. खूप उदास वाटलं. पण दुसऱ्याच क्षणी विचार पालटला.

मनाशी म्हटलं, `म्हातारी मेली तरी चालेल, पण `काळा` सोकावायला नको!